पुस्तक अनुभव - स्पर्श

New Novel Sparsha By Nisha Thore

पुस्तक - स्पर्श 

लेखिका - निशा थोरे (अनुप्रिया)

        आपल्या मित्राचं / मैत्रिणीचं लेखन पुस्तक रूपात प्रकशित व्हावं आणि ते पुस्तक हातात असावं, यापरता दुसरा आनंद तो काय! नवोदित लेखिका निशा थोरे यांचं खूप दिवसांपासून प्रतीक्षा असलेलं लेखन पुस्तक रूपात प्रकशित झालं. पुस्तक पाठवून त्यांनी आठवडा उलटला तरी माझ्यापर्यंत काही पोहोचेना. आतुरता कमी होऊ लागली होती. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी दिलेल्या नम्बरवर कॉल केला आणि जवळच्या कुरियर ऑफिसमधून घाईघाईने पुस्तक मिळवलं. इरा ब्लॉगिंगच्या ऑनलाईन व्यासपीठावर उपलब्ध असलेली "स्पर्श" नावाची त्यांची कथा. इरावर अत्यंत कमी किमतीत उपलब्ध असलेलं सब्स्क्रिपशन घेतलं कि, ऑनलाईन वाचता येते. पण कॉम्पुटर किंवा मोबाइल वर वाचण्यापेक्षा ते लेखन पुस्तक रूपानं हातात घेऊन वाचण्यासारखा आनंद नाही.

        निशा मॅडमची पहिली-वहिली कादंबरी हातात पडली आणि एका बैठकीत वाचून काढली. सारंग चव्हाण यांची छोटेखानी प्रस्तावना तुम्हाला कथेचं सारं तुमच्यासमोर मांडून जाते. असं वाटतं, पूर्ण कथाच इथं सांगितली आहे. मग कशाला एवढी मोठी कादंबरी वाचायची? तर असे नाही बरं का! थोडंसं मनाला समजावून वाचायला सुरुवात केली कि, कधी आपण त्या कथेमध्ये गुंतून जातो कळतही नाही. कथेतलं एक एक पात्र आपल्याला जवळचं वाटायला लागतं. प्रत्येक पात्राचा स्वभाव, वागणं, गुण लेखिकेने साध्या साध्या प्रसंगांमध्ये, संवादांमध्ये अत्यंत सहजपणे रेखाटलेले आहेत. लेखन वाचताना तुम्हाला कुठेही कथेची लय हरवली आहे, असे वाटत नाही. किंवा संवादही कुठे बाळबोध किंवा रटाळ वाटत नाहीत. एक एक प्रसंग, संवाद, मनाची घालमेल ज्या पद्धतीने लेखिकेने मांडले आहेत, ते मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाहीत. कुठेतरी आपलं मन त्या त्या पात्रांशी आपली तुलना करू लागतं. जवळीक साधू पाहतं. लेखनामध्ये खरंच एवढी जादू आहे कि, तुम्हाला कथेच्या, लेखनाच्या प्रेमात पडावंसं वाटतं.

        एखादं पात्र जेव्हा स्वतःची बोलतं तेव्हा असं वाटतं कि, खरंच हा किंवा हि स्वतःच मन आपल्यासमोर मोकळं करतोय. त्याचं दुःख, आनंद आपण स्वतः अनुभवतोय असं वाटतं. माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याला होणारे स्पर्श आणि त्या त्या स्पर्शाचे कितीतरी निरनिराळे पैलू, त्यांचा अर्थ ती व्यक्ती आयुष्यभर अनुभवत असते. कादंबरी वाचताना ठिकठिकाणी आपल्याला त्या वेगवेगळ्या स्पर्शांची ओळख होत जाते. त्यांचा अर्थ उमगायला लागतो.

        एखाद्या वस्तूवर, गोष्टीवर, व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो. ती मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. पण जेव्हा आपल्याला समजतं कि, ते कुणा दुसऱ्याचे आहे. आपले कधीच होणार नाही. तेव्हा ते आपण बळजबरीने हिसकावण्याचा प्रयत्न करतो. पण आपण हे विसरतो कि, कुणा दुसऱ्याच्या वाटणीचं सुख हिरावून घेऊन आपण कधीच आनंदी होऊ शकत नाही. तुम्हाला आनंद मिळेलही पण तो तात्पुरता असेल. दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणं, यापेक्षा मोठा आनंद आयुष्यात असूच शकत नाही. घरी एखादं कुरियर, पार्सल, लेटर घेऊन आलेल्या माणसाला आपण पाणी घेणार का म्हणून विचारलं? आणि त्याला पाणी दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर येणारं हसू. एखाद्या लहान मुलाला चॉकलेट दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर तरळणारं निखळ, निरागस हसू. आपल्या लहान लहान गोष्टींतून इतरांच्या चेहऱ्यावर फुलणारं हसू पाहिलं कि, होणारा आनंद तो काय वर्णावा! आणि हेच आपल्याला या कादंबरीमधून शिकायला मिळतं.  

कादंबरीतून आपल्याला शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. 

१. एखाद्या गोष्टीची आस असावी माणसाला. पण एवढीही असू नये कि, त्याची हाव बनावी. 

२. निसटून गेलेल्या गोष्टींसाठी दुःख करत बसण्यापेक्षा त्यातून आनंद शोधला पाहिजे.

३. प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नसतं. आपल्या माणसासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करणं. त्याच्या सुखात आपलं सुख मानणं.

४. राधेचा कृष्ण होणंही सोप्प नाही आणि कृष्णाची राधा होणंही सोप्प नाही. तिथं त्याग, समर्पण, निस्वार्थपणा असेल तरच खऱ्या प्रेमाचा अर्थ कळतो.

५. घडून गेलं ते बदलता येत नाही. पण त्यातून शिकून पुढे येणाऱ्या गोष्टी ठीक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत राहिलं पाहिजे.

       निशा थोरे यांची पुस्तक रूपाने प्रकशित झालेली हि पहिलीच कादंबरी. पण कुठेही नवखेपणा जाणवत नाही. अतिशय सुंदर, प्रतिभाशाली, विचारशील असं लेखन. "स्पर्श" वाचकांची मने नक्कीच जिंकून घेईन आणि मनाला "स्पर्श" करून जाईल यात शंकाच नाही.कादंबरीच्या शेवटी मनाला स्पर्शुन गेलेल्या काही ओळी.

मौनांतले इशारे डोळ्यांत वाच ना रे..

हसतील जाणिवांचे आभास गोड सारे..

         निशा मॅडम तुमचे हार्दिक अभिनंदन! पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा! आणि तुमच्याकडून अशाच आणखी उत्तमोत्त कादंबऱ्या लिहिल्या जाव्यात अशी बाप्पाचरणी प्रार्थना!