ऋणानुबंध... भाग १

'नाती ही प्रेमावर, विश्वासावर बहरतात. ती मायेने फुलतात.' अशाच एका नात्याची हि कथा.

               मधुराने पटापट आवरून आपली बॅग भरली. पुढील तीन दिवस धावपळीचे असणार होते. कामांची यादी तिच्या डोळ्यासमोर राहून राहून येत होती. बॅगमध्ये सर्व वस्तू भरल्या ना? फोन, पॉवर बँक घेतली ना? प्रत्येक प्रश्न तिच्या डोक्यावरील टेन्शन वाढवत होता. आता निघालो नाही तर ट्रेन चुकेल म्हणून तिने बॅग ओढत बाहेर आणून ठेवली. शेवटचं घरात सर्व जागेवर आहे ना? पंखा बंद आहे ना? सगळं बघून ती आपली पर्स आणि बॅग घेऊन दाराला कुलूप लावून ती निघाली.

रिक्षात बसल्यावर तिने पर्स उघडली आणि.....
"अरे देवा. मी महत्वाची गोष्ट विसरलेच घरी. आता काय करू?"
"काका, जरा पाच मिनिट थांबा हा. मी आलेच पटकन."
"ओ ताई! वेटींगचा चार्ज पडेल. आधीच सांगतो, म्हणजे नंतर वाद नको."
"हा, हा. ठीक आहे. आलेच मी."
पर्स हातात घेवून मधुराने धावतच खोली गाठली. खोली उघडल्यावर तिची नजर समोरच्या टेबलवर ठेवलेल्या वस्तूकडे गेली.
"हाश्, नशीब!! मला वाटल आता घाईघाईत कुठे विसरले कोणास ठावूक??आज जर घरी वेळेत पोचले नसते तर आईने पुजाच बांधली असती माझी."
खोली व्यवस्थित लॉक करून ती पुन्हा रिक्षात येवुन बसली. रिक्षा सुरू झाल्यावर किती वाजले ते पाहण्यासाठी तिने मोबाईलच्या घड्याळाकडे नजर टाकली.
"अरे देवा, आईचे दोन मिसकॉल??"
"हॅलो, आई. हो निघाले मी.... अग... नाही चुकणार. मी सांगते ना.......आई, तू बाबांकडे फोन दे. हा बाबा, ऐका ना. मी पोचेन वेळेत. तुम्हाला कॉल करेन उतरले की......हा!...काय??...नको, नको. मी येते तिथून रिक्षा करून... हो, हो.... चला ठेवते. बाय."
"काका, जरा फास्ट घ्या. माझी ट्रेन चुकता नये."
"अरे ताई, काळजी करू नका. बरोबर वेळेत सोडतो तुम्हाला."
रिक्षा स्टेशनला थांबली तसे पैसे देवून आपल सामान घेवून मधुरा आपल्या ट्रेनच्या दिशेने निघाली. थोड्याच वेळात ट्रेन प्लॅटफॉर्मवर येवुन थांबली. आपली सीट चेक करून सामान व्यवस्थित ठेवून मधुरा शांतपणे आपल्या सीटवर बसली.
                 कधी एकदा घरी पोचते आणि आपल्या भाच्याला बघते अस तिला झाल होत. तीन दिवसांनी शांतनूचा म्हणजे तिच्या भाच्याचा उपनयन विधी होता. त्यासाठी स्पेशल सुट्टी घेवून ती घरी निघाली होती. तिला अजूनही आठवत होता तो दिवस जेव्हा तिने श्रध्दाच्या कुशीत शांत झोपलेल्या दोन महिन्याच्या शांतनूला पहिल्यांदा पाहिल होत. ट्रेन स्टेशनला लागली, तशी मधुरा सामान घेवून उतरली. स्टेशनबहेर येऊन रिक्षा शोधणार एवढ्यात तिला "मधू आतू" अशी हाक ऐकू आली. तिने आवाजाच्या दिशेने बघितल तर मिहिर दादा आणि शांतनू त्यांच्या गाडीजवळ उभे होते.
"अरे दादा, तू का आलास उगाच? मी रिक्षा करून येणार होते."
"हा ऐकायलाच तयार नाही. मधू आतू ला आणायला जाऊया म्हणजे जाऊया. तुझ्यावर गेलाय हट्टीपणाच्या बाबतीत अगदी."
"दादा, काय रे? मी कधी...."
"मधू आतू, मधू आतू. माझ्या मुंजीला आलीस ना!! चल ना घरी जाऊया. आईने मला नवीन सदरा घेतलाय. चल ना, चल ना, चल ना लवकर."
"शानू, माझ्या गुड्ड्या. हो, हो. चल जाऊया बाबा घरी." गाडीत गप्पागोष्टी करत ते घरी पोचले. घरी पोचल्यावर शांतनूने ओढतच मधुराला आपल्या बरोबर न्यायला सुरूवात केली. तेव्हा त्याच्या हातात चॉकलेट टेकवून ती पटकन फ्रेश व्हायला गेली. फ्रेश होऊन आल्यावर आई बाबा आणि श्रद्धाशी थोड्या गप्पा झाल्यावर शांतनूच्या खोलीत गेली. ह्या सगळ्यात दिवस असाच निघून गेला. दिवसभराचा प्रवास, शांतनू सोबत मस्ती या सगळ्यामुळे रात्री तिला पटकन झोप लागली. उद्यापासून तशीही सगळी धावपळच होणार होती.
                   सकाळ झाली तशी हळू हळू सगळ्यांना जाग आली. घरात तशीही कामाची आणि कामगारांची वर्दळ सुरू झाली होती. मधुरा फ्रेश झाली आणि तिने विधीसाठी लागणाऱ्या सामानाची लिस्ट चेक करायला घेतली, सोबत श्रद्धा होतीच. दोघींच्या गप्पागोष्टी करत सामान बघण चालल होत. बाबा आणि मिहिर दादा बाहेर कामगारांना सूचना देत होते. आई दुपारच्या जेवणाच पाहत होती. सगळ शांत, आरामात चालू असतानाच नऊ वर्षांचा शांतनू रडत रडत आई जवळ आला.


©Suvi

🎭 Series Post

View all