प्रेम बंध (भाग ४)

प्रेमाचे बंधन


प्रेम बंध (भाग ४) 


शशांक आणि रेखा दोघेही आता एकमेकांशी खूप छान वागत होते. रेखा शशांकची पी. ए. होती त्यामुळे त्याचे दिवसभराचे सारे शेड्यूल रेखाला माहिती असे. तरीही काम आवरल्यानंतरही शशांक रोज उशीरापर्यंत ऑफिसमध्ये का थांबतो हे रेखाला कळत नव्हते. रोज घरून आणलेला डबा तो कुणाला तरी देई आणि स्वतः कॅंटीनमधले काहितरी मागवून खात असे. आई घरी असताना आईच्या हातचे चांगले चविष्ट त्याला खायला मिळेल. पण आईला होईनासे झाल्यावर आणि आई केअरसेंटरला रहायला गेल्यावर त्याचे जेवणाचे फार हाल होत होते. त्याला मसालेदार पदार्थ सहन होत नसतं पण घरातील स्वयंपाकीण बाई ऋतुजाच्या सांगण्याप्रमाणे तिखट मसालेदार जेवण बनवत असे.

एक दिवस शशांकची तब्येत बिघडली. ऑफिसमधेच त्याला पित्ताने उलट्या होऊ लागल्या. त्याने रेखाला सांगून औषध मागवले पण त्याला बरे वाटले नाही. मग तो स्वतः उठून डॉ. कडे निघाला. पण जाताना तो ऑफिसमधेच चक्कर येऊन पडला. ऑफिसमधले सहकारी आणि रेखा सगळ्यांनी मिळून त्याला दवाखान्यात नेले. डॉ. नी त्याला तपासले आणि सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितले. तो औषध घेऊन बाहेर पडला पण घरी गेला नाही. कारण घरी ऋतुजाच्या मैत्रिणींची किटी पार्टी होती. तो परत ऑफिसमधेच गेला. रेखाने " बरं आहे का ? " विचारायला फोन केला तेव्हा तिला तो ऑफिसमधेच असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने गरम गरम भात तूप मेतकूट घालून तयार केला व तो घेऊन ती ऑफिसमधे गेली. तिने जबरदस्तीने शशांकला भात खायला लावला तेव्हा शशांकच्या डोळ्यात पाणी आले. त्याला आईची खूप आठवण झाली. तो रडतो आहे हे बघून रेखाने त्याचे डोळे पुसले आणि त्याला कारण विचारले. तेव्हा शशांकने ऋतुजा बद्दल रेखाला सर्व काही सांगितले. म्हणाला, " लग्न ठरले तेव्हा वाटत होते, ही समंजस साधी असेल, मला आईला सुखाचे चार घास खाऊ घालेल, पण तिला कुठलेच काम आवडत नाही. स्वयंपाक करता येत नाही. मनापासून काही करणे तिला जमत नाही. ती फक्त तिच्या सुखाचा विचार करते. माझ्या आणि आईच्या सुखाशी तिला काही देणे घेणे नाही. फक्त ऐशोआरामाची तिला आ्वड आहे. किटी पार्टी, भिशी आणि यातच ती रमते. आणि घरी असली की सतत टिव्ही लाऊन बसते. मला घरी विश्रांती मिळते शक्यच नाही. " शशांक ऋतुजाच्या वागण्यामुळे हवालदिल झाला होता.

रेखाला शशांक ची परिस्थिती समजल्यावर ती रोज स्वतः बरोबर शशांकसाठी देखील डबा आणू लागली. रेखाच्या हातचे चांगले चविष्ट जेवण शशांकला आवडत होते. सणाच्या दिवशी सुद्धा रेखा त्याच्यासाठी छान गोड पदार्थ करून आणत असे. शशांक रोजच्या प्रमाणे आपला डबा कोणालातरी देऊन टाकत होता आणि रेखाच्या हातचे चविष्ट खात होता. त्यामुळे त्याची तब्येत सुधारली. रेखा स्वतः त्याची काळजी घेत होती. खाणेपिणे औषधे घ्यायला लावणे सगळे रेखा बघत होती. शशांक तसा वयाने फार मोठा झालेला नव्हता. वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षीच त्याने चांगले यश मिळवले होते. व उच्च पदापर्यंत पोचला होता. रेखा ही तशी मोठी नव्हतीच. लग्न झाल्यावर वर्षातच तिला वैधव्य आल्यामुळे ती पोक्त वाटत होती. त्यात तिची रहाणी अगदी साधी होती. लांबसडक केसांची तेल लावून छापून चोपून वेणी, साधीच पण इस्त्री केलेली साडी, शक्यतो दोन्ही खांद्यावरून पदर अशी तिची रहाणी होती. शशांकला तिच्या राहण्यापेक्षा तिच्या वागणुकीमुळे जास्त प्रभावित झाला होता. हळूहळू दोघांनाही एकमेकाचा सहवास आवडू लागला होता. एखाद्या दिवशी ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलाच तर दोघांनाही चैन पडत नसे.

एक दिवस ऋतुजा ने घरी काहीतरी सीन क्रिएट केला. तिला मैत्रिणींबरोबर ट्रीपला देशाबाहेर जायची इच्छा होती. पण पैसे खूप लागणार होते म्हणून शशांकने ऋतुजाला जाण्यासाठी नाही म्हंटले. काहीही समजून न घेता ऋतुजा ने आदळ आपट केली. जोरजोरात ओरडून, मुद्दाम बाहेर ऐकू जाईल अशी मोठ्याने रडू लागली. शशांकला सगळे असह्य झाले. तो ऑफिसमधे निघून गेला. ऑफिसमधे आल्यावर त्याचे आणि रेखाचे बोलणे झाले. रेखा म्हणाली, " सर तुम्हाला इतका त्रास होतो, तर तुम्ही त्यांना घटस्फोट का देत नाही.? "

" हं. तेच जरा आधीच करायला हवे होते. म्हणजे आईला तरी केअर सेंटर मध्ये ही जावे लागले नसते… … ..

पण मी ऋतुजाशी घटस्फोट घेतला तर तू करशील माझ्याशी लग्न? " शशांकने डायरेक्ट विचारले. रेखाने लाजून हसत पायाकडे बघितले, नजर आपोआप खाली गेली.

" आमच्याकडे, आमच्या जातीमध्ये मुलींचे दुसरे लग्न होत नाही, करत नाहीत. " रेखा. शशांक तिच्याजवळ गेला आणि हळू तिच्या हातावर हात ठेवला. ती बावरली. त्याने तिला मिठीत घेतले आणि तिच्या डोक्यावर हलकेच थोपटले. पण सेकंदात दोघे बाजूला झाले, त्यांना आपण ऑफिसमधे असल्याची जाणीव झाली. " मी जात पात मानत नाही. तुझे माझे बंधन प्रेमाचे आहे. हे प्रेमाचे बंधू महत्त्वाचे असतात. " आणि रेखाने गालात हसून त्याला मूक संमती दिली.

त्यानंतर दोघे संध्याकाळचा वेळ एकमेकांबरोबर बाहेर काढू लागले. दररोज कुठेतरी लांब ड्राईव्हवर जायचे, भरपूर गप्पा मारायच्या, एकमेकाच्या सहवासाचा आनंद घ्यायचा. दोघांमध्ये प्रेमाचे बंध दिवसागणिक घट्ट होऊ लागले. प्रेम उमलू लागले, फुलू लागले. कधीतरी शशांक रेखाच्या घरी देखील जात असे. दोघांनाही ख-या प्रेमाची आस होती. रेखाच्या नशीबात लग्नाचे सुख नव्हते, तर शशांकचे लग्न होऊन ही न झाल्याप्रमाणे होते. एकदा शशांक रेखाच्या घरी आला होता. रेखाने मस्त पुरणपोळी केली होती. अनेक दिवसांनी पुरणपोळीच्या जेवणाने शशांक तृप्त झाला. तितक्याच गोड शब्दांनी रेखाने ही त्याला खुश केले. आणि शशांक मोहीत झाला. त्याने रेखाला मिठीत घेतले, तिची हनुवटी वर केली आणि तिचे मुलायम ओठ आपल्या ओठात घेतले. त्याचे ओठ तिच्या खांद्यावर, मानेवर स्पर्धेचे सुख घेऊ लागले. रेखा ही शशांकला प्रतिसाद देऊ लागली. हळूहळू त्याचे हात तिच्या सर्वांगावर फिरू लागले. स्पर्ष सुख काय त्याची चव चाखता चाखता दोघेही एकमेकात गुरफटून गेले, धुंद होऊन गेले, विरघळून गेले. दोघांनीही मिलनातून सुख अनुभवले. आणि मग वारंवार या मिलनाच्या सुखाची चव चाखून अनुभव घेऊन ते तृप्त होऊ लागले.


क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all