प्रेम बंध (भाग ३)

प्रेमाचे बंधन


प्रेम बंध (भाग ३)


शशांकची आई साधी भोळी पण स्वाभिमानी होती. ती कधीही ऋतुजानी तिची सेवा करावी अशी अपेक्षा करत नव्हती. पण निदान ऋतुजाने शशांकचे तरी सगळे व्यवस्थित करावे असे तिला वाटत होते. ऋतुजा नवीन घरात आल्यापासून आणखीन जास्त विचित्र पद्धतीने वागत होती. कधी घरात स्वयंपाक करत होती तर कधी बाहेरून मागवत होती. पण बाहेरून आणलेले तेलकट मसालेदार जेवण आई आणि शशांकला सोसत नव्हते. शेवटी आईला परत स्वयंपाक करायला लागत असे. शशांकला पित्ताचा खूप त्रास होऊ लागला. तो वरचेवर आजारी पडत होता. त्यातच एक दिवस सकाळी फिरायला गेला असताना तो रस्त्यात चक्कर येऊन पडला. नेहमी त्याला वाॅकला बघणा-या लोकांनी त्याला दवाखान्यात नेले. डॉ. नी तपासून बीपी वाढल्याचे सांगितले व विश्रांती घ्यायला सांगितले. पण घरी त्याला विश्रांती मिळत नव्हती. सतत ऋतुजा टिव्ही लाऊन बसत होती. त्याचा त्याला त्रास होत होता. शेवटी त्याने दोनच दिवसांनी ऑफिसला जायला सुरुवात केली.

ऑफिस तर्फे शशांकला एम. बी. ए. करण्यासाठी सुचवले गेले. त्यासाठी ऑफिसने त्याला काही फॅसिलीटीज ही दिल्या. शशांकने त्याचे एम. बी. ए. लवकरच पूर्ण केले. आणि त्याला प्रमोशन मिळाले. तो अकाउंट ऑफिसरचा असिस्टंट मॅनेजर झाला. आईला अतिशय आनंद झाला. ऋतुजाने फक्त फॅसिलीटीज काय मिळणार आणि पगार किती वाढणार याची चौकशी केली.

शशांकला प्रमोशन मिळाले आणि त्याच्यावरची जबाबदारी खूप वाढली. रोज ऑफिसातून यायला उशीर होऊ लागला. प्रमोशन झाल्यावर त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या रेखाचे देखील प्रमोशन झाले व ती शशांकची पर्सनल असिस्टंट म्हणून काम बघू लागली. ती अनेक वर्षे शशांक बरोबर काम करत होती. दोघे एकमेकांना ओळखत होते. शशांकची स्वभाव आपण बरे आणि आपले काम बरे असा होता. तो कधीच कुणाच्या भानगडीत पडत नसे. वेळ पडली तर मदत नक्की करत असे, पण जास्त कोणत्याही गोष्टीत रस घेत नसे. आता रेखा पी. ए. झाल्यामुळे त्यांचे बोलणे जास्त होऊ लागले.

रेखा विधवा होती. ती सुरक्षिततेच्या दृष्टीने माहेरी रहात होती. पण घरीही तिचे पटत नव्हते. भाऊ भावजयीला तिच्या येणारा पैसा हवा होता, पण तिची आयुष्यभर जबाबदारी नको होती. रेखा पण एकटी आणि दुःखी होती. पण शशांकला हे काही इतके दिवस माहिती नव्हते. एक दिवस तिला तिच्या मैत्रिणीशी बोलताना त्याच्या कानावर पडले. शशांकला तिच्याबद्दल दया वाटू लागली.

शशांक रोजच उशिरा घरी जात असे. ऑफिस सुटल्यावर ही तो काम करत बसत असे. कारण घरी जाण्यासाठी त्याचे मन कधी उत्सुक नसे. फक्त आईसाठी त्याला घरी जायची इच्छा होई. एक दिवस तो संध्याकाळी साडेसात वाजता घरी जायला निघाला तेव्हा रेखा ही त्याला काम करताना दिसली. त्याला आश्चर्य वाटले. त्याने तिला जाताना घरी सोडले. दुसऱ्या दिवशी तिला सांगितले, " तुम्ही इतकावेळ ऑफिसमध्ये थांबण्याची गरज नाही. एखादे काम राहिले तरी दुसऱ्या दिवशी करा. मी थांबतो म्हणून तुम्ही थांबले पाहिजे असे नाही. तुम्ही साडेपाचला ऑफिस सुटायच्या वेळीच जात जा. " शशांक.

" सर मी तुमच्यासाठी नाही मला लवकर घरी जायचे नसते म्हणून थांबते. " रेखा म्हणाली.

" पण हे बरोबर नाही. " शशांक.
रेखाच्या डोळ्यात पाणी आले. शशांकने तिला बसायला सांगितले. तिला पाणी दिले. " तुम्हांला दुखवायचे नव्हते. पण आपण दोघेही उशीरापर्यंत थांबलो तर ते बरे दिसत नाही. बाकी कोणीच थांबत नाही. " शशांक म्हणाला.

" एक विधवा निराधार स्री सगळ्यांसाठी अडचण ठरते. सगळ्यांनाच ती नकोशी होते. " रेखा.

" काय झाले? मी काही मदत करू करू शकतो का? " शशांक.

तेव्हा रेखाने तिची कर्म कहाणी त्याला सांगितली. तेव्हापासून शशांक आणि रेखामधे मैत्री झाली. शशांक ही एकाकी होता. त्याची बायको असूनही नसल्यासारखे होती. शशांकने रेखाला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. " आमच्यामधे मुलीचे नवरा लवकर गेला तरी परत लग्न करत नाहीत. " रेखाने सांगितले. ते दोघेही आता एकमेकांशी मोकळेपणाने बोलत होते. शशांकच्या सांगण्यावरून रेखाने वेगळे रहायचा निर्णय घेतला व दोन खोल्या भाड्याने घेऊन ती वेगळी राहू लागली. शशांकच्या सर्व बाजूंनी विचार करून समस्येवर उपाय शोधायची पद्धत रेखाला आवडत होती. त्याचा साधा भोळा स्वभाव आणि सच्चेपणा तिला आवडत होता. तर शशांकला तिचे केअरींग नेचर आवडत होते. दोघांमध्ये हळूहळू चांगले संबंध रुजू पहात होते.

शशांकची आई दिवसेंदिवस आणखी थकली होती. एक दिवस ती शशांकला म्हणाली, " शशांक मला केअर सेंटरला जावेसे वाटते आहे. तुझे आता काम वाढले आहे. मी केअर सेंटरला गेले तर तिथे माझी व्यवस्थित सोय होईल. माझी देखभाल होईल. तुलाही मग माझे टेन्शन रहाणार नाही. आणि तू आठवड्यातून येऊन मला भेटू शकतोस. " शशांक नाही म्हणत होता. पण आईने हट्ट केला व ती केअर सेंटरला रहायला गेली. आई केअर सेंटरला गेल्यावर ऋतुजा ला आनंद झाला. शशांक मात्र आता आणखी उशिरा घरी येऊ लागला. त्याची घराबद्दलच ओढ पूर्ण कमी झाली.

शशांक आणि रेखा रोजच उशिरापर्यंत कामासाठी थांबत होते. एकमेकांबरोबर जास्त वेळ जात होता. अशा परिस्थितीत ते एकमेकांकडे ओढले जाऊ लागले आणि दोघांच्या ही मनात प्रेमाची पालवी आकार घेऊ लागली. असे घडले नसते तरच नवल होते.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all