पण… . हा पण खूप गोंधळ घालतो दरवेळी. ऋतुजा दिसायला जितकी सुंदर तितकीच मनाने काळी कलुषित होती. कुंजकी होती. परिस्थिती प्रमाणे ऋतुजा देखील एटजस्ट करणारी, समंजस असेल असे वाटत होते. पण ती खूप हट्टी हेकेखोर होती. रोज काहीतरी कारण काढून आईशी भांडण होई. शशांकशी पण सारखे खटके उडायचे. सुरवातीला आई गप्प रहायची, असू दे लहान आहे म्हणून सोडून द्यायची. ऋतुजा घरातील एकही काम करायची नाही. तिला कामाची आवड नव्हतीच. सकाळी उठल्यावर हाॅट काॅफी लागायची, ती देखील सुरवातीला शशांकच्या आईने हातात द्यायची. घरातली धुणे, भांडी, केर, फरशी स्वयंपाक सारी कामे आईला करावी लागत होती. तिला " हे काम तू कर" असे आईने सांगितले की ती सरळ सांगायची, " तुम्हांला जमत नसेल तर कामवाली बाई लावा. माझ्या आईवडिलांनी यासाठी मला शिकवले नाही. मी चांगली शिकलेली आहे, मी ही काम करणार नाही." शेवटी शशांकने आणि आईने पडती बाजू घेऊन धुण्याभांड्यासाठी बाई लावली. ऋतुजा हट्टी तशीच उर्मट पण होती. आई स्वयंपाक करायची पण त्यालाही ऋतुजा नाव ठेवायची. काही कमी जास्त झाले की वाकडे बोलायची. सहा महिने हेच चालू होते. शेवटी शशांकने आईला सांगितले " आई हे नको करूस. ती तुझी सून आहे. आजारी असेल तर ठीक आहे पण रोज का तू काॅफी देतेस तिला? तिची तिला करून घेऊ दे. तिने स्वयंपाक केला तरच तिला जेवायला वाढ. तू स्वयंपाक करायचा आणि वर तिने तुलाच बोलायचे हे चालणार नाही. तिला येत नसेल तर तिला शिकव. नुसते घरात लोळत पडायचे हे चालणार नाही. शिकून देखील तिला नोकरी करायची नाहीये. घरातले काम तरी करायला हवे. " हे बोलताना ऋतुजा समोरच होती. तिने बडबड केली. आईने मुलाला माझ्याबद्दल चहाडी केली असा तिने समज करून घेतला. ती माहेरी गेली, पण आईवडिलांनी उलट तिचीच कान उघडणी करून तिला पाठवले. आणि त्यानंतर नाईलाजाने ऋतुजा स्वतःचे स्वतः करून घेऊ लागली. कसातरी स्वयंपाक करू लागली. पण मनापासून, लक्ष देऊन न केल्यामुळे कधी खारट तर कधी आळणी होई. पोळ्या कच्च्या, करपलेल्या करत होती. नीट निगुतीने काम करण तिला जमत नव्हते. भाजी चिरलेला कचरा तसाच पडून रहात असे. स्वयंपाक आवरला तरी ओटा कट्टा कधीही आवडलेला नसे. शेवटी आईला ते सर्व करावे लागे. कधी वेगळे काही पदार्थ करणे तर राहिलेच पण दोन्ही वेळेला भाजी पोळी आमटी भात एवढे चार पदार्थ देखील तिला चविष्ट बनवता येत नव्हते. मग शशांकच्या आईला काहीतरी वेगळे करावे लागत असे. सणावाराला पण सगळे आईच करत असे कारण ऋतुजाला वेगळे काही पदार्थ, पक्वान्न येतच नव्हते. तरीपण तिची मुजोरी कमी नव्हती. शशांक ने आईने केलेल्या पदार्थांचे कौतुक केले की तिला राग येत असे. आई आणि शशांक तिला शक्य तितका सांभाळून घ्यायचा प्रयत्न करत होते. कुठलीही अढी मनात न ठेवता आई तिच्याशी प्रेमाने वागत होती. पण शशांक ने बोलून तिला काम करायला लावल्या नंतर आईच्या बद्दल ऋतुजाच्या मनात ठिणगी पडली ती कायमची.
ती सतत आईचा अपमान करण्याची संधी बघत असे. छोट्या छोट्या कारणावरून घरात आकांडतांडव करत असे. शाल्मली घरी आलेली देखील तिला आवडत नव्हते. शाल्मलीने ही ती नीट वागत नव्हती. घरातील ह्या वातावरणाचा आई आणि शशांक दोघांना ही त्रास होत होता. त्यांना दोघांना एकांत मिळावा म्हणून आई संध्याकाळी शशांक घरी यायच्या वेळी देवळात जात असे तर ऋतुजाची तक्रार असे की काम टाळण्यासाठी त्या देवळात जाऊन बसतात. शशांकला कधीही कामावरून घरी आल्यावर गरम खायला मिळत नसे. कसातरी चहा करून तो ती त्याची समोर ठेवत असे.
प्रत्येकाची आनंदाची व्याख्या निराळी असते. आनंद साजरा करण्याची पद्धत निराळी असते. एखाद्याला रोज पोटभर जेवायला मिळाले तरी आनंद होतो. तर एखाद्याला रोज पक्वान्न जेवायला असले तरी त्याचा आनंद उपभोगता येत नाही. ऋतुजा ह्याला अपवाद नव्हती. गरीब सालस नवरा, शांत समंजस सासू असून देखील ती खूश नव्हती. तिला श्रीमंती थाट, लॅव्हीश रहाणे, ऐशोआरामाची आवड होती. सारखे बाहेर फिरायला जाणे, बाहेर हाॅटेलमधे खाणे तिला आवडत होते. किमती उंची ड्रेस साड्या खरेदी करायची तिला हौस होती. त्यामुळे शशांकच्या साध्या राहणीचा, साध्या वागण्याचा तिला त्रास होत होता.
शशांकला कंपनीत प्रमोशन मिळाले. तो वरच्या पोस्टला गेला. अकाउंट ऑफिसर झाला. पगारात वाढ झाली. आता त्यानी स्वतःचे घर घेण्यासाठी धडपड सुरू केली. बॅंकेकडून कर्ज घेऊन त्यानी नवीन घर घेतले. भाड्याच्या घरातून ते स्वतःच्या घरात रहायला गेले. शशांकने स्वतःच्या कष्टाने, मेहनतीने स्वतःचे घर केले. नवीन घर नवीन वास्तू, आता तरी लाभेल आणि ऋतुजाच्या वागण्यात बदल होईल असे त्याला वाटत होते. पण नवीन घरात आल्यावर नवीन खरेदी नवीन मैत्रीणी भिशी, किटी पार्टी यातच तिचा वेळ जाऊ लागला. शशांक साठी ही तिच्याकडे वेळ नव्हताच. आई आणि शशांकला भपका श्रीमंती देखावा अजिबात आवडत नव्हता. त्यांची रहाणी अगदी साधी होती. शशांक नवनवीन शिकत पुढे जात होता. नवनवीन अडथळे पार करत होता. प्रगतीचा एकेक टप्पा गाठत होता. पण हे अडथळे पार करताना त्याच्याबरोबर ऋतुजा नव्हती. ती तिचे आयुष्य मजेत घालवत होती, जगत होती.
शशांकने स्वतःला कामामध्ये गुंतवून घेतले होते. त्याचे ऑफिसचे काम आणि सी. ए.च्या मदतीने करत असलेले जास्तीचे काम जे तो घरातून करत होता, त्यात त्याने स्वतःला बिझी करून घेतले होते. काम करून तो स्वतःच्या भविष्य सुरक्षित करण्यासाठी पैसे साठवत होता. आणि त्याच्या पैशावर ऋतुजा मजा करत होती.
इकडे आई थकत होती. जरी कामाला बायका होत्या तरी तिला एकटीला घरात रहाणे जड जात होते. वयाप्रमाणे तिची स्मरणशक्ती कमी होत होती. कधी गॅस तसाच चालू रहात होता तर कधी खोलीतला दिवा बंद करायचा विसरत होता. बी. पी. डायबेटिस सारखे आजार मागे लागले होते. वरचेवर चक्कर येत होती. पण स्वतःला सांभाळून ती रहात होती. वेळेवर औषध घेत होती. शक्यतो आपल्यामुळे शशांकला आणखी त्रास होऊ नये असे तिला वाटत होते. ऋतुजा घरी असली की तिचा सगळा वेळ टिव्ही बघण्यात जात असे. आईला तिचा काही उपयोग, मदत होत नव्हती. आईचे अस्तित्व ऋतुजाच्या गणतीतच नव्हते.