Feb 27, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

प्रेम बंध (भाग १)

Read Later
प्रेम बंध (भाग १)


अष्टपैलूलेखक महासंग्राम स्पर्धा
पहिली फेरी- कथामालिकाप्रेम बंध (भाग १)


( ही कथा पुर्णपणे काल्पनिक आहे.)

शशांक कुलकर्णी, त्याच्या केबीन मधे डोळे मिटून शांत बसला होता. झालेला सगळा व्यवहार फायद्या पेक्षा त्याला भावनिक दृष्ट्या जास्त शांतता देणारा होता. त्याच्या वडीलांचे असलेले दुकान त्यांच्या पार्टनरने त्यांना फसवून स्वतःच्या नावावर करून घेतले होते. बिझनेस ही बळकावला होता. तेच दुकान स्वतःच्या नावावर करून घेताना त्याला खूप आनंद झाला होता. त्याला आई वडीलांची आठवण येत होती. महत प्रयत्नाने त्याने ते दुकान मिळवले होते. ते दुकान खरेदी करण्याची आर्थिक तयारी तो खूप आधीपासून करत होता. आणि आज त्याचे ते स्वप्न साकार झाले होते.

भूतकाळ

शशांकचे वडील शरदराव यांनी स्वतःच्या हिंमतीवर बिझनेस उभा केला होता. त्यांचा एक मित्र देखील त्यांच्या बरोबर पार्टनर होता. दुकान शरद रावांच्या नावावर होते पण बिझनेस मधे त्यांच्या मित्राची रघूची पन्नास टक्के पार्टनरशीप होती. रघू अत्यंत धूर्त आणि बनेल माणूस होता. तो इतका गोडबोल्या होता की तो कधी आपल्याला फसवून सगळा बिझनेस गिळंकृत करेल असे शरदरावांच्या मनातही आले नाही. सुरवातीला रघू फार लक्ष घालत नसे. शरदरावांना फक्त आर्थिक मदत करत असे. पण बिझनेस म्हंटल की गुंतवणूक आणि फायदा आलाच. शरदराव अखंड कष्ट करत होते. बिझनेस नावारूपाला आला तशी त्यात गुंतवणूक ही वाढवावी लागत होती. आणि रघू ती आर्थिक गुंतवणूक करत होता. कारण त्याच्याकडे गुंतवणूक करायला आर्थिक पाठबळ भरपूर होते. रघू आणि शरदरावांमधे काही आर्थिक व्यवहार झाला की रघू गोड बोलून कागदपत्रे स्वतःकडे घ्यायचा. शरदराव भोळेपणाने सर्व कागदपत्रे त्याच्याकडे देऊन बसले आणि रघुने हळूहळू शरद रावांच्या नकळत दुकान आपल्या नावावर करून घेतले. बिझनेसमधील पार्टनरशिप रद्द करून तो स्वतःच्या नावावर करून घेतला. बिझनेस हातातून गेल्यानंतर शरदरावांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आणि त्यांना वेडाचे झटके येऊ लागले. ते स्वतःला विसरत होते, मुलांना त्यांच्या आईला विसरत होते. कधीतरी त्यांना सगळे आठवले तर लहानमुलासारखे रडत होते. तेव्हा शशांक फक्त चौदा वर्षांचा होता. नववीत शिकत होता. त्याची आता शिक्षणाची महत्वाची वर्ष होती, पण तो अभ्यासात लक्ष देऊ शकत नव्हता. वडिलांकडे त्याला लक्ष द्यावे लागत होते. आई बरोबर त्यालाही वडीलांना घेऊन दवाखान्यात जावे लागत होते. परिस्थिती हालाखीची होती. वडीलांचा औषधाचा खर्चही खूप होता. त्यांना मेंटल असायलम मधे एडमीट करणे गरजेचे होते, पण इतका खर्च करणार कसा आणि कुठून? घरात मिळवणारे कोणीच नाही आणि हातात साठलेला पैसाही नाही. आईचे स्त्री धन कर्जापाई खर्ची पडले होते. वडीलांनी साठवलेल्या थोड्या पैशावर कशीतरी गुजराण चालली होती. कसेतरी दिवस जात होते. त्यामुळे वडीलांना नीट ट्रिटमेंट देता आली नाही. दिवसेंदिवस वडिलांचे आजारपण वाढत गेले आणि त्यातच एका अपघातात त्यांचे निधन झाले. मुले पोरकी झाली. आईच्या कपाळाचे कुंकू पुसले गेले. या सगळ्यात शशांकची महत्वाची वर्षे मागे पडली. रोजची खाण्यापिण्याची भ्रांत होतीच. सगळे कसे निभवायचे हा मोठा प्रश्न शशांक आणि त्याच्या आई समोर होता. सगळ्या नातेवाईकांनी अंग काढून घेतले. प्रत्येकाला आपापली काळजी होती. शशांक आई आणि शाल्मलीची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नव्हते. सगळे मागे सारून दोघांनी पुन्हा उभे रहायचे ठरवले. आई घरोघरी पोळ्या, स्वयंपाक करायला जाऊ लागली. शशांक पेपर टाकणे, दुधाचा रतीब घालणे अशी कामे करत होता, पण शाल्मलीला मात्र त्यांनी कुठे कामाला पाठवले नाही. पण घरातल्या छोट्या छोट्या कामात आईला मदत करत असे. हळूहळू सगळे सावरत होते. शशांक ने काम करताकरता बाहेरून मॅट्रिक ची परीक्षा दिली आणि तो चांगल्या मार्कांनी पास झाला. पुढे त्याने काॅमर्सला एडमिशन घेतली आणि बी. काॅम व्हायचे ठरवले. काम करता करता तो शिकत होता. शाल्मलीलाही परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. तीही घरबसल्या शिकवण्या घेत होती. आई सकाळ संध्याकाळ पोळ्याची कामे करून दोघांना शिकवत होती. इतके कष्ट करून आईने शशांक आणि शाल्मलीला मोठे केले. दोघांनी आईच्या कष्टाचे चीज केले. दोघेही फस्टक्लास ग्रॅज्युएट झाले. शशांकला एका मल्टी नॅशनल कंपनीत नोकरी लागली, तर शाल्मलीला कोऑपरेटिव्ह बॅंकेत नोकरी लागली.

आता शाल्मली लग्नाच्या वयाची झाली होती. तिला साजेसे स्थळ पाहून तिचे लग्न करून द्यायचे आईच्या मनाने घेतले. तिच्यासाठी वर संशोधन सुरू झाले. तिच्याच बॅकेत काम करणारे कल्पेश जोशी यांचे स्थळ सांगून आले. सगळे काही नीट आहे ना बघून, चौकशी करून शशांक आणि आईने चांगले लग्न करून दिले. त्यासाठी शशांकच्या ऑफिसातून त्याला कर्ज घ्यावे लागले. पण थोड्याच दिवसात आपण ते फेडून टाकू याची शशांक ला खात्री होती. सगळे सेटल झाले. शाल्मली तिच्या सासरी खूश होती. शशांक आईचे रोजचे रूटीन व्यवस्थित चालू होते.

शशांकचे आयुष्य

दरम्यान शशांकचे लग्न करायचे आईने मनावर घेतले. त्याच्यासाठी स्थळ शोधणे चालू होते. शशांक नोकरीत पर्मनंट झालेला होता. अकाउंटंट म्हणून त्याचा चांगला जम बसला होता. शिवाय एका सी ए च्या मदतीने तो दोन फर्म ची अकाउंट रायटिंग करत होता. ब-यापैकी पैसे मिळवत होता. त्याला एक चांगले स्थळ सांगून आले. ऋतुजा देसाई, दिसायला देखणी होती. संस्कारात वाटली आणि आईने आणि शशांकने होकार दिला. शशांकचे लग्न झाले. आईने आणि शशांक ने ऋतुजाची सगळी हौसमोज केली. तिला मोत्याच्या दागिन्यांना सजवली. लग्नही अगदी छान झाले. तो खुश होता. आईला त्याने आता आराम करायला लावला होता. तिने सुनेच्या सहवासात निवांत रहावे, सुन्नी तिची सेवा करावी, आईला विश्रांती द्यावी असे त्याला वाटत होते. शशांकचे आणि आईचे आत्तापर्यंत आयुष्य खूप कष्टात गेले होते. आता आईला चार सुखाचे दिवस पहायला मिळत होते. ऋतुजा शशांकची बायको अगदी नक्षत्रासारखी होती. दिसायला खूप सुंदर. ग्रॅज्युएट झालेली होती. हुशार होती. त्यांच्याकडची परिस्थितीपण खाऊन पिऊन सुखी अशीच होती. पण… ..


क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Harshali Karve

Housewife

Like writing, music and read Stories

//