बोलीभाषा संवर्धन

बोलीभाषे बद्दल अभिमान
विविध संस्कृती ने नटलेल्या माझ्या ह्या महाराष्ट्राच्या मातीचा मला सार्थ अभिमान आहे. नशिबाने ह्या मातीचा गंध आपल्या तनामनात दरवळत आहे. ह्या मातीच्या गंधात अनेक हळव्या, अलवार, कणखर, रांगड्या तसेच लोभस अश्या भाषांचा एक आगळावेगळा परंतु सर्वांना हवाहवास वाटणारा लोभसपणा आहे.

जसजशी गावाची सीमा बदलत जाते तसतशी बोलीभाषा तीचे रूप अलवार बदलत जाते. कधी ती धारदार वाटते, तर कधी अगदीच मधाळ होते. ही गंमत पाहण्यासाठी मला एकदा नक्कीच पूर्ण महाराष्ट्राची सफर करायची आहे. महाराष्ट्र म्हटला की सर्व जगाला तिथे मराठी भाषाच आहे असं वाटत. परंतु माझी ही माय मराठी कितीतरी विविध ढंगात महाराष्ट्रात अगदी शानदाररित्या वावरते हे कोणाला सहज कळणारच नाही.
ह्या माझ्या मराठी भाषेची गोडी चाखायची म्हणजे जिभेला एक योग्य वळण लावावच लागतं, नाहीतर "ल" आणि "ळ" ची सांगड नाही बसली की मग माझी ही माय रुसून बसते हा. म्हणून अगदी लहानपणापासून आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली योग्यरीत्या वाचनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. शालेय शिक्षणात हिची साथ खूपच होती, पण त्या वेळीच हिच्या इतर सख्या म्हणजे हिंदी आणि इंग्रजी ह्याही माझ्या जीवनात डोकावू लागल्या. कॉलेज जीवनात माझी माय मराठी थोडी हिरमुसलेली कारण तिला वाटले की मी तीला विसरून हिंदी आणि इंग्रजी भाषेचा हात धरेन. पण तसे झाले नाही जसजशी मोठी होत गेले तसतशी इतर भाषांच्या सानिध्यात राहूनही ही माझी मराठी भाषा मला अधिकाधीक आवडू लागली. कितीही काही झालं तरी तीचा हाथ मी माझ्या खाजगी तसेच व्यवहारी जीवनातही सोडला नाही.

उलट तिची संगत एवढी आवडायला लागली की वाचना सोबत लेखनही करू लागले. तिचे च एक रूप म्हणजे गावाकडची मालवणी भाषा ही मला अतिशय गोड वाटू लागली. मराठी भाषेचे संवर्धन करायचं अस मनात पक्के झालं आणि चमत्कार म्हणजे माझा कल अधिकाधिक लेखन करण्याकडे झुकत गेला. मराठी भाषेचा खोल अभ्यास करताना व्याकरणाचा एक एक टप्पा ही पार करायची कसरत नकळतपणे चालू झाली. मराठी भाषेतील साहित्य अधिकाधिक हाताळण्यासाठी अनेक नावाजलेल्या साहित्यिकांची पुस्तके नजरेसमोरून जाऊ लागली. मराठी भाषेचीच रूपे मालवणी, कोकणी,वऱ्हाडी, खान्देशी अशी अनेक भाषा ऐकणे तसेच वाचण्याचा सराव करण्याची गोडी स्वतःमध्ये निर्माण करून घेतली. बहुरंगी असणारी भाषा कोणत्याही अमराठी भाषिकांच्या समोर गर्वाने उच्चारताना जो काही परमानंद होतो ना, तो इथे शब्दात नाही मांडता येणार. अभिमान आहे मला मी मराठी आहे ह्याचा. हीच माझी माय मराठी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापराक्रमी, संस्कारशील योध्याला घडवून गेली. अनेक साधू संतांनी हिला डोईवर घेऊन मिरवले आणि साक्षात भगवंतांही ह्या भाषेचा गोडवा चाखावासा वाटला. अशा ह्या माय मराठीचे संवर्धन करणे ही केवळ माझी जबाबदारी नसून माझं आद्य कर्त्याव्यच आहे असे मी मानते.
#कृष्णवेडी
सौ.प्राजक्ता हेदे (बोवलेकर)