बोललो असतो तर

हातात मोबाईल असुन सुद्धा फक्त असलेल्या अगोदर मुळे ब-याच जणांशी बोलणे करत नाही आपण. वेळ निघुन गेल्यावर ढाळलेल्या अश्रुंचा काही फायदा होत नाही.

त्याचा गाडीचा स्पीड आज १४० ते १५० किमी प्रती तास इतका होता.

त्याला गाडी फास्ट चालवायला आवडायची पण घरातले आणि त्याचे मित्र त्याला भांडायचे म्हणून तो नेहमीच मर्यादेत गाडीचा स्पीड ठेवायचा.

पण आजची गोष्ट वेगळी होती. आज गाडीत त्याची आई आणि बायको दोघेही होते. तरी गाडीचा स्पीड वाढलेला होता. त्याला लवकरात लवकर पोहोचायच होत. 

घाटाच्या भागात तो स्पीड ८० वर आला बाकी तो १४० च्या वरच होता.

त्याची आई आणि बायको गाडीत जरी शांत बसल्या होत्या तरी मनात मात्र भावनांचा पुर आलेला होता.

त्याची अवस्था काही वेगळी नव्हती. पण त्याला भावनेच्या आहारी जाउन चालणार नव्हते. कारण रस्त्यावर चालायला भावना नाही तर सतर्कता आवश्यक असते.

त्यात डोक पुर्ण थंड ठेवल होत इतक की कोणी हात लावला असता तर बर्फ ठेवण्यासारखी वाटल असत.

नेहमी त्याच रस्त्याने गावाला जाताना ते नेहमी एक स्टॉप घ्यायचे, नाश्ता करण्यासाठी. पण आज तो नॉनस्टॉप चालला होता.

साधारणतः २.३० तास लागतात त्याला गावाला पोहोचायला. आज तो १.३० तासात पोहोचला होता.

पण तरी उशीर झाला त्यांना. सगळ आटपल होत.

कोरोना ने त्यांच्या घरातला एक घास उचलला होता.

इतका वेळ त्याच्या आई आणि बायकोने बांधून ठेवलेला अश्रूंचा बांध आता फुटला होता.

शेवटच पहायला मिळाले म्हणून एवढा आटापीटा करत आला, तिथे पोहोचल्यावर त्याला फक्त लावलेला दिवाच पहायला भेटला.

त्यांना पाहुन त्याच्या मामींचाही अश्रुंचा सुकलेला बांध सुटला.

“खुप आठवण काढत होते तुमची, म्हणे भेटायलाच येत नाही. खुप वाट पहात होते” मामींच्या शब्दानां फक्त हुंदक्यांची साथ होती.

तस त्याला त्याच्या मामांचा आवाज शेवटचा कधी ऐकला ते आठवत होते. मागच्या महीन्यात त्याच्या बायकोने त्यांना फोन लावला होता, ते आजारी होते.

त्यावेळेस तो बाजुला असुन बोलला नाही याच त्याला खुप वाईट वाटायला लागल होत.

गैरसमज भावा बहिणींमध्ये होते न. त्यालाही उगाच आपल्या आईशी बोलत नाही म्हणून बोलावस वाटत नव्हत.

पण जिव ही त्यांनी खुप लावला होता. जो जीव लावतो तोच आपल्याला हक्काने रागावतो न.

आता याचा विचार करून काय फायदा होणार होता.

त्याने त्याच्या मोबाईल कडे पाहीले. या मोबाईल ने सगळ जग जवळ आले पण ह्याच मोबाईल ने मी त्यांना एक फोन करू शकलो नाही. मी बोललो असतो तर कदाचित झालेले गैरसमज लवकर दुर झाले असते.

त्याच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली. डोळयातल्या अश्रूंनी पापण्यांची वेस ओलांडण्याआधीच तो त्या घरातुन बाहेर जाउन उभा राहीला.

गावाला १४० च्या स्पीडने जाणारी गाडी घरी जाताना मात्र ६० ते ७० च्या स्पीड नेच जात होती.

मनात एक निश्चय करुन की आता संवाद प्रत्येकाशी प्रत्येकाला भेटुन करायचा. ज्यांना भेटायला जमत नाही त्याना मोबाईल द्वारे. 

समाप्त.