बोचणारा पाऊस... भाग 8

Abhidnya ani abhiraj madhe durava yayla lagla

बोचणारा पाऊस...भाग 8


आधीच्या भागात आपण पाहिले की,


अभिज्ञा आणि अभिराजच्या प्रेमाच्या वेलीवर अंकुर फुलायला लागला. अभिज्ञाला दिवस गेले, दोघेही खूप आनंदात होते. डॉक्टरने अभिज्ञाला पुर्णपणे आराम करायला सांगितलं होतं. ती आता ऑफिसला जाणार नव्हती.

घरी जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा घरचे तिला बोलले. आता तीन महिने ही घरीच बसणार, हा तिचे चोचले पुरवणार, हिला घरचं खायला नको, बाहेरच हवं वगैरे.


हे सगळं ऐकून अभिज्ञाच्या डोळ्यात पाणी आलं, ती उठून खोलीत गेली.
अभिराजही तिच्या मागे मागे गेला.

आता पुढे,


अभिज्ञा खोलीत गेली आणि रडत बसली. मागेहुन अभिराज आला, तिच्या बाजूला बसला.

“अभिज्ञा प्लिज रडू नकोस ग, अशा अवस्थेत रडणं बरोबर नाही. आपला बाळाला रडकु बनवायचं आहे का तुला?”तो  गंमत करण्याच्या सुरामध्ये बोलला.


“अभिराज तुला गंमत सुचत आहे का?”

“तसं नाही ग, तुझा मूड चांगला व्हावा म्हणून बोलतोय.”

“अभिराज तू बघितलंस ना वहिनी कशा बोलल्या ते?”

“हो ग मला पण राग आला, पण मी बोललो ना? तुझी बाजू घेतली ना मी?”

“माझी बाजू घेण्याचा प्रश्न नाहीये अभिराज,  आता तुला हात पाय चालवावे लागतील. काही तरी प्रयत्न करावा लागेल. किती दिवस तू असा घरात बसून राहणार आहेस. प्रयत्न करतोय अस सांगतोस पण करतोस का? का नाही तुला इतक्या दिवसा पासून नोकरी मिळाली? का नाही करू शकला काही? हे बघ अभिराज तुझं नोकरीच काहीच होत नसेल तर मलाही माझं बाळ नकोय आणि तुझ्यासोबत संपूर्ण आयुष्यही नकोय.”


“काय बोलतेस तू? असं का बोलतेस? यानंतर असं बोलायचं नाहीये.” असं म्हणून तो खोलीच्या बाहेर गेला.

“सॉरी अभिराज मी तुला टोचून बोलले पण दुसरा उपाय नाही. मी टोचून बोलल्याशिवाय तुझ्या  मनाला काही लागणार नाही आणि तू मनावर घेणार नाहीस. म्हणून मला टोचून बोलावं लागलं.” ती मनातल्या मनात विचार करू लागली.


दुसऱ्या दिवशी सकाळी अभिज्ञा उठली आणि किचन मध्ये गेली. तिथे तिने स्वतः साठी चहा करून घेतला. बाकीचे कोणी तिच्याशी काही बोलले नाही. सासु, चुलत सासू, वहिनी कोणीच काही बोलले नाही. फक्त कनिका तेवढी बोलली.

“अगं वहिनी, तु का चहा करतेस? मला सांग मी करून देते.”

“नाही, कमीतकमी तेवढ मी करू शकते.”
तितक्यात चुलत सासूने टोमणा मारला.


“कनिका काहीतरी करू दे तिला. बसून बसून वजन वाढेल आणि वजन वाढलं की नॉर्मल डिलीव्हरी होणार नाही, सिजेरियन डिलीवरी करावी लागेल. अजून त्यात खर्च वाढेल. करू दे तिला काही होत नाही. एकतर तिच्या नवऱ्याला कमावण्याची अक्कल नाही, वरून सगळा खर्च आपल्याच माथी.”

अभिज्ञा चहा न घेता किचन मधून बाहेर निघाली. 

अभिज्ञा ऑफिसमध्ये जात नव्हती आणि अभिराज काहीही करत नसल्यामुळे त्यांना रोज अस सगळ्यांच ऐकाव लागत असे. अभिज्ञाला हे सगळे ऐकण्याची सवय नव्हती, ती आधीपासूनच स्वतःच्या पायावर उभी होती, ती सगळ स्वतःच स्वतः करायची. खूप कमी वयात ती कमवायला शिकलेली होती. कधी तिने कोणाचे टोमणे ऐकले नव्हते,  त्यामुळे तिला या सगळ्याचा खूप त्रास व्हायला लागला.

घरचे हिला बोलायचे आणि ही अभिराजला बोलायची. या सगळ्यामुळे दोघांमध्ये भांडणं व्हायला लागली. अभिराजचं अभिज्ञावर खुप प्रेम असल्यामुळे तो सगळं निमूटपणे ऐकून घ्यायचा.

एका रात्री अभिज्ञा त्याला बोल बोल बोलली. त्या वेळी मात्र त्याला खरच खूप त्रास झाला, त्याने दाखवल नाही चुपचाप खिडकीजवळ बसून होता. अभिज्ञा बोलली आणि झोपली. रात्री तिला जाग आली, बाजूला हाताने बघितलं तर कुणीच नव्हतं. तिने डोळे उघडले बघितलं अभिराज तिथे नव्हता. तिने आजूबाजूला बघितलं तर तो तिला खिडकीजवळ बसलेला दिसला.

ती त्याच्याजवळ गेली. त्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्याने खांदा झटकला. तिला कळलं याचा राग अजूनही गेलेला नाही. ती त्याच्या समोर जाऊन बसली. त्याचा हात हातात घेतला, त्याने तोही सोडवण्याचा प्रयत्न केला पण अभिज्ञाने तिचा हात घट्ट केला होता.

“अभिराज आय एम सॉरी. माझ खरंच चुकलं. मी तुला असं बोलायला नको होतं. पण मी खरं सांगू का? आता मला या सगळ्यांच्या खूप त्रास होतोय. मला सहन होत नाही रे. अभिराज मी ऑफिस जॉईन करू का?”

“काही गरज नाही आहे. तुला डॉक्टरांनी आराम सांगितलंय ना?”

“असू दे, मी ऑफिस मध्ये व्यवस्थित स्वतःची काळजी घेऊन काम करेल. तसं मी ऑफिसमध्ये कळवेल. तिथे सगळे चांगले आहेत रे, सगळे माझी मदत करतील. हे असं इथे घरी दिवसभर राहून मी झोपलेली असते. माझं मन कुठेच लागत नाही, नुसती चिडचिड होते. रिकाम बसण्यापेक्षा ऑफिसला गेलेलेच बर.”


“पण अभिज्ञा आपलं बाळ महत्वाचा आहे. डॉक्टरांनी काय सांगितले पूर्णपणे आराम हवाय. ऑफिसला जाणार मग आराम कधी करणार? आधी घरचे काम करणार मग ऑफिसला जाणार त्यानंतर पुन्हा घरी येऊन काम करणार? तुला राम कधी मिळणार सांग बर? 


“मला नको आराम, मी कामात व्यस्त असेल तर मला बरं वाटेल. आपला बाळ छान होईल.” असं म्हणत ती हसायला लागली.

“नाहीतर घरात बसून मी तुझ्यासारखी ठोंब्या होईल.” ती पुन्हा हसली.

“अच्छा मी ठोंब्या काय? मला ठोंब्या म्हणतेस का? थांब तुला दाखवतो.” असं म्हणून त्याने तिचे गाल ओढले.


“अभि अभि सोड मला, अभिराज दुखतायत माझे गाल, सोड मला.’ असे बोलून तिने त्याचे हात झटकले.

त्याने तिच्या गालावरून हात फिरवला.

“अभिज्ञा तुझं सगळं खरं पण तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय एकही क्षण जगू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेव आणि मला प्रॉमिस कर, मी तुला काहीही बोललो, तुला रागावलो , काहीही झालं तरी तू मला सोडून जाणार नाहीस.”

“नाही, नाही जाणार मी तुला सोडून.”

अभिज्ञा अभिराजच्या कुशीत झोपली.


काही दिवस असेच गेले. अभिराजचे नोकरीचे प्रयत्न सुरू होते. काही ठिकाणी तो इंटरव्ह्यूला गेलेला होता पण त्याला हवा तसा जॉब मिळत नव्हता. आणि जो जॉब मिळायचा तो हा घेत नव्हता. चांगल्या नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात त्याने छोटे-मोठे काम सोडले.

आता हळूहळू त्याची आई ही त्याला बोलायला लागली. आधी त्याची बाजू घ्यायची मात्र आता ती ही बोलायला लागली. तिचं बघून वडीलही बोलू लागले. या सगळ्यांच्या बोलण्यामुळे अभिराजला खूप तणाव यायचा. कधीकधी तो खूप चिडायचा. घरात ताणतणाव वाढत गेला. घरातल्या ताणतणावामुळे अभिराज आणि अभिज्ञा मध्ये दुरावा निर्माण होऊ लागला. 

एका रात्री अभिज्ञा बाहेर गार्डन मध्ये जाऊन बसली. बाहेर खूप जोराचा पाऊस सुरू होता. अभिराजने तिला घरभर शोधल, ती दिसली नाही म्हणून त्याने बाहेर खिडकीतून डोकावले तर अभिज्ञा पावसात ओली चिंब झालेली होती. तो लगेच गेला आणि तिला दोन्ही हाताने पकडून आत घेऊन आला. टॉवेलने तिचे केस पुसून दिले. तिचं अंग कोरड केलं.

“काय चाललय अभिज्ञा? काय झालं? तू स्वतःची नाही निदान त्या बाळाची तरी काळजी घे. अशी ओली होऊन आजारी पडलीस ते बाळाला त्रास नाही का होणार. अभिज्ञा मी काही बोलतोय? तुझ्याशी बोलतोय मी. अभिज्ञा गप्प उभी आहेस तू, बोल ग काही तरी. मला त्रास होतोय.”

या सगळ्यांचा तिलाही खूप त्रास होत होता म्हणून आता आपण बोलायचं नाही असं कदाचित ठरवलं असेल. ती फक्त शांत बसलेली होती. अभिराज तिला खूप बोलला. त्यावर अभिज्ञा भडकली.


“हो होउ दे, बाळाला त्रास होऊ दे आणि मलाही त्रास होऊ दे. मरू दे आमच्या दोघांना. काय उपयोग असं आयुष्य जगण्याचा? मला हे मुल नको आणि मला माझा आयुष्यही नको. तू जग तुला हवं तसं.” असं म्हणून ती फ्रेश व्ह्यायला निघून गेली.


क्रमशः

🎭 Series Post

View all