Jan 19, 2022
सामाजिक

साईंचा आशीर्वाद

Read Later
साईंचा आशीर्वाद

#साईंचा_आशीर्वाद

शालुचा मुलगा नी नलेचा नवरा साई गेले दोन महिने हॉस्पिटलातल्या एका बेडवर पडून होता. 

नलेले तिच्या मुलीला,श्रद्धाला आजोळी पाठवलं होतं. नलीचा भाऊ,बाबू येऊनजाऊन असायचा.

साईच्या तब्येतीत काहीच फरक पडत नव्हता. आधी बारीक बारीक ज्वर येऊ लागला. फँमिली डॉक्टरांच्या औषधगोळ्यांवर महिना काढला पण अंगातली कसकस जाईना. 

ब्लडटेस्ट वगैरे सगळं काय ते झालं. पाण्यासारखा पैसा जात होता पण तब्येतीत काडीचाही फरक पडत नव्हता. 

नली सकाळी उठून घरातली कामं आवरुन सासू व नवऱ्यासाठी डबा घेऊन जायची. सासूसाठी ज्वारीची भाकरी नि एखादी पालेभाजी नाहीतर कालवण व नवऱ्यासाठी मुगडाळ व तांदळाची मऊ खिचडी तर कधी आंबील. 

तापाने त्याची आतडीही नरम पडली होती. नलीने आणलेल्या डब्यातलं पावदिडपाव तो कसंतरी खायचा. तोंडाला कसली ती चवच नव्हती. 

त्यात नलीची सासू,शालू तिच्या तोंडाचा पट्टा सुरु करायची. भाकरी अशीच नि तशीच कधी भाजीत मीठ जास्त घातलं तर कधी ठार अळणी बनवली असं म्हणून नलीचा,तिच्या माहेरच्यांचा उद्धार करायची. 

नलीसुद्धा काही कमी नव्हती. तिच्या जीभेची तलवारही तळपत होती. सासूच्या प्रत्येक टिकेला उलट उत्तर तिच्याकडे तयारच असायचं. 

हॉस्पिटलातल्या नर्सेसना या सासूसुनांची भांडणं म्हणजे एक प्रकारचं मनोरंजनच होतं. बिचारा साई मात्र शरमेने मान खाली घालायचा. 

साईच्या लग्नाला चार वर्ष झाली होती. पहिले दोनतीन महिने नलीने सासूचं निमुट ऐकून घेतलं पण शालू तिच्या प्रत्येक कामांना नावं ठेवू लागली. 

नलीने कपडे धुतले की तो कपड्याचा पिळा पिळून त्यातलं पाणी काढून दाखवायची व नलीला म्हणायची,"काय गं भवाने,तुझ्या आयशीने तरी धुतलले का असे कपडे. कपड्यात साबणाचा फेस बघ किती नि असे पिळतात का कपडे मंग ते सुकायचे कधी?"

नलीला हे सहन होईना मग नलीपण तिला प्रत्युत्तर द्यायची,"मला असेच कपडे धुता येतात. मी असेच धुणार. तुम्हाला आवडत नसेल तर तुमचं लुगडं तुम्ही सवता धुवा."

यावर शालू धावत येत म्हणायची,"काय गं ए सटवे,आतापासून वेगळेचार करायला लागली की काय तू! जीभ लई शिवशिवते तुझी. उपटून हातात देईन."

यावर नली,"हात तर लावून बघा पुरी चाळ गोळा करीन."..मग काही वेळ त्यांचा अबोला ठरलेला.

 सांज झाली की साई लोकलच्या गर्दीत पिचून थकलाभागला घरी यायचा तर या दोघींची तोंडं वाकडी.

शालू तोंडाचा पट्टा सुरु करायची,"तुझ्या बायकोला काय ते समजाव. जीभ लई चालते तिची."

"काय समजवायची गरज नाही मला. तुमीच तुमचं वागणं सुधरा सासुबाई."

"बाई बाई बाई,काय तोंड चालतया हिचं. माझी नसाय झालिया हिला."

साई बोलणार तरी कोणाच्या बाजूने..विधवा आईच्या बाजूने की बायकोच्या बाजूने! 

त्यातच नलीला दिवस गेले. साई किती आनंदला. त्याला वाटलं,आता घरातली भांडणं संपतील. सुखाचे दिवस येतील. तसं त्याच्या जीवाभावाच्या मित्रांनी त्याला त्यांच्या अनुभवावरुन सांगितलं होतं पण प्रत्यक्षात चित्र उलटं होतं. 

नलीला मासेमटण खायचे डोहाळे लागले नि शालूला मासमच्छी अजिबात आवडत नव्हती. नलीच्या माहेरी मात्र तिने यथेच्छ मांसाहार केला होता. 

साई मग खानावळीतून,हॉटेलातून नलीसाठी चिकन,मटण,मच्छीफ्राय घेऊन येई.

 शालूला फार राग येई. "काय बाई खाजोळी. ढोंग आहेत सगळी. कसले डोहाळे नि कसले काय. पैसे उडवायचे धंदे सगळे."

नलीचा धीर चेपला तशी ती दारात येणाऱ्या मच्छीवालीकडून मच्छी विकत घेऊ लागली. शालूच्या नाकावर टिच्चून घरात मांदेली,मोदक,राणे माशांचा सार शिजू लागला. मच्छी फ्राय होऊ लागली.

 एकदा तर नलीने जवळा भाजला. घरभर जवळ्याचा वास. शालू जाम खवळली."हिची तर ना. ही बाय मुद्दामहून ही असली मच्छी भाजते. माझ्या नाकात मच्छीचा वास जावा म्हणून. मी नकोशी झालीय हिला घरात."

दोघींची भांडणं कधीकधी एवढी विकोपाला जायची की एकमेकींच्या झिंज्या धरायच्या.

 नलूला सातवा महिना लागला तसा साई तिला माहेरी सोडून आला. अधनामधना बघायला जायचा. माहेरी नलीची तब्येत सुधरू लागली नि नववा महिना लागताच तिने एका सुद्रुढ मुलीला जन्म दिला. 

बाळंतपण सुरळीत झालं. बारशाला साई आईला घेऊन गेला होता. नातीला पाहून शालू बोललीच,"आयशीसारखीच दिसतेय लेक. तोंड आयशीसारखं नसलं म्हणजे मिळवली." नलू तिला प्रत्युत्तर देणार इतक्यात साईने नजरेनेच तिला गप्प रहाण्याची विनंती केली होती. 

नलूचे आईवडील पाहुण्यांसमोर काय बोलणार शिवाय काही उत्तर दिलं तर जावईबापूंना वाईट वाटेल म्हणून मुग गिळून गप्प राहिले. नलूच्या आईला नलूचा फटकळ स्वभाव माहीत होता. नलू मुद्दामहून कोणाच्या वार्तेला जाणाऱ्यातली नव्हती पण अरे ला कारे करणाऱ्यातली होती. 

लेकीचा संसार सुरळीत व्हायचा असेल तर जावईबापूंनी वेगळं घर घ्यावं असं तिला वाटत होतं व तसं तिने साईस बोलूनही दाखवलं होतं. उगा एकत्र राहून भांडत रहाण्यापेक्षा वेगळ्या चुली करुन सणासमारंभाला एकत्र या असं तिनं सुचवलं पण साईला त्याच्या आईला एकटं सोडणं परवडणारं नव्हतं शिवाय मग घरखर्चही वाढला असता.

 नवीन घराचं घरभाडं,दोन्हीकडचा किराणा..आणि बरंच त्यामुळे तुर्तास तरी त्याने तो विचार पुढे ढकलला होता.

लेक,श्रद्धा दिसामाजी वाढत होती. सासरी येऊन नलीला एखाद महिना झाला नि परत सासूसुनेची हमरीतुमरी सुरु झाली. कधी बाळाला न्हाऊ घालण्यावरुन तर कधी तिला बाळगुटी देण्यावरुन. दोघींच एकमत होतच नव्हतं.

 छोटी श्रद्धा पण आता हात पुढे करुन आजी,आई कशा भांडतात ते एक्टींग करुन दाखवायची. नलूनं तर वेगळं रहाण्यासाठी साईकडे तगादा लावला होता. 

त्यातच साईची कंपनी तोट्यात गेली. मालकाने त्याला व त्याच्या काही मित्रांना कामावरून कमी केलं. घर कसं चालवायचं हा यक्षप्रश्न साईला सतावू लागला. मित्रांनी त्याला वेळाला पैसे दिले खरे पण असे किती दिवस मागून खाणार!

 घरी काही बोलावं तर सासूसुनेची सततची भांडणं. मन मोकळं करणार तर कोणाकडे? सतत विचार करुन तो नैराश्यात गेला. मन बरं नसेल तर शरीर तरी कसं साथ देईल! नैराश्याची परिणिती तापात झाली. शालूच्या पेंशनवर व नलूच्या भावाने केलेल्या मदतीवर घर कसंबसं चालत होतं. हॉस्पिटलचं बिल तर दिवसेंदिवस वाढतच होतं.

शालूचं मनही आता अस्वस्थ होऊ लागलं होतं. मुलाची दशा तिला पहावत नव्हती. हॉस्पिटलच्याजवळच साईबाबांच देऊळ होतं. आज तिथे भंडारा होता. शालूने साईबाबांना नमस्कार केला. प्रसाद ग्रहण केला. माझ्या लेकराला बरं करा अशी प्रार्थना साईबाबांकडे केली व डोळ्यातली आसवं पदराने पुसून घरी जायला निघाली. 

संध्याकाळी नलू हॉस्पिटलमधून आली तशी लेकाचा डबा घेऊन शालू निघाली. शालूने भाकरी नि पीठलं करून ठेवलं होतं. आताशी तिला नलूचीही दया येऊ लागली होती पण गोड बोलण्यास जीभ उचलत नव्हती. 

हॉस्पिटलमधे पोहोचताच तिने लेकाला डब्यातली सोजी भरवली. आज साईचा वाढदिवस होता. शालूने त्याला साईबाबांचा अंगारा लावला. दुपारधर ताप होता त्यामुळे साई थकल्यासारखा झाला होता. अंग गळून गेलं होतं. 

शालूने त्याच्या केसांतून हात फिरवला नि थोडी पिठलंभाकरी खाऊन खाली गोधडी घालून लवंडली. साधारण दोनअडीचच्या मानाने तिला स्वप्न पडलं. स्वप्नात, साईच्या बाजूस कोणतरी बसलय असा भास झाला. साक्षात साईबाबांनी साईच्या कपाळावर हात ठेवला होता.

शालूने त्यांना नमस्कार केला. साईबाबा म्हणाले,"शालू,आठवतय तुला सात वर्ष मुल नव्हतं. तुझी सासू तुझ्या नवऱ्याला दुसरं लग्न कर म्हणून सांगायची. तुझा छळ करायची. तुम्ही दोघं माझ्यापाशी आला होता आणि मग वर्षभरात तुला साई झाला होता. साईचे बाबा दरवर्षी शिरडीला यायचे. तुम्हाला प्रसाद घेऊन जायचे पण ते गेल्यानंतर  तुम्ही माझी आठवण काढली नाहीत. नव्हे,त्याचा मुळीच राग नाही मला. राग,लोभ,द्वेष यांच्या पलिकडे आहे मी पण तू स्वतः तुझ्या सासूचा वसा पुढे चालवत आहेस. तुझ्या सुनेला छळतेस,तिला घालूनपाडून बोलतेस. तू केलेला अपमान सहन न होऊन मग तीही तुला बोलते. तुमच्या दोघांच्या भांडणात या जीवाची वाताहात होतेय. तू सुधारणार असं वचन दे मला तर मी याला आशिष देतो." 

शालूने साईंच्या पायावर डोकं टेकवलं,नाक घासलं व साई मी चुकले,पुन्हा नाही भांडणार असं म्हणाली. साईबाबांनी शालूच्या लेकराला आशीर्वाद दिला व ते अंतर्धान पावले. सकाळी साईला खुपचं बरं वाटलं. नलू डबा घेऊन आली तेव्हा आज प्रथमच शालूने तिला जवळ घेतलं व मी घरातलं सगळं करते तू साईसोबत थांब म्हणाली. 

दोन दिवसांत साईच्या तब्येतीत झालेली सुधारणा पाहून डॉक्टरही थक्क झाले. सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. ताप पळाला. साईला घरी आणलं तेव्हा शालूने त्या उभयतांची भाकरतुकडा ओवाळून द्रुष्ट काढली.

साईच्या कंपनीतून त्याला कामावर रुजू होण्याचा फोन आला. चारेक दिवसांत साई कामावर जाऊ लागला. शालू स्वतः नलूला घेऊन तिच्या माहेरी गेली. शालूने नलूच्या आईवडिलांची माफी मागितली.

  एका महिन्यानंतर सगळे मिळून शिरडीला गेले. शालूने सश्रद्ध भावाने साईबाबांना नमस्कार केला. तिला जाणवलं, साईंची चर्या तिच्याकडे पाहून मंद स्मित करत आहे. शालूचे डोळे आपसूक पाझरु लागले.

-------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now