बिट्टू...!

निरागस बिट्टूची हृदयस्पर्शी कथा...!!

आपण वाचत आहात...

निरागस बिट्टूची हृदस्पर्शी कथा..!!


      ***************************


.... नोव्हेंबर महिन्याचा शेवट.. आणि ती गोठवणारी थंडी....!

रात्रीचे  जवळपास सात वाजले असतील.

त्या गोठवणाऱ्या थंडीत घरातच छोटीशी शेकोटी करून चिल्लर मंडळी  भोवती बसली होती.
त्यांच्या गप्पांना पूर आला होता.

खेड्यावरच्या त्या कौलारू घरात थंडी जरा जास्तच जाणवत होती...!
पण त्या गप्पांच्या पुरात त्या चिमण्यांना थंडीचं तेवढं काय..??

सुधा...

त्या चिल्लर मंडळींची आई चुलीवर गरम गरम भाकरी थापत होती.


तेवढ्यात...


भुर्रर्र भुर्रर्र...  दुरूनच स्कुटरचा आवाज आला.


" शुss.. शांत राहा..! अण्णा आलेत. "


लहानग्या रजनीने सावधतेचा इशारा दिला.

तसा सर्वांच्या हसण्या - खिदळण्यावर पूर्णविराम लागला.  क्षणात सर्व शांत झाले.

स्कुटर दारात थांबली. तशी मधली मंजिरीने  हात पाय धुवायला गरम पाणी अंगणात आणून ठेवले..

हातपाय धुऊन अण्णा आत आले.

त्यांच्या हातात एक मोठा बॉक्स होता तो त्यांनी थोरली... नलिनीच्या हातात ठेवला.

बॉक्स पूर्ण पॅक होता पण मध्ये मात्र थोडी जागा मोकळी सोडली होती.
नलूनं हळुवार तो बॉक्स उघडला..

आणि आत पहिले...


एक काळ्याभोर डोळ्यांची किलकिली नजर तिच्यावर खिळली होती..

तिनं आनंदाने तो बॉक्स पूर्ण उघडला... आत एक पांढराशुभ्र थंडीने गारठलेला मऊ गोळा होता.


" येss य...! अगं बघा..  छोटुसं पिल्लू...!! "

मंजिरी आणि रजनी दोघीही तिच्याजवळ उत्सुकतेने आल्या.

नलिनीनं आपल्या नाजूक हातानं त्या गोळ्याला बाहेर काढलं.
तिच्या ऊबदार स्पर्शाने ते छोटुसं पिल्लू तिच्या छातीकडे सरकलं.


तशी मंजिरी घाबरून दूर झाली.


धाकटी रजनी मात्र धीट होती. जवळ जात तिनं त्याच्या पाठीवरून हात फिरवला. तसं ते पिल्लू तिच्याकडे जीभ बाहेर काढून बघू लागलं.


तोवर सुधानं वाटीमध्ये थोडं कोमट दूध आणून दिलं.

" पोरींनो दूध पाजा गं त्याला.. "

तिनं त्याच्यावरून हात फिरवत मायेनं म्हटलं.

नलिनी आणि रजनी ने मिळून त्या चिमण्या जीवाला चमच्याने दूध पाजायला लागल्या..!

शेकोटीची उब... आणि पोटात गेलेलं दूध...
त्यामुळं त्या पिल्याला तरतरी आली.

नलिनीच्या हातातून त्यानं टूनकण बाहेर उडी मारली.

मंजिरीनं तर घाबरून अण्णाच्या मागे आडोसा शोधला. तसं नलू आणि रज्जु दोघी हसायला लागल्या.

त्यांचा हसरा चेहरा बघून ते नलूच्या पायात  घुटमळायला लागलं.

नलूनं त्याला प्रेमानं गोंजारून जवळ घेतलं.


" ओ रे..! माझं बिट्टू गं ते..! "


त्याच्या पाठीवरून ती हात फिरवत होती तसं जीभ बाहेर काढून तो तिला चाटायला लागला.

" ये गं ताई...! काय म्हणालीस..?? "
मंजिरीने कुतूहलाने विचारले.

" बिट्टू...! "
ती पुन्हा म्हणाली.

" अगं आवडलं बघ त्याला हे नाव...! डोळे बघ कसे चमकत आहेत त्याचे..!! "

मंजिरी दुरूनच त्याचे निरीक्षण करत म्हणाली. तसा तो तिच्याकडे झेपावला.

" आई ss गं ss...!
नको नको.. तू तिच्याकडेच थांब..! "
बाजूला पळत ती म्हणाली.

" बिट्टू.... "

रज्जुने हाक दिली तसे त्याचे कान टवकारले..
तो पळत तिच्याकडे गेला.

" हां ताई... खरंच गं.. आवडलं ह्याला नाव..! "

त्याला जवळ घेत ती म्हणाली.

"आजपासून तुझं नाव... "

ती म्हणायचा अवकाश... तिघीही एकसुरात ओरडल्या....

" बिट्टू...! "

त्यानंही आनंदून आपली शेपूट हलवली...

" अण्णा... कुठून आणलंत हॊ याला..?? "
मंजूनं विचारलं.

" अगं ते एका विद्यार्थ्याने दिले मला. "
ते म्हणाले.

अण्णा...

गावापासून दहा - पंधरा किलोमीटर दूर दुसऱ्या ठिकाणच्या शाळेत शिक्षक होते.

गावात शेती होती.. त्यांनाही शेतीचे वेड होते...म्हणून ते कुटुंबासोबत तिथेच राहत.
दोनेक वर्षांपूर्वी त्यांनी स्कुटर घेतली. मग तिनेच शाळेच्या ठिकाणी भुर्रर्र भुर्रर्र करत जाऊ लागले.

शाळेत शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे सर म्हणून त्यांची ख्याती होती.


कडक असले तरी त्यांच्या शिकवण्याच्या हातोटीने विद्यार्थ्यांचे ते लाडके सर होते. त्यामुळं मुलेही त्यांच्याशी कधी भीत  - भीत तर कधी हसत - खेळत मोकळेपणाने बोलायची.


असेच दोन दिवसांपूर्वी आठवीतला सदू त्यांना म्हणाला..

" सर जी...
मह्या घरी कुत्रीले पाच पिल्लं झाली..! तुम्हाले देऊ का एक..?? "

त्यांनी हसून होकार तर दिला पण ते विसरूनही गेले.

म्हणून आज सायंकाळी शाळा सुटल्यावर सदू त्यांना आठवणीने आपल्या घरी घेऊन आला. आणि त्या पाच पिल्ल्यापैकी बघायला सुंदर दिसणारा हा दोन दिवसांचा जीव त्यानं सरांकडे सोपावला.


त्यांनीही मग त्या छोटया जीवाला थंडी लागू नये म्हणून पुठ्ठयांच्या खोक्यामध्ये पॅक केलं.. आणि स्कुटरवर समोर ठेऊन घरी आणलं.


तरी घरी येईपर्यंत गारठलेच ते..

पण त्या तीन बहिणींनी आपल्या करामतीने त्याला परत नार्मल केले..

पुढील एक दोन दिवसात बिट्टू चांगलाच रूळला तिथे..

बहिणींनी आपआपसात कामे वाटूनं घेतली.


बुधवार रविवारी आंघोळीचा दिवस असायचा.


मंजिरी राहाटाचं पाणी काढून आणायची. मग रज्जु आणि नलू  दोघी मिळून त्याची साबण लावून सांग्रसंगीत आंघोळ करून द्यायच्या...

सगळ्यांना त्याचा चांगलाच लळा लागला...


त्यालाही सगळे आवडायचे...


पण सर्वात जास्त आवडायची ती म्हणजे नलू...!


  तो सारखा तिच्या पुढे मागे करायचा. तिच्याशी खेळायचा..


उन्हाळ्याचे दिवस आले आणि शाळांना सुट्या लागल्या. मग काय सर्वांचा दिवसभर बिट्टूसोबत धिंगाणा सुरु असायचा.

उन्हाळ्याची शेतीची कामं सुरु झाली. तेव्हा तोदेखील आपल्या या तीन मैत्रिणींबरोबर शेतावर जाऊ लागला.

सगळ्यांच्या पुढे पळत पळत समोर जायचा नी मग एखाद्या झुडपात लपून बसून राहायचा..


ह्या तिघींची शोधाशोध सुरु झाली नी हळूच तो त्यांच्यासामोर आपली जीभ काढून उभा राहिला ..


" आँ बिट्टू...! खूप द्वाड झालास रे तू..!! "

नलूनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तसा तोही तिच्या पायाला चाटू लागला..

मंजुची थोडी थोडी भीड चेपली होती आता..  तिदेखील बिट्टूशी खेळायला लागली.

असा हा बिट्टू....!

अल्पावधीत  सगळ्यांचा लाडका झाला. अगदी फॅमिली मेंबर.

अण्णा शाळेला स्कुटर वर निघाले की त्यांच्या मागे पळणे हा तर त्याचा अतिशय आवडता खेळ.

जणू काही स्कुटरशी रेस लावून त्यांना रोज गावच्या वेशीपर्यंत निरोप दयायला जायचा.

गावाची हद्द संपली की ते दिसेनासे होईपर्यंत बसस्टॉप वर थांबून राहायचा नी मगच घरी परतायचा..!

तो एक मुका जीव....!

... पण आपल्या धन्यावर खूप जीव होता  त्याचा...!!

असचं एकदा त्याची तब्येत बिघडली..

दोन दिवसांपासून नीट खात पीतही नव्हता तो. आणि मग उलट्याही करायला लागला.

खेड्यावर कुठे आले वेट डॉक्टर्स..??

तो एकाच ठिकाणी बसून असायचा..

तो खात पीत नाही म्हणून पोरीही नीट जेवत नव्हत्या. सारख्या त्याच्याजवळ बसून असायच्या..
नलू तर बिट्टू बिट्टू करत त्याला गोंजारत होती.

तोच स्कुटरचा आवाज आला...
अण्णा कामानिमित्त बाहेरगावी निघाले होते.

शरीरात त्राण नसलेला बिट्टू खाडकन उभा झाला.

" बिट्टू... आज नको येऊस..! "

आपली स्कुटर काढत अण्णा म्हणाले.

आज थोडा उशीर झाला होता  त्यांना निघायला.
मागे न बघता ते निघाले..

नलू, रज्जु नको नको म्हणत असतानाही बिट्टू स्कुटरच्या मागे धावायला लागला... नेहमीप्रमाणे...!

गावचे बस स्टॉप दीड दोन किलोमीटर लांब होते...   तो रोज  त्यांच्या मागे तिथपर्यंत जायचाच.

आजही निघाला..!

स्कुटरच्या साईड मिरर मध्ये अण्णाना तो दिसत होता.. ,
पण आधीच झालेला उशीर.., त्यामुळं ते थांबूही शकत नव्हते..

नेहमीच तो अण्णा दिसेनासे झाले की घरी परतायचा. आज सुद्धा जाईल  असं वाटून ते पुढे निघून गेले..

... ते पुढे निघून गेले पण तो तिथेच थांबला..!

धावून धावून खूप  थकला आता तो.

बस स्टॉप वरून मागे वळायचीही ताकद उरली नव्हती त्याच्यात.

रोडवर मध्येच बसला तो..!

त्याला चांगलीच धाप लागली होती.  आपली जीभ बाहेर काढून तो तिथेच मोठयाने श्वास घेत होता..
.
.

... मागून येणारा ट्रक दुरूनच मोठयाने भोंगा वाजवत होता..

त्या थकल्या जीवाच्या कानापर्यंत तो आवाज पोहचलाच नाही..

तो तिथेच बसून होता...
...  मख्ख.. !!

काही क्षणात तो ट्रक तेथून निघून गेला...

आणि..

तिथे बसलेला बिट्टू आता आडवा पडला होता...
रक्ताच्या थारोळ्यात...!!


अण्णा दुपारी परतले तेव्हा त्या ठिकाणी संपूर्ण चिंधडया उडल्या होत्या..

ते घरी आले...
बिट्टू नव्हताच घरी.
नलू, मंजू, रज्जु.. कोणालाच त्याच्याबदल काहीच माहिती नव्हते.
त्यांनीही सकाळपासून सगळीकडे शोधाशोध केली होती.. पण तो माघारी परतला नाही हे कोणाच्याच लक्षात आले नाही.

अण्णांनी डोळे मिटले..
त्या मिटल्या डोळयांसमोर त्यांना त्यांच्या स्कुटरच्या मागे धावणारा बिट्टू दिसला..

त्यांना आठवलं बिट्टू रोडच्या मध्ये बसला होता..
... आणि मग आठवलं...
घरी येतांना त्यांना दिसलेल्या गावच्या बस स्टॉप वर वाहनां मुळे  शरीराच्या उडालेल्या चिंधडया...!!

काय समजायचं ते अण्णा समजून गेले..

ज्या स्कुटरवर बसवून मोठया प्रेमानं त्यांनी बिट्टूला घरी आणलं होतं.. तिच्याच मागे धावण्यात त्याचा जीव गेला होता...!!

" बिट्टू ss...!"

डोक्याला हात लावून ते  मटकन खाली बसले...
रडून रडून सुधा आणि मुलींचे  डोळे सुजले होते...

कुत्रा नव्हे तर घरातीलच एखादी व्यक्ती गेली असेच दुःख होते ते.
किमान महिनाभर तरी ते दुःख नलिनी आणि तिच्या बहिणींना पुरलं...


... आता ह्या गोष्टीला जवळपास दोन तपं उलटली....!
तरी अजूनही अधेमध्ये येतेच त्याची आठवन...! आणि  मग त्यांचे डोळे उगाच भरून येतात.
.
.

बिट्टू तर गेला...

पण त्या प्रसंगानंतर अण्णांनी दुसरा कोणताच बिट्टू परत घरी कधीच आणला नाही....!!
समाप्त....!!
..... आवडली का बिट्टूची ही कथा...??