बिरबलाचे बुद्धी चातुर्य

Birbal's Wisdom
बिरबलाचे बुद्धी चातुर्य


बादशहा अकबर त्याच्या गुणग्राहकतेसाठी आणि लोकसंचयासाठी खूपच प्रसिद्ध होते. असं म्हणतात की बादशहा अकबराच्या दरबारात नवरत्न होते आणि त्यामधले सर्वात श्रेष्ठ नररत्न होते बिरबल.

एकदा बादशाह अकबर दरबारी कामकाज आटोकल्या नंतर आपल्या मंत्रिमंडळासोबत काहीतरी मसलत करत होते. सहजच इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. नेमक्या त्याचवेळी दरबारात एक शिल्पकार आला. शिल्पकाराने आपल्या सोबत तीन सुंदर मूर्ती आणल्या होत्या. त्या तीनही मूर्ती अतिशय सुंदर होत्या आणि अगदी सारख्या दिसत होत्या. त्यामुळे दरबारात साहजिकच सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित झाला की जर तीनही मूर्ती सुंदर आणि अगदी सारख्या आहेत तर तीन मूर्तींची काय गरज होती बादशहाला भेट म्हणूनच द्यायची आहे तर एकच मूर्ती पुरेशी होती.

दरबारातील मंडळींच्या मनातली ही गोष्ट कदाचित त्या शिल्पकाराला कळली आणि तो बादशाह अकबराला नम्रपणे निवेदन करू लागला,"जहांपना मी आपल्या राज्यातला एक शिल्पकार आहे आणि मी या तीन अगदी सारख्या दिसणाऱ्या मूर्ती बनवल्या आहेत; पण या मूर्ती जरी सारख्या दिसत असल्या तरीही त्यांच्यामध्ये अगदी छोटासा फरक आहे आणि तो छोटासा फरकच त्यांचं श्रेष्ठत्व ठरवणार आहे. आपण आपल्या दरबारातील मंत्र्यांना बोलवून या तीनही मूर्तींची पारख करायला लावून, कुठली मूर्ती सर्वात उत्तम किंवा सर्वश्रेष्ठ आहे याची निवड करायला सांगा."

राज्यातल्या कुठल्याही एखाद्या सर्वसामान्य शिल्पकाराने दिसायला अगदी सारख्या असणाऱ्या मूर्तींमधला छोटासा फरक दरबारातील मंत्र्यांना शोधायला सांगणे म्हणजे त्या मंत्र्यांना त्यांचा अपमानच वाटला. पण बादशहा अकबराच्या मनात मात्र उत्सुकता निर्माण झाली 'की दिसायला सारख्या असणाऱ्या मूर्तींमध्ये खरंच असा कोणता फरक असेल?' त्यामुळे बादशहाने आदेश दिला "या मूर्तींमधला फरक जो कोणी ओळखून दाखवेल त्याला मी खास इनाम देईन."

आता मात्र दरबारातल्या मंत्र्यांची पंचायीत झाली. एकतर त्यांना फरक शोधणे हे काम अगदीच फुटकळ वाटत होतं पण दुसरीकडे बादशहाचं मन राखायचं होतं आणि आदेशही मान्य करायचा होता; त्याशिवाय जो त्या तीन मुर्त्यांमधली सर्वश्रेष्ठ मूर्ती शोधून दाखवेल त्याला बादशहा इनामही देणार होते. त्यामुळे मनात नसून सुद्धा काही मंत्र्यांनी नुसतच त्या मुर्त्यांभोवती चकरा मारल्या. तर काहींनी खरोखरच फरक शोधण्याचा प्रयत्न केला. पण मुर्त्या इतक्या सुंदर रेखीव आणि हुबेहूब एकसारख्या होत्या की कुठल्याही मंत्र्याला त्या मुर्त्यांमधला तो सूक्ष्म फरक ओळखू आला नाही.

मंत्र्यांची ही फजिती पाहून तो शिल्पकार गालातल्या गालात मंद स्मित करत होता. ह्या गोष्टीचा बादशहाला मात्र खूप राग आला आणि त्यांनी बिरबलाला बोलावणे पाठवलं. बिरबल दरबारात आल्याबरोबर मूर्तिकारालाही आता विश्वास वाटला की, बिरबल नक्कीच या तीन मुर्त्यांमधली सर्वोत्तम मूर्ती शोधून दाखवेल.

इतरमंत्र्यांप्रमाणे बिरबल आणि ही त्या तीनही मुर्त्यांना अगदी निरखून पाहिले, मूर्तींच्या कानात आणि तोंडाला छोटी छिद्रे असल्याचे त्याच्या लक्षात आले; त्यानंतर त्याला त्या मुर्त्यांमधला फरक लगेच लक्षात आला. बिरबलाने दरबारात एक लोखंडी तार मागवली.

बिरबलाने एक पातळ आणि लांब तार पहिल्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. त्याने दुसरी मूर्ती उचलली आणि ती तार त्या मूर्तीच्या कानात घातली. दुसऱ्या मूर्तीच्या कानातून ती तार बाहेर आली. शेवटी बिरबलाने तिसरी मूर्ती हातात घेतली, त्याने त्या मूर्तीच्या कानात तार घातली आणि ती तार मूर्तीच्या पोटात गेली. बिरबलाने ती मूर्ती शिल्पकाला दाखवली आणि म्हणाला, "तीन मूर्तींपैकी ही सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ मूर्ती आहे."

बिरबलाच्या या योग्य निवडीवर शिल्पकाराला आश्चर्य वाटले. तो बिरबला म्हणाला, "हीच मूर्ती सर्वश्रेष्ठ का त्याचं कारण सांगशील?"

बिरबल म्हणाला, "प्रत्येक मूर्ती राजाच्या मंत्र्याचे प्रतिक आहे. आणि तार राज्याच्या गुप्ततेचे प्रतीक आहे असे आपण गृहीत धरू. पहिल्या मूर्तीच्या बाबतीत कानात घातलेली तार तोंडातून बाहेर पडली. या प्रकारचे मंत्री हे अगदीच खालच्या दर्जाचे असतात. म्हणजे त्यांना जर एखादं गुपित माहिती पडलं किंवा त्यांनी ते ऐकलं तर ते सगळीकडे ते गुपित सांगत सुटतात. राजाने अशा मंत्र्यांवर अजिबात विश्वास ठेवू नये कारण एखादी महत्त्वाची गोष्ट किंवा राज्याशी संबंधित गुपित ते कुठे कुणाजवळ सांगतील याचा नेम नसतो."

बिरबल पुढे म्हणाला, "दुसरी मूर्ती ही दुय्यम किंवा सामान्य दर्जाची आहे, कारण मी या मूर्तीच्या कानात तार घातली आणि ती तार मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर आली. या प्रकारचे मंत्री हे कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टीकडे किंवा राज्याशी संबंधित गुपिताकडे कानाडोळा करतात. त्यांना सांगितलेल्या कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टीकडे त्यांचे लक्ष नसतं किंवा ते त्या महत्त्वाच्या बाबीकडे साफ दुर्लक्ष करतात. ते एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात."

बिरबल पुढे म्हणाला,"तिसऱ्या मूर्तीच्या बाबतीत कानात घातलेली तार सरळ पोटात गेली. ह्या प्रकारचे मंत्री हे अगदी उत्तम दर्जाचे किंवा सर्वश्रेष्ठ असतात. हे मंत्री एखादे गुपित ऐकतात पण ते कोणाला कधीच उघड करत नाही राज्यसंदर्भातल्या महत्त्वाच्या गोष्टी आणि गुपिते राजा या मंत्र्याला अगदी बिंदिकतपणे सांगू शकतो. या प्रकारचे मंत्री त्यांना माहिती असलेल्या महत्त्वाच्या बाबींचा कधीही कुठेही बोभाटा करत नाहीत. या प्रकारातले मंत्री हे अगदी आदर्श मंत्री असतात म्हणून हे शिल्पकार या तीनही मूर्तींमधली ही मूर्ती सर्वश्रेष्ठ आहे."

बिरबलाचे स्पष्टीकरण ऐकून बादशहा अकबर, तो शिल्पकार आणि दरबारातील सर्वच मंत्री आश्चर्यचकित झाले. बादशहाने स्वतःच्या गळ्यातला नवरत्नांचा हार बिरबलाला पारितोषिक म्हणून दिला; तर शिल्पकाराने आनंदाने त्या तीनही मूर्ती बिरबलाला भेट दिल्या.

©® राखी भावसार भांडेकर, नागपूर.


🎭 Series Post

View all