चतुर बिरबल

Birbal The Wise
चतुर बिरबल


बादशाह अकबराच्या दरबारात असणाऱ्या नवरत्नांपैकी बिरबलाची ख्याती ही त्याच्या बुद्धी चातुर्य आणि हजरजबाबीपणा या गुणांनी सर्वत्र पसरली होती. त्यामुळे कधी कधी न्यायनिवाड्यासाठी किंवा एखादी क्लिष्ट गुंतागुंत सोडविण्यासाठी किंवा हरवलेल्या वस्तूचा शोध घेण्यासाठी अनेकजण बिरबलाला पाचारण करीत.

खरंतर बिरबलाचा न्यायनिवाडा अतिशय तर्क सुसंगत असल्याने आणि अपराधाला योग्यरित्या शिक्षा देत असल्याने अनेकांचा बिरबलावर योग्य न्यायासाठी विश्वास होता.

एकदा काय झाले! दिल्लीतील एका मोठ्या धनाढ्य व्यापाराकडे काही अमूल्य रत्नांची आणि मोत्यांची चोरी झाली. खरंतर व्यापाऱ्याने रात्री दुकानातून परत येताना एका बटव्यात ती सारी रत्ने आणि मोती आणले होते आणि स्वतःच्या खोलीत बिछान्यात तो रत्नांचा बटवा लपून ठेवला होता. पण तरीही तो बटवा चोरीस गेला होता. त्यामुळे व्यापाराचा संशय त्याच्या घरात काम करणाऱ्या नोकरांवर गेला. पण गेले कित्येक वर्षे ते सात नोकर त्या व्यापाराकडे काम करत होते आणि सारेच इमानदार होते. त्यामुळे खरा चोर कसा पकडायचा? असा पेच त्या व्यापारासमोर निर्माण झाला.

व्यापाराने जेव्हा सातही नोकरांना आपल्या रत्नांच्या बटव्याबद्दल विचारले तर सगळ्यांनी कानाला हात लावले. एकही जण चोरी कबूल करेना.

व्यापारी, "हे बघा केले कित्येक वर्षे तुम्ही सगळेजण माझ्या घरी काम करत आहात. तुम्ही सगळेजण अतिशय इमानदार आहात. त्यामुळे तुमच्यापैकी ज्या कोणी माझा रत्नांचा बटवा घेतला आहे त्याने तो माझ्या खोलीत नेऊन ठेवावा. मी त्यास कुठलीही शिक्षा करणार नाही."

पण तरीही कुणीही चोरी कबूल करेना. म्हणून शेवटी नाईलाजाने व्यापाऱ्याने बिरबलाला खरा चोर पकडण्यासाठी पाचारण केले.

दुसऱ्या दिवशी सकाळी बिरबलाने व्यापाऱ्याच्या इथल्या सातही नोकऱ्यांना एका रांगेत उभे केले.

बिरबल, "हे बघा मित्रांनो, तुम्ही सगळेजण अतिशय इमानदार आहात. तुमच्या मालकाचा अमूल्य रत्नांचा बटवा ज्याने घेतला असेल, त्याने तो मालकास परत करावा. काल जसं मालकाने सांगितले त्याला अनुसरूनच मीही आज तुम्हाला आश्वासन देतो की, जो कोणी चोर असेल त्यास कुठलीही शिक्षा होणार नाही. पण जर तुम्ही तुमची चोरी कबूल केली नाहीत तर मात्र तुम्हाला शंभर फटक्यांची शिक्षा होईल."

शंभर फटक्यांची शिक्षा ऐकूनही एकही नौकर चोरीची कबुली देण्यास आणि बटवा परत करण्यास तयार होईना. शेवटी बिरबलाने सातही नोकरांना एकाच आकाराच्या सात काड्या दिल्या.

बिरबल, "कालच माझ्या गुरूंनी मला एक मंत्र दिला आहे. तो मंत्र मी या काड्यांवर अभिमंत्रित केला आहे. तुमच्यापैकी जो कोणी चोर असेल त्याची काडी रात्रीतून एका इंचाने वाढेल आणि उद्या लगेच मला चोराचा पत्ता लागेल."

बिरबलाचं म्हणणं ऐकून आणि मिळालेल्या आपापल्या काड्या घेऊन नोकर त्यांच्या खोल्यांमध्ये गेले. आता जो नोकर चोर होता त्याच्या मनात विचार आला की, "मीच तो अमूल्य रत्नांचा बटवा चोरला आहे, त्यामुळे रात्रीतून ही काडी खरंच एक इंच वाढेल, ही काडी एक इंच वाढण्याआधीच, मी ही आधीच कापून टाकतो, त्यामुळे वाढलेली काडी कुणाच्याही लक्षात येणार नाही."

आणि त्या नोकराने स्वतःची काडी एका इंचाने तोडून टाकली.

दुसऱ्या दिवशी बिरबलाने पुन्हा सर्व नोकरांना व्यापाराच्या दिवाणखान्यात एका रांगेत उभे केले आणि तो सगळ्यांच्या काड्या न्याहळत होता. काड्या बघता बघता त्याच्या लक्षात आलं की एका नोकराच्या हातातली काडी एका इंचाने लहान झाली आहे. बिरबलाने लगेच त्या नोकराला पकडले आणि व्यापाराकडे दिले. व्यापाराने त्याला खडे बोल सुनावले.

नोकराने गयावया करून माफी मागितली आणि चोरलेला बटवा व्यापाऱ्याला परत आणून दिला. व्यापाराने बिरबलाचे आभार मानले आणि नोकराला कामावरून काढून टाकले.

लोककथांवर आधारित
©® राखी भावसार भांडेकर.
नागपूर

🎭 Series Post

View all