बिरबल हरवला

Birbal Lost
बिरबल हरवला


एकदा अशाच एका कुठल्यातरी गोष्टीवर अकबर आणि बिरबलाची चर्चा सुरू होती आणि चर्चेच्या दरम्यान अगदी शुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. अकबराने रागा रागात भिरभराला दरबारात येण्यास बंदी घातली आणि राज्याच्या बाहेर जाण्याचा आदेश दिला. बिरबल स्वामीभक्त होता तसाच स्वाभिमानीही त्यामुळे बादशहाच्या आदेशानुसार बिरबल राज्य सोडून दूर एका खेडे गावात गेला.

परंतु काही दिवसातच अकबराला राज दरबारात बिरबलाची अनुपस्थिती जाणवू लागली. खरंतर बादशहाला बिरबला शिवाय अजिबात करमेना. त्याच्या बुद्धीच्या तुरीच्या अनेक गोष्टी अकबराला राहून राहून आठवत होत्या पण बादशहाला हेही माहिती होते की बिरबल किती स्वाभिमानी आहे. त्यामुळे बिरबलाला परत बोलवण्यासाठी काहीतरी युक्ती करावी लागणार हे अकबर जाणून होता. परंतु बिरबलाचा कुठेच काहीच ठावठिकाणा नसल्यामुळे त्याला शोधणे अवघड होते.

असेच एकदा महालाच्या गच्चीवरून बादशहा राजमार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बघत होता आणि तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली. त्याने लगेच नौकराला बोलावून राज्यभर दवंडी पिटवण्यासाठी सांगितली.

ती दवंडी अशी होती,"ऐका हो ऐका! बादशहा अकबर यांच्या सांगण्यावरून अशी दवंडी पिटवण्यात येते की, जो माणूस सावलीतही उभा नसणार व उन्हातही नसणार, म्हणजेच जी व्यक्ती अर्धे ऊन व अर्ध्या सावली चालेल आणि दिवसभर खाऊनही जो अत्यंत उपाशी असेल अशा व्यक्तीला बादशहाकडून खूप मोठ्या रकमेचे बक्षीस दिले जाईल होsss आणि राजदरबारात त्याचा मोठा मानसन्मान केला जाईल होss!"

बादशहाने सांगितलेल्या दवंडीची घोषणा राज्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक गल्लीत केली गेली. ही दवंडी बिरबलापर्यंत ही पोहोचली. त्याने तो राहत असलेल्या त्या खेडेगावातील एका गरीब व्यक्तीला आपल्याजवळ बोलवून राज दरबारात जाण्यास सांगितले.

बिरबल,"हे बघ सदा, तुला सध्या पैशांची फार गरज आहे आणि बादशाह अकबराने राज्यभर पेटवलेली दवंडी तू ऐकली आहेस त्यामुळे तू एक काम कर! तू राजधानीस जा."

सदा,"बिरबल जी तुम्ही जे म्हणताय ते अतिशय योग्य आहे पण दवंडी मधल्या अटी कदाचित तुम्ही ऐकल्या नाहीत आणि तसं होणं शक्यही नाही. मला सांगा बरं भर दिवसा अर्ध्या उन्हात आणि अर्ध्या सावलीत कसं चालता येईल? आणि दिवसभर खाऊनही कोणी उपाशी राहील का?"

बिरबलाने सदाला आपल्याजवळ बोलावले आणि राजाच्या प्रश्नांना कशी उत्तर द्यायची तेही सांगितलं. बिरबलाने एक मोठी खाट त्या माणसाला दिली व म्हणाला, "ही खाट तू तुझ्या डोक्यावर ठेव आणि राजवाड्यात जाताना चुरमुरे खात खात जा माझ्या सूचनेप्रमाणे राजाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दे."


बिरबलाने सांगितल्याप्रमाणे त्या माणसाने एक खाट आपल्या डोक्यावर घेतली आणि राजवाडा कडे जाण्यास निघाला. दरम्यानच्या काळात तो शेंगदाणे व चुरमुरे खात खात चालला होता. राजवाड्याकडे जात असताना त्या माणसाला बघून शिपायाने त्याला थांबवले.

शिपाई, "अरे डोक्यावर ही खाट घेऊन आणि तोंडात चुरमुरे, शेंगदाणे टाकून तू दरबाराकडे कसा काय जातोयस? थांब इथेच थांब!"

सदा,"महाराजांनी घोषणा केल्याप्रमाणे मी माझे बक्षीस घेण्यासाठी आलो आहे. त्यामुळे तुम्ही मला दरबारात जाण्यापासून थांबवू शकत नाही."

आणि सदा डोक्यावर खाट घेऊन आणि तोंडात चुरमुरे टाकत दरबारात गेला. खरंतर डोक्यावर खाट आणि तोंडात चुरमुरे खाताना सदा फारच मजेशीर दिसत होता त्याला तसं बघून दरबारात उपस्थित सर्व लोक हसायला लागले. बादशाह ही स्वतःच हसू आवरेना तरीही चेहऱ्यावर गंभीरतेचे भाव आणून बादशहाने त्याला विचारले.

बादशहा, "कोण आहेस तू आणि ह्या अशा विचित्र पद्धतीने दरबारात का आला आहेस?"

सदा, "मी एक तुमच्या राज्यातला माणूस आहे." सदाने उत्तर दिले.

बादशहा, "मग तू असा डोक्यावर खाट घेऊन का आला आहेस?" बादशहाने विचारले.

सदा, "महाराज तुम्हीच राज्यभर दवंडी पिटवली होती की, तुम्ही अशा व्यक्तीला बक्षीस देणार आहात जो सावलीतही नाही आणि उन्हातही नाही. त्यामुळे मीही खाट माझ्या डोक्यावर ठेवली आहे. मी सावलीतही नाही आणि सूर्यप्रकाशातही नाही." बोलता बोलता त्याने तोंडात चुरमुरे कोंबले.

बादशहा, "अरे हे काय करतो आहेस तू? राजदरबारात काय खातो आहे? राज दरबारात काहीही खाण्यास सक्त मनाई आहे हे तुला माहीत नाही का? याची तुला शिक्षा नक्कीच होईल."

सदा, "महाराज, मला माहिती आहे की राजदरबारात काहीही खाण्यास सक्त मनाई आहे पण माझी ही कृती तुमच्याच त्या घोषणेचा एक भाग आहे मी खात आहे तरी माझी भूक पूर्णपणे संपलेली नाही कारण मी उपाशी आहे."

सदाचे ते मजेदार बोलणे ऐकून अकबराला कळून चुकले होते की ही सगळी बिरबलाची करामत आहे. बादशहाने सदाला विचारले-

बादशहा, "मला खरं खरं सांग हे सगळं करायला तुला कोणी सांगितलं आहे आणि कोणी शिकवले आहे?"

सदा, "बादशहा काही महिन्यांपासून आमच्या गावात एक अनोळखी विद्वान व्यक्ती राहत आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच मी हे सर्व केले आहे." सदा भोळेपणाने म्हणाला.

अकबराला लगेच समजले की ती अनोळखी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून बिरबलच आहे, आणि बादशाह आनंदाने ओरडला "मला बिरबल सापडला."

बादशहाने सदाला योग्य ते बक्षीस दिले आणि आपले काही सैनिक त्या गावात पाठवून, राजेशाही सन्मानाने बिरबलाला राज दरबारात परत बोलावले.


लोककथांवर आधारित

©® राखी भावसार भांडेकर. नागपूर.





🎭 Series Post

View all