बिनपोस्टाचं पत्र..

बिन पोस्टाचं पत्र


#कथा
#बिनपोस्टाचं पत्र
©स्वप्ना...
सकाळी नेहमीप्रमाणे बायकोने तूप लावलेली गरम पोळी ताटात वाढली.गेल्या तीन वर्षात हे गरम पोळीच सुख तिने आपल्यासाठी अविरत वाटलं होतं,..पण आज भाजी जरा खारट झाली म्हणत माधव जरा ओरडलाच तिला,.. ते ओरडताना त्यालाही जाणवत होतं," लुसलुशीत पोळीच कौतुक आपण एकदाही नाही करत पण हे मीठ कमी जास्त गणित आपल्याला चांगलंच संतापायला लावत,..ती गोरिमोरी होऊन सॉरी म्हणते आणि मनोमन आपला आत्मा सुखावतो की अजूनही घरात माझा वट आहे म्हणून,.. त्या जोश्याला ऑफिसात गेल्यावर हे सगळं सांगितलं की कसं तोंड उतरत त्याचं,.. तो तर म्हणतो,"आमची बायको उणिवा दाखवू देत नाही,.खायचं तर खा म्हणते नाहीतर खसकन ताट ओढून घेते,.."आताही हे माधवला आठवलं आणि त्याची छाती गर्वाने फुगली,..मी कसा हिच्यावर अजूनही रुबाब गाजवतो हे त्याला स्वतःलाच आत्मसुख देणारं होतं,.. तरी बाजूला बसलेल्या आईने मांडीवर हलकेच चापट मारत सुनावलंच," अरे सकाळपासून तिची एकटीची किती धावपळ होते,..जरा मदत कर म्हणजे नाही होणार भाजी खारट,.."
आईने अशी तिची कड घेतलेली माधवला मुळीच आवडत नव्हती,..तेवढ्यात माधवच्या वडिलांनी पेपर बाजूला करत आईची री ओढली,.."आम्ही नाही हो कधी कोणत्या भाजीला खारट,अळणी म्हंटलो,..आम्हाला नेहमीच वाटायचं तुम्ही स्वयंपाक एवढया कष्टाने,मनलावून करता कधीतरी छोटी चूक झाली तर ती बोलून दाखवून कशाला तुमचं मन दुखवायचं,.. नाही का?"
आई लगेच म्हणाली,"हो अगदी खरं कधी अन्नाला नाव ठेवलं नाही हो तुझ्या वडिलांनी.."
माधव पुढे काहीच बोलला नाही,..तिच्या डोळ्यात मात्र चूक झाली माफ करा हे भाव स्पष्ट दिसत होते तोच आपला विजय म्हणत माधव ऑफिसला जायला बाहेर पडला,..रोजच्या टपरीवर पान खायला थांबला तशी समोरून सिटीबस येताना दिसली आणि त्याने पानवाल्याला पान पटकन बांधायला लावलं,..ते घेत तो पळतच बसकडे गेला,.. आवडती खिडकी पकडून निवांत बसला,.. आज समोरच्या सीटवर एक जोडपं बसलेलं होतं आणि त्यांच्यात काहीतरी वाद सुरूच होता,..माधवच्या स्टॉपला तब्बल चाळीस मिनिटं वेळ असल्याने त्याला आजूबाजूचे लोक बघण्यात मजा यायची आज नेमकं ही जोडी का भांडते याकडे त्याच लक्ष लागलं होतं,..त्यांचा संवाद त्याला स्पष्ट ऐकू येत होता,..
ती - पण मी म्हणते खोटं का होईना पण केलं असत माझ्या माहेरचं कौतुक तर बिघडलं असतं का,..?
तो - कशाला करायचे खोटे कौतुक? मला नाहीच आवडला तो शर्ट जो तुझ्या बापाने काल आहेरात दिला.
ती - अहो चार जावायाचं करायचं म्हणजे जमेल तसं ऐपतीप्रमाणे केलं त्यांनी,तुम्ही कुठे त्या शर्टवर आहात,.. नका घालू पण तोंडदेखलं तर म्हणायच ना,..त्यांना तेवढाच आंनद झाला असता.
तो -मला खोटं बोलायला आवडत नाही..
एव्हाना ती हार मानून खिडकीबाहेर बघायला लागली होती तिच्या डोळ्यातून टपटप पाणी गळत होतं,.. तो जिंकल्यामुळे छाती फुगवून बसला होता ,..अगदी माधवसारखाच हे आता माधवला जाणवलं आपल्यासारखाच हा मनुष्यप्राणी ह्याचा वेगळाच आंनद त्याला झालं.
तेवढ्यात कंडक्टर तिथे आला आणि माधवची समोरच्या सीटवरची तंद्री मोडली,..तिकीट काढताना खिशातल्या पानाकडे लक्ष गेलं आणि त्याने तिकीट खिशात ठेवत पानाची पुडी उकलली,.. पान ज्या कागदात गुंडाळलं होतं त्या पानावरचं सुंदर अक्षर बघून तो कागद न फेकता माधवने ते पान तोंडात टाकून कुतूहलाने ते पान हाताने मांडीवर प्रेस केल्यासारखं केलं आणि वाचायला घेतलं,..
ते एक पत्र होतं,.. मचकूर होता,..
अहो,
ज्या अंगणात मी लहानाची मोठी झाले ते अंगण एका क्षणात मी सोडून आले ते फक्त तुमच्या विश्वासावर,..
मला स्वप्नांच जग खुणावत होतं, नवीन घर,नवीन माणसं सगळं काही नवं अगदी चहा करण्याच्या पध्द्तीपासून स्वयंपाकाच्या बारीकसारीक गोष्टीपर्यंत,.. मी काही माहेरी सतत स्वयंपाक घरात नव्हते,माझं एक वेगळं विश्व होतं, स्वयंपाकात मी कधीतरी डोकवायचे पण इथे आल्यावर स्वीकारलं होतं मी अन्नपूर्णा होणं,..मग मागे सुरू झालेली धावपळ यात कधीतरी उणिवा राहतच होत्या,..त्यात तुम्ही टचकन बोलले की तसंच टचकन पाणी माझ्या डोळ्यात येतं,.. ते कधीतरी वाचाता यावं तुम्हाला असं खुप वाटतं,.. पण त्यासाठी नशीबच असावं लागतं ते वाचणारा नवरा भेटायला किंवा ते पाणी तिच्या डोळ्यात येऊ देणार नाही अशी काळजी घेणारा,.. फार काही अपेक्षा नाहीच माझ्या मला फक्त चुकासोबत कधीतरी चांगलही म्हणा,..मी देखील माणूसच आहे ना..?
माधवने चिठ्ठी वाचली आणि मनाशीच हसत म्हणाला,"बरं आहे आपल्या नशिबात असल्या काही अपेक्षा करणारी बायको नाही,..आपली कशी नीट ऐकून घेते चुका दाखवल्या की.."
आज त्याने जोश्याला ऑफिसमध्ये ती चिठ्ठी दाखवली आणि खळखळून हसला,..कसल्या बावळट असतात या बायका,..मुळात ही कोण आहे लिहिणारी हिला लिहायला कस सुचलं आमची तर बघा कुठली अपेक्षा न ठेवता सॉरी म्हणून मोकळी होते,..ती चुका करायला मोकळी आणि मी चुका दाखवायला मोकळा...खळखळ हसत माधव उठला जोश्याने ती चिठ्ठी परत परत वाचली आणि मनात म्हंटला.., "इतकी घुसमट आपण आपल्या आयुष्यातल्या जोडीदाराची होऊ देत नाही हेच बरं, इतकं कोणाच मन दुखावलं जाणं पापच नाही का..?किंवा तिला तेवढं व्यक्त होऊ देतो आपण हे ही चांगले अश्या वहिमध्येच नाही तिच्या भावना अडकलेल्या..
तेवढ्यात माधवने ती चिठ्ठी ओढून खिशात ठेवली,....
संध्याकाळी माधव आवर्जून परत टपरीवर थांबला,..थोड्यावेळ टपरिवल्याशी गप्पा मारत उभा राहिला,..टपरिवाल्याच काम सुरू होतं,.. तो अधूनमधून काही पान बांधत होता,..माधवने सहज ती रद्दी वही उचलली,..थोडी चाळली सगळ्या अश्याच कविता,जोडीदाराने न समजून घेतलेल्या भावना असलेल्या,.. तो बघत होता तेवढयात एका कवितेखाली नाव बघितलं,..मधु..आणखी एकदोन पानांवर तेच नाव,..त्याने पटकन टपरिवल्याला विचारलं," काय रे ही रद्दी..?"
टपरिवाला म्हणाला,"तुमच्याच वडिलांनी आणली होती ते चालले होते रद्दीच्या दुकानात त्यातल्या ह्या वह्या बघून मी म्हंटल," मला द्या काही मला लागतातच,..तर म्हणाले बर घे माझं ओझं कमी होईल..ह्या अश्या अजून सात आठ वह्या आहेत,..काही कामाच्या आहेत का साहेब.."
माधवला घामच फुटला,..खूप काही चुकीच मोठेपण घेऊन वावरत होतो ते झटकन कपड्यासारखं फाटलं अस वाटलं,..त्याने सगळ्या तिथंच ठेवल्या,.. खिशातल पत्र पुन्हा वाचलं,.. तो गुपचूप घरात येऊन बसला त्याच त्यालाच अपराधी वाटायला लागलं,..
जेवताना खिचडीत मीठ कमी झालं होतं तरी तो काहीच बोलला नाही,..यावर हसून त्याचे वडील म्हणाले,"अरे माधव आज जेवणात लक्ष नाही का?त्या सूनबाईला तुझ्या शिव्या नाही मिळाल्या तर जेवण जायचं नाही बिचारीला.."
माधवने सहज तिच्याकडे पाहिलं तिचे डोळे बोलण्याआधीच डबडबलेले त्याला जाणवले,..त्याने मनाचा हिय्या केला आणि सगळ्यांसमोर तो म्हणालाच,"मधु मला माफ कर ग,..मी फार छोट्या छोट्या चुकांवरून बोललो तुला,..यापुढे नाही बोलणार.."
आई हसत म्हणाली,"चला माझा आजचा गुरुवार पावला म्हणायचा,.. मी दत्त गुरूला म्हणालेच होते,"माणसाचं मन जाणता येऊ दे माझ्या पोराला सारखं सूनबाईला घालून पाडून बोलतो,..आम्हाला वाईट वाटत रे,..ती ऐकून घेते म्हणून असं वागवू नाही कोणाला.."
माधव म्हणाला,"आई तुझा गुरुवार पावला की नाही माहीत नाही पण पोस्टात न जाता माझ्यापर्यंत देवाने पोहचवलेलं पत्र मात्र पावलं आहे,..एवढं बोलून माधवने मधूकडे डोळे मिचकावून पाहिलं आणि कान पकडले,.."
आता मधूचे डोळे दुःखाने नाही पण आनंदाने डबडबले होते हे ही माधवला पटकन जाणवलं..
वाचकहो अश्याच कथांचे पुस्तक हवे असल्यास 9822875780 ह्या no वर msg करा .
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद