बीन आडनावाची पोरी..

मनाला चटका लावणारी कथा..

थोडी कळ काढ! थोडी कळ काढ बाई!!.. बाजुला बसलेली सोयीन व दोनचार बायका तिला धीर देत होत्या...तिला प्रसूती वेदना अगदी असह्य झाल्या होत्या.. कारण बाळ फिरल होत..डोक्या ऐवजी पाय खाली आले होते...ती वेदनेने ओरडत होती. कळीने हात पाय मारत होती. शेवटी झाली एकदाची प्रसूती....पण तिला वेदना इतक्या असह्य झाल्या होत्या की.. प्रसूती होताच ती बेशुद्ध पडली..सोयीनीने बाळ हातात घेतल्या बरोबर ती समजली...हे बाळ राक्षस आहे.. कारण बाळ दिसायला कळेकुट्ट व विचित्र होते.. त्याचे डोक बरंच मोठ होत... आणि डोळेही ..बाळाला दात देखिल आले होते.. बाजूच्या बायकांना सोयीनीने ती गोष्ट सांगीतली व दात देखिल दाखवले... बिचारी त्या बाळाची आई... ती तर बेशुद्ध होती.. सोयीनीने ही बाब बाळाच्या बापाला व गावांतील इतर लोकांना सांगीतली... ते बाळ बघून सगळ्यांची खात्री झाली की, हे नक्की राक्षस आहे.. रूढी- परंपरे.. प्रमाणे गावातील लोकांनी लागलीच बाभळीच्या काटेरी फांद्या तोडून आणल्या.. व त्यावर ते नुकतच जन्माला आलेले बाळ पातळ कापडात गुंडाळून
ठेवले...त्याच बरोबर त्या लहान गोळ्याचे अंग रक्तबंबाळ झाले... बाळ जोर- जोरात रडत होते... मन हेलाऊन टाकणारे भयंकर द्रुष्य होते ते.. मात्र त्या निर्दयी लोकांना कसलीही दया-माया......नव्हती.. कारण आता पर्यंत असे कितीतरी राक्षस त्यांनी.. काटयावर नेवून जंगलात टाकले होते...गावकऱ्यांनी त्याही बाळाला तसंच त्या काटयावर ताणत ताणत न्यायला लावले.. तान्ह्या बळाचा भयंकर रडण्याचा आवाज... ...त्या भयानक द्रुष्याचे वर्णन तरी काय कराव?... ..त्याची आई तर बेशुद्धच होती.तिला या विषयी काहीच कल्पना नव्हती... बाप समाजाच्या बंधनात जखडलेला होता मग ती जर शुद्धी वर असती तर आई म्हणून तिने याला विरोध केला असता?.. की, समाजाच्या भीतीने ती देखिल या क्रूर प्रथेला बळी पडली असती.?......
निर्दयी गावकऱ्यांनी ते जिवंत नवजात बाळ काटयावर ताणत दूर जंगलात नेऊन टाकले..आता बाळाचा रडण्याचा आवाज बंद झाला ..काम झाला! अस बोलुन त्यांनी नारळ फोडला... व...गावकरी परत निघाले....ती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ते बाळ मेलेलेच जन्माला आले.. अस तिला नवऱ्याने संगितले...
... मध्येरात्र झाली ..या भयाण अंधाऱ्या रात्री एक सावली त्या बाळा जवळ येत होती..हळू हळू ती सावली त्या बाळा जवळ आली . ..काटया वरील बाळाला त्या सावलीने चाचपले.. बाळ जिवंत होत.. त्या सावलीने..बाळ उचलले व ती सावली बाळाला घेऊन गेली...
हळूच झोपडीच दार उघडले म्हतारीने आणलेले बाळ अंथरूण करुन त्यांवर ठेवले.. सुरवातीला म्हातारीने बाळ गुंडाळलेल्या फडक्यात काही मिळते का पाहिले...फडके उघडल्या बरोबर तिला दिसले ते बाळ एक मुलगी आहे,रक्ताने ती पुर्ण माखली होती... त्या असह्य वेदनन.तीची रडण्याची शक्तीही संपली होती... त्या फडक्यात घरच्यांनी प्रथा म्हणुन ठेवलेले पाच पन्नास रुपए म्हातारीला मिळाले.. ते पाहुन आपली मेहनत वाया गेली नाही याचे समाधान तिला झाले.. ती उठली .. तिने ते पैसे तिच्या नेहमीच्या पेटीत ठेवले.. व सकाळी काढुन माचीवर ठेवलेले बकरीचे दुध चमच्याने त्या मुलीला पाजायला सुरवात केली... आणि काय चमत्कार त्या मुलीने ते दुध घोटले....हे पाहुन म्हातारीला मनोमन आनंद झाला....
शांता..... घरातील सासू-सासरे आणि नवऱ्याच्या त्रासाने अगदी हैराण झाली होती.. कारण काय तर तिला मुल नव्हते..आता पर्यंत तिला तीन मुलं झाली पण.. जन्माला आल्यावर लगेच मेली....ही भुताळी आहे आपल्या मुलांना खाते! असे टोमणे सासु नेहमीच तिला मारे.. त्यांत सासरा व नवरा हे देखिल सामील तिला नेहमीच टोचून बोलत... या रोजच्या जाचाला शांता अगदी कंटाळुन गेली होती.. नेहमी तोच तोच विचार करुन ती मनोरुग्ण झाली.. काही - बाही बडबडायला लागली.. त्यामुळे घरच्यांनी शांताच्या माहेरच्या लोकांना बोलवून पंचायत भरवली व शांता भुताळी आहे असे ठरवले...गावातील लोकांनी तीचे केस कापून,तोंडाला काळे फासून,तिचे सर्वच कपडे फाडून नग्न अवस्थेत मार झोड करून.. जंगलात दूरवर हाकलून दिले....
शांता काहीशी मनोरुग्ण होती मात्र ठार वेडी नव्हती.. तीन त्या घनदाट जंगलात.. एक तोडकी- मोडकी झोपडी बनवली.. ती जंगलातील फळे व इतर काही बाही खाई..पण त्या मुळे तीच पोट कस भरणार... तिला भुक असह्य होई..म्हणुन तिने रात्री स्मशानात जाऊन टोप ,ताट, ग्लास आणले सुरवातीला तिला भीती वाटली... पण पोटातील भुकेने तिला हे सर्व करवले.... त्यातच ती कंदमुळे शिजवून खाई..आग पेटवायला ती कधी कधी ती स्मशानातील जळक लाकूड घेऊन येई.. आता तर स्मशान म्हणजे तीच दुसरे घर झाल होत.. कारण तिथे तिला मयतावर टाकलेले पैसे वस्तु तर कधी कपडे मिळत होते.. त्यामुळे मयत पेटवले त्या रात्री ती हमखास फेरी मारी... गावकऱ्यांनी तिला किती तरी वेळा स्मशानात पाहिले होते त्यामुळे आत्तातर शिक्कामोर्तब झाले की, शांता भूताळी आहे..
शांता झोपडीत राही तीच्या तीच्या गरजा मर्यादित होत्या.. तीच्या कडे पैसे देखिल असायाचे त्यामुळे ती बाजुच्या दुसऱ्या गावातुन धान्य व इतर गरजेच्या वस्तु घेऊन यायची.. आत्ता तर तिने पैसे जमवून बाजुच्या गावातुन एक गाभण बकरी आणली होती.. जंगल भरपुर त्यामुळे तिला चाऱ्याची अडचण नव्हती... अस करता करता आज तीच्या जवळ पाच बकऱ्या होत्या. त्यांना होणारे बोकड ती बाकी बाजुच्या गावातील खाटकाला विकत असे. तीच्या गावातील लोक तिला भूताळी समजायचे त्यामुळे तीच्या झोपडीच्या आसपास कोणी फिरकत नसे म्हणून तीच्या बकऱ्या सुरक्षित होत्या.... शांता.. आता बरीच म्हातारी झाली होती.. आज तिला पैशांच्या लोभाने का होईना पण जिवंत बाळ मिळाल होत..आणि शांता त्याला काटयावरून उचलून घरी घेऊन आली .... तीची सुप्त ममता आता जागृत झाली होती तिने त्या बाळाला.. सांभाळण्याचे ठरवले.....
त्या नवजात मुलीला सांभाळताना तिचा वेळ कसा जात असे हे शांताला समजत नसे.. तीच्या माये मुळे आता तीच्या मनात इतर विचार येत नव्हते त्यामुळे तीची मानसिक स्थिती सुधारली.. तीची स्वतःशीच बडबड करण्याची सवयही बंद झाली.शांता आता बऱ्यापैकी सामान्य झाली...
दिवस जात होते... शांताची मुलगी म्हणजे तिने काटयावरून आणलेली ..आता बरीच मोठी झाली होती.. शांता समाजाच्या भितीने.. तिला जंगलाच्या बाहेर कधीच नेत नसे.. बाजुच्या गावात कधी धान्य किंव्हा इतर वस्तु आणयला ती एकटीच जाई...ती मुलगी शांताला माय म्हणुन हाक मारी.. मात्र शांताने अजुन तीच नाव देखिल ठेवले नव्हते.. पोरी म्हणूनच ती तिला हाक मारत असे...शांता पोरीला फार फार माया करत असे.. आपल्या नंतर या पोरीचं कस होणार याचा ती नेहमीच विचार करी.. पोरीचं वय जस वाढत होत तसं तीच शारीरिक व्यंग देखिल कमी होत गेले.... लहानपणी अंगाच्या तुलनेने मोठ दिसणार डोक लहान झाल होत... डोळे जरा मोठेच आणि काळा रंग कायम होता... बाकी सामान्य झाले.पोरी लहानपणी जितकी विद्रुप दिसायची तितकी आता दिसत नव्हती... आता ती साधरण पाच -सहा वर्षाची झाली होती....
मस्टर वर शाळेतील पहिल्या दिवशीची सही करुन मोहन मुख्याध्यापकानां भेटला. या! या!! माळी सर आपले स्वागत आहे.बसा! मुख्याध्यापक म्हणाले.
मोहन माळी आत्ताच डी. एड. करुन जि. प. शाळेत नोकरीला लागला होता. मोहन हुशार मेहनती व विज्ञानवादी होता. तो अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा सदस्य होता... आता पर्यत त्याने समितीच्या अनेक कार्यक्रमात भाग घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले होते.. आज त्याचा शाळेचा पहिला दिवस होता.. नोकरीची पाहिली सही करुन तो मुख्याध्यापक सरांच्या समोर बसला होता..
माळी सर!.. आपली ही शाळा आणि गावातील लोकां बाबत थोड सांगतो.. या गावातील लोक फार डांबरट आहेत. कोणाचे काही ऐकत नाही.. आपल्या शाळेची गाव शिक्षण समिती तर विचारूच नका.. त्यामुळे आपण आपले काम भले आणि आपण भले.... महिन्याचा पगार मिळाला की झाल..बाकी दुनिया गेली तेल लावत...या तत्वावर काम करा. समजले? मुख्याध्यापक म्हणाले. हो सर! मोहनने मान हलवली .
दोन तीन महिने मोहनने गावातील लोकांचा अभ्यास केला. मुख्याध्यापक सरांनी सांगितल्या प्रमाणे येथील लोकं खरच डांबरट तर होतीच त्याच बरोबर कमालीची अंधश्रध्दाळू होती... चांगल्या गोष्टीला देखिल नहाक विरोध करायची..
राईट टू एजूकेशन कायद्या खाली सर्वांना शिक्षण मिळावे म्हणून शाळा बाह्य मुलांच्या सर्वेचे काम मोहनकडे आले..त्याने संपूर्ण गाव फिरून जी जी मुलं शिक्षणापासुन वंचित आहेत त्यांची सर्वांची नावे नोंदवली व त्यां सर्वं मुलांना शाळेत आणले.. या साठी मोहनने काय काय कसरत केली ही त्यालाच माहिती होती.. कुणी गुरे चरायला जात होत,कोणी पक्षी मारायला, कोणी विटा पाडायला, कोणी मुलं सांभाळायला तर कोणाला पालक पाठवत नव्हते ..कोणच काय ?तर कोणच काय?....तरी हे सगळं दिव्य पार करुन त्याने सर्वच मुलांना शाळेत आणले..
मोहनला मिळालेल्या माहिती नुसार जंगलात एक घर आहे.तेथे एक शाळाबाह्य मुलगी आहे..मोहनने अधिक चौकशी केली तेव्हा ती भूताळीची मुलगी असल्याचे समजले.. व तेथे न जाण्याचा सल्लाही त्याला मिळाला.. मोहन आधीच विज्ञानवादी असल्याने त्याचे त्या मुली विषयी कुतूहल जागरुक झाले व उद्या जंगलातील त्या झोपडीत जाण्याचा निर्णय त्याने घेतला..
पोरी.. माय! माय!! करत धावत येवून शांताला जाऊन बिलगली.. ती भितीने थर थर कापत होती.. काय झाल ग पोरी? शांताने तिला विचारले... तेव्हा पोरीने झोपडीच्या आवारा कडे बोट दाखवले... शांताने त्या दिशेला पाहिले तर तिला सुद्दा धक्काच बसला....त्या आवारात चक्क एक माणूस उभा होता. किती किती वर्ष झाली होती झोपडीच्या आस पास कोणी माणूस फिरकला नव्हता आणि आज चक्क आवारात... शांताचाही स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.. पोरी तर दुसरा एखादा प्राणी पाहिल्यासारखे भ्याली होती.
कोणी आहे का घरात?.. मोहनने विचारले... तसं त्याला पाहुन आतमध्ये पळताना त्याने त्या मुलीला पहिल होत पण एक शिष्टाचार म्हणून त्याने विचारले... तशी शांता बाहेर निघाली आणि तिला बिलगून पोरीही...
नमस्कार आजी!..मी मोहन माळी आपल्या गावातल्या शाळेचा शिक्षक! ..आपल्या गावातल्या? शांताने काहीश्या रागात विचारले.. हो! आपल्या म्हणजे तुमच्या गावातल्या.. मोहन म्हणाला.. हे पहा गुरुजी! ज्या गावाने मला भूताळी ठरवून वाळीत टाकले त्या गावाशी माझा काही संबध नाही समजल?... ठीक आहे आजी! पण तुमच्या मुलीचा तर विचार करा ती चांगली शिकली तर तीच भविष्य उज्वल होईल. मोहनने समजावले... तशी शांता नरमली.. कारण तिला देखिल पोरीच्या भविष्याची फार चिंता सतावत होती.. शांताने मोहनला आत बोलवले.. म्हातारी आणि पोरी नंतर त्या झोपडीत आत जाणारा मोहन पहिलाच माणूस होता... मोहन आत जाऊन पाहतो तर काय?.. त्या लहानश्या झोपडीत कमालीची स्वच्छता होती.. घरात मोजक्याच वस्तु होत्या पण व्यवस्थित जागेवर लावल्या होत्या.. बाजुला बकऱ्यानांचा गोठा होता.. त्यांत एकदोन पिल्ल म्या.. म्या.. करत होती..म्हातारीने चहा केला त्यांत बकरीचे दुध टाकले.. मोहनने चहाचा पहिला घोट घेतला. त्याला आश्चर्य वाटले.चहा मस्त मसालेदार होता... आजी चहाची चव फार मस्त आहे!... भूताळीचा आहे ना म्हणून!.. ती उपरोधिक स्वरात म्हणाली.. आजीच्या प्रत्येक वाक्यात समाजावर रोष दिसत होता...
गुरुजी माझ्या पोरीला शाळेत घेतील का? नाहीतर तिलाही भूताळीची मुलगी म्हणून हाकलून लावतील.... आजी! काळ बदलला आहे.. आणि आता तर सरकार ने कायदाच केला आहे.की, प्रत्येक मुलाने शिकले पाहीजे..आणि फारच अडचण आली तर मी आहे ना आजी!..
बोला!... मुलीचे नाव काय?.. यांवर काहीवेळ आजी शांतच राहुन म्हणाली.. गुरुजी मी या मुलीचे काहीच नाव ठेवलेले नाही... खरतर याची मला कधी गरजच वाटली नाही.. मी तिला पोरी अशीच हाक मारते!.... अस कस आजी?.. कहितरी नाव तर लिहावच लागेल?... तुम्ही तिला पोरी म्हणून हाक मारता मग पार्वती लिहू?... म्हातारीने मान हलवली... वडलांचे नाव?.. पुन्हा आजी शांतच... आजी वडलांचे नाव?.. या प्रश्नावर आजी दचकली....तीन मुद्दामून पोरीला बकऱ्या पहायला बाहेर पाठवले... काय सांगु गुरुजी.?. ..अस म्हणत तिने त्या मुलीची जन्म कहाणी मोहनला थोडक्यात सांगीतली...एखाद्याच्या घरी जर राक्षस जन्माला आला तर.. थोड्याच दिवसांनी तो मोठा होतो आणि घरातील लोकांना व गावातील लोकांना खाऊन टाकतो.. म्हणुन त्याला काटयावर टाकून ताणत नेऊन दूर जंगलात नेऊन टाकतात.. ते राक्षस बाळ जो पर्यत रडत तो पर्यत लोक तेथे थांबतात.. रडणं थांबले की, काम झाला!.. असा शब्द बोलुन एक नारळ फोडतात.. व निघुन येतात...हे सर्वच ऐकून मोहन शॉक झाला...आजी! हे राक्षस वैगरे अस काहीच नसत.. स्त्रीच्या गर्भात काही दोष झाला तर विचित्र दिसणारी मुलं जन्माला येतात.त्यात विशेष असे काही नाही! जगात आता पर्यत कितीतरी मुलं जन्माला आली असतील.. पण त्यांत कधी ते मुल राक्षस झाल..आणि त्यांनी माणस खाली.. अशी कधी बातमी ऐकिवात नाही आजी!.... हो!...हे मला चांगलच ठाऊक आहे गुरुजी!..पण हे गावातल्या लोकांना समजावणार.. कोण?..कारण तसं असत तर पोरीने मला कधीच खाऊन टाकले असते!... आणि आता तुम्हांलाही!...अस सांगुन आजी हसली... आजीचे हे सगळे बोलण ऐकून... मोहनच्या मनात आजी विषयी प्रचंड आदर निर्माण झाला ...
ठीक आहे आजी! तुम्ही तुमच नाव लावू शकता.... बरं आडनाव?... पुन्हा शांतता.. आडनाव कोणाचे लावणार गुरुजी?... तीच्या बापाचा तर मला पत्ता नाही.. कारण मी गावात कधी जात नाही.. त्या दिवशी कोणच्या घरी तिचा जन्म झाला हे माहिती नाही..... मोहनने मोठा सुस्कारा सोडला.. आजी मग तुमच आडनाव लिहा?.... माझ आडनाव?.. काय आहे माझ आडनाव?... मला तर नवऱ्याने सोडली... आणि.. माझ्या सख्या आई -वडिलांनी सख्या भावा- बहीनीनी भूताळी म्हणून आसरा दिला नाही... मग माझे आडनाव तरी काय?... आजीचे ते सगळं बोलण मोहनचे काळीज चिरून टाकत होते.... अंधश्रध्देने हा समाज किती खालच्या पातळीला गेला आहे.. याची त्याला जाणीव झाली ..काहीवेळ तो निशब्द झाला....
ठीक आहे आजी! मी तीच नाव पर्वती शांता.. असच टाकतो आणि आडनावाचा रकाना तसाच ठेवतो...पार्वतीला स्पेशल केस म्हणून मी शाळेत दाखल करतो.
मोहनने रजिस्टर वर पर्वती शांता इतकंच नाव लिहून आडनावाचा रकाना रिकामीच ठेवला...
एव्हाना ही बातमी गावात आगी सारखी पसरली की ,नवीन गुरुजी त्या भुताळीच्या मुलीचे शाळेत नाव दाखल करण्यासाठी गेला आहे..
माळी सर!.. मी तुम्हांला संगितले होते.. थोड नियमात काम करत जा!.. आता त्या भूताळीच्या मुलीच्या प्रकरणा वरून ग्रामशिक्षण समितीने तातडीची मीटिंग लावायला सांगीतलीय मला... आता तुम्हीच काय ती उत्तरे दया! मुख्याध्यापक रागा - रागात बोलत होते....
मीटिंग सुरू झाली सगळे सदस्य चिडलेले होते... गुरुजी काय गरज होती त्या भूताळी मुलीचे नाव नोंदवण्याची?..ती मुलगी कोण? तीने कुठून आणली?...याची काहीच कल्पना नाही....आणि तिचे नाव तुम्ही नोंदवले?अध्यक्षांनी विचारले....त्या म्हातारीकडे ती मुलगी कुठून आली याची गावात कुणालाच खबर नव्हती...ती फक्त त्या आजीला आणि आता मोहनला माहिती होती.मात्र या विषयी त्याने कोणालाच काही संगितले नाही... कारण पर्वती काटयावरच राक्षस बाळ आहे अस समजले तर या प्रकरणाला वेगळे वळण लागले असते.. व पर्वतीचा शाळा प्रवेशाचा मार्ग अजुन खडतर झाला असता...... साहेब!.. कायद्यानुसार सगळ्याना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे!... आम्हांला कायद्याची भाषा शिकवू नका गुरुजी!.. तुम्ही नवीन आहात.. गावातील कायदे कानून तुम्हांला माहिती नाही!...तुम्ही त्या मुलीचे नाव रद्द करा बस!.. अध्यक्ष रागात म्हणाले..
तीच नाव रद्द होणार नाही!.. तिलाही शिक्षण घेण्याचा अधिकार आहे!.. बाकी आपली मर्जी.. मोहनने ठासून संगितले..
हे प्रकरण तालुका जिल्हा पातळी पर्यंत गेले.. मोहनने आपली सगळी शक्ती पणाला लावली त्याच्या जोडीला अंधश्रद्धा निर्मुलन समिती होतीच.. शेवटी.. कायद्याचा बडगा उगारला.. शिक्षण समिती आणि विरोध करणाऱ्या सगळ्यावर कायदेशीर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले तेव्हा कुठे.. पर्वतीला प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला......
पार्वतीचा शाळेचा पहिला दिवस.. मोहन तिला स्वतः घरून घेऊन आला..कारण म्हातारीला गावात प्रवेश बंदी होती.. तसही ती आलीच नसती कारण गावातील लोकांवर तिचा प्रचंड राग होता ...पार्वतीने शाळेच्या गेटमधनं मोहन सोबत प्रवेश केला.. त्या कळ्या कुट्ट आणि काहीसे मोठे डोळे असणाऱ्या पर्वतीला पाहुन कोणी हसले तर कोणी घाबरले.. तिला पहीलीच्या वर्गात बसवले... बाजूची मुलं तिला घाबरली...त्यामुळे काहीसे दूर सरकली..
एक दोन महिने तर पर्वतीला सगळं निरिक्षण व समजून घेण्यात गेले.. कारण तिच्यासाठी सर्वच नवीन होते.... नंतर ती एक एक शब्द बोलु लागली.. वर्गातील मुलांचीही आता तीच्या विषयी वाटणारी भीती कमी झाली होती...
मोहन तीच्या प्रगतीवर नजर ठेऊन होता. त्या मनाने तिने सर्व लवकर आत्मसात केले ...ती फारच कमी बोलायची.. ..मात्र अभ्यासात तीने चांगली प्रगती केली.. दिवस चालले होते.पर्वती आता चवथीच्या वर्गांत गेली. अंतर्मुख असली तरी आभ्यासामध्येही फार चांगली होती. गणित विषयात तर नेहमी तिला पैकीच्या पैकी मार्क मिळत.. पार्वती चवथी अतिशय चांगल्या मार्कांनी पास झाली.. आता मोहनने तिला आजीची परवानगी घेऊन एका दूरवरच्या आश्रमशाळेत प्रवेश घेऊन दिला ..जेणेकरून तीची राहण्याची आणि जेवणाची सोय होईल...आश्रमशाळेत तिचा प्रवेश चवथीच्या दाखल्यावर झाला. त्यामुळे तेथे देखिल तिचे आडनाव नव्हते...
मोहनने पार्वतीच्या शिक्षणाचाची योग्य ती व्यवस्था केल्या बद्दल शांताची देखील बरीचशी काळजी मिटली.. मोहनची बदली एका दुसऱ्या शाळेवर झाली...त्यामुळे आता त्याचा पार्वतीशी संपर्क तुटला...
जूनचा पहिला आठवडा सुरू होता.. पार्वतीची शाळा सुरू व्हायला आता थोडेच दिवस शिल्लक होते.. पार्वती आता नववीची परीक्षा पहिल्या क्रमांकाने पास होऊन आता दहावीत बसणार होती.... आश्रमशाळेत ती रुळली होती.. में महिन्याच्या सुट्टीत सध्या ती म्हातारी कडे होती.. आता एक आठवड्यात ती शाळेत जाणारच होती.......आज पर्वतीच्या नकळत...शांताने सगळ्या बकऱ्या खाटकाला विकल्या.पार्वतीने कारण विचारले तेव्हा ती म्हणाली.. पोरी! आता मी म्हातारी झाले.. आता कुठे त्यांच्या मागे फिरू?.. आता तु देखिल दोन चार दिवसांनी शाळेत जाशील.. म्हणून विकल्या..
रात्री झोपताना..शांता काहीश्या जड आवाजात म्हणाली.. पोरी! आता मी बरीच म्हातारी झाली आहे...आता मी कधी मरेन काही भरवसा नाही. म्हणून तुला काही सांगायच आहे व दाखवायचे आहे....शांता उठली.. तिने कपडयात गुंडाळलेली मोठी पत्र्याची पेटी काढली.... त्यांत अनेक वस्तु सोबत अजुन एक कुलप लावलेली लहान पेटी होती.शांताने ती उघडली त्यांत नोटांची थप्पी होती.. पोरी!..हे पैसे आहेत माझ्या आयुष्यभराची कमाई तूझ्यासाठी राखून ठेवली होती.....यात तूझ शिक्षण पुर्ण होईल..ते पैसे तिने स्मशानाततुन जे सोन मिळवले होते त्याचे होते.. याची खबर मात्र पार्वतीला नव्हती.तिला वाटले हे आज बकऱ्या विकल्या त्याचे असतील. पोरी! ही पेटी नीट जपुन ठेव.....
सकाळ झाली.. शांता उठली नाही.. पार्वतीने तिला उठवण्याचा भरपुर प्रयत्न केला..पण ती काही उठली नाही.. पार्वती आता मोठी होती.. तिला समजले माय देवाघरी गेली... तशी पार्वती खंबीर मनाची होती.. मायला सगळी लोकं भूताळी समजतात हे ती जाणून होती.. पण माय भुताळी नाही हे देखिल तिला माहीत होत... कारण इतक्या वर्षाचा सहवास होता तिचा... कधीतरी जाणवलं असत तिला....तीन डोळ्यांतील अश्रू पुसले...कारण तीच्या मदतीला कोणी येणार नव्हते....रात्री म्हातारीने दिलेली पेटी तीन बाहेर काढली.. झोपडीतील सर्व लाकडे काढुन तीन तीच्या लाडक्या माय वर ठेवली... आणि आपल्या दुःखाचा बांध सावरत तिने ती झोपडीच पेटवून दिली... अशा प्रकारे पार्वतीने आपल्या लाडक्या मायचा अंतिमसंस्कार केला.... आणि पेटी घेऊन तीच्या आश्रम शाळेकडे निघाली...
पार्वती शाळेवर पोहचली.. शाळा सुरू व्हायला अजुन काही दिवस बाकी होते.. मात्र आश्रमशाळा असल्याने अधीक्षक शाळेवर हजर होते.. पार्वतीने शाळेवर राहण्याची विनंती केली..अधीक्षकांनी ती मान्य केली.... शाळा सुरू होईपर्यंत ती अधीक्षकांच्या घरी भांडी पाणी तसेच कपडे धुवुन देत असे त्यामुळे तीची जेवणाची अडचण दूर झाली... काही दिवसांनी शाळा सुरू झाली.. पार्वती यंदा दहावीच्या वर्षाला होती... दिवस जात राहिले... ..
आज मोहनच्या शाळेवर लगभग सुरू होती... कारण त्याच्या शाळेत आज तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन होते... यजमान शाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्याची जबाबदारी मोठी होती.... आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन खुद्द जिल्हाधिकारी यांच्या मार्फत होणार होते.... कलेक्टर शाळेत येणार म्हणून मोहन व शाळेतील सर्वच शिक्षक स्वागताची व इतर तयारी करत होते.......... इतक्यात जिल्हाधिकारी यांची गाडी त्यांच्या लवाजम्या सह शाळेच्या फाटकात आली सुद्दा... मोहन व इतर शिक्षक लगबगीने.. त्यांच्या गाडी जवळ गेले..गाडीचा दरवाजा उघडला... जिल्हाधिकारी मोहन जवळ येऊन मोहनचे पाय धरून... आशीर्वाद दया सर!... आज मी तुमच्यामुळेच कलेक्टर होऊ शकले.....माझा आशीर्वाद आणि शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत आहेत ..पार्वती मॅडम !.....हे काय सर?.. मला नुसत पार्वती म्हणा!...नाही मॅडम!आज तुम्ही कलेक्टर पदावर आहात... पदाचा मान आहे तो! आणि तुम्हांला मॅडम सांगतांना मला कमीपणा नाही तर आभिमान वाटतोय... मोहन आपले आनंदाअश्रू...आवरत म्हणाला...
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पार्वतीने आपला संघर्ष वैगरे त्याचा काही उल्लेख केला नाही..पण ज्या व्यक्तिमुळे आपण संघर्ष करायला शिकलो त्या व्यक्तीचा म्हणजे मोहन सरांचा उल्लेख मात्र तीने आवर्जून आपल्या भाषणात केला आणि सगळ्याना असे शिक्षक मिळो अशी प्रार्थना केली... पर्वतीचे शब्द ऐकून मोहनचे डोळे पाणावले....
कार्यक्रम आटोपल्यानंतर निरोप घेतांना पार्वती पुन्हा मोहन जवळ येऊन त्याच्या पाया पाडली.. व पर्स मधुन काढलेला लिफ़ाफ़ा मोहन च्या हाती देत.. म्हणाली. सर!..तुम्ही जो माझ्या आडनावाचा रकाना रिकामा ठेवला होता.. तो येत्या पंधरा तारखेला पुर्ण होणार आहे...तुम्ही सह परिवार मला आशिर्वाद देण्यासाठी या!..... मिस्टर देखिल माझ्या सारखेच कलेक्टर आहेत. समीर राधा पवार....फरक फक्त इतकाच आहे की, त्यांना वडिलांचे नाव नाही आणि मला आडनाव नाही!... आम्ही एकाच बॅचला होतो... ओळख झाली विचार जुळले..प्रेम झाले आणि पंधरा तारखेला लग्न.. तुम्ही नक्की या सर!...चला सर! मी निघते.. कारण चार वाजता आपल्या त्याच जि. प.शाळेत गावकऱ्यांनी आपल्या शाळेतील मुलगी कलेक्टर झाली म्हणुन माझा सत्कार ठेवलाय...
शाळेत छान सजावट करण्यात आली होती.. गावचे सरपंच व शिक्षक हार- तुरे घेऊन पर्वतीच्या स्वागताला सज्ज होते.. शाळेत येताच सरपंच, शिक्षक व गावकरी यांनी तीच जोरदार स्वागत केल.... पार्वतीला आपली ती शाळा पाहिल्यावर गहिवरून आले... सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या... तीच्या शाळा प्रवेशासाठी मोहन सरांनी केलेले प्रयत्न.... गावकऱ्यांचा कडाडून विरोध.. शाळेचा तो पहिला दिवस.. तिला पाहुन हसणारी... घाबरून दूर पाळणारी मुलं.... सगळं सगळं... अगदी तीच्या डोळ्या समोर दिसले...
सरपंचांनी त्यांच्या स्वागतपर भाषणांत सुरवातीलाच पार्वतीची माफी मागितली... बाईसाहेब त्या वेळेस मी सरपंच नव्हतो..पण गावकरी मात्र होतोच... त्या वेळेस गावकऱ्यांनी आपल्याला शाळा प्रवेशाबद्दल जो त्रास दिला त्या बद्दल मी संपुर्ण गावकऱ्यांच्या वतीने माफी मागतो... आपण जीवनात इतका संघर्ष करून इतक्या कमी वयात कलेक्टर झालात या बद्दल आम्हा सर्वांना आपला अभिमान आहे.. आणि आपण या शाळेची माजी विद्यार्थिनी आहात ही तर आमच्यासाठी अजुन अभिमानास्पद गोष्ट आहे... आपण कलेक्टर झाल्या बद्दल मी पुन्हा एकदा.. सगळ्यांच्या वतीने आपले अभिनंदन करतो!....
मला आपल्यावर कोणताही राग रोष नाही.. तो सगळा त्या वेळेसच्या परिस्थीतीचा दोष असेल कदचित.. ...फक्त माझी आता एकच इच्छा आहे की,... आता पुढे असा उपेक्षित मुलगा किंव्हा मुलगी शाळेत आली तर... त्यांच्यावर माझ्या सारखी वेळ येऊ नये.... आपण सर्वानी मला इथे बोलवले आणि माझा सत्कार केला त्या बद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार.... धन्यवाद..
कार्यक्रम आटोपल्यानंतर पार्वती गावकऱ्यांचा निरोप घेऊन गाडीत बसली...गाडी गावच्या मुख्य रस्त्या वर आली.... हा तोच रस्ता होता.. ज्या रस्त्या वरून कधी काळी राक्षस बाळ म्हणून गावकऱ्यांनी तिला काटयावर ठेऊन ताणत नेले होते.......मात्र ते राक्षस बाळ म्हणजे पार्वती आहे या गोष्टीची कल्पना मोहनसर... सोडुन..ना गावकऱ्यांना आहे... ना... पार्वतीला......

लेखन: चंद्रकांत घाटाळ..
संपर्क क्रमांक: ७३५०१३१४८०