भावनांचा कल्लोळ

Bhawana Manatlya

प्रिय ,
सुहास

पहिल्यांदाच एकेरी नावाने उल्लेख करत आहे. कारण, तुला नाही ना आवडत.
‌‌तू माझ्या जीवनाचा जोडीदार झाला. माहेरचा उंबरठा ओलांडला आणि सासरी आले. तुझी कधी झाले ते कळलेच नाही. सर्वस्वी तुझीच झाले रे.
परंतु, आजही जुने दिवस आठवले तरी अंगावर अजुनही काटा उभा राहतो. नकळत डोळे पाणावतात. तुझा तो राग .... कसा आणि केव्हा यायचा. हे मात्र कळत नव्हते. हो, तू मात्र रौद्र रूप धारण करायचा. नकळत शब्दांच्या त्या खोचकतेने माझ्या काळजाला झरे पडायचे. तुला वाटायचे नेहमी आपलेच बरोबर. तुझा स्वभाव ओळखण्यासाठी कितीतरी काळ गेला. संसाराची दोन तप पूर्ण होत आली. तरीही तुझ्या मनात काय चाललंय याचा कधी कधी थांगपत्ता लागत नाही. पण, जसा तू रागीट तसाच तू प्रेमळही.
जसे एका जोरदार पावसानंतर आभाळ जसे स्वच्छ होते. तसा तू आहेस. तुझ्यातले प्रेम कसे ओसंडून वाहते. एका निर्मळ आणि स्वच्छ वाहणाऱ्या झऱ्यासारखा सतत वाहणारे तुझे हे प्रेम.
दिवसेंदिवस तुझ्यात बरेच बदल होत गेले ‌‌. परंतु, नावाप्रमाणेच तुझ्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते.
जीवनात तू खूप संघर्ष केला. आईवडीलांचा एक प्रेमळ विश्वास होता. त्यांच्या पायाशी सुखाची आरास करण्याचा नेहमीच प्रयत्न करीत होता. गरीबीचे चटके सहन करूनही
चेहऱ्यावर मात्र हास्याचे कारंजे होते.
आपल्या आयुष्यात संसाराच्या वेलीवर दोन फुले उमलली. तेव्हा आणखी मोठी जबाबदारी पडली तुझ्यावर. स्वतःचे मन मारून इतरांना कसा आनंद देता येईल याचाच तू नेहमी विचार करतो.
तू विद्यादानाचे कार्य अतिशय उत्तम करतो. तू एक हाडाचा शिक्षक आहेस. तळमळ आणि धडपड तुझ्या कृतीतून दिसून येते. तुझी शिकवण्याची शैली मला फार आवडते. तुझा तो कणखर आवाज मनाला उभारी देऊन जातो.

मी जेव्हा तुझ्या जीवनाचा भाग झाले. हो, तेव्हा थोडेफार आयुष्य बदलले तुझे. कारण, माझ्या मुळे तुझ्या स्वातंत्र्यावर बंधने आली होती.

मला खूप शिकायचे होते. संगीत माझा छंद होता. पण, लग्नानंतर आलेल्या जबाबदारी मुळे मी ते करू शकले नाही. पण, तू नेहमीच प्रोत्साहन देत आला.
तुझा सडेतोड स्वभाव सगळ्यांनाच नडत आला. या स्वभावामुळे बऱ्याच जणांना तू नकोसा असतो. कारण, तुझा स्पष्टवक्तेपणा , तुझ्यात असलेली निर्णय घेण्याची क्षमता, खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. कोणतेही काम चांगल्या पध्दतीने व्यवस्थित कसे पुर्ण होईल . या कडे तू लक्ष देतो.


गणिताचा तर मास्टर..... पण, इतर विषयांचे अफाट ज्ञान सामावलेले आहे तुझ्यात. तुझी लेखनी तर सतत कार्यरत असते. आयुष्याची संध्याकाळ असो किंवा प्रेम विरह किंवा कोणताही विषय असो. तो हाताळण्याची तुझी कला , तुझी हातोटी वेगळी आहे.
‌ भरभरून जगणं तुझ्याकडून शिकावं. प्रत्येक गोष्टीत तुझा सल्ला कुटुंबियांना अनमोल ठरतो.
आयुष्य सरत चालले आहे. आयुष्याच्या या वाटेवरती खूप काही करायचे राहिले आहे. खूप स्वप्न पूर्ण करायची आहे.
हि विरान संध्याकाळ संपण्याच्या आधीच मनातल्या भावना तुझ्या पर्यंत पोहोचवायचा आहे. भावनांचा पूर आला कि परिस्थिती बिकट होते. पण, आता आपण एकमेकांचे मन जपायला हवे. तरच पदरी यशाचं माप पडेल.
मुले तर मोठी झालीत. पण,आपली जबाबदारी काही संपत नाही. त्यामुळे आपणही त्यांच्यासोबत त्यांच्या सारखे मनसोक्त जगू या.
फुलपाखरू होऊन उंच उडू या. मधुगंधात डुबून या सुगंधी जीवनाचा आनंद लुटू या.
तापलेल्या जमिनीवर जेव्हा पाण्याचा थेंब पडल्यावर आपल्याला जेवढा आनंद होतो. तेवढा वेळ मी तुझ्यासोबत आयुष्य जगणार आहे.
फक्त तुझी सोबत कायम हवी आहे.

                           फक्त तुझीच

                           आश्विनी










आश्विनी