भुतकाळात डोकावतांना (भाग/५)

कथामालिका


भुतकाळात डोकावतांना (भाग/५)

एक ना एक दिवस सगळं काही नीट होईल. हा विचार करून ती एक एक दिवस पुढे ढकलत होती. तिच्या माहेरच्या लोकांनीही तिच्याशी काहीच संपर्क केला नाही. पुढे....

आता प्रविणचा वाढदिवस जवळ आला‌ आहे. तेव्हा काही तरी प्लॅनिंग करू या. या विचाराने ती आनंदी झाली.

एके दिवशी तब्येतीचे कारण पुढे करून मी मेडीकलवरून गोळी आणायला जात आहे असे सांगून ती जबरदस्तीने घराबाहेर पडली आणि केकचे साहित्य घेऊन आली.

ज्या दिवशी वाढदिवस होता. त्यादिवशी ‌नेमके प्रविण घरात नव्हता. काहीतरी कामानिमित्त तो बाहेर जाणार होता. त्यामुळे तिला केक करायला जरासा वेळ मिळाला. त्यात नेमकं मावशी पण घराबाहेर पडली. कितीतरी दिवसांनी तिने आज मोकळा श्वास घेतला होता. कसलेही दडपण नव्हते की भिती नव्हती. वाटलं होतं हा एक क्षण आनंदाने जगावा. असे तिला वाटू लागला.

प्रविण संध्याकाळी घरी येण्याआधीच तिने सर्व तयारी करून ठेवली. आज ती जास्त आनंदी झाली होती. तिला वाटले आज तरी प्रविण आपल्याशी चांगला वागेल.

पण, रोज वेळेवर येणारा प्रविण आज लवकर आलाच नाही. बरीच रात्र झाली तरी प्रविण आला नव्हता. रात्री एकच्या सुमारास प्रविण आणि मावशी आले. दोघांनाही एकत्र पाहून तिने विचारले.

"प्रविण कुठे गेला होतास तू? मी केव्हापासून तुझी वाट बघतेय आणि ही मावशी तुझ्यासोबत कशी काय? ती तर नातेवाईकांना भेटायला गेली होती ना!"

त्याच्या गळ्यात पडून ती लाडाने बोलू लागली. पण, त्याने तिला धुडकावले. ती दूर जाऊन पडली.

"प्रविण , अरे या महाराणीने केक बनवला आहे. बघ तरी एकदा खाऊन.‌ असे म्हणत मायाने तो केक उचलला आणि तिच्या तोंडावर फासला."

"तू बाहेर कशी गेलीस? काय मिळते बाहेर जाऊन. मजा मारायला जातेस का? थांब आता तुला सोडतच नाही."
असे म्हणत प्रविणने तिच्या अंगावर धाव घेतली.
खूप मारझोड केली. त्यात मायानेही हात धुवून घेतले.

"मी काय म्हणते एकदा ऐक तरी." अर्चना पोटतिडकीने बोलू लागली.

परंतु, प्रविण आणि माया ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
ती आधीच इतकी थकली होती की तिच्यात विरोध करायची सुध्दा ताकद उरली नव्हती. खूप मारझोड झाल्याने तिचे अंग दुखू लागले. कशीबशी रात्र सरली. पण, आता येणारी प्रत्येक सकाळ तिला नकोशी वाटू लागली. पण, काहीच करू शकत नव्हती. आता तर प्रविण आणि माया जेव्हा केव्हा घराबाहेर जात तेव्हा तेव्हा बाहेरुन कुलूप लावले जाऊ लागले. त्यामुळे ती कोणाशीही संपर्क करू शकत नव्हती. एक एक दिवस तिला जड जात होता. आठ दिवसांनंतर तिचा वाढदिवस होता. दोन दिवस आधीपासूनच प्रविणचे आणि मायाचे वागणे अचानक बदलले. ते दोघेही तिच्या सोबत अतिशय प्रेमाने वागू लागले. त्यामुळे तिच्या शरीरावरील आणि मनावरील मरगळ दूर झाली. त्यांचे काही तरी प्लॅनिंग सुरू आहे असे अर्चनाला वाटू लागले.

"अर्चना , वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे बघ आज तू छान तयार हो. तुझा वाढदिवस आहे‌ ना आज. आपण फिरायला जाणार आहोत. फक्त तू आणि मी." प्रविण तिच्या जवळ गेला आणि अगदी प्रेमाने स्पर्श करीत बोलू लागला.

खरंच प्रविण, असे म्हणत ती प्रविणच्या जवळ गेली.
पण, प्रविणने तिला दूर केले.

"मॅडम, तयार व्हा पटकन. आपल्याला जायचे आहे ना."

प्रविण जरा जास्त‌ लाडात आला होता.
"हो आलेच."

स्वतः मायाने अर्चनाला तयार केले. पण, अर्चनाच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती.

दोघांच्याही मनात एकाचवेळी इतके सौजन्य ,इतके प्रेम कसे काय निर्माण झाले. काही तरी डाव शिजतो आहे. आपण सावध रहायला हवे.

थोड्याच वेळात एक गाडी आली. प्रविण अर्चनाला घेऊन गाडीत बसला.

अर्चना अतिशय आनंदात होती. कितीतरी दिवसांनी ती आज प्रविण सोबत फिरायला निघाली होती.

" प्रविण, पण ही गाडी कशाला आणि कोठून आणली ? कोणाची आहे?"

"तू बस, तुझ्यासाठी आणखी एक सरप्राइज आहे. ते घेण्यासाठी तयार रहा."

त्याने तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. त्यामुळे तिला समजतच नव्हते. आपण कुठे जात आहोत.

"प्रविण ,हे सगळं काय आहे. कोणतं सरप्राइज आहे."

"अगं, तू चल तर आपण मस्त एका निसर्ग रम्य ठिकाणी जाणार आहोत."

अर्चनाने विचार देखील केला नव्हता. की प्रविण तिला असे सरप्राइज देणार आहे म्हणून.
खूप छान गप्पा मारत प्रवास चालू होता. कितीतरी दिवसांनी ती स्वतःच्या नवऱ्याजवळ बसली होती.

प्रविण आपण कुठे चाललो आहोत? शहराच्या बाहेर आलो का? एकतर तू माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहेस. मला सांगत देखील नाही कुठे नेत आहे ते. मला आता खूप तहान लागली आहे."

नेमकी हीच संधी प्रविणने साधली. आधीच आणून ठेवलेली कोल्ड ड्रिंकची बाॅटल तिच्या पुढे धरली. तिने लगेच कोल्ड ड्रिंक घेतलं आणि काही वेळातच तिला झोप येऊ लागली.‌

"प्रविण, किती वेळ लागेल आपल्याला. मला झोप येत आहे."
अर्चना तू झोप निवांत. मी उठवतो तुला.

अर्चना गाढ झोपी गेली. त्यानंतर प्रविण तिला कुठे घेऊन जातो हे बघुया.

©® अश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all