भुतकाळात डोकावतांना (भाग/३)

कथा मालिका


भुतकाळात डोकावतांना (भाग ३)

ठरल्याप्रमाणे दोघेही परत एकदा भेटले.

"अर्चना आपण लग्न करणारच आहोत. पण, जरा पैसे... तेव्हा अर्चना हे बघ तू तुझ्या घरून काही पैसे आणि दागिने घेऊन ये. आपण आजच लग्न करू या."

"पण, ते कसं शक्य आहे. मी नाही आणू शकणार. आई घरीच असते आणि तू रीतसर घरी येऊन आपल्या लग्नाविषयी बोलणार होता ना? मग काय झाले?"

"अगं, माझे आईवडील सुध्दा आपल्या लग्नासाठी तयार नाही आणि तुझ्या घरचेही संमती देणार नाही. आणि माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मी आपल्यासाठी एक खोली भाड्याने घेतली. त्यामुळे काही दिवस खर्चासाठी पैसे लागणारच की."

"पण, तुझं घर असतांना तू भाड्याने घर का घेतलं. मी राहील तुझ्या आईबाबांसोबत. त्यामुळे आपले पैसे वाचतील ना!"

" हे बघ राणी, तू माझी होणारी बायको. मी तुला आत्ताच सांगितले ना. मी तुझ्या सुखासाठी काहीही करू शकतो. म्हणून मी सांगतो तसे ऐक. "

त्यानंतर दोघांनी कधी आणि किती वाजता ,कुठे भेटायचे हे ठरवले.

"ठीक आहे माझ्या राजा. तू म्हणशील तसे."

प्रविण तिला गोड गोड बोलून फसवत होता आणि ती त्यात पुरती अडकली होती.

ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी ती पैसे आणि तिच्या आईचे दागिने घेऊन घरातून निघून गेली.

संध्याकाळ उलटून गेली तरी अर्चना खोलीबाहेर कशी आली नाही. म्हणून तिची आई तिला बघायला गेली. तर कपाट उघडे होते. पैसे आणि दागिने जागेवर नव्हते.

"अहो, बघा ना कपाट उघडे आहे. पैसे आणि दागिने सुध्दा नाही आणि हो अर्चना सुध्दा घरात नाही. म्हणजे ती घरातून पळून तर नाही गेली."

अर्चनाच्या आईच्या मनात अनेक शंका कुंशका येऊ लागल्या.

"हे बघ नलिनी असे काही होणार नाही. आपली मुलगी फार समजुतदार आहे."

पण, घरात अर्चना नव्हती आणि दागिने, पैसे देखील. सगळ्यांच्या मनात कालवाकालव सुरू झाली . म्हणून सगळे जण काळजीत पडले. तिचे दोन्ही भाऊ तिच्या सगळ्या मैत्रिणींकडे जाऊन आले. पण, ती कोणाकडेच नव्हती.

"अजून थोडावेळ वाट बघूया. नाही तर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी लागेल. अर्चनाचे वडील बोलले."

रात्रीचे नऊ वाजत आले. आता मात्र अर्चनाची आई घाबरली. सतत येरझाऱ्या घालत होती.

"अहो, पोरीला कुठे शोधायचे. रात्रीचे नऊ वाजत आले आता? आता काय करायचे?"

"ठीक आहे. मी जाऊन येतो." असे म्हणत असतांनाच अर्चना आणि प्रविण एकत्र आले. एका नवरीप्रमाणे तिने साडी नेसली होती. गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत कुंकू. ती सगळ्यांच्या पाया पडणारच की .

"अर्चना काय आहे हे? तू लग्न केलं आणि कोण आहे हा? कुठे राहतो ? काय करतो? आम्हांला एकही शब्द न सांगायची गरज नाही वाटली. काही लाज शरम आहे की नाही? मायबापाची इज्जत धुळीला मिळवली? तू शुध्दीवर आहेस का?"

"आई, मला काही बोलू देणार की नाही."

अर्चना तिच्या आईवडीलांना सांगण्याचा प्रयत्न करू लागली.

"आई ,बाबा ऐका ना. माझे प्रविणवर खूप प्रेम आहे. त्याच्या शिवाय मी जगूच शकत नाही. म्हणून आम्ही लग्न केलं. आम्हांला फक्त तुमचे आशीर्वाद पाहिजे होता."

" अगं, तुला समजत कसं नाही. तू तुझं आयुष्य बरबाद करू नकोस. हे बघ अजूनही सावर. वेळ गेलेली नाही. तू आमची लाडकी लेक आहे गं."

"आई, मी फक्त सांगायला आले आहे. तुम्हांला आशीर्वाद नसेल द्यायचा तर नका देऊ. मी निघते."

अर्चनाच्या दादा आणि ताईनेसुध्दा खूप समजावले. पण, अर्चना काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. तिने तिच्या बहीणीचे हात झिडकारले आणि निघाली.

हा धक्का सहन न झाल्याने तिच्या आईला चक्कर आली आणि खाली पडली.

आपली आई कोसळून खाली पडत आहे. हे दिसून देखील तिने मागे वळून बघीतले सुध्दा नाही. पुन्हा कधीच या घराची पायरी चढणार नाही. अशी शपथ घेऊन ती घराचा माहेरचा उंबरठा ओलांडून बाहेर पडली.

पुढे तिच्या आयुष्यात काय घडते पाहुया पुढच्या भागात.

©® अश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all