भुतांच्या गप्पा

Funny story

भुतांच्या गप्पा 


मध्यरात्र उलटली होती. दूरवरच्या माळरानावर शुकशुकाट पसरला होता. मधूनच येणारी वाऱ्याची झुळूक अंगावर काटा आणत होती. चांदण्याच्या प्रकाशात झाडावरती दोन आकृत्या बसलेल्या दिसल्या. त्यांचं आपापसात काहीतरी बोलणं चालू होतं. लांबच लांब केस... मोठे पांढरे झगे... चेहरा पांढरा फटक... लाल लाल डोळे.... बसक नाक... मोठी वाढलेली नखे... भुत म्हणून जे जे हवं ते त्यांना पाहून वाटतं होतं... बहुधा ते दोघे नवरा बायको असावेत. कारण त्यातल्या एका भुताचा आवाज सतत ऐकू येत होता आणि दुसरं भूत शांत ऐकत होतं.


"अहो ,.... अहो आजच जेवण कसं झालं होतं. ते कवट्यांची आमटी कशी झाली होती.....सांगा ना ?? "

( दुसरं भूत बोटानेच सुंदर म्हणून सांगतं )

"अहो मला ना तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. मला वाटतं आपल्या हडळीच त्या पिंपळावरल्या मुंज्याशी काहीतरी गॅटमॅट चालू आहे. "


"तुला कोणी सांगितलं हे..?? "


"काल आपल्या शेजारची जकीण आली होती.. कुचकट मेली. तिचा मुलगा त्या खविसाच्या पोरीच्या मागे आहे हे तिला माहीत नाही.. माझ्या पोरीच्या उचापती सांगायला आली लगेच. आगलावी नुसती... " 
( ते भूत तिच्या नावानं कराकरा बोटं मोडत ) 


"तिच्यावर काय विश्वास ठेवतेस...? जिवंत असताना पण तिने कोणाचं चांगलं केलं नाही. मेल्यावर पण चहाड्या करतेय ती."


"अहो पण खरंच आपल्या पोरीचं काय असेल तर तिला विचारायला हवं. चांगलं स्थळ असलं तर आपण तिला पिंपळावरच देऊ. म्हणजे कसं आपल्याला पण लेकीकडे जाता येईल.. "


"चालेल. पण आधी त्या मुंज्याची माहिती काढायला हवी. त्याचा बाप आग्या वेताळ जाम खवट आहे म्हणतात. नि त्याची आई एक नंबरची कुस्की हडळ आहे. आपल्या पोरीचं जमेल का तिकडे....?? "


"अहो तो मुंज्या आपल्या इथल्या सरकारी स्मशानात कामाला आहे. पगार पण असेल चांगला. आणि पण त्यांनी हुंडा मागितला तर काय द्यायचं....?? "


"हे बघ हुंडा मागितला तर मी 10 वटवाघळ आणि हाडांचा हार घालीन. बाकी मी काही देणार नाही. "


"असं काय करता. आपली एकुलती एक हडळ आहे ना मग तिचं लग्न थाटात नको का करायला...?? आपण निदान तिला  रक्ताचं पाणी चढवलेला तरी एखादा कवट्यांचा नेकलेस देऊ... असं हो काय... !!!"


"बरं देऊ. आणि लग्नाला आपले नातेवाईक सोडून कोणाला बोलवायचं नाही. नाहीतर उगीच इकडच्या आणि तिकडच्या गावातल्या भुतांना बोलवायला लागायचं. "


"मी माझ्या माहेरच्यांना बोलावणार आहे काही झालं तरी... "


"अग तुझ्या घरचे आले तर 50 घुबडं ,100 वटवाघळ आणि 10 माणसं आणली तरी पुरायची नाहीत गं.."

 ( भूत हे हळू आवाजात म्हणतं. बायकोपुढे आवाज करायची भुताचीही हिंमत नाही ) 


"काय म्हणालात......???? माझ्या माहेरचं जर कोण आलं नाही तर तुमच्या वडावरच्या नातेवाईकांना मी अजिबात बोलावणार नाही. सांगुन ठेवते. "


"नको गं. आमची आई चेटकीण आता जक्ख म्हातारी झाली आहे गं. निदान तिला मोतीबिंदू व्हायच्या आत ती नातीचं लग्न तरी बघेल. आपण बोलवूया सगळ्यांना. बास खूश. "


"हो खूप खुश..... मी काय म्हणते तुम्ही मला तो नवीन बोटांचा हार घेऊन द्याल का. आत्ताच नवीन आलाय आत्मा ज्वेलर्स मध्ये. लेकीच्या लग्नात मिरवेन मी पण....!!! "


"आधीच काय कमी खर्च होणारे का लग्नाचा. आधी आपल्याला लग्नासाठी मोठं वडाच नाहीतर पिंपळाच झाड बघावं लागेल. सगळी तयारी करायला लागेल. तुझ्या हाराच मग बघू. तोपर्यंत तू सध्या हा लिंबाचा हार घाल..( आपल्या गळ्यातला हार काढून तो तिच्या गळ्यात घालतो )  किती छान दिसतेस गं. एकदम सुंदर हडळ...!!! "


त्यावर बायको भूत गोड लाजली आणि तूर्तास तरी नवीन हाराचा विषय संपला म्हणून नवऱ्या भुताने सुटकेचा निश्वास सोडला. 


समाप्त. 


   विनोदी लिहण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. आशा आहे की तुम्हाला आवडेल. कंमेंट मधून नक्की सांगा. याच्या पुढील भागात तुम्हाला भुताच्या लग्नाची पत्रिका वाचायला मिळेल... तर मग वाचायला तयार आहात ना.. भेटू पुन्हा लवकरच.