भूक.... तिलाही लागतेच ना!

Even Home Makers Can Be Hungry Too


आज सासऱ्यांच्या एकसष्टीचा कार्यक्रम... पुण्याहवाचन, साखरतुला, अन्नदान अश्या विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. जेवणाचा तर अगदी थाट होता... पुरणपोळी, खीर, बटाट्याचा रस्सा, पुऱ्या, वडे -भजे,कोशिंबीर अन् काय काय!!

लहान मुलं, नंतर पुरुष मंडळी, ज्येष्ठ स्त्रिया ह्यानंतर घरातल्या सु्नांची पंगत बसली.

ह्या शेवटच्या पंगतीत घरातल्या सुनांसाठी उरलं काय तर बटाट्याची भाजी, पुऱ्या अन् भज्यांचा चुरा... नाही म्हणायला मीठ आणि लिंबू! पुरणपोळीचं तर नामोनिशाण शिल्लक नव्हतं.

त्यातल्या एका चटपटीत सुनेनं पुरणपोळ्या करण्यासाठी म्हणून कणिक मळायला घेणार तोच...

"चला आवरा लवकर...दिवसभर भटारखाना सुरु ठेवू नका " चुलत सासऱ्यांची हाक आली अन् दिवसभर हौसेने रांधणाऱ्या सुनांनी मसालेदार रस्सा संपून कोरड्याठक झालेल्या बटाट्याच्या फोडींसोबत पुऱ्या कश्यातरी पोटात ढकलल्या.

************************************************

उन्हाळ्याच्या सुट्टीत ती कुटुंबासहित जावेकडे गेलीये राहायला.

सकाळी नाश्ता बनवला तो लहान मुलं आणि पुरुषांमध्ये संपला. मग बायकांच्या वाट्याला थोडी थोडी रात्रीची फोडणीची खिचडी आली.

दुपारी जेवायच्या वेळी सगळी पुरुषमंडळी आधी अन् शेवटी बायकांची पंगत बसली अन् पातेल्यातला उरलेला आमरस सगळ्यांनी वाटून घेतला.

सगळ्यांनी आमरसाच्या वाट्या संपवल्या. हिला मात्र जेवणाच्या आमरस शेवटी शांतपणे चमच्याने खायला आवडतो म्हणून तिनं राखून ठेवलेला तो मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी! तितक्यात घरातलं एक लेकरू आंब्याचा रस पाहिजे म्हणून रडत आलं..

सासूबाईंनी लगेच हिच्या पुढ्यातली वाटी लेकराच्या तोंडाला लावली...

ही बोलली की "त्यानं भरपेट खाल्लाय आमरस.. माझा खायचा राहिलाय.. राहू देत माझ्यासाठी तर "लेकराचं खाणं काढते" म्हणून लेकराच्या आईनं त्याच्या तोंडची वाटी काढून हिच्या पुढ्यात आदळली...

तिचं तोंड तसंच कडू कडू झालं!

************************************************

तिच्या चुलत नणंदेचा साखरपुडा होता. कार्यक्रम आणि वरपक्षाकडच्या मंडळींची जेवणं होईतो दुपारचे तीन वाजून गेले. सगळ्या गडबडीत तिनं सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. पंगतीवर पंगती उठतच होत्या.भुकेनं अगदी राहावेना आणि कुणी जेवायला बोलवेना.

तिच्या नणंदा -भाच्या हसत खेळत गुलाबजाम, पकोडे तोंडात टाकत, एकमेकींना भरवत होत्या अन् पंगती वाढत होत्या. हिला मात्र असं काही मध्येच खायची हिंमत होईना.सासुरवाशीणीची मर्यादा राखायची असते ना!

शेवटी भुकेनं तिच्या संयमावर मात केली अन् तिनं तिच्या तीन वर्षांच्या मुलाची ताटली समोर ओढून त्यातली उष्टी पोळी अन् वरण खायला सुरुवात केली.

तिथे पंगत वाढणाऱ्या थोरल्या जाऊबाईंना तिनं गुलाबजाम मागितले... त्यांनी तिच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकत गुलाबजामचं वाडगं पुढे नेलं.

नंतर महिलावर्गामध्ये रंगलेली हिच्या खादाडीची चर्चा ऐकली अन् तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं.

********* **************************************

तिच्या आजेसासूबाई वारल्या तेव्हा घरातले सगळे मोठया घरी गेले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ती, तिची जाऊ आणि बच्चा कंपनी अंघोळ इत्यादि सोपस्कार आटोपण्यासाठी घरी आली.

तिच्या शेजारी राहणाऱ्या एका नातेवाईकांनी रीतीप्रमाणे पिठलं पोळ्या आणि भात असा स्वैपाक तयार केला आणि तिकडे काकांकडे नेऊन देत असल्याची सूचना दिली.(महाराष्ट्रात काही भागात मरणघरी अंत्यसंस्काराच्या दिवशी स्वैपाक देण्याची पद्धत आहे.)

एव्हाना संध्याकाळचे साडे पाच वाजलेले.तिने शेजारणीला विनंती केली की द्यायचंच आहे तर त्यातल्या पाच -सहा पोळ्या आणि भात आम्हाला इथे द्या कारण मुलं भुकेली आहेत आणि आम्ही देखील सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही.तिथे जाऊन हेच अन्न जेवणार पण अजून तासभर उशीर होईल. आता थोडं अन्न पोटात गेलं तर बरं वाटेल.

पण त्या बाईंनी सरळ नकार दिला... कदाचित "तिची भूक" त्यांना त्यांच्या रीती-परंपरेक्षा खुजी वाटली असावी!

************************************************

मैत्रिणींनो, स्त्री ही गृहलक्ष्मी, अन्नपूर्णा समजली जाते. पण काही प्रसंगी तिला वेळेवारी पोटभर जेवणसुद्धा मिळत नाही.

सगळ्यांना रांधून तृप्त करणाऱ्या घरातल्या अन्नपूर्णांना गरम आणि ताजे जेवण मिळणे आवश्यक आहे...

तुम्हाला काय वाटतं?