भूक... तिचीही अंतिम भाग

Horror Story Of A Hungry House
माधवकडे सत्यनारायणाच्या पूजेसाठी आलेले ऑफिसमधले साठे साहेब माधवचं घर बघून अस्वस्थ झाले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी माधवला विचारलं देखील... "तुम्हाला तिथे काही अतर्क्य अनुभव आलेत?"

काय आहे माधवचं उत्तर -

"अं... नाही बुवा... तसं काही नाही... तसंही मी अंधश्रद्ध नाही... प्रत्येक गोष्टीचा डोळसपणे विचार करतो." माधव उत्तरला अन् तितक्यात मोठया साहेबांनी साठे साहेबांना बोलावल्याचा निरोप आला अन् तो विषय तिथेच संपला.

"तेल संपत आलंय! उद्या आणायला लागेल हं !" रात्री जेवण झाल्यावर ओढणीला हात पुसत अनघा माधवजवळ आली अन् तो भानावर आला. ह्या महिन्यात पाच किलोचा हा दुसरा डबा संपला! अजून महिना संपायला 10 दिवस बाकी आहेत...

"तुम्हाला तिथे काही अतर्क्य अनुभव आलेत?" साठे साहेबांचे शब्द माधवच्या कानात घुमू लागले... तो अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत सकाळची वाट पाहत राहिला.

"साहेब, तुम्ही काल मला काही विचारत होतात... आमच्या घराबद्दल... प्लीज मला सांगा.... काय झालं... काय प्रॉब्लेम आहे तिथे" माधव घायकुतीला आला.

"तुम्ही राहता तो प्लॉट एका सदाशिव नावाच्या शेतकऱ्याचा होता... तो त्याची पत्नी आणि मुलगा... सुखी परिवार... प्लॉट घेतला.... घर बांधायला घेतलं... ज्यानं घर बांधायचा कॉन्ट्रॅक्ट घेतला त्यानं ह्यांना फसवलं.... भरमसाठ रक्कम घेऊन फक्त पायापर्यंतच बांधकाम केलं...

सदाशिवजवळची पुंजी संपली... त्यानं त्या कॉन्ट्रॅक्टरला हाकलवून लावलं आणि शेत गहाण टाकून घर बांधणीसाठी रक्कम उभारली. पण एका अपघातात त्याचा मृत्यू झाला... घरबांधणीसाठी जमवलेला पैसा उपचारात खर्च झाला.... सदाशिवाची पत्नी सारजा त्याच प्लॉटवर झोपडी बांधून राहू लागली... दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करू लागली...पुढे त्याचा मुलगाही दम्याच्या आजाराने पुरेश्या उपचाराअभावी मरण पावला....

झालेलं कर्ज फेडण्यासाठी सारजानं तो प्लॉट विकला अन् गावातल्या सावकारानं तो अगदी पडत्या भावात विकत घेतला.... दोन वर्षात सारजादेखील खंगून खंगून मरून गेली... ते ह्या मोठ्याश्या प्लॉटवर टूमदार घर बांधण्याचं स्वप्न उरात ठेवूनच...

जमीन विकत घेतलेल्या सावकाराने तयार पायावर इमारत बांधण्याचा प्रयत्न केला पण इमारत उभारणीचा खर्च आवाक्याबाहेर जाऊ लागला... त्याला जाणवलं की ह्या वास्तूला प्रचंड भूक आहे... ती सगळं खाते... विटा, रेती, सिमेंट, पैसा....

घाबरून त्यानं ते अर्धवट बांधकाम विकून टाकलं आणि सध्याच्या घरमालकानं हे बांधकाम पूर्ण केलं. पण इथला इतिहास माहित असल्याने स्वतः राहायला न येता हे घर भाड्याने देण्याचा निर्णय घेतला.

पण इथे राहणाऱ्या लोकांना विचित्र अनुभव येऊ लागले... कुणाला मध्यरात्री सारजा घरात फिरताना, स्वैपाक करताना दिसते....आणि तिच्या धन्याला आणि मुलाला जेवायला वाढते!

तेव्हापासून त्या घरात भाडेकरूदेखील टिकत नाही." साठे साहेबांनी बोलणं संपवलं आणि समोरची पाण्याची बाटली तोंडाला लावली.

"व्हॉट!!!! सारजा स्वैपाक करते! आणि सगळे जेवतात!! मध्यरात्री... आपल्याच घरात!"

तरीच... इतकं धान्य, किराणा संपतो... त्याला एकेक गोष्ट संगतवार आठवू लागली.

अनघा जीव तोडून सांगते की मी नासधूस नाही करत.... एका दिवसात कणकेचा डबा अर्धा संपतो.... दर आठवड्याला तेलाचा रतीब... कोलमडलेलं आर्थिक बजेट, विस्कटलेली मनस्थिती! शेजारच्या सुरक्षा रक्षकांचं आपल्याला टाळणं, रात्रपाळीच्या सुरक्षारक्षकांचं रात्री-अपरात्री पर्यंत चालणारं भजन,अनघाला वाटणारी हुरहर...सगळंच!

माधवने एक निर्णय घेतला... ऑफिसमधल्या उजवणेला सांगून एका वाड्यात अडीच खोल्यांचं छोटंसं घर भाड्याने घेतलं आणि रातोरात तिथून बस्तान हलवलं.

जाताना धान्य-किराण्यातला एक कणही सोबत नेला नाही...सगळं वाणसामान तिथेच ठेवलं... सारजेच्या स्वैपाकसाठी.... तिची... तिच्या कुटुंबाची भूक भागावी म्हणून... आतातरी त्यांनी तृप्त व्हावं म्हणून....

🎭 Series Post

View all