भूत

Bhoot

संगमेश्वराच्या ऐतिहासिक प्राचीन मंदिरामध्ये एक गाण्याचा कार्यक्रम होता. कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला होता ते दोघेही माझे मित्र होते. मंदिरात गाण्याचा कार्यक्रम, तोही कोणतीही कृत्रिम म्युजिक सिस्टीम न वापरता, मंदिराच्या वास्तूरचनेचा फायदा घेऊन शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. असा कार्यक्रम मी चुकवणं शक्यच नव्हतं. शिवाय संगमेश्वरपर्यंत म्हणजे कोकणात जाता येणार होतं. मग आम्ही तीन मित्रांनी बाईकवरून कोकण ट्रीप करायची आणि संगमेश्वरला त्या कार्यक्रमालाही जायचं असं ठरवलं. प्रत्यक्ष ज्या दिवशी आम्ही निघणार होतो त्या दिवशी बाकीच्या दोघांनी ‘जमणार नाही’ असं सांगितलं. त्यामुळे आम्ही ठरवलेली ट्रीप रद्द झाली. पण माझ्या डोक्यात संपूर्ण ट्रीपचं नियोजन पक्कं बसलेलं होतं. ‘कोणी नसेल तर आपण एकट्याने जायचं, पण जायचंच’ असं ठरवून नियोजित वेळेला मी पुण्यातून निघालो. माझ्याबरोबर एक मित्र होता, त्याला ‘कराड’ला एका लग्नाला जायचं होतं. त्यामुळे कराडपर्यंत माझ्याबरोबर तो होता. सकाळी लवकर आम्ही पुण्यातून निघालो. मला वाटतं ९ च्या दरम्यान आम्ही कराडमध्ये पोचलो. कराडमध्ये शिवाजी चौकात एक अफलातून हॉटेल आहे, अगदी लहान, पण त्याच्याकडे खूप मस्त ‘मिसळ’ मिळते असं ऐकलं होतं. मग कराडमध्ये पोहोचल्यावर मिसळीचा नाश्ता केला. मित्राला तिथेच सोडलं आणि मी एकटा पुढे निघालो. दर वर्षी एकदा तरी कोकणात उत्सवाला आम्ही जातो त्यामुळे रस्ता मला नीट माहिती होता. कराडमधून मलकापूर, आंबा घाट, साखरपा असा सगळा रस्ता मला व्यवस्थित माहिती होता. 

आता काय मी एकटाच होतो. शिवाय बाईक होती. त्यामुळे हवं तिथे थांबा. हव्या त्या स्पीडने जा काहीही विचारणारं कोणीही नव्हतं. आंबा घाट उतरून साखरप्यात पोहोचलो तेव्हा मला वाटतं एक-दीड वाजून गेला होता. साखरप्यातून अगदी चार-पाच किलोमीटरवर देवरुख, तिथे मित्राचं घर होतं. त्याच्याकडे मी जाणार होतो. पण साखरप्यातून त्याला फोन करून, ‘आता मी नाही येत, रात्री मुक्कामाला येईन’ असं सांगितलं. आणि तसाच पुढे गेलो. सकाळी नाश्ता भरपूर झाला होता त्यामुळे अजून भूक लागलेली नव्हती. अजून थोडं पुढे जाऊ, अजून थोडं, असा मी विचार करत राहिलो. साखरप्यातून रत्नागिरी अजून चाळीस किलोमीटर तरी होतं. मला आठवतं आहे त्याप्रमाणे त्या दिवशी रविवार होता. कारण हातखंबा ओलांडून मी रत्नागिरीकडे वळलो तिथपासूनच मला भूक लागलेली होती. पण रविवार असल्यामुळे किंवा अजून कोणत्या कारणामुळे ते माहिती नाही पण काहीही सुरू नव्हतं. सगळी हॉटेल्स, किराणा मालाची दुकानं, स्वीट मार्ट काहीही सुरू नाही. रत्नागिरीमध्ये पोहोचलो तेव्हा तीन-सव्वा तीन झाले होते. भयंकर भूक लागली होती. रत्नागिरीमधले रस्ते कर्फ्यू लागल्याप्रमाणे सुनसान. भूक, ऊन आणि रिकामे रस्ते याने मला अचानक एकटेपणा वाटायला लागला. 

तशीच भूक पोटात ठेवून मी गाडी रत्नदुर्गाकडे वळवली. मागे केव्हातरी अनेक वर्षंपूर्वी रत्नदुर्ग पाहिलेला होता. त्यामुळे एवढं आठवत होतं की वरपर्यंत गाडी जाते. त्यामुळे चालायचे कष्ट पडणार नाहीत आणि आणखी भूक लागणार नाही, असं वाटून मी तिकडे निघालो. गाडी वरपर्यंत जात असली तरी किल्ला पाहण्यासाठी चालावं लागतं हे गणित मी विसरलो. बाईक पार्क केल्यावर माझ्या हे लक्षात आलं की ऊन कमी झालेलं नाहीये, भूकही कमी झालेली नाहीये आणि किल्ला मात्र चालतच फिरावा लागणार आहे. मग तसाच थोडाफार किल्ला पहिला. किल्ल्याच्या दोन्ही बाजूने समुद्र पाहिला. आणि परत गाडीपर्यंत आलो. तिथे कोणीतरी मला सांगितलं की बहुतेक गणपतीपुळे रस्त्यावर तुला काही हॉटेल्स चालू मिळतील. त्या दिशेला तू प्रयत्न करून पहा. माझ्या डोक्यात प्रकाश पडला, गणपतीपुळे म्हणजे आरे-वारे किनाऱ्याच्या बाजूने रस्ता जातो. रत्नागिरी ते गणपतीपुळे व्हाया आरे-वारे हा एक अतिशय रम्य प्रवास आहे. या दोन जोड किनाऱ्यांचं कौतुक मी खूप ऐकलं होतं, पण कधी तिकडे गेलेला नव्हतो. आज चांगली संधी आहे म्हणून तिकडे निघालो. 

रत्नागिरी मागे टाकून आपण पुढे येतो तेव्हा अनेक छोटी मोठी गावं आहेत त्यातल्या एका गावातूनच पुढे रस्ता जातो आणि एक वळण ओलांडून पुढे आलो की एकदम ‘आरे’चा समुद्रकिनारा आपल्यासमोर अवतरतो. किनाऱ्याला लागून डांबरी रस्ता आहे, आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गाव. ‘आरे’ गाव संपल्यावर खाडीवरचा पूल आहे तो ओलांडून डोंगरावर रस्ता जातो. तो डोंगर उतरला की पलीकडे ‘वारे’गाव. तो ही रस्ता असाच. त्याच्यापुढे गेल्यावर गणपतीपुळ्याच्या अलीकडे मला एक हॉटेल उघडं दिसलं. अधाशासारखा तिथे जाऊन बसलो. जे काय लवकर मिळेल ते आणून दे, असं सांगितलं. त्याने काहीतरी समोर आणून ठेवलं. ते काय आहे याचा फारसा विचार न करता मी ते संपवलं. त्याच्या हातावर पैसे ठेवले आणि निघालो. गणपतीपुळ्याचे मंदिर पाहण्यात मला फारसा इंटरेस्ट नव्हताच. मला तो रस्ता बघायचा होता. गणपतीपुळ्यापर्यंत जाऊन मी परत आलो. तोपर्यंत संध्याकाळ होत आली होती. मी विचार केला ‘आरे’बीचवरून सूर्यास्त पहावा आणि संगमेश्वर करता निघावं. कार्यक्रम संध्याकाळी साडेनऊ वाजता होता. रत्नागिरीहून संगमेश्वर हे अंतर साधारण चाळीस-पंचेचाळीस किलोमीटर आहे. म्हणजे सूर्यास्त पाहून साडेनऊच्या कार्यक्रमाला मी वेळेत पोचू शकलो असतो, असं माझं गणित होतं. सूर्यास्त पाहिला, आणि मी निघालो. देवरुखच्या मित्राला फोन केला आणि मी थेट संगमेश्वरला येतो असं सांगितलं. अंधार पडायला सुरवात झालेली होती. आणि चाळीस-पंचेचाळीस किलोमीटरमधला बराचसा रस्ता मुंबई-गोवा हायवेचा होता. रात्रीच्या वेळी मुंबई-गोवा हायवेवरून चाळीस-पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास तसा धोकादायक होता. म्हणून त्याने मला सुचवलं की तू आतल्या रस्त्याने ये, अंतरही कमी होतं आणि ट्रक आणि मोठ्या वाहनाच्या ट्रॅफिकची भीती नाही. मीही विचार केला, की बरोबर आहे. मी एकटा आहे, रात्रीची वेळ आहे. कोणतीही रिस्क नको घ्यायला. गोवा हायवेवरून त्या आतल्या रस्त्याने जाण्यासाठी मी वळलो. 

अंधार पडून गेलेला होता. माझ्या गाडीची अवस्था काय फार चांगली नव्हती. गियर टाकण्यासाठी क्लच दाबला की हेडलाईट डीम होत असे. गोवा हायवेचा रस्ता सोडून मी आतल्या कमी वर्दळीच्या रस्त्याला लागलो. वर्दळ कमी असेल तर रिस्क कमी असा विचार मी केला, पण वर्दळ कमी असेल तरच जास्त रिस्क आहे हा विचारच मी केला नाही. अजिबात वस्ती नसलेल्या, अजिबात वर्दळ नसलेल्या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी मी निघालो होतो. जसा जसा पुढे जात राहिलो तसा तसा अंधार वाढतच जात होता. गाडीचा प्रकाश जेवढा पडत होता तेव्हढाच भाग डोळ्यांना दिसत होता, बाकीचा परिसर इतका अंधारून गेला होता की त्या अंधारात बघायचीही भीती वाटत होती. डोळ्यांत कोणी बोट घातलं तरी कळणार नाही, इतका अंधार पसरलेला होता. त्या अंधाराचा परिणाम व्हायला लागला. मी हळूहळू पॅनिक व्हायला लागलो. ज्या दोन गावांची नावं मला मित्राने सांगितली होती तीही मी विसरलो. आणि रस्ता चुकलो.

एका ठिकाणी रस्ता विभाजक होता. तिथे मैलाचा दगडही होता. पण त्यावरची अक्षरं पुसट झालेली आणि अंधार यामुळे एकही अक्षर लागत नव्हतं. अंदाजानेच एक रस्ता निवडला आणि त्या रस्त्याला निघालो. मनात एकदा शंका निर्माण झाली की सगळेच निर्णय चुकीचे वाटायला लागतात. इथे तर मी चुकलोच होतो. आणि नेमका रस्ता विचारायला कोणी माणसं नव्हती. असे आठ-दहा किलोमीटर गेल्यावर पुन्हा एकदा रस्ता विभाजक आला. या वेळेला विभाजाकाच्या इथे मैलाचा दगड नव्हता. तर कठडा होता. आणि कठड्यावर खाली मान टाकून, गुढग्यावर हात रेलून निराश अवस्थेत एक माणूस बसला होता. गोवा हायवे सोडल्यापासून जवळ जवळ बारा-पंधरा किलोमीटर मी एकही वस्ती पाहिलेली नव्हती. माणसाचं मागमूसही त्या रस्त्यावर नव्हता. प्रचंड अंधार होता. आता रात्रीच्या आड-सव्वाआठच्या दरम्यान इतक्या अंधारात, बहुतेक जंगलात हा माणूस करतोय काय? माझ्या मनात भीतीचं भांडं भरायला लागलं. पण थांबून रस्ता विचारण्यासाठी थांबणं भाग होतं. तिथपर्यंत गेलो, गाडीचा लाईट डीम झाला. माझ्या डोक्यात होतं की, त्याला संगमेश्वरचा रस्ता विचारायचा. आणि माझ्या रस्त्यावर त्याला जायचं असेल तर त्याला बरोबर घेऊन पुढे जायचं. त्याच्यापासून पाच-सहा फुटावर गाडी नेऊन उभी केली. लाईट पूर्ण बंद झाला. पण त्या डीम होत जाणाऱ्या प्रकाशात मला एवढं लक्षात आलं की मी थांबण्याचा विचारात आहे हे पाहून तो त्याच्या जागेवरून उठला. मी पोचलो, गाडी थांबवली, लाईट बंद झाला तोपर्यंत तो उठून चालत चालत माझ्याजवळ आला आणि एकदम गाडीवर मागे बसलाच! 

माझी वाचच बसली, आवाजच फुटेना. माझी मागे बघायची हिम्मत होईना. पण स्पीड मीटरच्या मागे जो दिवा लागतो त्या प्रकाशात मला त्याची खुरटी दाढी आहे हे लक्षात आलं. मागे बसून तोच बोलला, चला तुम्हाला संगमेश्वरपर्यंत पोहोचवतो. संमोहित झाल्याप्रमाणे मी गाडी सुरू केली. आणि त्याने हाताने दाखवलेल्या रस्त्याने निघालो. मनात अनेक प्रश्न उसळत होते. पण ते तोंडातून फुटत नव्हते. एकतर आवाजच फुटत नव्हता. भीतीने हात आणि पाय आखडले आहेत, असं माझ्या लक्षात आलं. भीतीने मला घामही फुटला. पण जंगल, रात्रीची दमट पण थंड हवा या सगळ्यात तो विरून जात होता. अशा स्थितीत मी आठ-दहा किलोमीटर पुढे गेलो. तोपर्यंत धीर गोळा केला. विचार केला की, आता आठ-दहा किलोमीटर तर या माणसाने आपल्याला काही केलं नाही, आपण घाबरलो, आवाज फुटत नाही, इतक्या रात्रीचा मानवी वस्तीपासून इतक्या लांब हा काय करत होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी संगमेश्वरला जाणार आहे हे त्याला कसं कळलं? पण हे सगळं मनात खाली बसायला आठ-दहा किलोमीटरचा वेळ गेला. मन घट्ट करून मी त्याला विचारलं, ‘तुम्हाला कुठे जायचं आहे?’ त्यावर त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ‘इथे थांबावं गाडी. मला इथेच जायचं आहे’ असं सांगितलं. माझ्या डोक्यात होतं की, संगमेश्वरपर्यंत हा आपल्याला सोबत करेल, आणि इतक्या प्रवासात गप्पा होण्यासाठी कुठूनतरी सुरवात करावी लागेल. पण माझ्या तोंडून पहिला प्रश्न बाहेर पडतोय न पडतोय तोपर्यंत याने खांद्यावर हात ठेवला. त्याचा थंड हात माझ्या खांद्यावर पडला तेव्हा तर भीतीने माझ्या अंगावर शहाराच उभा राहिला. मी पुन्हा संमोहित झाल्यासारखी गाडी थांबवली. तो उतरला, आणि म्हणाला, ‘इथून असे या रस्त्याने जा. संगमेश्वरला पोहोचाल!’ अंधार काय कमी तर झालेला नव्हता. गाडी थांबवल्यामुळे गाडीचाही प्रकाश नव्हता. तो उतरल्यावरही समोर आलाच नाही, मागेच थांबला आणि एवढं बोलून त्याने पाठ फिरवली. मीही मागे वळून न बघता लवकर निघावं असा विचार करून गाडीला किक मारली. 

दहा-पंधरा फूट मी पुढे गेलो असेन, तर समोर कोरडा पडलेला धबधबा होता. रस्ता संपत होता, कोरडा पडलेला पाण्याचा प्रवाह समोर होता. मी मागे वळून पाहिलं, आसपास कोणीही नव्हतं. कुठेही जवळपास मानवी वस्तीच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या. जो माणूस मागे दहा-पंधरा फुटावर गाडीवरून उतरला होता तोही अर्थात दिसत नव्हता. मोबाईलला रेंज नव्हती. 

फार विचार करत न बसता मी, गाडी फिरवली. गोवा हायवेपर्यंत परत आलो आणि भरपूर वर्दळ असलेल्या रस्त्याने संगमेश्वरला पोहोचलो. माझ्या डोक्यात जे नियोजन होतं त्यानुसार साडेनऊच्या कार्यक्रमाला मी साडेआठपर्यंत पोहोचणार होतो. पण रस्ता चुकला, एका माणसाने गंडवलं वगैरे सगळं झाल्यामुळे मी बरोबर साडेनऊलाच संगमेश्वरला पोहोचलो. मनातली भीती अजूनही गेलेली नव्हती. एकूण सुंदर वातावरणात चाललेला शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम मी हार्डली लक्ष देऊन ऐकू शकलो. त्या दिवशी मला लक्षात आलं की भीतीने माणूस जास्त दमतो. चालू कार्यक्रमात मी मागे बसून पेंगत होतो.