भूत नव्हे ती देवदूत

"Ata mala sanga hi Aasha Kon??? Ani hi kashane geli??" Pratibha

कथेचे नाव - भूत नव्हे ती देवदूत

विषय - आणि ती हसली



फेरी - राज्यस्तरीय लघुकथा





       "डॉक्टरसाहेब एकदा येऊन तरी बघा की हो गावात, ते आशा चं भूत अजून त्रास द्यायला लागलं की ..!"  कचरु अण्णा  तिथल्या  सरकारी दवाखान्यात डॉक्टर असलेल्या डॉ. संजय सरांना सांगत होते.





"आम्ही आजारी लोकांना बरं करतो अण्णा,अशा भूतांवर आमची मात्रा काही चालत नाही हं..! " हसून डॉ. संजय म्हणाले.



"माहीत आहे  जी मले पण एकदा येऊन बघाल तर थोडं बरं व्हईल." कचरू मात्र माघार घ्यायला तयार नव्हता.





"कधी येता जी मंग???" त्याचे प्रश्न पुन्हा सुरूच.



"अरे बाबा मला सध्या एक दोन आठवडे वेळ नाही ,तिकडून आलो की येऊन  बघेन." डॉक्टर 



"काही करा साहेब पण एकदा दोन दिवसांत येऊन बघा जी तुम्ही." कचरू विनवणी करत बोलला.





"हे बघ कचरू, मला खरंच वेळ नाही पण या नवीन मॅडम आल्या आहेत ना यांना पाठवतो मी तिकडे सगळं बघून यायला,चालेल ना?" डॉक्टर बोलले.





"चालेल जी चालेल पण कुणीतरी येऊन बघा की एकदा तिकडे." कचरु





कचरू तर निघून गेला पण  डॉ. प्रतिभाच्या मनात मात्र सरांनी आपल्या ला हे विचित्र काम  कां द्यावं? ते मात्र कळलं नाही.





"डॉ. प्रतिभा ,तुम्हाला जमेल तसं त्या गंधारी- जांभळी ला जाऊन या बरं . इथली ओपीडी आटोपली की लगोलग  दवाखान्याची गाडी घेऊन एक चक्कर लावून  या."



"उषा सिस्टर, तुम्हाला पण मॅडम सोबत तिथे  जायचं आहे .मॅडम अगदीच नवीन आहेत आणि प्रकरण पण वेगळं आहे पण तुम्हाला काही आकलन होतं काय ते   बघू या. नाही जमलं तर मग  जाऊन बघेनच मी" डॉ. संजय





उरकत आलेली ओपीडी आणि हे नवं प्रकरण डॉ. प्रतिभा कडे सोपवून  डॉ. संजय गेले होते ते तब्बल दोन आठवड्यांसाठी..!





काय करणार ? ते या आरोग्य केंद्रात असले तरी तालुका आरोग्य अधिकारी असल्याने संपूर्ण तालुक्याचा चार्ज त्यांच्याच कडे होता ना,त्यामुळे जीवाला धावपळ नुसती...!





 डॉ.प्रतिभा च्या मनात हे विचित्र प्रकरण तिच्यावर ढकलून देण्याची खदखद होतीच. पण येऊन एक महिना नाही होत तो  एकदम भूताचे प्रकरण हाती घ्यावे लागेल असे तिला  सुद्धा  वाटले नव्हते.



डॉ. प्रतिभा,  गोठणगाव  प्राथमिक आरोग्य केंद्रात  जवळपास एक महिन्या आधी रुजू झाली होती.

मुळात हुशार असली तरी  खेडेगावात जाऊन रुग्णांची सेवा करायची हे तीनी मनात आधीच ठरवलेलं म्हणून सरकारी नोकरी ची ऑफर येताच तिने ही ऑफर अगदी आनंदाने स्वीकारली होती.





पण जेव्हा ती तिथे रुजू झाली होती  तेव्हा तिच्या अपेक्षेपेक्षा ही अतिदुर्गम  ,आदिवासी  बहुल भागात तिची पोस्टिंग झाली होती. अन् मुख्य म्हणजे इथला काही भाग हा नक्षल ग्रस्त म्हणून सुद्धा ओळखला जायचा.तरीही एक अनुभव म्हणून तिने तिथे राहायचे नक्की केले.





एक महिन्यात तिला तसा  तिथला चांगलाच अनुभव आला होता. लोकं शांत अन् शांतता प्रिय होते. गावात थोडं  राजकारण चालायचं पण दवाखाना गावाच्या बाहेर असल्याने त्याची झळ फारशी तिथपर्यंत पोहोचायची नाही.तिथला हिरवागार नसर्ग अन् चारही बाजूंनी अगदी हिरव्या गार टेकड्यांनी घेरलेल्या  जागी असलेला तो दवाखाना तिला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जायचा. 

तिथली शांतता अन् सुंदर निसर्ग बरेचदा तिला अंतर्मुख करायचे.





पण आज असे हे भुताटकीचे प्रकरण तिच्याकडे सोपवले जाईल असे तिला मुळी सुद्धा वाटले नव्हते.पण \"आलीया भोगासी असावे सादर \" या उक्तीनुसार जाणे तर होतेच...!





ओपीडी अन् जेवण उरकून उषा सिस्टर आणि डॉ. प्रतिभा  दोघीही गंधारी - जांभळी च्या दिशेने मार्गस्थ झाल्या.





"सिस्टर, दीपा मॅडम सीनिअर असूनही सरांनी हे विचित्र प्रकरण मला सोपवलं  ना ते मला अजिबात आवडलं नाही हं." प्रतिभा





"मॅडम ,तुम्ही नवीन असल्या तरी धडाडीच्या अन् मन लाऊन प्रश्नाची उकल करणाऱ्या आहात ना म्हणून सरांनी हे प्रकरण दीपा  मॅडम ला न सोपवता तुम्हाला सोपवलं आहे. अन् आता कुठची हो आलीत भूतं खेतं??? आपल्याला त्या मागचे सत्य आणि लोकांची मानसिकता समजून उपाय योजना करायची असते. आता तुम्हाला नाही आवडलं हे पण यातून बरेच काही शिकायला मिळेल तुम्हाला...!" सिस्टर





गाडी मूळ रस्ता सोडून गंधारी च्या रस्त्याला लागली अन्  प्रतिभा स्तिमित होऊन निसर्गाचा तो अनुपम नजारा पाहून लुब्ध झाली. गावाजवळ असलेले  मत्स्य उत्पादन केंद्र मागे टाकत गाडी \" इटियाडोह\"  प्रकल्पाच्या  जवळून निघाली.





मनोमन ती पलीकडे असलेलं गाढवी नदीचं विस्तीर्ण पात्र डोळ्यासमोर आणू लागली. धरणाची सीमा ओलांडली अन् मग ओव्हरफ्लो चा असलेला रपटा ओलांडून   गाडी पुढे निघाली.



गंधारी आणि जांभळी ही एकमेकांपासून थोड्याच अंतरावर असलेली जोडगावं. गंधारी थोडं मोठं आणि नदीच्या बाजूच्या डोंगराच्या अगदी पायथ्याशी असलेलं जांभळी....! कधी कधी तिथे नक्षल वाद्यांचे वास्तव्य असल्याचे  कुजबुजत च एका अटेंडंट नी तिला सांगितले.





 \"डॉक्टर आपल्या दारी\" अंतर्गत असलेली आरोग्य तपासणी त्यांच्या टीम ने तिथे उरकून घेतली अन् तिथल्या  अंगणवाडी च्या इमारती मधे गावची काही मंडळी त्या  विषयाची चर्चा करायला एकत्र आली.





पुन्हा तोच टॉपिक....!

"मॅडम ते आशा चं भूत आजकाल पुन्हा  लै त्रास देयाला लागलं की..! " एक तक्रार.



"अच्छा! मला सांगा याआधी कधी त्रास दिला होता तिने??" प्रतिभा.



"मॅडम ,मागच्या वेळी ते मंगरू ची घरवाली गरवार होती का नाही तवा जी..!" एक जण बोललं.



"काय त्रास दिला तीने तेव्हा??" प्रतिभा



"त्रास म्हणून काही नाही जी पण ते तिच्या सप्नात ये अन् तीले बाळतपणाले माहेरी जा म्हणून सतावे अन् त्या राम्याची पोरगी पोटुशी होती न  तेव्हा तिच्या सपनात जाऊन तिले बाळतपण कराले माहेरी नको येऊ म्हणून सांगे." एक जण अगदी पोट तिडकीने सांगत होता.





सगळं ऐकल्यावर  प्रतिभा च्या एक गोष्ट लक्षात आली होती की हे  भूत फक्त गरोदर बायांच्या स्वप्नात येऊन त्यांनाच त्रास देतं.





यावेळी मात्र थोडं आक्रित घडलं होतं  हे भूत यावेळी  त्या गरोदर स्त्री च्या स्वप्नात तर येतच होतं पण तिच्या वडिलांच्या  म्हणजे कचरू च्या सुद्धा स्वप्नात येऊन त्यांना त्रास देऊन  जात होतं. त्यामुळे आता सगळ्यांना धडकी भरू लागली होती. वेळेवर याचा बंदोबस्त केला नाही तर ते भूत अख्ख्या गावाला त्रास देईल असं सगळ्यांना वाटत होतं. म्हणून हा सगळा प्रपंच..!



डॉ. प्रतिभा नी सगळं नीट ऐकून घेतलं आणि संपूर्ण प्रकरण समजून त्यावर तोडगा काढायचं आश्वासन देऊन ती तिथून निघाली.



"आता मला सांगा ही आशा म्हणजे कोण?? ही कशाने गेली?" प्रतिभा ने गाडीमध्ये सगळ्यांना प्रश्न विचारला.





"मॅडम जो कचरू आहे ना, त्याचीच मुलगी ही आशा...!" ड्रायव्हर बोलला.



आता मात्र प्रतिभा शॉक  मधे..!



"पण मग ही वडिलांनाच काय त्रास देतेय,विचित्रच न सारे??" प्रतिभा





"बरं ,मला सांगा ही गेली कशाने??" प्रतिभा





"मॅडम  शहरात दिली होती हो तिला, घरी कुणी करणारं नसल्याने बाळंतपणासाठी आली होती इथे . पावसाळ्याचे दिवस होते. चार दिवस संततधार पाऊस आला. सगळी कडचे नदी ,नाले, बंधारे भरून आले अन् \"इटियाडोह  धरण\"  तुडुंब भरून ओव्हरफ्लो  होऊन वाहू लागले.  इकडे आशा ची बाळंतपणाची वेळ झालेली तिला प्रसव कळा सुरू झाल्या ,बाळंतपण जरा अवघडच होते. तिथे गावच्या दाईण  नी प्रयत्न केले पण जमेना ,तिला दवाखान्यात घेऊन जायचं ठरलं तर रपट्या वरून सहा फूट पाणी...! दुसरा कुठला च रस्ता नाही. उपचारा अभावी बाळ अन् बाळंतीण दोघेही गेले....!" उषा सिस्टर





"हीच आशा पुढे प्रत्येक गरोदर बाईंच्या स्वप्नात येऊ लागली." ड्रायव्हर बोलला.





"ती इथल्या सुनांना माहेरी बाळंतपण करायला प्रवृत्त करते आणि इथल्या लेकिंना सासरी...! 

आता तर तिची बहीण च प्रेग्नंट आहे आणि मघाशी कळलं की तिचं  सासर आणि माहेर दोन्ही गावातच आहेत. त्यामुळे तिच्या बहिणीच्या स्वप्नात येऊन ती नुसती रडते म्हणतात...!" सिस्टर





"अन् आता तर तिचे वडील कचरू अण्णा च्या सुद्धा स्वप्नात येऊ लागली ती....!" ड्रायव्हर.





आता प्रतिभा च्या लक्षात सगळा प्रकार आला होता. आशा चा  वैद्यकीय मदत न मिळाल्याने बाळंतपणात नाहक मृत्यू झाला होता. आणि पुन्हा तसा प्रसंग दुसऱ्या बाईवर   येऊ नये या शुद्ध हेतूनी ती सगळ्या  गरोदर बायांना सतर्क करत होती  पण सगळ्यांनी मात्र तिला भूत ठरवून तिचा धसका घेतला होता. 





 खरं तर आशा च्या  मृत्युसाठी नैसर्गिक आपत्ती हे तर एक कारण होतेच पण योग्य किंवा  दुसऱ्य रस्त्याची नसलेली सोय हे सुद्धा एक कारण होतेच की...!

आता तर तिची सख्खी बहीण गरोदर होती. वरून तिचे माहेर आणि सासर तिथेच होते ही एक दुविधा होती. वरून तिचे भरत आलेले दिवस आणि तोंडावर असलेला पावसाळा यामुळे अस्वस्थ आशा  आता बहिणीसोबत च  तिच्या वडिलांच्या सुद्धा स्वप्नात येऊ लागली होती. 





यावर नीट विचार करून डॉ. प्रतिभा ने दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने सोमवारी जाऊन पुन्हा या प्रश्नावर तोडगा काढायचं ठरवलं.





सोमवारी पुन्हा डॉ. प्रतिभा तिथे आली. गावातले सगळे पुन्हा तिथे एकत्र आले. 



"सांगा मॅडम आता आम्ही काय करायचं या भूताचं???" सगळ्यांनी सरळ मुद्द्यालाच हात घातला.





"आधी मला काहीतरी सांगायचे आहे ते नीट समजून घेता का ? मग या प्रश्नावर आपण बोलू..!" प्रतिभा





"ठीक आहे मॅडम बोला तुम्ही..!" एकजण म्हणाला.





"हे  संपूर्ण  प्रकरण पाहिलं तेव्हा  मला तर असं वाटतंय की आशा ही भूत नाही तर देवदूत आहे. आज वर झालेला प्रकार बघता तिनी भूत म्हणून कुणाला कधी त्रास दिलाच नाही.तिच्यावर आलेला प्रसंग या गावातल्या दुसऱ्या बाईवर येऊ नये म्हणून ती त्यांना सावध करत असते. ती वाईट काय करतेय? ती तर तिची काळजी घेतेय नं!!आता तर तिच्या सख्ख्या बहिणीचे जीवन दावणीवर आहे असे तिला वाटते अन् तीच्याबाबतीत परिस्थिती सुद्धा प्रतिकूल आहे त्यामुळे हतबल होऊन ती रडत असावी. तिच्यासारखी अवस्था तिच्या बहिणीची होऊ नये म्हणून ती तुम्हाला सावध करत असावी अण्णा, समजून घ्या तिला!!! भूत म्हणून उगीच तिची दहशत घेऊ नका. तिनी दिलेला इशारा समजून घ्या.

           स्त्री चे बाळंतपण एक साधी सहज गोष्ट वाटत असली तरी तो तीचा बरेचदा पुनर्जन्मच असतो हे जाणून घ्या अण्णा ,जाणून घ्या!!!" प्रतिभा





प्रतिभा बोलायचं थांबली अन् सारे गावकरी अंतर्मुख झाले. कारण आजपर्यंत भूत म्हणून त्यांनी फक्त आशाची दहशत च घेतली होती. तिची खरी तळमळ आजवर कुणालाच कळली नव्हती.





"मी अजून एक निर्णय घेतला आहे. तुमच्या मुलीचे दिवस भरत आलेत आणि पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे त्यामुळे आधीच तिला दवाखान्यात भरती करून घेऊ या म्हणजे उगीच अशा प्रसंगाचा तिला सामना करावा लागणार नाही. आणि मला वाटते की आपण सगळ्यांनी मिळून या गावासाठी दुसरा रस्ता बनावा यासाठी सुद्धा पाठपुरावा करू या. जेणेकरून गाव पूर्ण प्रवाहात येईल आणि पुन्हा अशी वेळ कुणावरच येणार नाही." प्रतिभा





डॉ. प्रतिभा च्या  सूचने नुसार आशा च्या बहिणीला दवाखान्यात  ॲडमीट केलं गेलं . वेळ येताच तिचे बाळंतपण सुखरूप पार पडले. आज आशा पुन्हा बहिणीच्या अन् अण्णाच्या स्वप्नात आली आणि आज ती मात्र हसत  होती. कारण तिची तळमळ खरोखरीच कुणाला तरी का होईना कळली होती.





पुढे गावासाठी नवा रस्ता सुद्धा बनला होता पक्का आणि कायमचा अन् आशाच्या भूताने आता मात्र गावाचा निरोप घेतला होता तो कायमचाच...!!!!



एक नवीन प्रकरण यशस्वी रित्या हाताळल्याच्या आनंदात डॉ. प्रतिभा सुद्धा मनोमन खुश होऊन हसली ...!!!!!!





©® मुक्ता आगाशे

      मुक्तमैफल