विषय- परावलंबी तिचे जगणे...
संघ.... मुंबई
प्रकार... लघुकथा
प्रकार... लघुकथा
ती कॉलेजच्या रस्त्यावरून घरी येत असायची. तोच तिचा ठरलेला रस्ता असायचा. घराजवळ आली की, मध्ये एक आड रस्ता तिला पार केला की,घर अगदी जवळ पडायचं त्यामुळे त्यात तिचा वेळ ही वाचत होता.
ती म्हणजे बारावीत नुकतीच गेलेली गौरी.
गौरी ही दिसायला सुंदर ,गोरी ,नाजूक,आणि जरा भित्री होती. हळवी होती आणि त्यामुळेच कोणी काही बोलले ,चिडवले तर निमुट ऐकून घ्यायची आणि तशीच रडत घरी येत असे ,नंतर घरी येऊन मग त्याचा राग, वैताग आईवर काढत असे . आई जरा व्यस्त असली तर कधी बहिणीकडे त्याची तक्रार करे. तितके असं करून तिचे मन मनमोकळे होई.
ती मग हळूहळू गप्प बसून मग डोळे पुसून ताईला सांगे,"पुन्हा जर भेटला तर त्याची चांगलीच सोय करते की नाही बघच."
पण मुळात मात्र भित्री भागूबाई असलेली गौरी पुन्हा तशीच भीत भीत घरी येत असे.
तो, गुंड मुलगा वयाने तिच्यापेक्षा पाच एक वर्षाने मोठा, कॉलेज सोडून तो बाहेर भटकणारा असा होता. येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना उगाच चिडवून छेड काढणारा होता तो, नाव
\"रवीकिरण\". उंचा पुरा, मिसरूड असलेला, सतत घाण नजरेने मुलींना बघणारा. त्यांच्या कपड्यावरून त्यांना घाण घाण शब्द प्रयोग करणारा. खरे तर तो एक टुकार मुलगा. आजकालच्या वळू सारखाच. काळा कुट्ट, वाढलेले केस. कोणाला ही त्याची किळस येईल असा. कितीदा तरी पोलीस कोठडीत राहून आलेला असा तो.
कॉलेजमध्ये जातांना बरेचदा तो दिसायचा, तर काही दिवस तो गायब असायचा.
ज्या दिवशी त्या रस्त्यावर खूप वर्दळ असेल त्यादिवशी तर तो गायब असायचा, आणि त्या दिवशी गौरीचा जीव भांड्यात पडायचा.
गौरीसाठी तो दिवस म्हणजे डोक्यावरचे ओझे कमी झाल्यासारखे असायचा.
खूप दिवस गायब असलेला जेव्हा तो एकदम अचानक त्याच्या बाईक वर तिची वाट बघत उभा असलेला दिसला रे दिसला,तिची गाळण उडायची. तेव्हाच नेमके रस्त्यावर गर्दी नसायची, आजूबाजूला कोणी पब्लिक नसायची. त्या रस्त्यावर फक्त ती आणि तो तिच्याकडे एकटक बघत असलेला... रवीकिरण..
रवीकिरण तिला म्हणे," काय मग मिस केले ना मला खूप,मला वाटलंच होतं, तू मला खूप खूप मिस करत असशील ग,पण काय करणार इथे पब्लिक असली की मी नाही येऊ शकत तुला भेटायला, खूप इच्छा असते ग,पण हिम्मत नाही होतं.."
गौरी त्याच्या ह्या बोलण्याने समोर दिसत असलेली वाट विसरून जायची आणि पुन्हा ज्या वाटेने आली तिकडून निघण्याचा प्रयत्न करत असायची..
तो पुन्हा जवळ येऊन म्हणायचा ,"जवळ ये ग,किती दूर पळशील अशी..मी किती दिवसांनी भेटत आहे ,हा रस्ता बदलून जाणे बरे दिसते का सांग बरं ?"
तिला काहीच सुचत नसे, ती त्याला चुकवून आणि जीव मुठीत घेऊन निसटून घेत असायची..
हा त्याचा ठरलेला नियम होता ,मुद्दाम तिला ह्याच प्रकारे त्रास देण्याचा.
पण हे सगळे दिव्य पार करून गौरी सुखरूप बाहेर पडली आणि घर जवळ आले ही हुश करत असे.
पुन्हा दबवातून आलेले रडू न अवरल्याने ताईला जाऊन सगळे प्रकार सांगे
कधी दिसलाच नाही महिनोमहिने तर आनंदाने हा समज करून घेई की तो ह्या वाटेला येणारच नाही.
ताईला गौरी जाऊन सांगत असे, "आज नाही दिसला ,आज मी अशी वाट बदलली, आज सोबत काही लोक होते ,आज मैत्रीण असल्याने मी वाचले..."
ताई तिच्या ह्या बोलण्याला हसून
आणि तिला तरी समजावून काही तिच्या हिताच्या आणि स्वरक्षणाच्या गोष्टी सांगत असायची,"अग हे असे भीत भीत किती दिवस काढणार आहेस तू, अशाने काही ही होणार नाही ,तू घाबरते हे त्याला माहित आहे आणि म्हणून तो तुला अजून घाबरवण्याचा प्रयत्न करणार. बघ तू !"
आणि तिला तरी समजावून काही तिच्या हिताच्या आणि स्वरक्षणाच्या गोष्टी सांगत असायची,"अग हे असे भीत भीत किती दिवस काढणार आहेस तू, अशाने काही ही होणार नाही ,तू घाबरते हे त्याला माहित आहे आणि म्हणून तो तुला अजून घाबरवण्याचा प्रयत्न करणार. बघ तू !"
गौरी एक प्रकारे त्याच्या दबावात असल्याने, सगळे सहन करत जात असायची. मी मोठी झाली आहे आणि मी हे आई वडिलांना न सांगता स्वतः माझ्या अडचणी सॉल्व करायला हव्या ह्या डोक्यात घेतलेल्या खुळा मुळे ती आई बाबांपर्यंत काहीच जाऊ देत नसायची. ( परंतु खऱ्या अर्थाने तुम्हाला जर असे प्रश्न असतील ,ज्यात तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगितले पाहिजे .)
गौरी असे असून ही हे प्रकरण हलक्यात घेत होती. ती ताईला म्हणत, "ताई जाऊदे तसे ही किती दिवस काढायचे आहेत मला तिथे ,आणि तो फक्त त्या रस्त्यावरच तर येतो ,तो कुठे घरापर्यंत येतो, मला फक्त त्या रस्त्याची भीती वाटते ,बाकी मी बिनधास्त असते..मी घाबरत नाही मग पुढे."
गौरीची ताई मीनल,तिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठी होती, समजदार होती, गौरीसाठी ती ताई कमी आणि गाईड जास्त होती..आई बाबांच्या नंतर ताईचा मानसिक आधार होता. तिच गौरीचा अभ्यास ही घेत. तिच्या चुकांना पांघरून तर घालत असायची,पण जिथे चूक होत असायची तिथे मात्र तिला अद्दल घडेल असे विचार मांडायची.
ताई म्हणायची, "अग तो घरापर्यंत ही येईल जर त्याला घर माहीत झाले तर, तू अशी गाफील राहू नकोस, सहज घेऊ नकोस चिऊ ,तुला हे जग माहीत नाही, हे जग गैरफायदा घेत असतांना तुला मात्र भित्री भागवू बाई होता कामा नये, तोडीस तोड उत्तर दे, कारण घाबरून राहणाऱ्या मुलींना मुलं मुद्दाम जास्त त्रास देतात, आणि मी हे अनुभवले आहे ,मला ही हा अनुभव आला आहे, मी बाबांना कॉलेजमध्ये सोडवायला सांगायचे रोज, मग ट्युशन ला सोडवायला सांगायचे, मग हळूहळू मी जिथे जाईल तिथे मी बाबांना घेऊन जाऊ लागले...मी पूर्ती बाबांवर डीपेंड होत चालले होते माझ्या रक्षणाकरिता..आणि मी परावलंबी होत गेले...मी परावलंबी होत जात असतांना मी माझी हिम्मत हारत जात आहे हे मला कळत नव्हते."
ताईने तिच्यावर झालेला ह्याच प्रकारच्या अन्याय बाबत गौरीला सांगायला सुरुवात केली, "तो ,( म्हणजे असाच एक रवीकिरण, मवाली पण ओळखीच्या नात्यातला, जवळचा ज्याच्या वागण्यावर इतर कोणाला ही शंका येणार नाही असे त्याचे वागणे ) मला सतत असाच कुठे ही भेटायचा आणि मला हात लावून जायचा, त्याला त्यात मज्जा वाटायची...त्यात तो सुखावायचा... कसा तरी दिसायला असलेला तो एकदम घाण हसायचा आणि मला पूर्ण रस्ता भर एकटक बघत रहायचा... मी मग तिथेच रडत उभी राहायचे.. त्याने हात लावला की अंग चोरण्याशिवाय आणि भिण्याशिवाय काहीच करू शकत नव्हते... थर काप उडायचा...मी फ्रॉक घातला तेव्हा तो मला तर कितीदा आडवा यायचा...मागे बांधलेली ती नॉट तो मागून येऊन सोडवायचा... मी तर बरेच दिवस तापेने फन फणत असायचे किती तरी दिवस... मी शाळेत जायला नकोच म्हणू लागले, बाहेर मैत्रिणी सोबत ही खेळायला भीती वाटायची..तो मागून येऊन मला बेटा ,दीदी म्हणत उचलून घ्यायचा... मग एकदा त्याने माझे गाल पकडले आणि पापी घेतली...एकदम चावून...मी तर तेव्हा खूपच घाबरले होते....नेमके ते शेजारच्या काकूने पाहिले आणि तेव्हा त्यांनी कॉलेजमधील त्या मुलाला खूप खूप झोडपले...मी तर तिथेच रडायला लागले होते....इतके होत होते आणि मी सहन करतच जात होते...तरी हे मी आई बाबांना सांगण्याचे धाडस नाही केले... कारण त्याने मला एकदा रस्त्यात थांबून सांगितले होते...तू जर आई वडिलांना झाल्या प्रकाराबद्दल सांगशील तर तुझे आई वडील जिवंत रहाणार नाहीत... मी त्यांना मारून टाकेन....ते ही ह्याच रस्त्याने जातात ना तर त्यांना मारून टाकले तरी कोणाला कळणार ही नाही...बघ तू जर सांगितले तर याद राख...आणि माझ्या आई वडिलांना तो मारून टाकू शकतो ह्या भीतीने मी आई बाबांना कधीच काही सांगितले नाही."
गौरीने तर ह्यापूर्वी आपल्या ताईच्या जीवनातील ही अप्रिय घटना कधी ऐकली नव्हती,एकदम ताईची ही अशी बाजू ऐकून गौरी शॉक मध्येच होती. तिने विचारले,"ताई पुढे मग त्याने तुला काही त्रास दिला नाही ना पुन्हा ?"
ताई म्हणाली, "तो त्या घटनेनंतर तो पुन्हा भेटला तेव्हा म्हणाला , तू फ्रॉक घालून येत जा ,तू त्यात खूप गोल गोड दिसतेस..मला तू त्यात रोज दिसायला हवीस.. नाहीतर बघ तुझ्या आई वडिलांना काय करतो..सुदैवाने आम्ही मोठ्या क्लास मध्ये गेलो आणि शाळेतून फर्मान आला, आणि त्यानुसार पंजाबी ड्रेस घालायला बंधनकारक केले होते... तरी तो दिसला की म्हणत फ्रॉक घाल, नाहीतर बघ,तुझे आई वडील...मारून टाकेन..."
गौरी म्हणाली,"ताई हे किती कठीण होते गं तुझ्यासाठी,तुला तर माझ्यासारखी कोणी मोठी ताई ही नव्हती अश्या वेळी सांभाळून घेणारी, मग तू कसे तोंड दिले असशील ग,तू किती प्रेशर मध्ये असशील त्या छोट्या वयात..!! "
ताईला हा तिचा काळाकुट्ट भूतकाळ सांगताना रडायला येत होते, खरंच किती दिव्यातून जातात ह्या वयातील मुली ,ना कोणाला सांगता येत ना बोलता येत...एक एक प्रसंग जणू डोळ्यासमोरून जात नव्हता,अंगाला अगदी काटा येत होता ताईच्या आणि गौरीच्या ही..ताई तरी मनात साठलेले सांगत होती ,तिला ही हे सांगून मोकळे व्हायचे होते,कारण आता तिची मैत्रीण ऐकणार होती, गौरी तेव्हा मैत्रिणीच्या भूमिकेत होती तिच्यासाठी.
ताई सांगू लागली,"एकदा असेच जात होते आणि त्याने मागून येऊन मला पकडले ,आणि तो मला सोडतच नव्हता,मी ओरडत होते, मग आठवले माझ्या बॅग मध्ये मी एक कटर ठेवले होते,मग मी ते कटर काढले ,आणि त्याच्यावर वार केले ,तो चांगलाच जखमी झाला होता ,त्याला असे वार करत असतानाच एका पोलिसाने पाहिले ,आणि तो उलट माझ्या मदतीला धावून आला, त्याला घडलेला प्रकार माहिती होता ,आणि तो काही करणार इतक्यात मीच त्या नालायक माणसावर झपा झप वार केले होते, सगळे धावत आले होते, त्यांनी मला सावरले, माझी भीती कमी केली, आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.... आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने माझी भीती कुठच्या कुठे पळून गेली होती ,आणि मी तेव्हापासून परावलंबी पण नाकारले, मी स्वतःचे रक्षण करण्यात स्वावलंबी ,आणि सक्षम झाले होते...."
"तर तू ही असेच करावे, कारण दर वेळी कोणी मदतीला येईल असे नाही ,हो पण तू तुझीच मदत केली तर सगळे तुझ्या सोबत उभे राहतील हे नक्की...म्हणून तू स्वतः तुझी शक्ती होने गरजेचे आहे... नाहीतर कोणी तुला मदतीला येणार नाही... तुला कळतंय ना मी काय म्हटले ते...की अजून काही वाईट होण्याची वाट बघत राहशील.." ताई गौरीला धीर देत विचारत म्हणाली
"हो ताई ,तुला ही असाच त्रास झाला होता, पण मी तर समजते हा असा त्रास फक्त मलाच होत आहे ,मीच एकटी ह्या तून जात आहे, मी एकटी भित्री आहे ,पण मी ही तुझीच बहीण आहे, मी त्याला अद्दल घडवल्याशिवाय गप्प बसणार नाही, मला माझीच हिम्मत जागी करावी लागणार आहे ,आणि हे ठरले आहे...तू बिनधास्त रहा, उद्याचा दिवस हा माझाच असणार...मी ही त्या संकटाला समोर जाणार...हे नक्की."
"चिऊ ने ठरवले ,तो हात लावतो ना तर तोच हात मी नाही उद्या जखमी केला तर माझे नाव दुसरे, पुन्हा तो माझ्या वाटेला जाणार नाही अशीच सोय करते..तिने ठरवले ज्या बांगड्या घालते त्याच बांगड्यांची त्याचा घात करणार हे नक्की..."
ती उठली आणि तिने तिच्या सगळ्या बांगड्या आणि काही मेटल च्या बांगड्या काढल्या, काहींच्या तारा काढल्या आणि त्या तारा तश्याच अर्धवट काढून ठेवल्या ,जेणे करून त्याने हात पकडताच त्याचा हात कापला जाईल..झाले ही ठरल्याप्रमाणे .
ती कॉलेजला ताईचा आशीर्वाद घेऊन निघाली,आता ती पूर्ण निर्भय होती आणि तिने हातात त्या सगळ्या बांगड्या घालता,घालतांना तिला ही तार लागली,रक्त निघाले,पण तिला कळले मलाच इतका त्रास होत आहे म्हणजे त्याला ही होईल...
ती त्या वळणावर गेली...तो समोर उभा होताच बाईक वर...ती येताच तो गाडी घेऊन समोर आला..
गाडी तिच्या सोबत सोबत घेऊन चालू लागला.
तो मग तिच्या चेहऱ्याकडे बघून म्हणू लागला, "ये चल बस बाईक वर,जाऊ फिरायला ,आज तू एकदम फटाका वाटत आहेस...माझ्यासाठी इतके सजण्याची काय गरज आहे, तरी आलीच आहेस तर सांग ना तू हे माझ्यासाठी केले आहेस ना,बोल ना ग पिल्लू...ये डार्लिंग बोल ना...!"आणि त्याने तिचा हात पकडला...तो जोऱ्यात ओरडला...
त्याचा हात सगळ्या तारांनी पूर्ण जखमी झाला... त्याच्या हातात त्या तारा खोलवर घुसल्या...
त्याने लगेच तिच्या बंगड्यातून हात काढून घेतला, त्याला गाडी ही सांभाळता येत नव्हती, तर गाडीला हात ही लावता येत नव्हता..... समोर गाड्या येत होत्या आणि गाडी कंट्रोल होत नव्हती.....आणि अश्यात जे व्हायचे नव्हते तेच झाले...त्याला समोरून येणाऱ्या गाडीने उडवले.. त्यात त्याचा पायावरून गाडीचे चाक गेले...
त्याला मदतीला ही कोणी आले नाही, कारण सगळ्यांना वाटत होते की हा दारू पिऊन गाडी चालवत होता... मग का कोणी त्याची मदत करावी... बराच वेळ तो तसाच विव्हळत पडला होता.. त्याच्या कर्माची सजा भोगत...
चिऊ ही एका कडेला त्याचे झालेले हाल पहात उभी होती ,तिला इतकी शिक्षा ही द्यायची नव्हती पण तिने ठरवल्यापेक्षा त्याला देवाने मोठी शिक्षा दिली होती...तिने विचार केला कर्म अद्दल घडवतील ह्याची वाट बघत राहिले असते तर मी माझी कधीच स्वावलंबी झाले नसते... आज जे घडले ते ताईने दिलेल्या हिमतीमुळे... अशी ताई सर्वांनाच मिळेल असे नाही..पण मुलींनी इतरांच्या अनुभवाने शहाणे व्हायला हवे...
परावलंबी होणे म्हणजे सशक्त होणे नाही, त्यासाठी सशक्त विचारांनी जागरूकता वेळीच जागी व्हायला हवीच....तुम्ही जितके दबले जाणार तितके तुम्हाला दबवले जाणार... जितके पेटून उठणार तितके ज्वलंत होणार...
ताईने सांगितलेले बिभत्स सत्य जे कधी ही कोणाला सांगावेसे नाही वाटले ते गौरीच्या कमालीच्या परावलंबी होत चाललेल्या वागणुकीमुळे आज तिला सांगणे भाग पडले.. तिने जे धाडस दाखवले ती गौरीसाठी एक शिकवण ठरेल..आणि खरंच ते सत्य जणू.. रामबाण उपाय ठरले.....
©®anuradha andhale palve