भेटली ती पुन्हा (भाग २०)

अपूर्ण राहिलेली त्या दोघांची गोष्ट


भेटली ती पुन्हा (भाग २०)
©®रश्मी केळुसकर

***************************************************


हृदयावर कोरलेल्या जखमा घेऊन मेघना आपलं दुःख लपवत आपल्या वडिलांसमोर उसनं हसू आणून वावरत होती. तिच्या मनात कायम ही भीती असायची की तिथे सुरेशला कळलं आणि तो इथे आला तर तिला न्यायला? पण मग पोलिस त्याच्या मागावर आहेत म्हणजे तो गाव सोडून जाऊ शकत नाही अशी ती मनाची समजूत घालत होती.

साधारण महिन्याभरानंतर तिच्या लहान भावाला तिच्या वडिलांच्या मित्राच्या ओळखीने एक चांगल्या नोकरीची ऑफर आली पण नोकरी बंगलोरला होती. त्याला तिथे वास्तव्य करणं अनिवार्य होतं. वडिलांनी टाकलेल्या शब्दाला जागून त्यांच्या मित्राकरवी आलेली ही चांगली नोकरीची संधी अशी हातातून घालवण म्हणजे मूर्खपणा होईल असा विचार करून तिच्या भावाने वडिलांना घेऊन तिथे बंगलोरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि तसा तो मेघनाला सांगितला. इतके दिवस काही ना काही खोटं सांगून आपली बाजू सावरणाऱ्या मेघनाला आता मात्र काय कारण सांगावं कळलं नाही आणि भावाच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतंय ते आपल्यामुळे नको विस्कटायला म्हणून "मी आता सासरी परत जाते तुम्ही जा" असं सांगून तिने त्याच्या निर्णयाला संमती दर्शवली.

पुढच्या काही दिवसातच तिचा भाऊ आणि बाबा बंगलोरला निघून जाणार होते म्हणून मेघनासुद्धा आपल्या सासरी परत जायला निघाली. पण फक्त वडिलांना आणि भावाला दाखवण्यापुरता... पण आता पुढे काय? कुठे जावं आणि काय करावं हे तिला काहीच कळत नव्हतं. खरंतर आपल्या भावाला सगळं सांगून टाकून ती त्याच्यासोबत जाऊ शकली असती पण आजवर आलेल्या एकामागोमाग संकटांमुळे तिला जगणंच नकोसं झालं होतं आणि आपल्यामुळे आपल्या भावाला का त्रास द्यायचा असा विचार करून तिने काहीच सांगितलं नाही. नशिबाला दोष देत ती पूर्णपणे नैराश्येच्या गर्तेत अडकली होती. वाट मिळेल तिकडे ती चालत होती.... डोक्यात विचारांनी काहूर माजलं होतं. एकटी बाई बघून काही विकृत पुरुषांच्या रोखून बघणाऱ्या नजरा तिला तिच्या शरीराच्या आरपार जात आहेत असं वाटत होतं. जगून तरी आता काय करायचं आहे, सासरी परत जाऊन त्या नरकात रोज थोडं थोडं मारण्यापेक्षा एकदाच विषय संपवून टाकूया असा टोकाचा विचार करून ती अचानक धाऊ लागली. वाट मिळेल तिथे धावत सुटली. बराच वेळ धावल्यावर तिला समोर रेल्वे स्टेशन दिसलं आणि आता बास्स.... भरधाव वेगाने येणारी ट्रेन खाली आता जीवच देते असा विचार करून ती अधिक वेगाने धावू लागली. ती रुळावर पोचणार इतक्यात कुणीतरी तिचा हात धरला, पटकन मागे ओढलं आणि विचारलं... "काय ग पोरी? काय करते आहेस??" घाबरलेल्या मेघनाने बघितलं तर एक सडपातळ अंगकाठी असलेली तरीही नजरेत जरब असलेली तिच्या आईच्या वयाची बाई तिचा हात धरून विचारत होती. तिला तेव्हा त्या बाईच्या रुपात तिच्या आईच दिसली आणि मेघना तिथेच बसून रडू लागली. ती बाई अक्का होती. अक्का ने मेघनाला बाजूला नेऊन बसवलं आणि पाणी प्यायला देत शांत केलं.

त्या दिवशी अक्का ने वाचवलं नसतं तर मेघना स्वतःला संपवायलाच निघाली होती पण अक्काने तिला आईची माया दिली, आसरा दिला आणि जगण्याची नवी आशा दिली. मेघनाचा पुनर्जन्मच होता तो. त्यानंतर मेघनाने स्वतःची खरी ओळख पुसून टाकून नव्याने आयुष्य जगायचं ठरवलं. आता तिला कुणावरही ओझं म्हणून जगायचं नव्हतं आणि कुठल्याही नात्यात गुंतायच नव्हतं. कमी वयात झालेल्या एकापाठोपाठ एक मानसिक आघातांमुळे तिचं मन रुक्ष झालं होतं.

अक्काच्या घरी राहायला आल्यानंतर दोन दिवसांनी तिने एकदा सासरी कॉल करून सुरेशला खरंच शिक्षा झाली का हे बघायला फोन लावला. तेव्हा सूरेशच्या आईने फोन उचलला आणि तीच्याकरवी सुरेशला पंधरा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाल्याचं मेघनाला कळलं. सुरेशच्या आईने तिला इथे कॉल न करण्यास बजावलं आणि काळजी घे असही सांगितलं. सुरेश ची आई पुढे असही म्हणाली की "आता तुझा इथला वाईट भूतकाळ विसरून नव्या आयुष्याला सुरुवात कर. आम्ही आमचं बघून घेऊ. सुरेशच्या वाईट कर्मांची फळं आम्हालाच भोगू दे. तू यापुढे कधीही इथे संपर्क करू नको. आम्हीही दोघे नवरा बायको आता जुन्या च घरी राहायला जाणार आहोत. इथे या मोठ्या घरात खोट्या बडेजावाखाली जीव नाही करमत. आमचं जे व्हायचं ते होईल पण तू आता मागे वळून बघू नकोस." असं म्हणून सुरेशच्या आईने फोन ठेऊन दिला. त्या नंतर मेघना या बाबतीत तरी निश्चिंत झाली की आता सुरेश जेल मध्ये आहे म्हणजे त्याचा आपल्याला काहीच त्रास होणार नाही. प्रश्न राहिला भाऊ आणि वडिलांचा तर मेघना महिन्यातून एकदा स्वतः भावाला फोन करून वडिलांच्या तब्येतीची चौकशी करू लागली सासरचा फोन बंद झालाय असं खोटंच सांगून. तिथे बंगलोरला तिच्या भावाच चांगलं बस्तान बसलं. नोकरी चांगली होती. सगळं बरं चाललं होतं. इथे मेघना ही अक्काच्या ओळखीने गारमेन्ट मध्ये नोकरीला लागली होती. दोन वर्षांनी मेघनाच्या वडिलांचं ही निधन झालं पण ही बातमी तिच्या भावाने वडील गेल्यानंतर जवळ जवळ महिन्याभराने मेघनाला सांगितली आणि यापुढे आता इथे फोन करू नको, माझ्या आयुष्यात ढवळा ढवळ करू नको असही बजावलं. दोन वर्षात कसंबसं या सगळ्यातून सावरलेल्या मेघनाला वडील गेल्याच दुःख तर झालंच पण आपल्या वडिलांचे अतिंम दर्शनही लाभू न देणाऱ्या आणि अचानक वर्तन बदललेल्या भावाच आश्चर्य वाटलं. त्यानंतर दोन तीन वेळा तिने भावाला कॉल केला तेव्हा त्याच्या बोलण्यावरून तिच्या हे लक्षात आलं की आपल्या भावाच्या आयुष्यात कुणी मुलगी आली आहे आणि त्याला आपल्या बहिणीपेक्षा त्या मुलीची आणि आपल्या वडिलांच्या इस्टेटीची जास्त काळजी वाटू लागलीय.

मनावर पुन्हा एकदा दगड ठेऊन तिने हा शेवटचा ऋणानुबंध ही मग आपल्या आयुष्यातून कापून टाकला आणि आपल्या भावाला मोकळं केलं. नाते संबंध या शब्दावरचा विश्वास च उडून गेला तिचा. नियतीने खेळच असा अघोरी मांडला तिच्या आयुष्याचा की कितीही नको म्हणावं तरी तिला आपल्या या जगात असण्याचाच राहून राहून पश्र्चाताप होत होता. इथे ती अक्कासोबत राहून नोकरी करून जगत होती पण त्या वस्तीतील काही मवाली पुरुष घाणेरड्या नजरेने तिला येता जाता बघत च होते. गळ्यात असलेलं मंगळसूत्र तिने सुरक्षेसाठी म्हणून घातलं होतं खरं पण एव्हाना लोकांमध्ये चर्चा होऊ लागली होती की हीचा नवरा कधीच येत नाही आणि ही एकटी बाई आहे. अक्काच्या घरात ती राहत होती त्यामुळे उघड उघड कुणी तिला त्रास देत नव्हतं पण तरुण आणि सुंदर मेघना अशा कितीतरी नजरा रोज झेलून त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात होती.

काही दिवसांपूर्वी जेव्हा संजय तिला भेटला तेव्हा सुकलेल्या जीर्ण पर्णावर पावसाच्या सरी बरसाव्या असं काहीसं झालं तिचं. आशेचा एक किरण तिला दिसला. घाव सोसून सोसून बधीर झालेल्या तिच्या मनावर थंड वाऱ्याची झुळूक यावी असं वाटलं. इतक्या वर्षानंतर ते ही संजय... तिला आपलं कुणीतरी भेटल्यासारख वाटलं.. पण दुसऱ्याच क्षणी... तिने स्वतःला सावरलं आणि उगाचच नवे स्वप्न पाहणाऱ्या मनाला आवर घातला. संजयच्या वागण्यावरून, नजरेतून तिला अजूनही तोच जुना संजय, तिच्यासाठी थांबलेला दिसत होता पण आता पुलाखालून बरंच पाणी निघून गेलं आहे आणि इतका वाईट भूतकाळ पाठीशी जोडलेला असताना संजय सारख्या चांगल्या मुलाच्या आयुष्यात आपल्यामुळे उगाच गदारोळ माजू नये या विचाराने तिने शक्य तेव्हा त्याच्यापासून लांब रहायचा प्रयत्न केला. तरीही नशीब त्या दोघांची पुन्हा पुन्हा भेट घालतच होतं... आत्ता इथे असं माथेरानला सुद्धा... संजयच्या आयुष्यात गेल्या नऊ वर्षात काय घडलं आहे? तो खरंच तिची वाट बघत थांबला आहे का? अजूनही खरंच त्याला ती तितकीच आवडते का? असे बरेच प्रश्न तिच्या मनात थैमान घालत होते....


पुढे काय होईल हे पाहण्यासाठी वाचत रहा... भेटली ती पुन्हा


सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..

साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


कथा आवडत असल्यास लाईक आणि कमेंट करून मला कळवा आणि कथेचे असेच सगळे भाग वाचण्यासाठी मला फॉलो करा..


©®रश्मी केळुसकर...


🎭 Series Post

View all