भेटली ती पुन्हा (भाग १९)

अपूर्ण राहिलेली त्या दोघांची गोष्ट
भेटली ती पुन्हा (भाग १९)
©®रश्मी केळुसकर.

***************************************************

मेघना ने थंडगार पाणी ओंजळीत भरून घेतलं आणि आपल्या चेहऱ्यावर मारलं. ती पुन्हा पुन्हा ओंजळ भरून पाणी चेहऱ्यावर मारत राहिली. तिचा अस्वस्थ जीव शांत होईपर्यंत... जणू काही ती लग्न झाल्यापासूनच्या गेल्या पाच महिन्यातल्या त्या वाईट आणि नकोशा आठवणी धुऊन टाकायचा प्रयत्न करत होती.. कपाळावरच्या नशिबाच्या रेषा पुसून टाकायचा भाबडा प्रयत्न करत होती.. पण ते कुठे शक्य होतं?? नियतीने मांडलेल्या या क्रूर खेळात आतापर्यंत तिचाच बळी जात होता पण तरीही ते सगळं सहन करायची हिंमत तिने दाखवली होती ती केवळ आपल्या आई वडिलांसाठी. आपल्या आईला तिच्या शेवटच्या दिवसात त्रास होऊ नये म्हणून ती गप्प होती. समाजासमोर देवा ब्राह्मणांच्या साक्षीने ज्या माणसाने आपल्या सोबत लग्न केलं, सप्तपदी चालून गळ्यात पवित्र मंगळसूत्र घातलं तो माणूसच जेव्हा तिच्याशी क्रूरपणे वागू लागला तेव्हा त्याने कुस्करून टाकलेलं तिचं मन उमलायच्या आतच कोमेजून गेलं होतं पण तरीही इथून आता बाहेर पडले तर अशी कितीतरी टपून बसलेली गिधाडं लचके तोडणार त्यापेक्षा हा एकच परवडला असं म्हणत तिने हेच आता आपलं आयुष्य म्हणून स्वीकार केला होता आणि ती जगत होती.... पण आता मात्र हद्द झाली... सुरेश इतक्या कोत्या मनाचा असेल आणि एवढ्या खालच्या पातळीवर उतरेल याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती.. त्यात तो आता एक खुनी होता आणि अशा गुन्हेगारासोबत आपल्या आयुष्याची वाताहत लावणं तिला असह्य होऊ लागलं. तिने तोंड धुतलं. आपल्या साडीच्या पदराने तोंड पुसून घेतलं. रडून रडून आता डोळ्यातले अश्रूही थकले होते.. बाहेरच येत नव्हते. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि भरलेली बॅग कपाटाच्या कोपऱ्यात लपवून ठेवली. सुरेश आलाच तर त्याला दिसू नये म्हणून.


ती तिथून तडक स्वयंपाक घरात गेली. तिथे सुरेशची आई होतीच. तिने रडत रडत त्यांना सगळं सांगून टाकलं आणि म्हणाली "आई... आता माझी सहनशक्ती संपली आहे. मी नाही राहू शकत इथे. हा माझ्यासाठी नर्क आहे. एक बाई म्हणून आणि एक आई म्हणून तुम्ही मला समजून घ्याल अशी आशा करून तुमच्याकडे आले आहे. मला इथून आता मुंबईला जायचं आहे माझ्या आई बाबांकडे.. इथलं मला काहीच माहीत नाही. आज रात्रीपर्यंत जरी इथे थांबले तर माझ्या आयुष्याचं वाटोळं होईल. मला इथून बाहेर पडायला मदत करा. मी इथून एकटी गेले आणि सुरेश किंवा त्याच्या माणसांनी मला कुठे पाहिलं तर ते मला जाऊ देणार नाहीत.." मेघना जिवाच्या आकांताने एका दमात सगळं बोलली.

मेघनाच बोलणं ऐकून सुरेशच्या आईचे डोळे पाणावले. एक आई म्हणून आपण कमी पडलो पण आता एक सासू म्हणून तरी आपली जबाबदारी पूर्ण करूया आणि या सोन्यासारख्या मुलीच्या आयुष्याची परवड थांबवूया असा विचार करून सुरेशची आई मेघनाला मदत करायला तयार झाली. घरात होते ते पैसे तिने मेघनाला दिले आणि गावातून सुटणाऱ्या एसटी स्टँडवर ती मेघनाला सोडायला गेली. सुरेश या सगळ्यापासून अनभिज्ञ होता. तो फक्त त्याला त्या खुनाच्या शिक्षेतून कशी सुटका मिळेल याच विचारात होता. मेघना त्याला त्याच्या हातातलं खेळणं वाटत होती. ती इथून पळून वैगरे जाण्याचा विचार करेल असा त्याने विचारही केला नाही. त्याने दिलेल्या धमकीला घाबरून मेघना घरात रडत बसली असेल आणि रात्री आपण तिला भय्यासाहेबांकडे जबरदस्ती सोडून येऊ असं त्याला वाटून तो गाफील राहिला.


इथे मेघना संध्याकाळच्या सहाच्या गाडीत बसली. तिला सोडायला आलेल्या सूरेशच्या आईचे मनोमन आभार मानून त्यांचे आशीर्वाद घेऊन ती गाडीत बसली. सुरेशची आई हात उंचावून तिला साश्रू नयनांनी मेघनाला निरोप देत होती आणि देवाकडे मेघनाच्या चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करत होती. असं एकटीने एवढ्या लांब प्रवास करण्याची मेघनाच्या आयुष्यातील पहिलाच वेळ होती पण आता तिला या एकटेपणाची, काळोखाची, एकटीने प्रवास करण्याची अजिबात भीती वाटत नव्हती कारण गेल्या पाच महिन्यात जे भोग तिच्या वाट्याला आले होते त्याच्यापुढे हे सगळं काहीच नव्हतं. आता या सगळ्याच्या पलीकडे ती गेली होती. कधी एकदा मुंबईला पोहचते आणि आईच्या कुशीत शिरते असं तिला झालं होतं. बाबांना हे सगळं सांगून आता मी सासरी कधीच जाणार नाही असं कधी एकदा सांगते असं वाटत होतं.


साधारण रात्री सव्वा अकराच्या सुमारास ती आपल्या स्टॉपला पोहचली. इतकी रात्र असूनही तिला भावाला फोन करून बोलवावं असं अजिबात वाटलं नाही तेव्हा कारण मुळात तिला त्या अंधाराची भीतीच वाटत नव्हती. उलट त्या अंधारातही तिला तिच्या आयुष्यात प्रकाशाचा आणि आशेचा किरण दिसत होता. आपण एका खूप मोठ्या संकटातून वाचलो याचं समाधान वाटत होतं आणि सुरेश सारख्या राक्षसाच्या तावडीतून आपली सुटका झाली म्हणून बरं वाटत होतं. तिने बसमधून उतरून टॅक्सी केली आणि घरी आली. मनात विचारांचं द्वंद्व चालूच होतं. इतक्या रात्री एकटी घरी आलेली पाहून सगळे काय म्हणतील? काय विचार करतील? आईला या अवस्थेत कसं सगळं सांगू? सगळ्या विचारातच ती घरी पोहचली तर घराबाहेर गर्दी जमली होती....


गर्दी बघून मेघनाच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली. घाबरतच ती घरापाशी गेली तर आतून रडण्याचा आवाज येऊ लागला. मेघनाला बघून शेजारीपाजारी अवाक् झाले. मेघना आत गेली आणि बघते तर काय?? तिच्या आईचं शव..... मेघना सुन्न झाली. ती धाडकन खाली कोसळली आणि "आई......." म्हणत तिने एकच आक्रोश केला. त्या दिवशी सकाळीच मेघनाच्या आईची तब्येत जास्त बिघडली होती आणि संध्याकाळी त्यांचं निधन झालं होतं. हे कळवायला मेघनाच्या भावाने मेघनाच्या सासरी फोन केला तेव्हा त्याला कळलं की मेघना मुंबईलाच यायला निघाली आहे. मेघना कडे काही त्यावेळेस मोबाईल फोन वैगरे नव्हता त्यामुळे तिला याची कल्पनाही नव्हती... ती बिचारी पूर्ण प्रवासात कधी एकदा जाऊन आईला मिठी मारते या विचारात आली होती. इथे येताच आई गेल्याच कळताच तिचा बांध सुटला.. "आई.... आई..." म्हणत ती नुसती रडत राहिली. आईच्या शेवटच्या दिवसात आपण निदान काही दिवस तरी तिच्या सोबत असू असं तिला वाटलं होतं पण देवाने बहुतेक मेघनाच्या नशिबात एका मागोमाग एक दुःखच लिहिली होती. बाबांना मिठी मारून मेघना खूप रडली आणि त्या क्षणी ती इथे अशी अचानक का आली हे सांगण्याच्या मनस्थितीत ती आता राहिली नव्हती. आपली आई आता या जगात नाही हे दुःख तिच्यासाठी तिच्या त्या यातनांपेक्षा खूप मोठं होतं.


मेघनाची मोठी बहीण सगळे संबंध तोडल्यामुळे आई गेली कळल्यावरही आली नाही. नको ते गैरसमज करून घेऊन तिचं हृदय नात्यांच्या पलीकडे जाऊन कोरडं पडलं होतं त्यात तिच्या नवऱ्याने तिला जाऊ दिलं नव्हतं कारण त्यांचं लग्न झालं तेव्हा जेव्हा मेघनाच्या मोठ्या बहिणीने घरी फोन केला तेव्हा मेघनाच्या आईने पराकोटीचा अपमान केला होता त्याचा.

दुसऱ्या दिवशी त्या सुतकी वातावरणात आईच्या आठवणीत अश्रू ढाळताना मेघना बसलेली असताना तिच्या वडिलांनी ती इथे अशी अचानक येण्यामागच कारण विचारलंच. बाबांना आता या परिस्थितीत काही सांगू की नको या संभ्रमावस्थेत असतानाच अचानक तिचे बाबा छातीवर हात ठेऊन जोरात ओरडता चक्कर येऊन पडले. त्यांना ताबडतोब मेघना आणि तिच्या भावाने हॉस्पिटलला नेलं. हे एवढं सगळं घडत होतं ते कमी की काय म्हणून मेघनाच्या बाबांना हार्ट अटॅक आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यांना त्रास होईल असं काहीही करू नका असं ही बजावलं. आता बाबांना या सगळ्या गोष्टी सांगून त्रास नको द्यायला म्हणून मग मेघनाने पुन्हा आपल्या ओठांना कुलूप लावून टाकलं आणि बाबांची काळजी घेण्यात स्वतःला मग्न करून घेतलं... तिथे सुरेशच काय झालं पुढे हे तिला काहीच माहीत नव्हतं आणि तिला ते जाणून घ्यायची इच्छाही उरली नव्हती. तिच्या दृष्टीने सुरेश नावाचं एक खराब पान तिच्या आयुष्याच्या पुस्तकातून तिने फाडून टाकलं होतं... कायमचं...


मेघनाच्या भूतकाळात इतक्या कमी वयात इतकं सगळं तिने सहन केलं तरीही पुढे काय झालं? ती का जीव द्यायला चालली होती जिथे तिला अक्का तिला भेटली.. आणि मेघनाच्या येणाऱ्या भावी आयुष्यात आणखी काय काय घडणार हे जाणून घ्यायला वाचत रहा.... भेटली ती पुन्हा.


सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..

साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


कथा आवडत असल्यास लाईक आणि कमेंट करून मला कळवा आणि कथेचे असेच सगळे भाग वाचण्यासाठी मला फॉलो करा..


©®रश्मी केळुसकर...

🎭 Series Post

View all