भेटली ती पुन्हा (भाग१८)

अपूर्ण राहिलेली त्या दोघांची गोष्ट : मेघनाच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी


भेटली ती पुन्हा (भाग १८)
©®रश्मी केळुसकर.

**************************************************

त्या रात्री सुरेश काहीशा चिंतेत दिसला मेघनाला. काहीतरी चाललं होतं त्याच्या डोक्यात. त्या रात्री बाहेरून दारू पिऊन आलेल्या सुरेशने पुन्हा घरी कितीतरी ग्लास रिचवले. इतके की दारु पिऊन तिथेच त्याच सोफ्यावर तो झोपून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेशने सांगितल्याप्रमाणे मेघना तयार झाली. सुरेश ही कधी नव्हे ते लवकर उठला. मेघनाच्या असं लक्षात आलं की सुरेश आपल्याला नजर मिळवणं टाळतो आहे. कसल्यातरी टेन्शनमध्ये दिसत होता तो. इतक्यात सुरेशला त्याच्या साहेबांचा फोन आला. त्यांच्याशी बोलायला सुरेश दुसऱ्या रूममध्ये निघून गेला आणि आतून कडी लावून बोलू लागला. मेघनाने बाहेरून ऐकायचा प्रयत्न केला तर नीट काही कळलं नाही पण काहीतरी गडबड नक्कीच आहे असं तिला जाणवलं. सुरेश बघेल म्हणुन ती निघून गेली. पाच मिनिटांनी फोन ठेऊन सुरेश दार उघडुन बाहेर येत खेकसला.. "झाली का तयारी?"

"हो मी तयारच आहे" म्हणत मेघना लगबगीने बाहेर आली. लग्नानंतर पहिल्यांदाच बाहेर कुठेतरी चाललो आहोत म्हणून मेघनाने छान जरिकाठी साडी नेसली. मराठमोळी जरीकाठी साडी, केसांची सैलसर वेणी आणि गजरा... मेघना अतिशय सुंदर दिसत होती. सुरेशने तिच्याकडे एकदा पाहिलं आणि गाडीत जाऊन बसला. तो आपल्याच तंद्रीत होता. मेघना मात्र विचारात पडली की आज सुरेशने आपल्याकडे रोखून कसं पाहिलं नाही?..

दोघेही गाडीत बसले आणि त्यांच्यासोबत नेहेमी सुरेशसोबत असणारा त्याचा मित्र पण होता. साधारण अर्ध्या तासानंतर एका आलिशान बंगल्यासमोर त्यांची गाडी थांबली. गाडी थांबताच सुरेश लगेच उतरला आणि त्याने रुमालाने आपला डोक्यावरचा घाम पुसला. मागोमाग मेघनाही उतरली. एवढा मोठा बंगला पाहून तिला जरा अवघडल्यासारखं झालं पण सुरेश पुढे जोरजोरात चालू लागला तशी ती सुद्धा मागोमाग चालू लागली. सुरेशच नेमकं काय चाललय? इथे आपण कशासाठी आलोय? याचा काहीच अंदाज येत नव्हता तिला. आपलं नवीन लग्न झालंय म्हणून साहेबांनी भेटायला बोलवलं असेल असा अंदाज बांधला तिने आणि ती चालत राहिली.

तो आलिशान बंगला आतून पाहून मेघनाचे डोळेच दिपले. ते दोघेही सोफ्यावर बसले तसं नोकराने पाणी आणून दिलं त्यांना.

त्या नोकराला सुरेशने विचारलं

"भय्यासाहेब कुठे आहेत? मी आलोय सांग त्यांना"

एरवी घरी अरेरावी करणारा सुरेश इथे मात्र दबक्या आवाजात बोलत होता.

मेघना त्या बंगल्यातल्या आलिशान आणि महागड्या वस्तू बघण्यात मग्न होती इतक्यात आतून भय्यासाहेब आले आणि बोलले..

"अरे अलभ्य लाभ सुरेश शेठ.. आलात तुम्ही? आम्हाला वाटलं येताय की नाय?"

भय्यासाहेबांचा तो भारदस्त आवाज ऐकून मेघना दचकलीच. तिने मान वर करून पाहिलं तर भय्यासाहेब म्हणजे तो कालचाच माणूस होता जो मेघनाला काल क्लिनिकमधून बाहेर पडताना दिसला होता. त्याची ती विचित्र नजर... मेघनाला आठवली आणि दोन सेकंद तिला काही कळलंच नाही..

"पाय पड साहेबांच्या" सुरेश मेघनाला म्हणाला.

तशी मेघना उठली आणि दोघांनी वाकून नमस्कार केला त्या साहेबांना.

"बायको सुंदर आहे सुरेशराव..." त्यांना आशीर्वाद देत भय्यासाहेब मेघनाकडे रोखून बघत म्हणाले आणि गालातल्या गालात हसले.

"हा पन्नाशी उलटलेला माणूस माझा नवरा समोर असताना असं कसं बोलू शकतो?? साहेब असला म्हणून काय झालं? नजरच वाईट आहे या माणसाची" मेघनाने विचार करत सूरेशकडे रागाने बघितलं. तिला टाळत सुरेश हसत भय्यासाहेबांना म्हणाला "साहेब ते जरा आपलं कामाचं आत जाऊन बोलूया काय?"

भय्यासाहेब परत मेघनाकडेच पाहत म्हणाले "हो हो चल कामाचंच तर बोलायचं आहे तुझ्याशी. सगळं एकदा क्लिअर केलं की झालं.. काय मग तुला पण टेन्शन नाय आणि माझा रस्ता मोकळा.." असं बोलून ते कुत्सितपणे हसू लागले.

भय्यासाहेबांची ती घाणेरडी नजर, ते कुत्सित हसणं हे सारं मेघनाला संशयास्पद वाटू लागलं. ती पुन्हा सोफ्यावर बसली. सुरेश आणि भय्यासाहेब आत निघून गेले.

जवळ जवळ पंधरा वीस मिनिटांनी ते दोघे बाहेर आले. भय्यासाहेबांनी मेघनाला पाहून आपल्या मिशीवर हात फिरवला आणि सुरेशला बोलले "कळव मला काय ते. सगळं तुझ्याच हातात आहे. निर्णय घे आणि फोन कर. मी वाट बघतोय"

एकूणच हे भय्यासाहेब म्हणजे वाईट माणूस आहे हे मेघनाला कळलं होतं पण सुरेशला कसला निर्णय घ्यावा लागणार आहे हे तिला कळत नव्हतं.

नोकराने सुरेश आणि मेघनाला चहा आणून दिला. चहा घेऊन ते दोघे तिथून निघाले. येताना सुद्धा गाडीत सुरेश खूप अस्वस्थ दिसला मेघनाला. तिला घरी सोडून गाडी तशीच फिरवून तो निघून गेला. आपल्याला साहेबांकडे भेटायला न्यायचं काय प्रयोजन होतं हे मेघनाला अजूनही कळलं नव्हतं पण कसली तरी अनामिक भीती तिला राहून राहून वाटत होती. ती आत जाणार इतक्यात पोलिसांची गाडी आली आणि दारात पोलिस पाहून मेघना घाबरली.

"सुरेश.. कुठे आहे?" पोलिसांनी गाडीतून उतरताच तार स्वरात विचारलं.

"अं... ते आत्ताच बाहेर गेले." मेघना घाबरत बोलली.

"कुठे गेलाय तो?" पोलिसांनी पुन्हा दरडावून विचारलं.

"माहित नाही मला" मेघना म्हणाली

"आला की आम्हाला फोन करा" अशी धमकी देऊन पोलिस निघून गेले.

काय चाललंय काहीच कळेनासं झालं मेघनाला.. त्या दिवशी सुरेश घरी आलाच नाही. तो थेट दुसऱ्या दिवशी पहाटे आला तेही लपून छपून.

आत येताच त्याने मेघनाला उठवलं आणि बोलायला सुरुवात केली "आता मी काय बोलतोय ते नीट ऐक." सुरेशची ती भेदरलेली नजर पाहून मेघनाची झोपच उडाली.

सुरेश बोलू लागला "आपल्या हातून एक खूप मोठा गुन्हा घडलाय. चोऱ्यामाऱ्या, खंडणी वसुली इथपर्यंत ठीक होतं पण त्या दिवशी दारूच्या नशेत हाणामारी करताना एकाचा खून झालाय आपल्या हातून.. पोलिसांना अजून हे माहित नाय पण डाऊट आहे माझ्यावर"

हे ऐकताच मेघनाच्या पायाखालची जमीन सरकली.. ती काही विचारणार इतक्यात सुरेश पुन्हा बोलू लागला "मी काय बोलतोय ते फक्त ऐकून घे मुकाट्याने. आता या प्रकरणातून आपल्याला फक्त भय्यासाहेबच बाहेर काढू शकतात आणि हे सगळं तुझ्या हातात आहे.."

"माझ्या हातात??" प्रश्नार्थक नजरेने घाबरून मेघानाने विचारलं.

"होय तुझ्याच हातात.. भय्यासाहेबांना तुझ्या सौंदर्याची भुरळ पडलीय आणि...."

"आणि काय????" जोरात किंचाळत मेघनाने विचारलं.

"ओरडू नकोस... ही गोष्ट फक्त आपल्या दोघातच राहिली पाहिजे. आज रात्री तयार रहा. मी गाडी पाठवेन. भय्यासाहेबांच्या बंगल्यावर न्यायला तुला एक गाडी येईल.." सुरेश तिच्या हाताला करकचून धरून बोलत होता. त्याच्या डोळ्यातला तो खुनशीपणा बघून आणि हे सगळं ऐकून मेघना स्तब्ध झाली. सुरेश त्याला जे बोलायचं होतं ते बोलून लपत छपत निघूनही गेला पण मेघना तशीच शून्यात बघत बसून राहिली...

तिला जोरजोरात ओरडावसं वाटत होतं.. आपल्याच बायकोचा आपल्या फायद्यासाठी असा सौदा करणाऱ्या सुरेशसारख्या नराधमाला चाबकाने फोडाव वाटत होतं.. तिला त्याला "मी कुठेही येणार नाही" असं निक्षून सांगायचं होतं... एरवी पुरुषी अहंकार गाजवणाऱ्या तिच्या त्या नवऱ्याला नवरा म्हणायचीच लाज वाटू लागली तिला... स्वतःला वाचवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला उतरलेल्या सुरेशचा तिला तिरस्कार वाटू लागला. तिच्या सौंदर्याचा तिला राग येऊ लागला. हे सौंदर्य म्हणजे आपल्यासाठी शापच आहे असं वाटू लागलं.. काय करावं तिला काहीच कळत नव्हतं. लग्न झाल्यापासून इच्छेविरुद्ध स्वतःची गरज भागवणारा सुरेश इतका नीच असेल याची लाज वाटली तिला. हे सगळं कल्पनेपलिकडलं होतं तिच्या.

"यासाठी घेऊन गेला होता का मला साहेबांकडे?? इतके गलिच्छ विचार?? इतकी विकृत माणसंही असू शकतात या जगात?? माझ्याच नशिबात का हे सगळं?? का????" तिचं मन एकच आक्रोश करत होतं.. ती हुंदके देऊन रडत राहिली. बऱ्याच वेळानंतर ती स्वतःचे डोळे पुसत ताडकन उठली आणि पुटपुटली "बास्स... बास्स झालं आता सगळं.. आता सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलं आहे. आज रात्र व्हायच्या आत इथून पळून गेलं पाहिजे नाहीतर तो नराधम माझा सौदा करून टाकेल.."

मेघनाने आपला रडून रडून सुजलेला चेहरा एकदा आरशात बघितला आणि आपली बॅग भरायला घेतली. पुढे काय आणि कसं करायचं आहे? मुंबईला परत कसं जायचं आहे? आईबाबांना हे सगळं कसं सांगायचं आहे? याचा काहीही विचार न करता तिने मिळेल ते सामान बॅगेत भरायला सुरुवात केली.

मेघनाने पुढे काय केलं? सुरेश च काय झालं? त्याला शिक्षा झाली का? मेघनाचा हा भूतकाळ संजयला कळेल का? संजयची मैत्री मेघनाच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे क्षण घेऊन येईल का? हे सारं पाहायला वाचत रहा.... भेटली ती पुन्हा.


सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..

साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


कथा आवडत असल्यास लाईक आणि कमेंट करून मला कळवा आणि कथेचे पुढचे भाग वाचण्यासाठी मला फॉलो करा..

©®रश्मी केळुसकर...



🎭 Series Post

View all