भेटली ती पुन्हा (भाग १६)

अपूर्ण राहिलेली त्या दोघांची गोष्ट...
भेटली ती पुन्हा (भाग १६)
©®रश्मी केळुसकर.


***************************************************


मेघना झपझप पावलं टाकत चालू लागली आणि संजय तिच्या मागे मागे. काय करावं काहीच सुचत नव्हतं संजयला. मेघना हॉटेलच्या दिशेने आली. खाली वनिता आणि इतर सगळेच बसले होते. कुणाकडेही न बघता मेघना वर आपल्या रूममध्ये निघून गेली. तिने आत येऊन रूमचा दरवाजा लावून घेतला. संजयसुद्धा आपल्या रूममध्ये गेला भिजलेले कपडे बदलून घ्यायला. एकंदर संजयला आपल्या अशा प्रश्न विचारण्याचा खूप संकोच वाटला. उगाच मेघनाला तिच्या घरच्यांविषयी विचारलं असं वाटलं.

मेघना फ्रेश होऊन आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःलाच विचारू लागली "काय चुकलं संजयच? एक जुना चांगला मित्र म्हणून त्याच्या दृष्टीने अगदी माफक माहिती विचारली त्याने माझी आणि मी मात्र भावनेच्या आवेगात अशी तरातरा निघून आले.. पण मी तरी काय करू? तो सुरेशचा आवाज ऐकला आणि काटाच आला अंगावर.. सहा.. तब्बल सहा वर्षांनंतर तो परत आलाय. म्हणजे आता पुन्हा तो मला तसाच त्रास देणार का??" मेघना आपल्या भूतकाळातील त्या काळ्याकुट्ट आठवणींच्या खोल डोहात बुडाली....... सगळं सगळं पुन्हा तिच्या डोळ्यासमोर झरझर येऊ लागलं. ती आरशात बघत तशीच उभी राहिली... निस्तब्ध...


नऊ वर्षांपूर्वी जेव्हा मेघनाच्या मोठ्या बहिणीने घरातून पळून जाऊन एका दाक्षिणात्य मुलाशी लग्न केलं तेव्हा हे कळल्यावर मेघनाच्या आईवडिलांना खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. मेघनाचे वडील खूप साधे होते तर आई कडक शिस्तीची. मेघना तीन भावंडांमध्ये मधली. मेघनाच्या मोठ्या बहिणीचा स्वभाव लहानपणापासून निर्भिड होता.. अगदी आईसारखा. आईच्या कडक शिस्तीमुळे मेघनाच्या मोठ्या बहिणीच आणि आईचं अजिबात पटायचं नाही. मेघना अतिशय बडबडी आणि स्वभावाने गोड मुलगी होती. सगळ्यांची मनं जपणं तिला बरोबर जमायचं आणि म्हणूनच ती आई वडिलांची लाडकी होती. तिसरा भाऊ म्हणजे मंदार हा लहान आणि दोन बहिणींच्या पाठचा मुलगा म्हणून अती लाडावलेला.. मेघनाच्या आईला वाटायचं की आपली तिन्ही मुलं आपल्या धाकात आहेत, शिस्तीत आहेत पण जेव्हा त्यांच्या मोठ्या मुलीने परजातिय मुलाशी पळून जाऊन लग्न केलं आणि ती कायमची केरळला निघून गेली तेव्हा त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला.. हा धक्का कमी की काय म्हणून दोन महिन्यांनी मेघनाच्या आईला ब्लड कॅन्सर आहे असं निदान झालं आणि मेघनाचे आई बाबा आयुष्याच्या या गंभीर वळणावर अक्षरशः हेलावून गेले. डॉक्टरांनी सहा महिन्यांचा अवधी हातात आहे असं सांगितल्यानंतर मेघनाच्या आईने जाण्यापूर्वी मेघनाच्या डोक्यावर अक्षता पडलेल्या पहायच्या आहेत असं सांगितलं. अशातच मेघनाच्या वडिलांना कुणीतरी सुरेशच स्थळ सुचवलं. मुलगा श्रीमंत आहे, गाडी बंगला आहे, साताऱ्याला गावाकडे जमीनजुमला आहे असं सांगितलं. त्या वेळी मेघनाच्या आईची खालावत चाललेली तब्येत आणि समोरून चालून आलेलं श्रीमंत स्थळ यामुळे मेघनाच्या बाबांनी निदान मेघानाच तरी सगळं चांगलं व्हावं या हेतूने हे लग्न ठरवलं. सुरेश जेव्हा मेघनाला बघायला आला होता तेव्हा आई बाबांना सोबत घेऊन आला होता. सुरेशच लाघवी बोलणं, श्रीमंती थाट हे सारं पाहून कसलीही शहानिशा न करता मेघनाच्या वडिलांनी मेघना शेवटच्या वर्षाला असतानाच तिचं लग्न ठरवून टाकलं. एवढं चांगलं स्थळ हातचं जायला नको या एकमेव उद्देशाने. मेघना तेव्हा नुकतीच एकवीस वर्ष पूर्ण झालेली.. अल्लड तरीही आईवडिलांच्या शब्दाबाहेर नव्हती. त्या वयात इतकी सारी संकटं एका मागोमाग एक तिच्या घरच्यांवर आली असताना आणि आई मरणाच्या दारावर उभी असताना तिच्याकडे काहीतरी मागत होती त्यामुळे मेघना मनात नसतानाही लग्नाला तयार झाली. पुढच्या पंधरा दिवसातच त्यांचं लग्न झालं. बघायला आला तेव्हा एकदा आणि नंतर थेट लग्नात अशी फक्त दोनदा भेट झाली मेघना आणि सुरेशची. आपला भावी नवरा नेमका कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे हे मेघनाला त्या वेळी जाणून घेणं महत्वाचं वाटलं नव्हतं कारण तिच्यासाठी ते लग्न म्हणजे फक्त एक तडजोड होती. कुठे ना कुठे तिला मनोमन संजयबद्दल मैत्रीच्या पलीकडे काही वाटू लागलं होतं तेव्हा पण या लग्नाच्या निर्णयामुळे तिच्या आयुष्याचं सगळं गणितच बदलून गेलं होतं..

अगदी थाटामाटात मेघना आणि सुरेशच लग्न झालं आणि सुरेश सोबत मेघना साताऱ्याकडच्या त्यांच्या बंगल्यात राहायला गेली. मेघनाचे आईबाबा आता खुश झाले की एवढ्या श्रीमंत आणि मोठया घरात आपल्या मुलगी गेली. मेघना आणि सुरेश आपल्या घरी आल्यानंतर त्या एवढ्या मोठ्या घरात सुरुवातीला मेघना बावरली. एवढं मोठं घर, गाडी, दिमतीला नोकर हे सारं बघून तिला सुरुवातीला आपल्या नशिबात आलेल्या या सुखाचा आनंद वाटला, आई बाबा आता खुश आहेत सगळं व्यवस्थित पार पडलं याचं समाधान वाटलं पण त्याचबरोबर आपली आई आता काही दिवसांची सोबती आहे आणि आपण या शेवटच्या दिवसात तिच्या सोबत नाही आहोत याच दुःख ही वाटलं पण हे सगळं सुद्धा आपण तिच्याच समाधानासाठी आणि आनंदासाठी केलं आहे असं तिने स्वतःच्या मनाला समजावलं. लग्न, पूजा सगळं आटपेपर्यंत मेघनाला सुरेशचा नेमका असा स्वभाव कळलाच नव्हता कारण जातानाही गाडीत सुरेश आणि तिचं बोलणं झालंच नव्हतं. मेघना या अचानक झालेल्या लग्नामुळे मनातून काहीशी गोंधळलेली आणि घाबरलेली होती. ती आपल्या भावासोबत बसली होती आणि सुरेश आपल्या दोन जवळच्या म्हणवणाऱ्या माणसांसोबत बसला होता. लग्नाचा दिवस, प्रवासाचा दिवस आणि त्या नंतर पूजेचा दिवस हे तीन दिवस फक्त धार्मिक विधींपुरता ते दोघं एकमेकांसोबत होते. या तीन दिवसात मेघना जेव्हा जेव्हा सुरेशकडे पाहत होती तिला एक वेगळीच, एक अनामिक भीती वाटत होती. ही गोष्ट कशी आणि कुणाशी शेअर करू असं तिला त्या वेळी वाटत होतं पण सोबत तिच्या त्या वेळी तिथे बाबा आणि लहान भाऊ एवढेच गेले होते. आईजवळ मावशी थांबली होती. नवीनच लग्न आणि अनोळखी माणूस म्हणून असं वाटत असेल आपल्याला, हळू हळू होईल ओळख असा विचार करून ती तिथलं सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करू लागली. पूजा झाल्यानंतर तिचे वडील आणि भाऊ हळव्या मनाने तिचा निरोप घेऊन निघून गेले आणि सुरू झाला तिच्या नव्या आयुष्याचा खेळ...

जसे तिचे भाऊ आणि वडील निघून गेले तसा सुरेशचा अंदाजच बदलला. त्याचं ते गोड गोड बोलणं, ते मधाळ वागणं सगळंच बदललं. मेघनाची मानसिक तयारी नसतानाही रात्री सुरेश तिला जबरदस्ती जवळ घेऊ लागला आणि सकाळी परक्यासारख वागवू लागला. सुरेशचे वडील हे पूर्णपणे दारूच्या आहारी गेलेले होते आणि ते दिवस रात्र मद्यपान करून आपल्याच जगात असायचे. सुरेशची आई स्वभावाने अतिशय नम्र आणि चांगली होती पण तिचं सुरेश समोर काहीच चालत नव्हतं कारण सुरेश हा त्या गावातला एक माजलेला गुंड होता आणि हे सगळं लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच मेघनाच्या लक्षात आलं.

मेघनाच्या आई वडिलांना फसवून, स्वतः बद्दल खोटं सांगून आणि मेघनाच्या सुंदर रुपावर भाळून सुरेशने मेघनाशी लग्न केलं होतं. सुरेश रात्री अपरात्री उशिरा उशिरा घरी यायचा, इच्छा झाली की मेघनाला ओरबाडायचा आणि सकाळी उठून कुठेतरी निघून जायचा. तो दिवसभर कुठे जातो, काय काम करतो हे घरात कुणाला माहीत नसायच. यायचा तेव्हा रग्गड पैसे घेऊन यायचा आणि तिजोरीत ठेवायला द्यायचा. हे सगळं मेघनाच्या कल्पने पलीकडील होतं. एकतर इतक्या घाईघाईत झालेलं लग्न, त्या नंतर सुरेशचा समोर आलेला खरा चेहरा, त्याचं फक्त शरीर सुखासाठी जवळ येणं, एक बायको म्हणून तिला समजून न घेणं, ती फक्त एक वस्तू असल्यासारखं वागवणं, गुंडगिरी करून आणि लोकांना फसवून पैसे कमावणं हे सगळं पचवणं मेघनाला जड जात होतं पण माहेरी याबद्दल काहीही सांगणं तिने टाळलं कारण शेवटच्या दिवसात आपल्या आईला तिला आपल्यामुळे मानसिक त्रास द्यायचा नव्हता... आपली दुःख, आपला हा त्रास हे सगळं आपल्या मनातच कोंडून ती आला दिवस ढकलत होती.....


अशी ही मेघना ची कहाणी... आत्ता कुठे सुरू झाली आहे.. अजून तिच्या आयुष्यात तीन वर्षात पुढे काय काय घडलं, तिने काय काय त्रास आणि छळ सहन केला हे सगळं जाणून घेण्यासाठी वाचत रहा.... भेटली ती पुन्हा.


सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..

साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


कथा आवडत असल्यास लाईक आणि कमेंट करून मला कळवा आणि या कथेचे पुढील भाग वाचण्यासाठी मला फॉलो करा..


©®रश्मी केळुसकर...


🎭 Series Post

View all