Login

भेटली ती पुन्हा (भाग १५)

अपूर्ण राहिलेली त्या दोघांची गोष्ट


भेटली ती पुन्हा (भाग १५)
©®रश्मी केळुसकर.

***************************************************

मेघना निघून गेली आणि संजय आपल्या मित्रांच्या ग्रूपमध्ये येऊन बसला. मेघनाचा नंबर सेव्ह करून घेतला त्याने चेक केलं तर ती व्हॉट्स ॲप वर नव्हती. कुठल्याच सोशल नेटवर्किंग साईटवर ती नव्हती. आत्ताच्या जगात कुणी असही राहू शकतं याचं त्याला आश्चर्य वाटलं.. अगदी जगापासून अलिप्त राहिल्यासारखं वैगरे त्याला वाटलं.. "ठीक आहे पण.. नसेल तिला आवडत.. इतकं काय आहे? असू शकतात अशी ही काही लोकं जी सोशली ॲक्टीव नसतात" संजयने मनाची समजूत घातली

मेघनाच्या ऑफिसचा ग्रुप बाहेर फिरून दुपारी जेवणाच्या वेळेला हॉटेलला परतले. संजयचेसुद्धा मित्र गाडी काढून बाहेर गेले पण संजय मात्र हॉटेलमध्येच थांबला. दुपारी जेवणानंतर मेघनाचे सगळे सहकारी खाली बसून छान गप्पा मारत बसले होते. ती मात्र जेवण आटपून आपल्या रूममध्ये बसली होती.

एरवी नको वाटणारा एकांत आज तिला हवाहवासा वाटत होता कारण आज कितीतरी वर्षांनी या एकांतात तिला कोंदट वाटत नव्हतं... खूप मोकळं वाटत होतं. इतकं मोकळं की या एकांतात तिला असच काहीवेळ निवांत बसावं वाटत होतं.... मनातलं शांत होऊ पाहणारं काहूर तिला अनुभवायचं होतं.. ती डोळे मिटून शांत बसून होती... इतक्यात बाहेर पाऊस पडू लागला आणि त्या पावसाच्या आवाजाने आणि वातावरणात अचानक वाढलेल्या गारव्याने तिला अजूनच ताजतवानं केलं. ती उठली आणि बाल्कनीत गेली. "कित्ती छान पाऊस पडतो आहे!! पिकनिकला आल्याचा पूर्ण फायदा झाला!!" पाऊस आल्याने मेघना मनोमन आनंदली. न रहावुन तिने दोन्ही हात पुढे करून पावसाचं पाणी आपल्या ओंजळीत भरून घेतलं आणि वर उडवलं.. ते उडणारे तुषार बघून ती एकटीच हसली. ती पुन्हा पुन्हा ओंजळीत पाणी घेऊन उडवू लागली.. इतक्यात तिचं लक्ष त्या तिकडच्या संजयच्या खिडकीकडे गेलं तर संजय खिडकीतून तिलाच पाहत होता... त्याला बघताच मेघना ओशाळली. तिने आपले हात मागे घेऊन पुसून टाकले आणि ती पटकन आत आली. तिच्या हृदयाची धडधड आता वाढली होती. तिने दार बंद करून घेतलं आणि ती बेडवर झोपली. कितीतरी वेळ मग पावसाची रिपरिप ऐकत ती तशीच पडून राहिली..

संजयला सुद्धा इथे जरा बावरल्यासारखं झालं. तो काही खिडकीत मेघनाला बघायला उभा नव्हता.. पाऊस आला आणि वारा सुटला म्हणून खिडकीत बंद करायला गेला होता तो... पण समोर मेघनाला असं पूर्वीसारखं पावसाचं पाणी ओंजळीत घेऊन खेळताना बघून, हसताना बघून तो तसाच तिला बघत राहिला.. पण मग मेघनाने त्याला बघून आत जाऊन दार बंद करून घेताच त्याने ही खिडकी बंद करून टाकली..

संध्याकाळची साडे सहा-सात ची वेळ.. मावळतीचा सूर्य आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेला आणि चंद्र रात्रीच्या शीतल चांदण्यात सोबतीला यायला आसुसलेला.... हिरवा निसर्ग आता मावळतीच्या काळोखाची शाल पांघरून पावसाच्या साथीने अधिकच बहरलेला.. हवेतला गारवा मनापर्यंत पोहचून प्रसन्न करत करणारा.. संध्याकाळपर्यंत पावसाची रिमझिम सुरूच होती.. जणू काही मेघना आणि संजय यांच्या भेटीला पूरक वातावरण तयार करायचंच असा चंग त्या पावसाने बांधला होता.

सगळेजण तिथल्या प्रसन्न वातावरणाचा आणि पावसाचा आस्वाद घेत पिकनिकची मजा आपापल्या पद्धतीने घेत होते. कुणी एकमेकांशी गप्पा मारत होतं तर कुणी फोटो काढत होतं. काहीजण ग्रुप करून काही गेम्स खेळत होते. मेघनाही छान फ्रेश होऊन खाली आली. गरम गरम, वाफळणारा चहा आणि पाऊस.. अहाहा!! मेघना मस्त चहाचा आनंद घेऊ लागली. समोर संजय आपल्या कॅमेऱ्याने तिथलं निसर्ग सौंदर्य टिपत होता.. फोटो काढता काढता त्याची नजर सहजच मेघनाकडे गेली. दोघांचीही नजरानजर झाली आणि दोघेही एकमेकांकडे बघून हलकस हसले. एव्हाना मेघेनाचा चहा पिऊन झाला होता. पाऊस आता थांबलाय हे पाहून संजय आपल्या हॉटेल बाहेरच्या आवारात येऊन फेरफटका मारू लागला. वनिता आणि मेघना ही थोडं फिरून यावं म्हणून बाहेर पडल्या. इतक्यात वनिताला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन आला आणि ती फोनवर बोलता बोलता बाजूला गेली. इथे संजयला समोर पाहून मेघना जाणूनबुजून इकडेतिकडे बघू लागली. तिची अस्वस्थता बघून संजय तिच्या जवळ येऊन म्हणाला.. "बाहेर जाते आहेस का?"

मेघना : "हो असच जरा इथेच पाय मोकळे करायला"

संजय : "अच्छा... खूप छान आहे ना वातावरण इथलं.. मस्त वाटतं आहे"

मेघना : "हो खूप फ्रेश वाटतं आहे.."

संजय (मेघनाला थोडं तिच्या घरच्यांबद्दल विचारावं या हेतूने) : " तुझी आई गेल्याच तेव्हाच कळलं मला पण नंतर बाबा आणि तुझा भाऊ तुझ्या भावाच्या नोकरीनिमित्त बंगलोरला शिफ्ट झाले असं कळलं आणि मग त्या नंतर तुझ्याबद्दल काहीच कळलं नाही.. आपल्या ग्रूपमध्ये पण कुणाला तुझ्याविषयी कुणाला काहीच माहीत नव्हतं.."

संजय बोलत होता आणि मेघना ऐकत चालत होती.

संजय (थोडं थांबून.. पुन्हा) : "आता कोण कोण असतं घरी तुझ्या? म्हणजे नवरा, मुलं, सासू सासरे???"

त्याच्या या प्रश्नाने मेघना तिथेच थांबली. तिला काय बोलावं कळतच नव्हतं इतक्यात तिचा फोन वाजला...

निनावी कॉल... पुन्हा?? वेगळाच नंबर होता.. तिने उचलला तर

समोरून एक माणूस : "मला भेटायचं आहे तुला कुठे आहेस बोल"

मेघना : "कोण?? कोण बोलतंय? (संजयला यातलं काही कळू नये म्हणून ती बाजूला गेली) कोण बोलतंय हे आधी सांग मला"

समोरून : "अजून कोण असणार? तुला भेटायला आलोय.. इतके वर्ष कुठे लपून बसली होतीस? आत्ता कुठे सापडली आहेस. तुझा नवरा... नवरा बोलतोय"

सुरेश बोलतोय हे ऐकताच मेघनाच्या पायाखालची जमीन सरकली.. ती जवळजवळ ओरडून म्हणाली

"मला फोन करायची हिम्मत कशी झाली तुझी? तुझा माझा आता काहीही संबंध नाही.." असं म्हणून तिने कॉल बंद केला आणि तो नंबर ब्लॉक करून टाकला. डोळ्यातून ओघळलेला अश्रू तिने रागाने पुसून टाकला आणि पुन्हा संजयकडे पाहिलं.. संजय तिलाच पाहत उभा होता. "याने काही ऐकलं तर नसेल ना??" मेघना स्वतःलाच विचारत पुन्हा संजयच्या दिशेने आली.

संजय : "काही प्रोब्लेम आहे का मेघना?"

मेघना : "अं नाही .. काहीच नाही" म्हणत मेघनाने उसनं हसू चेहऱ्यावर आणलं हे संजयने ओळखलं पण तिला तिच्या आयुष्याबद्दल काही सांगण्यासाठी तो बळजबरी करू शकत नव्हता.. तो शांत राहिला.

वनिताने तिचा फोन आटपल्यावर पाहिलं की संजय आणि मेघना छान गप्पा मारत चालत आहेत म्हणून ती तिथूनच परत हॉटेलमध्ये येऊन आपल्या ग्रुपमध्ये बसली.

चालत चालत हॉटेलपासून एक दहा मिनिटांच्या अंतरावर मेघना आणि संजय येऊन पोहोचले होते. अचानक पाऊस पुन्हा सुरू झाला आणि आडोशाला थांबावं म्हणून संजय आणि मेघना पळतच एका बंद दुकानाच्या छपराच्या खाली उभे राहिले.

मेघना : "जाऊया का पाऊस थांबेल असं वाटत नाही.. जास्त लांब नाही आलोय आपण. थोडंसं भिजायला होईल पण जाऊ परत"

संजय : "थोडा वेळ थांब ना!!.. नाहीच थांबला पाऊस तर जाऊ भिजत"

मेघनाची घालमेल नेमकी कशामुळे होते आहे हे संजयला कळतच नव्हतं. तिचा मूड जरा ठीक करावा म्हणून संजय हसत म्हणाला..

"ए मेघना तुला आठवतं.. कॉलेजमध्ये आपण असा पाऊस पडायला लागला की वडापाव खायचो.. आहेत नाहीत ते सगळे पैसे गोळा करून.."

मेघना : "हो आठवतं ना"

संजय : "मेघना.. एक विचारू का? तुला भेटल्यापासून बघतोय तू आधीसारखी वाटत नाहीस. बडबड करत नाहीस. पावसात भिजत नाहीस. खळखळून हसत नाहीस.. सतत कसल्यातरी विचारात हरवलेली असतेस.. नवरा आणि मुलांबद्दल, तुझ्या घरच्यांबदल काही कधी बोलली नाहीस.. नक्की काय चालू आहे तुझ्या आयुष्यात?? आपण चांगले मित्र मैत्रीण होतो आणि आत्ताही आहोत. मैत्रीच्या नात्याने तू मला तुझं सुख किंवा काही दुःख असेल तर शेअर करू शकतेस ना!! बोल ना आधीआरखी धडाधडा.." न रहावुन संजय बोललाच..

मेघना (मनातल्या मनात गहिवरून ) : "कित्ती प्रश्न पडले आहेत याला माझ्या बद्दल.. आणि ते त्याला पडणं साहजिकच आहे.. माझ्या स्वभावातला हा बदल एक जुना मित्र म्हणून तो ओळखूच शकतो. याला सांगू का सगळं?? एक मित्र म्हणून तो समजून घेईल का मला?? की नकोच... शेवटी हा ही एक पुरुषच... यानेही मला एकटी पाहून फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर?? नाही... मी आता कुठल्याही पुरुषावर विश्वास ठेऊ शकतच नाही.. नाही" मनाशी पक्क करत मेघना अचानक जोरजोरात चालू लागली... हॉटेलच्या दिशेने... पावसात भिजत.. आता या पावसाचे तिला आभार मानावेसे वाटत होते कारण डोळ्यातून वाहणारे अश्रू तो पाऊस बेमालूमपणे स्वतःमध्ये सामील करून घेत होता आणि मेघना काहीही न बोलता फक्त चालत होती...

"आपल्या अशा विचारण्याने मेघना दुखावली गेली का" असा विचार करून स्वतःला दोष देत संजयही तिच्या पाठोपाठ परतीच्या दिशेने भिजत चालत राहिला.


क्रमशः......................


मेघनाच्या मनाला टोचत असलेली सल मेघना संजयला बोलुन दाखवेल का? पाहण्यासाठी वाचत राहा... "भेटली ती पुन्हा"


सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..

साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


कथा आवडत असल्यास लाईक आणि कमेंट करून मला कळवा आणि कथेचे सगळे भाग वाचण्यासाठी मला फॉलो करा..