Login

भेटली ती पुन्हा (भाग १४)

अपूर्ण राहिलेली त्या दोघांची गोष्ट


भेटली ती पुन्हा (भाग १४)
©®रश्मी केळुसकर.

************************************************

सकाळी दहा वाजताच्या सुमारास मेघना आणि तिचे सहकारी माथेरानला त्यांच्या बुकिंग केलेल्या हॉटेलमध्ये पोहोचले. दूरवर पसरलेले डोंगर, रिमझिम पावसाच्या सरी, वातावरणात आलेला गारवा आणि छान मोकळं वातावरण...

"कित्ती मस्त वाटतंय ना मेघना??" वनिताने चौफेर नजर टाकत उत्सुकतेने मेघनाला विचारलं.

"हो.." मेघनानेही मनापासून उत्तर दिलं. आपापल्या रूममध्ये सगळे आपलं सामान ठेऊन फ्रेश व्हायला गेले. मेघना, वनिता आणि दोघी जणी अशा मिळून चार जणींना एक रूम देण्यात आली होती. रूम खूपच ऐसपैस आणि हवेशीर होती. वनिताने रूममध्ये गेल्या गेल्या खिडकी उघडली आणि बाल्कनीत येऊन समोर पाहून जवळजवळ किंचाळलीच..

"मेघना लवकर ये.. बघ काय मस्त व्ह्यू मिळाला आहे आपल्याला!! समोर बघ ना काय मस्त नजारा आहे ना!! या धुक्याच्या दुलईत हरवून जावसं वाटतंय.. ए मी ना महेशला सांगणार आहे आपल्या लग्नानंतर हनीमूनला आपण इथेच येऊया.." गोड लाजत वनिता म्हणाली..

मेघना : "इथे? एवढ्या जवळ च येणार तुम्ही हनीमूनला?"

वनिता : "अरे हो खूप च जवळ आहे ना हे.. आणि मी तर त्याला मला मनालीला जायचं आहे हनीमूनला असा हट्ट केला होता ते विसरलेच.. त्या दिवशीच तयार झालाय तो कसाबसा आणि आता मी माथेरान बोलली ना तर बरं झालं बोलेल आणि इथेच आणेल मला कमी खर्चात.. नको.. त्यापेक्षा मी त्याला सांगेन आपण ना लग्न झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात एखाद्या विकेंड ला येऊ इकडे... मस्त मज्जा.." वनिताची अखंड बडबड सुरूच होती..

मेघना मात्र बाल्कनीत येऊन खुर्चीत शांत बसली... समोरच्या निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद तिला त्यात एकवटून जाऊन घ्यायचा होता. या धुंद वातावरणात तिला एकरूप व्हायचं होतं.. सुरेश, संजय यातलं काहीच तिला मनात आणू द्यायचं नव्हतं.. आत्ता फक्त दोन दिवस तिला तिच्यासाठी जगायचं होतं.. स्वतःसाठी...

बाहेर पडणारा पाऊस बघून तिला आज मोह आवरत नव्हता. आज खूप दिवसांनी या पावसाच्या धारा आपल्या हातावर घेऊन ते पाणी पुन्हा उडवावं आणि मग ते उडणारे तुषार पाहून त्यात आपला निखळ आनंद शोधावा असं तिला क्षणभर वाटलं पण ही ओथंबून येणारी इच्छा मनातच परतावून लावत तिने फक्त डोळे मिटून घेतले आणि त्या नयनरम्य क्षणाचा आस्वाद ती आपल्या अंतर्मनातील नजरेने घेऊ लागली. हा आनंद घेण्यासाठी तिला आधी तिचं गढूळ झालेलं मन रितं करायचं होतं जेणेकरून ती या सुखद क्षणांचा खुल्या मनाने स्वीकार करू शकेल. ती आपल्याच अंतरंगात खोल अगदी खोल बुडून त्यातला उहापोह भेदून नव्या आयुष्याचं बीज रोवू पाहत होती.. तिने हलकेच हसून एक दीर्घ निःश्वास घेतला आणि प्रसन्न मनाने डोळे उघडले.... तर काय????


समोर एक साधारण तिच्याच वयाचा मुलगा एकटक तिच्याकडेच पहात उभा होता. त्याच्या हातात कॅमेरासुद्धा होता. बहुतेक तो बराच वेळ तिथेच उभा राहून मेघनाला पाहत होता.. "याने आपला फोटो वैगरे काढला की काय?" मेघनाला शंका आली. ती पटकन वळून रूम मध्ये गेली आणि आपली बॅग काढून बसली. "असा काय तो बघत बसला होता?? मूर्ख कुठला..." स्वतःशीच बोलत ती फ्रेश व्हायला गेली.

संजयही आपल्या मित्रांसोबत माथेरानच्या रम्य वातावरणात पोहोचला. घाई गडबडीत हे सगळं तो मंजिरीला कळवायला विसरला होता म्हणून मग एक मेसेज करून मी मित्रांसोबत दोन दिवस माथेरानला आलोय हे तिला कळवून टाकलं त्याने. लगेच मंजिरीचा रिप्लाय आला होता "enjoy.. will miss u.. come soon" तिच्या या सकारात्मक रिप्लायमुळे संजयला आपण मंजिरीवर अन्याय करत आहोत असं त्या क्षणी वाटलं आणि या दोन दिवसाच्या पिकनिक नंतर मस्त रिफ्रेश होऊन आपण मंजिरीसोबतच्या आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करायला सज्ज होऊया असा विचार करून टाकला. त्या सात जणांनी मिळून ज्या हॉटेलमध्ये रूम बुक केली होती तिथे संजयने आपली बॅग कपाटात ठेवली आणि तो इकडे तिकडे बघतच होता इतक्यात त्याचा मित्र नचिकेत तिथे आला आणि सोफ्यावर बसून संजयला म्हणाला "मस्त आहे ना इथलं वातावरण..."

संजय : "हो रे मस्त आहे.. खूप छान वाटतंय जरा मोकळ्या हवेत येऊन"

नचिकेत : "आज मस्त आल्या आल्या एका सुंदर मुलीचं दर्शन पण घडलं यार इथे मला.."

संजय (हसत) : "अरे वा इथे तुझी स्वप्न सुंदरी भेटली का तुला ते ही आल्या आल्या.. नशीबवान च आहेस"

नचिकेत पुन्हा त्या मघाशी पाहिलेल्या मुलीला आठवून स्वतःशीच हसला..

नचिकेत हा संजयचा कॉलनीतला मित्र. या नचिकेतला दर दोन दिवसांनी एक नवीन मुलगी आवडते आणि हा तिच्या प्रेमात पडतो. नव्याची नवलाई संपली की याला पुन्हा दुसरी कुणीतरी आवडते. तशीच आता इथेही याला एक सुंदर मुलगी बघता क्षणीच आवडली पण त्याला कुठे माहीत होतं की ती मेघना होती... त्याने तिच्या सौंदर्याचं वर्णन सगळ्या मित्रांसमोर करून तिची एक छबीच सगळ्यांच्या मनात उभी केली. जो तो आपापल्या परीने एक सुंदर मुलगी डोळ्यासमोर पाहू लागला आणि संजय या वर्णनात "मेघनाला"....

योगायोग असा झाला होता की संजय आणि मेघना दोघांचंही हॉटेल बाजू बाजूलाच होतं आणि नेमकी मेघनाच्या रूमची बाल्कनी आणि त्या हॉटेलची मागची बाजू जिथे संजयची रूम होती त्या रुमची खिडकी हे समोरासमोर होतं पण अजून दोघांनाही आसभास नव्हता की एकमेकांपासून दूर जाऊ पाहणाऱ्या त्या दोघांना नियतीने पुन्हा एकदा जवळ आणलं होतं ते ही इतक्या जवळ...

नचिकेत पुन्हा पुन्हा खिडकीत उभा राहून ती मुलगी दिसते का हे पाहत होता पण मेघना इथे रूम मधेच बसून होती. काही वेळाने मेघनाच्या सगळ्या सहकाऱ्यांनी खाली फेरफटका मारायला जायचं ठरवलं.. सगळे निघाले म्हणून मेघना ही निघाली... आज तिने छान गडद लाल रंगाचा सलवार कमीज आणि त्यावर साजेशी सोनेरी ओढणी घेतली होती. ती खाली उतरताच वनिता तिच्या केसांचा क्लिप काढून पळाली. इथे नेमके संजय आणि नचिकेत खालीच उभे होते. मेघना आपले असे अचानक सुटलेले, वाऱ्यावर उडणारे केस सावरत वनिताच्या मागे पळत होती. नचिकेत आणि संजय दोघांनीही मेघनाला बघायला एकच वेळ झाली आणि.... दोघेही फक्त तिला पाहतच राहिले...

नचिकेत (उसासा टाकत) :"हीच ती रे माझी स्वप्नसुंदरी..."

संजय (अवाक् होऊन नचिकेतकडे पाहून) : "ही??? अरे ही मेघना आहे.. माझी मैत्रीण आहे"

नचिकेत : "अरे वाह काय सांगतोस मैत्रीण आहे तुझी?? माझी ओळख करून दे ना तिच्याशी"

संजय (जरा रागातच) : "अरे भल्या माणसा तुला चष्मा लागला आहे का? तिच्या गळ्यातल मंगळसूत्र नाही का रे दिसत तुला?"

नचिकेत (डोळे मोठे करून) : "च्यामारी हो रे.. लक्षच गेलं नाही आपलं.. लायसेन्स आहे गळ्यात म्हणजे काही होऊ शकत नाही.. जाऊ दे.." म्हणत तो पुन्हा मित्रांमध्ये जाऊन बसला... संजय मात्र मेघनाला पाहतच राहिला.. "कुठे ती अस्ताव्यस्त असलेली मेघना आणि कुठे ही आजची मेघना... नेमकी कुठली खरी?? पण ही इथे कशी? मोठा ग्रुप दिसतोय सोबत.. बहुतेक ऑफिसचा स्टाफ असणार.. म्हणजे आज ही सुद्धा इथेच माथेरानमध्ये माझ्या डोळ्यासमोर असणार..." मनातल्या मनात आनंदलेल्या संजयला आता खात्री पटू लागली होती की नियतीच्या मनात नक्कीच काहीतरी वेगळं आहे आपल्यासाठी...

संजय पुढे सरसावला आणि मेघनाला त्याने हाक मारली...

मेघनाने इथे आपल्याला कोण हाक मारत आहे म्हणून कुतूहलाने मागे वळून पाहिलं आणि समोर संजयला बघून क्षणभर बावरलीच...

संजय : Hii

मेघना : Hii

संजय : "आपली भेट अशी अचानक इथे होईल असं वाटलं नव्हतं.. ऑफिस पिकनिक का?"

मेघना : "हो"

संजय : "त्या दोन्ही दिवशी आपलं नीट असं बोलणंच झालं नाही.. तुझा नंबर दे ना.. आपल्या कॉलेजच्या व्हॉट्स ॲप ग्रूपमध्ये add करतो तूला.." कॉलेजच्या व्हॉट्सॲप ग्रुपच निम्मित करत एकदाचा संजयने मेघनाकडे नंबर मागितलाच...

मेघना : "अं... हा नंबर घे माझा पण तुझ्यापुरताच ठेव.. कुठ्ल्याही ग्रुपमध्ये नको add करू मला.. प्लिज"

संजय : "no issue... नाही करणार मी कुठल्याही ग्रूपमध्ये add" असं हसत म्हणत मेघनाचा नंबर घेतला.

मेघना : "मी निघते नंतर बोलू आता मला सगळे बोलवत आहेत"
म्हणून मेघना निघाली. ती गेली पण आता तिचा नंबर तरी मिळाला आहे म्हणजे कधीही बोलता येईल असा विचार करून संजय खुश झाला. इतक्या दिवसात हरवलेली मेघना आज काही प्रमाणात का होईना त्याला पुन्हा सापडते आहे असं वाटू लागलं.

क्रमशः......

या दोन दिवसांच्या पिकनिकमध्ये संजय आणि मेघना पूर्वीसारखे चांगले मित्र मैत्रीण होतील का? मेघना आपल्या मनातली सल, तिचा भूतकाळ हे सगळं संजय समोर एक चांगला मित्र म्हणून बोलुन दाखवेल का?? की आणखी काही वेगळं घडेल हे सारं पाहण्यासाठी वाचत रहा.... भेटली ती पुन्हा


सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..

साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


कथा आवडत असल्यास लाईक आणि कमेंट करून मला कळवा.