Login

भेटली ती पुन्हा (भाग १३)

अपूर्ण राहिलेली त्या दोघांची गोष्ट..

भेटली ती पुन्हा (भाग १३)
©®रश्मी केळुसकर.


************************************************

सहा वर्षांपूर्वी अक्का आणि मेघनाची झालेली भेट.. ती रात्र.. (मागच्या भागापासून कथानक पुढे तसेच चालू)

आता पुढे...

भेदरलेली मेघना अक्काच्या कुशीत कधी विसावली आणि तिचा डोळा लागला हे तिचं तिलाच कळलं नाही. कितीतरी दिवसांनी अशी गाढ झोप लागली होती तिला.


सकाळी मेघनाला कसल्याशा आवाजाने जाग आली तर अक्का आपलं आवरत होती. पहाटे लवकर उठून अक्का आपल्या कामाला जायची. अक्का ही एक साधीशी फुलं आणि हार विकणारी पण कष्टाळू आणि प्रेमळ बाई आहे हे एव्हाना मेघना ने जाणलं होतं. आपल्या सोबतीला कुणीतरी आलं आहे आता म्हणून एकटी रहणारी अक्काही खुश होती. मेघनासाठी खायला तिने चहा आणि बिस्कीट ठेवले होते ते तिला सांगून संध्याकाळी येते असं सांगून अक्का निघाली. अक्काच ते छोटंसं घर तेव्हा मेघनाला मोठा आधार वाटलं. तेव्हापासूनच अक्का आणि मेघना या घरात एकत्र राहु लागल्या. अक्का ने मेघनाला आपल्या मुलीप्रमाणे जीव लावला, माया केली आणि मेघनानेही तितकीच माया लावली तिला. काही दिवसांनी अक्का ने वस्तीतल्या कुणाची तरी ओळख काढून एका गारमेंट मध्ये मेघनाला काम मिळवून दिलं पण तिथे आपल्या हुशारीमुळे मेघनाने हळूहळू अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये काम मिळवलं. दोघीही आपापलं काम सांभाळून समाधानाने तिथे राहु लागल्या. अक्काला मुलीचं प्रेम हवं होतं ते मिळत होतं म्हणून आणि ज्या गोष्टीचा विषय काढून मेघनाला त्रासच होणार आहे हे माहीत आहे म्हणून अक्काने स्वतःहून कधीही मेघनाला जाणूनबुजून तिच्या भूतकाळा विषयी विचारलं नाही आणि मेघनानेही जे झालं ते विसरून जायचं आहे म्हणून पुन्हा ते सगळं आठवणं टाळलं.....

गेली सहा वर्ष या दोघी रक्ताच कुठलंही नातं नसताना आपुलकीच्या ऋणानुबंधाने बांधल्या जाऊन एकमेकींवर इतकं प्रेम करू लागल्या होत्या की आत्ता अक्का म्हणजे आपली आईच असं मेघनाच्या मनाने निश्चित केलं होतं. मेघनाला खूप वेळा वाटायचं की सगळं सगळं अक्काला सांगून टाकावं, तिचा हक्क आहे सगळं जाणून घेण्याचा पण मग ती ते टाळायची. तिच्या भूतकाळाचे मनावरचे व्रण, त्या जखमा अजूनही पूर्णपणे सुकल्या नव्हत्या आणि त्यांची खपली काढावी अशी तिची अजिबात इच्छा व्हायची नाही. चाललय तसं सगळं चालू देत दोघी एकमेकींचा आधार बनून जगत होत्या..

तर अशी ही मेघना आणि अक्काची नात्यांच्या पलीकडली जोडलेली नाळ...

खरंतर एका समांतर रेषेसारखं चाललेलं दोघींचं आयुष्य... पण मेघनाच आयुष्य गेल्या काही दिवसात मात्र शांत पाण्यावर हलकेच तरंग उमटावे तसं काहीसं अस्थिर झालं होतं.

कालच्या मेघनाच्या वाढदिवसाच्या प्रसंगानंतर मेघना जरा सावधच झाली. तो निनावी फोन, तो आवाज तिला बैचेन करत होता पण आपलं मन सतत कुठल्या ना कुठल्या तरी कामात ती गुंतवू पाहत होती. सकाळची साडे सात वाजता ची वेळ.. अक्का मघाशीच आपल्या कामाला निघून गेली होती. काल अक्का ने आठवणीने आणलेल्या चॉकलेटमुळे कित्ती आनंद झाला होता मेघनाला पण त्या निनावी फोन मुळे सगळा आनंदावर पाणी फिरलं होतं. तिने गॅसवर चहा ठेवला आणि तशीच उभी राहिली. "तो सुरेश च तर नसेल???"

सुरेशचा नुसता विचार करून तिच्या अंगावर सर्रकन काटा आला. तिने दोन्ही हात एकमेकांवर चोळले आणि संपूर्ण चेहऱ्यावर फिरवत मान हलवून स्वतःशीच "नाही तो नसणार.. इतक्या वर्षांनी आता काय हवं असणारं त्याला आणि इथे मुंबईत कशाला येईल तो?? नाही चुकून आलेला कॉल असणार तो.. जाऊ दे!!" तिने चहा कपात ओतून घेतला आणि बसली. "कालचा अर्धा दिवस कित्ती छान होता ना!! संजय पुन्हा भेटला मला.. पण मी पुन्हा पुन्हा त्याच्याकडे अशी ओढल्यासारखी का होते आहे? त्याच्या सोबत तर त्याची बायको होती आणि मी पण काय?? मेघना आता तुझं आयुष्य हे असं छान, साधं सोपं प्रेम मिळावं असं नाही राहिलं आहे.. सावर स्वतःला..!!" स्वतःलाच समजावत मेघना उठली आणि ऑफिसला जायची तयारी करू लागली.

पुढचा आठवडा असाच गेला... मेघनाच रोजच ऑफिस आणि घर, संजयच सुद्धा ऑफिस आणि घर आणि रोजचे मंजिरीचे गूड मॉर्निंग, गूड नाईटचे मेसेजेस असं चालू होतं. संजयला मात्र पुन्हा आपली भेट मेघनाशी होईल की नाही याची काळजी वाटत होती तर मेघना पुन्हा संजय कधीच दिसू नये यासाठी देवाला मनोमन प्रार्थना करत होती.

सगळं सुरळीत चालू होतं पण फार थोडे दिवसच....


इथे संजय आणि मेघनाच्या आईने भटजींना विचारून पुढच्या महिन्याच्या अखेरीस दोघांच्या साखरपुड्याची तारीख ठरवली जेणेकरून दिवाळीनंतर लग्नाची तारीख मिळेल. दोन्ही घरात अगदी आनंदाचं आणि उत्साहाच वातावरण होतं फक्त संजय च मन मात्र मेघनाच्या एका भेटीसाठी आतुर झालं होतं...

एक आठवडा मध्ये असाच गेल्यानंतर संजयच्या एका मित्राने शनिवार रविवार सुट्टी पकडुन अचानक माथेरानला पिकनिक ठरवली आणि तिथे येण्यासाठी संजयला आग्रह केला. थोडासा सगळ्यातून ब्रेक मिळावा म्हणून संजयसुद्धा पिकनिक साठी तयार झाला. इथे मेघनाच्या नवीन ऑफिसमधून सुद्धा योगायोगाने माथेरानला जायचीच पिकनिक ठरली होती पण मेघना जाणार नव्हती. आपल्या शांत राहण्यामुळे इथे फारशी ती कुणामध्ये रमली नव्हती. फक्त वनिता ही तिची एकच मैत्रीण होती पण आयत्या वेळी वानिताने तिला खूप आग्रह केला म्हणून मग मेघनाने अक्काची परवानगी घ्यायची ठरवली. मेघना ने विचारताच अक्का ने लगेचच हो म्हणून टाकलं. इतक्या वर्षात पहिल्यांदा स्वतःसाठी असं काहीतरी करणार होती मेघना, चार निवांत आणि मोकळे क्षण जगणार होती म्हणून अक्काला मनातून फार बरं वाटत होतं.

पिकनिक ची मज्जा कुणाला नको असते?? मेघनाला सुद्धा मोह आवरला नाही आणि तिने स्वतःला बांधून घेतलेल्या कुंपणातून जरा बाहेर पडायचं ठरवलं... मनःशांती साठी का होईना आपण थोड्या वेगळ्या वातावरणात जाऊ असा विचार करून तिने वनिताला पिकनिकला यायला होकार कळवला.

"मेघना तुझ्या त्या साड्या घेऊ नको का नेसायला पिकनिकला.. मस्त सलवार कमीज घाल. जरा व्यवस्थित रहा ग. देवाने एवढं भरभरून सौंदर्य दिलं आहे.. जरा छान राहून तर बघ.. इतकीही काही मोठी नाही आहेस तू फक्त साड्या नेसायला.." वनिता मेघनाला सल्ला देत म्हणाली.

"आता हिला काय सांगणार? या सौंदर्यामुळेच तर घात झालाय माझा..." मेघना स्वतःशीच पुटपुटली.

शनिवार उजाडला आणि संजय आपल्या मित्रांसोबत आणि मेघना आपल्या ऑफिसच्या लोकांसोबत ठरलेल्या पण वेगवेगळ्या वेळी पिकनिकला निघाले. संजय आणि त्याचे सहा मित्र असा सात जणांचा ग्रुप होता. एक प्रायव्हेट गाडी करून ते मस्त धमाल, मस्ती करत गेले तर मेघनाचा साधारण तीस जणांचा ऑफिसचा ग्रुप होता जे मोठी बस करून गेले होते. कॉलेज नंतर पहिल्यांदाच असं छान मोकळ्या हवेत, डोक्यात कसलेही विचार न आणता जाताना मेघनाला खूप छान वाटत होतं. बसमध्ये सगळ्यांची गाणी आणि धमाल चालू होती. मेघना मात्र खिडकीतून बाहेरच छान निसर्ग सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवून घेत होती. वेगळं असं काहीतरी तिच्या आयुष्यात घडत होतं जे तिच्यासाठी खूप सुखावह होतं. ती बाहेर बघत असतानाच वनिताने तिच्या कानाला हेडफोन्स लावून दिले आणि "आता बाहेर बघता बघता छान गाणी ऐक मग अजून मस्त वाटेल" असं म्हणाली आणि छानस हसली. मेघनाही हसली आणि तिने हेडफोन्स कानाला लावले. बडबड्या वानिताचा हा निरागसपणा मेघनाला खूप आवडायचा. तिने आपल्या आवडीची जुनी गाणी लावली आणि बाहेर पाहिलं... स्वतःशीच गालात हसली आणि तिने डोळे मिटुन घेतले..

हिरवीगार झाडं... थंडगार वारा.. मधेच रिमझिम बरसणारा पाऊस असं अगदी आल्हाददायक वातावरण.. आणि त्यात होऊ घातलेली मेघना आणि संजयची भेट... जी दोघांसाठी अगदीच अनपेक्षित आणि अचानक होणार होती.. एकमेकांपासून जितके लांब जाऊ पाहत होते तितकंच नियती त्यांना काही ना काही कारणाने पुन्हा पुन्हा एकमेकांच्या समोर आणत होती. मेघनाच्या आयुष्यात संजयच्या रूपाने काही चांगलं घडेल का? की मंजिरी आणि संजय यांचा ठरल्याप्रमाणे साखरपुडा होईल? संजयला जसं मेघना बद्दल काही वाटतं आहे तसं मेघनाला सुद्धा वाटतं आहे का? माथेरानला ते दोघे एकमेकांशी मोकळेपणाने बोलतील का? हे सगळं पाहण्यासाठी वाचत रहा... "भेटली ती पुन्हा"


सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..

साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


कथा आवडत असल्यास लाईक आणि कमेंट करून मला कळवा.