भेटली ती पुन्हा (भाग १२)

अपूर्ण राहिलेली त्या दोघांची गोष्ट


भेटली ती पुन्हा (भाग १२)
©®रश्मी केळुसकर

***************************************************

मेघना डोळे घट्ट मिटून डोळ्यातल्या अश्रूंना थांबवायचा निष्फळ प्रयत्न करत होती आणि तिचे अश्रू मात्र तिला दादच देत नव्हते. ते सैरा वैरा पळू पाहत होते आणि मेघना आपले हुंदके गळ्यातच परतवून लावू पाहत होती. मेघनाने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तिचं चोरून रडणं अक्काला कळत होतं पण आज अक्काने नाही अडवलं तिला. मेघनाला स्वतःहून शांत होण्यासाठी वेळ दिला तिने.

अक्काला आठवलं ते ती सहा वर्षांपूर्वी त्या दिवशी रात्री जेव्हा ती तिचे सगळे हार विकून घरी निघाली होती आणि तिच्या बाजूने मेघना रडत रडत रेल्वे रुळापाशी धावत जात होती..... अक्काला ते सगळं सगळं आठवू लागलं......


अक्का ही एक फुलं आणि हार विकून आपला उदरनिर्वाह करणारी सामान्य स्त्री होती. खरं नाव तिचं इंदिरा होतं. पन्नाशीच्या बाहेर वय असणारी, काटक शरीरयष्टी, सावळा वर्ण आणि नजरेत जरब अशी ही इंदिरा. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी तिचं तिच्यापेक्षा तब्बल पंधरा वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसाशी लग्न लावून देण्यात आलं होतं. नवरा दारुडा आणि काम न करता पडून राहणारा त्यामुळे लग्नानंतर संसार चालवण्यासाठी तिने फुलं आणि हार विकायला सुरुवात केली. हळू हळू तिचा या व्यवसायात बऱ्यापैकी जम बसला. रेल्वे स्टेशन जवळच एक जागा पकडून ती रोज तिथे हार विकायला बसायची. बोलायला अतिशय प्रेमळ आणि माया लावणारी ही इंदिरा तिथल्या त्या वस्तीमध्ये अक्का म्हणून ओळखली जाऊ लागली. मुलाबाळांच सुख मात्र देवाने तीच्या नशिबात लिहिलं नव्हतं तरीही त्याचं दुःख उराशी कवटाळून न बसता ती सगळ्यांवर माया करायची आणि म्हणूनच ती सगळ्यांची लाडकी अक्का होती. सगळे अक्काला खूप मानायचे. लग्नानंतर अवघ्या दहा वर्षातच दारू पिऊन पिऊन अक्काचा नवरा वारला होता आणि अक्का एकटी पडली होती. तिच्या माहेरी ही अठरा विश्व दारिद्य्र होते त्यामुळे तिथे परत जाऊन तिला भार व्हायचं नव्हतं. ती ने आता एकटीने आयुष्य जगायचं ठरवलं होतं. रोज पहाटे उठून ती आपल्या कामाला जायची आणि दिवसभर हार बनवून विकत ती रेल्वे स्टेशन जवळ बसायची.


त्या दिवशी अक्काच्या बाजूनेच मेघना रडत रेल्वे ट्रॅकच्या दिशेने धावत गेली आणि अक्काच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. "काय करतेय ही पोरगी?? जीव तर द्यायला चालली नाही ना?" स्वतःशीच बोलत अक्का सुद्धा तेव्हा मेघनाच्या पाठी धावली होती. धावत जाऊन अक्काने मेघनाला अडवलं आणि "काय ग पोरी काय करते आहेस?" असं विचारलं तर मेघना फक्त रडत होती. काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत तेव्हा मेघना नव्हती. अक्का ने तिचा हात जोरात पकडुन ठेवला आणि ओढत आणून तिला एका बाजूला बसवलं. दहा मिनिटानंतर मेघना थोडी शांत झाली असं वाटल्यावर अक्का ने पुन्हा विचारलं "बाय का रडते आहेस एवढी? चांगल्या घरातली दिसतेस. अशी का धावत होतीस?" आक्काने एवढ्या मायेने आणि आपुलकीने विचारल्याने मेघना डोळे पुसत म्हणाली "का अडवलं तुम्ही मला? मला जगायची अजिबात इच्छा उरली नाहीय!! जाऊ दे मला!!"

मेघनाच्या बोलण्यावरून अक्काला अंदाज आला की काहीतरी वाईट आणि भयंकर घडलं आहे या मुलीच्या आयुष्यात पण म्हणून हिला असं स्वतःला संपवणं चुकीचं आहे. अक्का ने मायेने मेघनाच्या पाठीवरून हात फिरवला आणि मेघनाच्या गळ्यात मंगळसूत्र नाहीय हे बघून विचार केला की मंगळसूत्र नाहीय म्हणजे ही विवाहित नाही. काळजीपोटी मग अक्काने मेघनाला विचारलं "पोरी तुझे आई बाबा कुठे असतात?" असं अनोळखी असूनही अक्का त्यावेळी मेघनाला आपल्या आईप्रमाणे वाटली. आक्काचा हात धरून ती पुन्हा रडू लागली.

"आत्ता हिला काही विचारण्यात अर्थ नाहीय, हीची मानसिक स्थिती नीट नाहीय, हिला सद्ध्यातरी फक्त एका आधाराची गरज आहे" असा विचार करून अक्का म्हणाली "ठीक आहे पोरी, रडू नकोस, तुझं घर कुठे आहे सांग, मी सोडते तुला नेऊन "

"आता माझं या जगात कुणीच नाही... अगदी कुणीच नाही" मेघना डोळे पुसत म्हणाली.

अक्काला नेमकं काय घडलंय मेघनासोबत ते काहीच कळत नव्हतं पण एवढी सुंदर आणि चांगल्या घरातली वाटणारी मुलगी आणि हिला एवढ्या रात्री अशी रस्त्यावर एकटी कशी सोडून जाणार म्हणून अक्काने तिला " माझ्या घरी चल" सांगितलं.

अतिशय बावरलेल्या आणि भेदरलेल्या मनस्थितीत असलेल्या मेघनाला काय करावं हे तेव्हा काहीच कळत नव्हतं. तिला तेव्हा फक्त दिसत होती ती तिची आई.. अक्काच्या रुपात.. रडून रडून मेघनाच्या डोळ्यातले अश्रूही एव्हाना सुकले होते. ती अक्काचा हात धरून एका निर्जीव वस्तूप्रमाणे शून्यात बघत चालत राहिली. अक्काने दार उघडलं आणि आत नेऊन तिला बसवलं. पाणी प्यायला दिलं आणि पाठीवरून हात फिरवला. हळू हळू मेघना शांत होऊ लागली. कुणीतरी मायेने आपल्या पाठीवरून हात फिरवत आहे हे पाहून तिला गहिवरून येत होतं. नियतीच्या मनात काय आहे हे त्या क्षणी तिला काहीच कळत नव्हतं. अक्का उठली आणि तिने हात पाय धुऊन गरम गरम पिठलं भाकरी केली. मेघना अजूनही फक्त एकटक खिडकीकडे पाहत बसली होती. अक्का ने मेघनाला जेवायला वाढलं आणि स्वतःही बाजूला बसून जेऊ लागली. मेघनाला भूक लागलीच होती. असं गरम गरम जेवण मिळाल्यावर कितीतरी दिवसांनी ती मनापासून जेवली. आता थोडं बरं वाटू लागलं तिला. अक्का चे किती आणि कसे आभार मानू हे मेघनाला कळत नव्हतं. "मघाशी आपण ट्रेनखाली जीव द्यायला निघालो होतो, अक्काने येऊन आपल्याला वेळीच थांबवलं नसतं तर एव्हाना सगळं संपलं असतं... पण... पण आता जगून तरी काय करणार आहे मी? कुणासाठी जगू?" असंख्य प्रश्न मेघनाच्या डोक्यात घोळत होते.

"तीन वर्ष... तीन वर्ष माझ्या आयुष्याची वाताहत झाली आणि माझं आयुष्याच बदलून गेलं..." एक दीर्घ उसासा टाकत मेघना स्वतःशीच पुटपुटली. अक्का आपलं काम आवरता आवरता मेघनाच्या हालचाली न्याहाळत होती. "पोरीच काहीतरी मोठं नुकसान झालेलं दिसतंय. तिला जेव्हा सांगावस वाटेल तेव्हा सांगू दे, मी नाही विचारणार आता. शांत होऊ दे तिला" अक्का ने मनात विचार केला.

"अक्का तुम्ही इथे एकट्याच राहता का?" मेघनाने हळूच विचारलं.

"हो पोरी, चार वर्षांपूर्वी नवरा दारू पिऊन पिऊन वर गेला मग मी आपली एकटीच. देवाने पोरांचं सुख काय माझ्या नशिबी लिहिलं नाही पण म्हणून मी जगण्याची जिद्द सोडली नाही. मी जगणार. इथे मायेने जोडलेली चार माणसं आहेत, मी हार, फुलं विकते तिथे खूप माणसं भेटतात मला त्यातली आता काही ओळखीची झाली आहेत त्यांच्या बोलण्यात, हसण्यात शोधते आपला आनंद, दोन वेळेचं पोटभर खाता येईल एवढं कमवते आणि ढकलते आहे दिवस.." अक्का आपली कहाणी सांगत मान खाली घालून हसू लागल्या. त्या अशा एकट्याच राहत आहेत हे ऐकून मेघनाने विचार केला "जर या वयात या अक्का कुठलंही ध्येय नसताना इतकं समाधानी राहून एकट्या जगू शकतात तर मी का नाही? माझं तर वय आत्ता जेमतेम चोवीस आहे. पूर्ण आयुष्य पडलं आहे माझ्यासमोर..." मेघनाला असं विचारात बघून अक्काने विचारलं "हे बघ पोरी तुझ्यासोबत काय झालंय हे मला माहीत नाही पण काहीतरी असं भयंकर झालं आहे ज्यामुळे तू जीव देण्याच्या निर्णयाला पोहचलीस पण तू अजून तरुण आहेस.. अख्खं आयुष्य पडलंय तुझ्यासमोर. मला माझ्या मुलीसारखी आहेस तू.. तुला हवे तेवढे दिवस तू इथे रहा.." अक्काचे डोळे आता पाणावले.. आपल्याला मूलबाळ नाही पण निदान काही दिवस का होईना ही मुलगी आपल्यासोबत असेल या भावनेने अक्काला गहिवरून आलं.

"आता इथे माझं माहेरच कुणीच नाही... पुन्हा परत मला त्या राक्षसाच्या पिंजऱ्यात जायचं नाही आहे... झाला तेवढा अत्याचार पुरे आहे.. तो माणूस नाही हैवान आहे.. पण.. पण तो इथपर्यंत आला तर????? नाही नाही... एवढ्या लांब नाही येणार तो.." मेघना स्वतःशीच पुटपुटत राहिली.. आयुष्य संपवून टाकायला निघालेली असताना नियतीने आज अक्काच्या रूपाने जगण्याची एक नवी आशा तिच्यासमोर उभी केली होती..... तिने अक्काकडे आशेने पाहिलं आणि तिला घट्ट मिठी मारली...


क्रमशः................


मेघनाच्या आयुष्यात नेमकं काय घडलं होतं?? अक्का आणि मेघना कशा सोबत राहिल्या?? संजय आणि मेघना यांचं पुढे काय होणार?? तो निनावी फोन कुणाचा होता?? हे सगळं जाणण्यासाठी वाचत रहा... भेटली ती पुन्हा.


सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..

साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


कथा आवडतं असल्यास लाईक आणि कमेंट करून मला नक्की कळवा..


©®रश्मी केळुसकर...



🎭 Series Post

View all