भेटली ती पुन्हा (भाग ११)

अपूर्ण राहिलेली त्या दोघांची गोष्ट


भेटली ती पुन्हा (भाग ११)
©®रश्मी केळुसकर.

***************************************************


संजयची अस्वस्थता आता काहीशी आनंदात रूपांतरित झाली होती. मंजिरीसोबत लंच आटपून तो ऑफिसमध्ये जाऊन आपल्या खुर्चीवर बसला आणि मेघना आजही आपल्याला भेटलीच शेवटी या समाधानात स्वतःशीच हसला. मंजिरीसुद्धा आज खुश होती कारण अचानकपणे झालेली संजयची भेट आणि त्याच्या सोबत घालवलेला वेळ तिला नवीन आठवणी देऊन गेला होता पुढची भेट होईपर्यंत.. तिने लगेच आपल्या आईला कॉल करून हे सगळं सांगितलं. तिने आईला सगळं एवढ्या आनंदात सांगितल्यानंतर मंजिरीच्या आईला सुद्धा आता संजय आणि मंजिरीच्या नात्याबद्दल खात्री वाटू लागली. मंजिरीची आई हे सगळं मंजिरीच्या बाबांना छान हसत सांगतच होती इतक्यात संजयच्या आईचा त्यांना कॉल आला.. "पुन्हा एक शुभ संकेत" असं म्हणून त्यांनी कॉल उचलला..

संजयची आई : "हॅलो मी संजयची आई बोलते आहे.. अनुपमा. कशा आहात तुम्ही??"

मंजिरीची आई : "नमस्कार अनुपमा ताई!! मी एकदम छान तुम्ही कशा आहात आणि मी तुम्हाला कॉल करणारच होते आता!"

संजयची आई : "हो का?? पण का हो?"

मंजिरीची आई : "अहो आत्ताच मला मंजिरीने फोन केला होता. संजयराव आणि ती जेवायला गेले होते म्हणाली एकत्र. खूप आनंदात होती मंजिरी. मला तर वाटतं.."

त्यांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच संजयची आई घाईघाईत बोलली..
"तुम्हालाही तेच वाटतंय ना जे मला वाटतंय!!"

तशी मंजिरीची आई जोरात हसली.

संजयची आई पुन्हा : "अहो हे दोघं सारखे सारखे भेटत आहेत याचा अर्थ कळतो आहे ना तुम्हाला? आता आपल्याला लवकरच साखरपुड्याची तारीख नक्की करायला हवी."

मंजिरीची आई आनंदित होऊन : "आम्हालाही तेच वाटतं आहे. आज मंजिरी घरी आली की बोलतेच तिच्याशी"

संजयची आई : "हो मी पण आज संजयला काय ते नक्की विचारतेच आणि मग आपण उद्या तारीख ठरवून टाकू."

आपल्या मुलांच्या लग्नाची आणि त्यांच्या सुखी संसाराची स्वप्न पाहत दोघींनी फोन ठेवला आणि आता मंजिरी आणि संजय घरी आले की त्यांच्याशी कसं बोलायचं, कसा विषय काढायचा याची मनातल्या मनात उजळणी करू लागल्या.

मेघना मात्र सकाळपासून एवढी प्रसन्न होती ती काहीशी नाराज झाली. ऑफिसमध्ये ती लंच टाईम नंतर शांत शांत च होती. मनातले विचार दूर ठेवण्यासाठी संध्याकाळी मुद्दाम उशिरापर्यंत काम करत ती थांबली पण तिच्या सरांच्या हे लक्षात येताच ते तिला म्हणाले "मेघना तुझा आज वाढदिवस आहे ना मग आज का ओव्हरटाईम करते आहेस? जा घरी मस्त एन्जॉय कर आजचा दिवस तुझा आहे.." सर हसत हसत बोलुन आपल्या कामाला गेले. आता सरांना काय सांगणार म्हणून मेघनाने तिचा कॉम्प्युटर बंद केला. सगळं आवरलं आणि मनावरचं ओझं तसच सावरत उठली.

"काय करू मी घरी जाऊन? तिथे आहे कोण माझं? वाट बघणारं कुणी असेल तर पावलं जोरात चालतात ना!! पण इथे माझ्या मनावरचं ओझं माझी पावलं इतकी जड करत आहेत की उचलतच नाही आहेत.. काय करू मी?" एखाद्या जीर्ण पानाप्रमाणे वाऱ्याच्या झोक्यासोबत उडत जावे तशी मेघना खिन्न मनाने आपली वाट चालू लागली.

मेघना घरी आली आणि किल्लीने कुलूप उघडून आत आली. येऊन खुर्चीत बसली. "आज संजयची बायको किंवा मैत्रीण जी कुणी आहे ती सोबत असताना संजयने मला असं पाहायला नको होतं. माझंच चुकलं. कशाला एवढं तयार होऊन जायची गरज होती आज? माझं सौंदर्यच माझ्यासाठी शाप आहे हे कसं विसरली मी?? इतकी वर्ष यासाठीच तर अशी अस्ताव्यस्त राहत आले पण आज वाटलं मला थोडं जगावं मनासारखं तर हा संजय.. काय चाललं आहे नक्की याच्या मनात? माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र दिसत नाही का याला? हे मंगळसूत्र भले मी नावासाठी घालते आहे पण हे फक्त मला माहीत आहे पण संजयच काय?? कसा बघत होता तो" स्वतःशीच पुटपुटत ती बसून राहिली.


इतक्यात तिला एक निनावी कॉल आला..

मेघना : "हॅलो"

समोरून कुणीतरी : "हॅलो माय लव"

मेघना (गोंधळून) : "क... कोण बोलतंय?"

समोरून कुणीतरी पुरुष : "हॅप्पी बर्थडे darling "

आता मात्र मेघना चवताळली : "हे बघा तुम्ही जे कुणी असाल ते, मी तुम्हाला ओळखत नाही.. wrong number"

समोरचा माणूस : "बास काय तीन वर्ष सोबत घालवली ना आपण सोबत.. दिवस रात्र सगळे केले ना सेलिब्रेट आणि आता तू म्हणते मला ओळखत नाही.." तो कुत्सितपणे हसू लागला बोलता बोलता.

मेघना (आवंढा गिळून मनातल्या मनात) "हा तर सुरेश सारखा आवाज आहे"

मेघना घाबरली आणि तिने फोन कट करून टाकला आणि मोबाईल स्विच ऑफ करून ती खुर्चीत आपले पाय वर घेऊन बसली. सुरेशच नाव घेऊन अंगावर सर्रकन काटा आला तिच्या आणि तिने आपल्या साडीचा पदर मागून गुंडाळून पुढे घेतला, पाय सुद्धा आत घेतले आणि साडीने आपलं पूर्ण अंग झाकलं.. जुन्या आठवणी आठवून ती शहारली.

"तो खरंच सुरेश असेल का? आवाज तर तसाच वाटला पण सहा वर्षांनी आता कुठून आला हा? आणि माझा नंबर कुठून मिळवला? आता काय हवंय याला? आत्ता कुठे मी आयुष्य माझ्यापरीने जगायला शिकलेय तर हा पुन्हा माझ्या आयुष्यात येऊन सगळी घडी विस्कटणार.. आणि मी पुन्हा...!!" हवालदिल होऊन मेघना रडू लागली.

तिला एक एक करून सगळं जसच्या तसं आठवू लागलं तशी ती ताडकन उठली आणि गुलाबी साडी बदलून तिने पुन्हा ती जुनीच साडी नेसली. गजरा कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून दिला आणि सागरवेणी रागारागाने सोडून टाकली आणि हुंदके देऊन रडू लागली.

"का हे सगळं माझ्याच बाबतीत? मला जगण्याचा अधिकार नाही आहे का? नसेल तर सहा वर्षांपूर्वी जेव्हा मी स्वतःला संपवून टाकायला निघाले होते तेव्हा अक्का का आल्या माझ्या आयुष्यात आणि त्यांनी का वाचवला माझा जीव?" देवाला आणि नशिबाला दोष देत हतबल मेघना रडत राहिली.

इतक्यात अक्का आल्या आणि त्यांना बघून मेघना उठली आणि धावत जाऊन त्यांना मिठी मारून रडू लागली..

अक्का : "काय झालं ग पोरी? कशाला रडते आहेस? आज तुझा हॅपी बडे काय ते आहे ना मग आजच्या दिवशी तर हस.. आज पहाटेला मी लवकर गेले बघ आज फुलमार्केट ला म्हणून तुला न उठवताच गेली बघ.. पण आता मी लवकर आले तुझ्यासाठी ग बाय"

अक्काच बोलणं ऐकून मेघना डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली "अक्का तू नसतीस तर काय झालं असतं ग माझं?

अक्का : "काही नाही माझ्यासारखी दुसरी कुणीतरी अक्का उभी राहिलीच असती की तुझ्या पाठीशी"
आपले दुखणारे गुडघे चोळत अक्का भिंतीला टेकून बसली आणि तिने एक चॉकलेट पिशवीतून काढत मेघनाच्या हातावर ठेवलं.

अक्काने दिलेलं चॉकलेट बघून मेघनाच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं आणि तिने अक्काला पुन्हा एकदा मिठी मारत "Thank u" म्हंटल आणि अक्कला वाकून नमस्कार केला.

दोघींनी मग जेवण करायला घेतलं आणि गप्पा मारत मारत सगळी कामं केली. जेवणं झाल्यावर मेघनाच्या लक्षात आलं की तिने तिचा फोन स्विच ऑफ केला होता तो तसाच होता. तिने मोबाईल on केला तर त्या मघाशी आलेल्या निनावी नंबर वरून पुन्हा तीन कॉल येऊन गेले होते.

मेघना पुन्हा घाबरली पण अक्काला काही जाणवू न देता तिने अंथरूण घालून झोपायची तयारी केली. मेघना डोळे घट्ट मिटून घेऊन सगळं विसरण्याचा प्रयत्न करत होती. अक्काने हे पाहिलं आणि मेघना कसल्यातरी विचारात आहे मी अस्वस्थ आहे हे तिला जाणवलं.

"देवा खूप सोसलंय रे या पोरीने.. आता तरी तिला तिच्या वाट्याच सुख मिळून दे" अक्काने हात जोडून देवाला साकडं घातलं.

क्रमशः...............

पुढे काय घडेल? मेघनाने तिच्या भूतकाळात नेमकं काय सोसलंय? अक्का कोण आहे? संजय आणि मंजिरी च लग्न ठरणार का? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी नक्की वाचत रहा "भेटली ती पुन्हा"

सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..

साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


लेख आवडला तर लाईक आणि कमेंट करून मला कळवा.

©®रश्मी केळुसकर...


🎭 Series Post

View all