©®रश्मी केळुसकर
***************************************************
दुसऱ्या दिवशी सकाळी मेघनाला नेहमीपेक्षा जरा लवकरच जाग आली. झोप तरी कुठे नीट लागली होती तिला रात्रभर!! डोक्यात नुसतं विचारांचं काहूर माजलं होतं. भूतकाळ तिची ओंजळ रिकामी होऊ देत नव्हता आणि म्हणूनच की काय ती वर्तमानात मोकळेपणाने हात पसरवून भविष्याचा सकारात्मक विचार करू शकत नव्हती. कितीतरी वेळ ती विचार करत पडून राहिली होती आणि डोळ्यातील आसवं तिची उशी भिजवत राहिली होती. खूप उशिरा तिचा डोळा लागला आणि पुन्हा पहाटे जागही आली. खिडकीच्या बाहेर रात्रीच्या पावसाने झालेला ओलावा तिच्या मनातल्या आठवणींसारखाच होता.. अजूनही ओला... कुणाच्यातरी उबदार स्पर्शाची गरज असलेला..
काल रडून रडून जड झालेल्या पापण्या उघडत तिने अंगावरील चादर बाजूला केली. आज कितीतरी वर्षांनी का होईना तिला प्रसन्न वाटत होतं. धुक्यातून वाट काढत स्वच्छ वळणावर आल्यासारखं. आजची सकाळ काहीशी वेगळी भासली तिला. कारणही तसच होतं म्हणा, आज मेघनाचा वाढदिवस होता. इतके वर्ष वाढदिवस वैगरे या सगळ्या गोष्टींपासून कितीतरी लांब असणाऱ्या मेघनाला आज मात्र खूप आशावादी वाटत होतं. काल आरशात पाहून स्वतःला नकारात्मक प्रश्न विचारणारी मेघना आज मात्र कितीतरी दिवसांनी स्वतःला त्याच आरशात सकारात्मकतेने नखशिखांत न्याहाळत होती. एक गोष्ट तिच्या लक्षात आली की आपण स्वतःकडे लक्ष देणं च विसरलो आहोत. आपलं वय काही अजूनही सरलं नाही पण आपणच स्वतःला सगळ्या चांगल्या गोष्टींपासून दूर ठेवलं आहे.
"आज पंजाबी ड्रेस घालू का?? तो एक आहे ना माझ्याकडे.. नाही नको इथली वस्तीतली माणसं काय बोलतील? पुन्हा काहीबाही अर्थ काढतील.. त्यापेक्षा नकोच. साडीच बरी." ड्रेस घालण्याची उफाळून आलेली इच्छा नेहेमीप्रमाणे फेटाळून लावत तिने पाणी अंघोळीसाठी तापवायला ठेवलं.
अंघोळ आटपल्यावर आज तिने रोजच्या दोन साड्यांव्यतिरिक्त मागच्या दिवाळीत खास स्वतःच्या कमाईतून घेतलेली गुलाबी रंगाची साडी कपाटातून काढली. गुलाबी रंगाची साडी आणि त्यावर जांभळ्या रंगाची काठ आणि तसाच जांभळा पदर. आज कितीतरी दिवसांनी अशी रंगात रंगली होती मेघना नाहीतर एरवी रोज एक काळी आणि एक करड्या रंगाची साडी. एरवी कामाला जाता जाताच हाताने मागे घेऊन कसेतरी केस बांधून टाकणारी मेघना आज मात्र छान सागरवेणी घालून तयार झाली. का कुणास ठाऊक पण आज छान तयार व्हावं असं मनातून वाटत होतं तिला. निघण्यापूर्वी एकदा आरशात बघावं म्हणून तिने डोकावलं आणि क्षणभर बघतच राहिली. जरा चांगली साडी चापून चोपून नेसलेली आणि सागरवेणी घातलेल्या मेघनाच्या डोळयात स्वतःला असं छान बघून एक वेगळीच चमक आली होती. "कुठे तो कालचा निराशावादी आकांत आणि कुठे ही आजची आशादायी सकाळ!!"... ती स्वतःशीच कुजबुजत होती.. "का माहित नाही पण आज निरभ्र आकाशासारख वाटतंय. मनातल्या विचारांचा निचरा झाल्यासारखं वाटतंय. काहीतरी चांगलं होईल माझ्याही आयुष्यात असं वाटतंय... जगावं वाटतंय..... निदान स्वतःसाठी तरी..."
"वनिता नेहेमी म्हणते बाहेर जेवायला जाऊया लंच टाइम मध्ये पण मी तिचं कधीच ऐकलं नाही पण आज जाऊया तिच्यासोबत. आज डबा नाही करत मी. आज प्रसन्न मनाने देवळात जाते आणि मग ऑफिसला जाते" मनाशी आज काय काय करायचं याचा विचार करत मेघना बाहेर पडली. दरवाज्याला कुलूप लावून किल्ली शेजाऱ्यांकडे देऊन ती निघाली. रोज खाली मान घालून चालणारी मेघना आज आजूबाजूला बघत, डोळ्यात सारं साठवून घेत चालत होती. रोजचाच रस्ता होता पण कधी तिने मोकळ्या मनाने आजूबाजूला बघितलंच नव्हतं आत्तापर्यंत.
ती देवळात गेली. देवाचं दर्शन घेऊन बाहेर पडली तोच तिची नजर गजरे विकणाऱ्या बाईकडे गेली. "घेऊ का गजरा?? खूप आवडतो गजरा पण लोक काय म्हणतील म्हणून कधी घातलाच नाही मी.. जाऊ दे घेतेच. लोक काय बोलतच राहणार" म्हणत तिने एक गजरा विकत घेतला आणि सागर वेणीवर छान माळला सुद्धा.
या नवीन ऑफिसमध्ये जॉईन होऊन आज महिना झाला होता मेघनाला. अक्काच्या ओळखीने पाच वर्षांपूर्वी एका छोट्याश्या गारमेंट मध्ये तिला नोकरी लागली होती. शिवलेल्या ड्रेसेसना बटणं लावायची, टॅग लावायचे अशी छोटी मोठी कामं करत असताना तिच्यातली हुशारी आणि तिला असलेलं अकाऊंटच ज्ञान पाहून तिथल्या मालकाने तिला तिथे अकाऊंट डिपार्टमेंटमध्ये घेतलं. कॉलेजमध्ये असताना अकाउंट्स हा मेघनाच्या आवडीचा विषय. तिला खरंतर खूप शिकायचं होतं पण तिच्या मोठ्या बहिणीने पळून जाऊन एका दाक्षिणात्य मुलाशी लग्न केलं आणि ती कायमची त्याच्या गावी म्हणजे केरळला निघून गेली. तिच्या या कृत्यामुळे मेघनाच्या आई वडिलांनी खूप धसका घेतला. अशातच मेघनाच्या आईला ब्लड कॅन्सर आहे असं कळलं आणि मग मेघनाच्या वडिलांना मेघनाच्या लग्नाची चिंता होऊ लागली. भाऊ अजून शिकतच होता मेघनाचा. मोठी बहीण पळून गेली आता आपल्या लहान मुलीचं लग्न कसं होणार या चिंतेत असतानाच मेघनासाठी सुरेशच गडगंज श्रीमंत स्थळ समोरून चालून आलं आणि मग मेघनाच्या वडिलांनी हे स्थळ हातचं घालवायला नको म्हणून मेघनाला आईच्या आजारपणाच कारण पुढे करून भावनिक आवाहन करून शिक्षण अर्धवट सोडून लग्न करण्यास भाग पाडलं. त्यामुळे मेघनाला आवड असूनही शिक्षण पुढे सुरू ठेवता आलं नाही पण ऑफिसमध्ये तिच्या सरांनी दिलेल्या अकाउंट्सच्या कामामुळे ती हळूहळू सगळं शिकली. तिथे चार वर्ष नोकरी केल्यानंतर तिने आता या मोठ्या टुरिस्ट कंपनीत इंटरव्ह्यू दिला होता आणि तिला नोकरी लागली होती महिन्याभरापूर्वी. आत्ता कुठेतरी आर्थिक पातळीवर ती स्थिर होऊ पाहत होती पण वैयक्तिक पातळीवर मात्र अजूनही तिची ओंजळ रिती च होती.
ऑफिसमध्ये आल्या आल्या आज वानिताने मेघनाला हाक मारली "हे हाय मेघना... wow आज चक्क गुलाबी साडी.. सुंदर दिसते आहेस ग आज. छान सागरवेणी आणि गजरा वैगरे. ए तू रोज का नाही अशी छान राहत?" मेघनाला बघून आनंदित होऊन वनिताने तिचं तोंडभर कौतुक केलं. खूप दिवसांनी आपल्याला कुणीतरी छान दिसते आहे असं बोललं हे पाहून मेघना ही मनातल्या मनात सुखावली. आपल्या खुर्चीत बसत ती छान हसत वानितला "Thank u" बोलली. त्यावर वनिता पुन्हा म्हणाली "तुला खरं सांगते मेघना. जेव्हापासून आपण भेटलो आहोत आज तुला मी असं छान हसताना पाहिलं आहे. नेहेमी मीच एकटी बडबडत असते. तू नुसतीच सगळं ऐकत हो हो म्हणत आपलं काम करत असतेस. आज काही स्पेशल आहे का? वाढदिवस वैगरे आहे का तुझा?" वनिताने अंदाज बांधत विचारलं. तशी मेघना गालात हसली आणि "हो" म्हणाली. वनिताने लगेच मेघनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक घट्ट मिठी मारली आणि "आज तरी जेवायला बाहेर जाऊया" म्हणाली. मेघनाने लगेच होकारार्थी मान हलवली आणि आपला कॉम्प्युटर चालू करत कामाला सुरुवात केली.
इथे संजय सकाळपासूनच आज अस्वस्थ होता. आज मेघनाचा वाढदिवस आहे हे त्याला चांगलं लक्षात होतं. त्याने काही ठरवून लक्षात ठेवलं नव्हतं पण दरवर्षी बरोबर त्याला तिची जन्मतारीख लक्षात राहायचीच. आजही उठल्या उठल्या आजची तारीख बघून त्याला आठवला तो दिवस... त्या दिवशी सुद्धा मेघनाचा वाढदिवसच होता आणि त्याच दिवशी तो तिला आपल्या मनातली गोष्ट सांगणार होता पण नेमकं मेघनाने येऊन तिच्या लग्नाची बातमी दिली आणि काही ऐकून घेण्याच्या आतच ती तिथून निघून गेली. हो, तो आजचाच दिवस होता ज्या दिवशी सगळं सगळं संपलं होतं. खरंतर त्या दिवशीपासून आज मेघनाचा वाढदिवस म्हणून आनंदी राहायचं की त्यांच्या नात्याची गोष्ट या दिवशी सुरू होण्यापूर्वीच संपली म्हणून दुःखी व्हायचं हे त्याला कळतच नव्हतं. आज मात्र त्याला एकच वाटत होतं ते म्हणजे मेघना आत्तापर्यंत दोनवेळा अगदी अचानकपणे त्याच्या समोर आली तशी आजसुद्धा यावी... अगदी अचानक.... नकळत भेट व्हावी...
क्रमशः..................
पुढे काय घडेल हे पाहण्यासाठी नक्की वाचत रहा "भेटली ती पुन्हा"
कथा आवडत असल्यास लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा.
सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..
साहित्यचोरी हा गुन्हा आहे.
©®रश्मी केळुसकर...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा