Login

भेटली ती पुन्हा (भाग ८)

अपूर्ण राहिलेली त्या दोघांची गोष्ट
भेटली ती पुन्हा (भाग ८)
©®रश्मी केळुसकर ✍?

***************************************************

कुकरची शिट्टी वाजली आणि भूतकाळातील त्या हव्याहव्याशा तरीही आत्ता टाळाव्या लागणाऱ्या आठवणीतून मेघना बाहेर आली. उगाच आपण भलती आशा लावून घेत आहोत, नको ते विचार करण्यात आता काहीच अर्थ नाही असं स्वतःला समजावत ती पटापट भाजी निवडू लागली. नेहेमीप्रमाणेच स्वतःला मनात येणाऱ्या विचारांपासून दूर ठेवण्यासाठी कामात झोकून देत तिने जेवण करून झाल्यावर पुन्हा जाऊन खिडकी उघडली. पाऊस थांबला होता पण हवेत गारवा निर्माण झाला होता. "पाऊस पडून गेल्यावर कित्ती स्वच्छ आणि मोकळं वाटतं ना सगळं... आपल्या मनाचही तसच असतं तर कित्ती बरं झालं असतं!! ते कधी का नाही निरभ्र होत या आकशासारख? का सतत दाटून आलेल्या आभाळासारख काळोख करून असतं? आणि मग त्या काळोखात पुढचं काहीच दिसत नाही.. फक्त चाचपडत रहावं लागतं आणि हाती मात्र काहीच लागत नाही." मनातले विचार काही थांबत नव्हते मेघनाच्या. भूक तर लागली होती पण एकटी जेवायला कंटाळा येतो म्हणून ती वाट बघत तशीच थांबली होती. अचानक मघाशी त्या मवाल्याने हात धरल्यावर झालेला तो स्पर्श तिला अचानक आठवला आणि ती शहारली. गेले कितीतरी दिवस तो माणूस आपला पाठलाग करत होता हे तिला कळत होते पण असा हात वैगरे धरण्याची त्याची हिम्मत झाली नव्हती पण आज नेमकं त्याने तिला गाठलं आणि नशीब संजय आला तिथे.

"आज संजय आला पण पुन्हा तो माणूस आला तर मागे?? काय करणार आहे मी? आणि हा नाही तर दुसरा कुणीतरी येऊन त्रास देईल मला. हे असं किती दिवस चालणार? नाही काहीतरी उपाय करायला हवा. मला आता खंबीर व्हायलाच हवं नाहीतर असे विकृत पुरुष आयुष्यात भेटतच राहणार." मेघना मघाशी घडलेलं सगळं आठवून स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होती.

विचार करता करता चालत ती जाऊन आरशासमोर उभी राहिली. स्वतःचं प्रतिबिंब समोर आरशात न्याहाळत तिने स्वतःलाच विचारलं "काय अवस्था करून घेतलीस ग मेघना स्वतःची? कुठे गेलं तुझं ते आरसपानी सौंदर्य? कुठे गेलं ते खळखळून हसणं? ते अवांतर आणि अवखळ बोलणं कुठे गेलं? हीच का ती मी नऊ वर्षांपूर्वीची मेघना?" म्हणत ती ढसाढसा रडू लागली. रडता रडता ती धपकन खाली बसली. आता तिला थांबायचच नव्हतं. बाहेर बरसून गेलेल्या पावसाप्रमाणे आपल्या अश्रूंनासुद्धा बरसु द्यायचं होतं.. अगदी पार डोळ्याच्या कडा सुकेपर्यंत आणि मनात दाटून आलेलं आभाळ निरभ्र होईपर्यंत.. ती रडत राहिली.. निपचित बसून राहिली... वाहणाऱ्या अश्रूंनी आपला भूतकाळ पुसता येऊ शकतो का याचा निष्फळ प्रयत्न करत राहिली. बऱ्याच वेळानंतर तिने स्वतःला सावरत आपल्या दोन्ही हातांनी आपला चेहरा पुसला. आरशात पुन्हा बघितलं आणि आपल्या रडून रडून सुजलेल्या डोळ्यांना घट्ट मिटून घेतलं. भिंतीला डोकं टेकून ती तशीच बसून राहिली... कुणाची तरी वाट बघत... तशीच....


इथे संजय घरी आल्यावर आईने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

"काय रे पसंत आहे ना मंजिरी?"

आईने डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला. संजयने आपली बॅग सोफ्यावर ठेवली आणि बसत म्हणाला "काय ग आई डायरेक्ट पसंत आहे का काय? काय बोललात वैगरे विचार तरी."

"अरे आता ते काय विचारायचं? कार्यक्रम तर कालच आटपला होता. सगळं ठरल्यातच जमा आहे पण तुम्हा दोघांना आपसात बोलता यावं नीट म्हणून भेटलात ना मग आता काय राहिलं आहे?" आईने गुगली टाकली.

"ही आई म्हणजे ना सगळी घाईच असते हिला" स्वतःशीच पुटपुटत संजयने आईच्या बोलण्याकडे कानाडोळा करत आपल्या रूममध्ये जाऊन कपडे बदलायला घेतले. हातपाय धुऊन आल्यावर सहज म्हणून मोबाईल बघितला तर मंजिरीचा मेसेज आला होता. घरी सुखरूप पोहोचल्याचा मेसेज.

"अरेच्चा.. मी मंजिरीला तर पार विसरूनच गेलो या मेघनाच्या गडबडीत" कपाळावर हात मारत स्वतःवरच अचंबित होत संजय बाहेर जाऊन सोफ्यावर बसला. मंजिरी आपल्या रिप्लायची वाट बघत असेल असा विचार करून त्याने "ok. good night" असा जुजबी मेसेज टाकून दिला आणि हसणारा स्मायली टाकून विषय संपवून टाकला. त्याला स्वतःचच आश्चर्य वाटत होतं की काही तासांपूर्वी ज्या मंजिरीच्या दिसण्यावर, वागण्यावर, बोलण्यावर भाळत हीचा लग्नासाठी विचार करूया का या निष्कर्षावर तो पोहोचणार होता त्याच मंजिरीला आता त्याने एक साधा ok चा मेसेज करून जवळजवळ कटवलं होतं.

आता फक्त राहून राहून त्याला आठवत होती ती मेघना.... साध्याशा साडीत आपले जेमतेम विंचारलेले केस हळूच कानामागे घेणारी, गळ्यातलं ते छोटंसं मंगळसूत्र आणि दोन काचेच्या हिरव्या बांगड्या या एवढ्याच दागिन्यांमध्येसुद्धा तिचं रूप कुणाच्याही नजरेत भरेल इतकं साधं सुंदर होतं. तेज नव्हतं आधीसारख तिच्या चेहऱ्यावर पण वयानुसार आलेला तारुण्याचा बहर लपता लपत नव्हता. तिच्या अस्ताव्यस्त असण्यातसुद्धा तिचं सौंदर्य डोकावत होतं. कॉलेजमध्ये एखाद्या कळीप्रमाणे भासणारी ती आता एक पूर्णपणे फुललेलं फुल झालेली होती.

"तिच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचं काहीतरी गूढ आहे एवढं नक्की पण तरीही तिला भेटल्यानंतर माझ्या एकतर्फी प्रेमाला पुन्हा धुमारे फुटतात.. का माहित नाही पण ती काहीतरी लपवते आहे माझ्यापासून आणि टाळते आहे मला... पण तरीही तिच्या डोळ्यानी माझ्यासाठी एक आश्वासक साद घातली माझ्याकडे पाहून. डोळ्यात एक आणि ओठांवर एक असं काहीसं सुरू आहे तिचं. तिचं हे असं साधं राहणं, अशा वस्तीत राहणं हे सारं काही अनाकलनीय आहे. कसलाच मेळ लागत नाही आहे." मेघनाच्या विचारात आकंठ बुडालेला संजय हताश होऊन बसला होता.

अचानक त्याला कॉलेजचे दिवस आठवले. या अशाच पावसात जेव्हा ते सगळे मित्र मैत्रिणी मिळून वडापाव खायला पैसे काढायचे तेव्हा बाबांनी बसच्या तिकिटीसाठी दिलेले पैसे कसा ताठ मानेने संजय मेघनाला देऊन टाकायचा आणि मग एवढ्या लांब चालत यायचा हे सगळं आठवून त्याला स्वतःचच हसू आलं. "प्रेमात माणसं कित्ती वेडी होतात ना!!" त्याने स्वतःलाच विचारलं.

पण मग पुन्हा "मी काय आणि कसले विचार करतो आहे पुन्हा पुन्हा? माझ्या आयुष्यात हा असा पेच का निर्माण झाला आहे? एकीकडे सालस मंजिरी आणि दुसरीकडे माझी मेघना? मला नक्की कोण आवडतं हे मला ठरवताच येत नाहीय. पण मी मेघनाचा विचार करूच कसा शकतो? तीचं तर लग्न झालंय ना? तिच्याकडे बघून ती संसारात खुश नाहीय असा संशय आहे खरा पण हे सगळं माझ्यापर्यंत येण्याचं काहीच कारण नाही आहे. मी कोण आहे तिच्या आयुष्यात आता या घडीला डोकावणारा? संजय काय चाललं आहे तुझं? हा वेडेपणा थांबव आणि मेघनाचा विचार करणं, भलते सलते तर्क वितर्क लावणं बंद कर आणि त्या गोड मंजिरीचा विचार कर.." संजय स्वतःलाच पुन्हा पुन्हा पटवून देत होता. मेंदू आणि मन यांच्या द्वंद्व युध्दात मनात जपलेली मेघना मेंदूतल्या मंजिरीला हरवू पाहत होती. मंजिरीचा विचार करू लागल्यावर मेघना आपसूकच डोळ्याच्या कडा ओलावून संजयला मुक नजरेने खुणावत होती.

"नाही... नाही विसरू शकत मी मेघनाला!!" अचानक संजय ओरडला...

"काय रे काय झालं? काय बडबडत आहेस एकटाच?" आईने आश्चर्याने बघत जेवण वाढत विचारलं.

"अं.. नाही काही नाही.." कसनुसं होत संजयने डोळे दोन सेकंद बंद करून घेतले आणि मेघनाचा विचार मनातून झटकून टाकत उठून उभा राहिला. आईने जेवण वाढल्यावर त्याने जेवायला सुरुवात केली. एकदा मंजिरी एकदा मेघना असं चक्र डोक्यात सुरूच होतं.

"संजय आपल्याला मंजिरीच्या घरच्यांना काय ते कळवायच आहे अरे.. तुझा निर्णय सांग लवकर" विषय काढत आई म्हणाली.

"आई मला प्लिज दोन दिवस दे. मी काय ते नक्की सांगतो" काकुळतीला येत संजय म्हणाला.

"अजून दोन दिवस?? काय रे एवढी चांगली मुलगी आहे तरी तुझं हे काय चाललं आहे? चांगलं स्थळ हातचं जायला नको हा संजय" आईसुद्धा आता नाराजीच्या सुरात म्हणाली.

आता आपल्याला काय तो निर्णय लवकरात लवकर घ्यायला हवा असा विचार करत संजयने उसासा टाकला.


क्रमशः.....................


सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..