पाऊस बघून इतका वेळ शांत बसलेल्या मंजिरीच्या चेहऱ्यावर सुद्धा अलगद हसू उमललं. बाहेर बरसणाऱ्या हलक्या पावसाच्या सरी पाहत ती म्हणाली.. "तुम्हाला आवडतो का पाऊस?"
संजयच मात्र लक्ष च नव्हतं म्हणून मग तिने पुन्हा जरा आवाज वाढवून विचारलं...
"संजय.. मी विचारलं तुम्हालासुद्धा आवडतो का पाऊस?"
मेघनाच्या आठवणी बळेबळेच मनातून काढून टाकत संजय म्हणाला..
"अं... हो.. म्हणजे नाही.. नाही आवडत मला पाऊस." मनात हो असूनही तोंडावर नाही आलं होतं संजयच्या.
मंजिरी : "अच्छा.. ok.. मला वाटलं इतकं टक लावून बघताय म्हणजे तुम्हालासुद्धा असा पाऊस आवडतो."
संजय : "तुला आवडतो का?.... पाऊस?"
मंजिरी : "खूप जास्त.. मला पाऊस बघायला, त्यात चिंब भिजायला खूप खूप आवडतं. पावसाळा माझा सगळ्यात आवडता ऋतू आहे. सगळीकडे कसं मस्त हिरवंगार झालेलं असतं ना आणि पाऊस येणार म्हणून त्यापूर्वी जो अंधार दाटून येतो आणि ते एक वातावरण तयार होतं ना ते तर मला खूप च आवडतं... अगदी भरून आलेल्या मनासारखं भासतं मला."
संजय : "वाह कविता वैगरे करतेस की काय? एकदम अलंकारिक बोलतेस.."
मंजिरी (लाजत आणि हसत) : "नाही नाही कविता नाही करत पण मला आवडतात कविता वाचायला.."
इतक्यात वेटरने कॉफी आणली आणि दोघांनीही मस्त पाऊस बघत कॉफीचा एक एक घोट घेतला.
मंजिरी : "nice coffee"
संजय : "हो मला आवडते इथली कॉफी. मी कधीतरी मित्रासोबत येतो इथे कॉफी प्यायचा मूड झाला तर"
मंजिरी : "अरे वाह, छान!"
संजय (मनातल्या मनात) : खूपच अघळपघळ बोलणं होत आहे. किती वेळ पाऊस आणि कॉफी यावर बोलत बसणार? विषयाला हात घालायला हवा म्हणून बोलायला सुरुवात करणार इतक्यात मंजिरी बोलू लागली..
मंजिरी : "काल तुम्ही येऊन गेल्यानंतर आई बाबा खूपच खुश झाले. लग्नात काय काय करायचं याची चर्चाच करू लागले. अचानक बोलता बोलता हळवे झाले बाबा मग त्यांना मी समजावलं.. बोलले बाबा अजून कशात काही नाही आणि एवढ्यात कुठे मला पाठवताय. वेळ आहे अजून... कसं असतं ना मुलीचं लग्न हा विषय निघाला की आई बाबा अगदी हळवे होऊन जातात.." बोलता बोलता मंजिरीचा आवाज कातरला.
लग्न जवळजवळ ठरलं आहे असं समजणाऱ्या मंजिरीला आणि तिच्या घरच्यांना काहीतरी ठोस कारण द्यावं लागणार नकार कळवताना हे संजयला कळून चुकलं. मंजिरीसारख्या शांत, सोज्वळ, सालस आणि सुंदर मुलीला नकार कुठल्या आधारावर देऊ याचा संजय विचार करू लागला.. विचार करत असताना त्याला जाणवलं की नकार कसा देऊ यापेक्षा नकार का देऊ हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे कारण मेघना हा त्याचा भूतकाळ होता तो ही एकतर्फी प्रेमाचा. मेघनाच्या मनात काय होतं हे त्याला कधी कळलंच नव्हतं आणि आता ती फक्त परवा दिसली ते ही एक विवाहित स्त्री म्हणून तरी तिच्यात आपला जीव का गुंतवावा? ती तिच्या तिच्या आयुष्यात सुखी असेल तर? तिला माझी काहीच गरजच नसेल तर? आता तिचा आणि माझा काय संबंध? या आणि अशा अनेक प्रश्नांनी त्याच्या डोक्यात थैमान घातलं.. संजय पुन्हा कुठल्या तरी विचारात हरवलेला पाहून मंजिरीने त्याला हाक मारली.
मंजिरी : "संजय.. काही प्रॉब्लेम आहे का? सॉरी पण मी कालपासून बघते आहे. घरीसुद्धा तुमची आई आणि मावशी खूप खुश होत्या पण तुम्ही वरवर हसत आहात असं वाटलं. आजसुद्धा कुठेतरी हरवल्यासारखे वाटत आहात."
संजय (आपण आता जरा अतीच करतोय याची जाणीव होऊन चेहऱ्यावर हसू आणत) : "नाही... नाही म्हणजे तसं काहीच नाही. ऑफिसच्या कामांचा विचार जरा बाकी काही नाही. आत्ता अचानक आठवलं की एक काम विसरून आलोय.. उद्या करेन मी ते. त्याच विचारात होतो."
त्याच्या या उत्तरावर फारसं समाधान न झालेली मंजिरी पुन्हा म्हणाली.. "आल्यापासून मीच बोलते आहे तुम्ही काहीच बोलत नाही आहात."
आता जर बोललो नाही तर मंजिरीच्या मनात गैरसमज निर्माण होईल असा विचार करून संजय म्हणाला "खरं सांगू का actually मी लग्नाचा वैगरे विचार इतक्यात केला नव्हता त्यामुळे हे सगळं जरा पचवायला जड जातंय बाकी काही नाही."
मंजिरी : "अच्छा.. मला वाटलं तुम्हाला नकार द्यायचा आहे की काय"
ती असं म्हणताच संजय पटकन बोलला..
"नाही नाही नकार आणि तुझ्यासारख्या इतक्या चांगल्या मुलीला? कसा देईन मी... पण मला जरा विचार करायला वेळ हवा आहे. जास्त नाही थोडेच दिवस. प्लिज.. गैरसमज करून नको घेऊस"
दिसायला देखणा, रुबाबदार आणि मितभाषी स्वभावाचा संजय मंजिरीला फोटो बघूनच आवडला होता. आज भेटल्यावर तर तो अधिकच मनात भरला तिच्या. संजयच असं अस्वस्थ वागणं तिला कुठेतरी खटकलं होतं पण तो थोड्या दिवसांचा वेळ मागतो आहे तर काय हरकत आहे त्याच्यावर विश्वास ठेवायला असा विचार करून ती हसत म्हणाली "ठीक आहे.. काही हरकत नाही. आपण थोडे दिवस थांबुया. हवं तर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा भेटूया. एकमेकांना जाणून घेऊया.. मग विचार करूया.. काय वाटतं?"
आता संजयही मनापासून हसला (मनात विचार करू लागला की ही मुलगी कित्ती समजूतदार आहे.. कसलाही बाऊ न करता तिने आपल्याला समजून घेतलं आणि थांबायला देखील तयार झाली), म्हणाला "चांगली कल्पना आहे. आपण नक्की भेटूया पुन्हा.."
एव्हाना बाहेर पाऊसही थांबला होता आणि मगमधील कॉफीही संपली होती.
"आता निघायला हवं " म्हणत आपली ओढणी खांद्यावर नीट टाकत मंजिरी उठली आणि तिने दोन्ही हातांनी आपले मोकळे केस मागे एकत्र धरत त्याला क्लिप लावला.
हे बघून संजय न राहवून म्हणाला "मंजिरी... केस राहू देत ना मोकळे.. छान दिसतेस!!"
संजयच्या या अनपेक्षित बोलण्यामुळे मंजिरी लाजली आणि तिने केसांना लावलेला क्लिप काढून बॅगमध्ये ठेऊन दिला.. पुन्हा एकदा संजयकडे बघून ती " bye " म्हणाली आणि गालातल्या गालात हसत चालू लागली.
" Bye " म्हणत संजयही उठला आणि पाठमोऱ्या मंजिरीला पाहून, तिच्या त्या लांबसडक वाऱ्यावर उडणाऱ्या केसांना बघून, लाजणाऱ्या मंजिरीला आठवून आपणही हळूच हसला..
"आपणही मंजिरीच्या प्रेमात पडू लागलो आहोत का??" मंजिरीच्या त्या निर्मळ सौंदर्यात हरवत,स्वतःलाच प्रश्न विचारत संजयने बाईक स्टार्ट केली.
पुढच्याच सिग्नलला बाईक थांबवल्यावर इकडे तिकडे बघत असताना नकळत त्याचं लक्ष बाजूच्या रिक्षामध्ये गेलं तर त्यात मेघना बसलेली होती..
आपल्याच विचारात हरवलेली, चेहऱ्यावर कसलीतरी काळजी असणारी, मनावर कुठलं तरी दडपण असणारी आणि शून्यात नजर लावून बसलेली....
सिग्नल सुटला आणि तिची रिक्षा सुरू झाली तशी संजयने आपली बाईक तिच्या रिक्षाच्या मागे न्यायला सुरुवात केली. आपण का हिच्या मागे जातोय याचा काहीही विचार न करता संजय फक्त त्या रीक्षाच्या मागे बाईक चालवत राहिला. दहा मिनिटांनी परवाच्या त्या बैठ्या चाळीच्या दुसऱ्या बाजूच्या रस्त्याला मेघनाने रिक्षा थांबवली.
रिक्षातून उतरून तिने पैसे दिले आणि चालू लागली. आजूबाजूला कुठेही न पाहता ती पटापट चालत होती. संजयने सुद्धा बाईक तिथे बाजूला लावली आणि तिच्या पाठून चालू लागला. थोडं पुढे गेल्यावर बैठी घरं असलेली वस्ती चालू झाली. बऱ्यापैकी अंधार होता आणि गल्ल्या गल्ल्या होत्या. तिथे पुढे गेल्यावर एका अंधाऱ्या कोपऱ्यात एक माणूस उभा होता त्याने अचानक मेघनाचा हात धरला. बहुतेक तो हिचीच वाट बघत तिथे थांबून राहिला होता. त्याने तिचा असा हात धरताच मेघना ओरडू लागली "सोड.. सोड मला.. सोड"
काय चाललं आहे हे कळायच्या आतच तिला असं ओरडताना बघून संजय धावत पुढे गेला आणि त्याने जोरात ओरडून विचारलं "काय चाललं आहे हे.. सोड तिचा हात"
संजयला पाहून तो मवाली जरा गडबडला.. त्याने मेघनाचा हात सोडला आणि धावतच अंधारात कुठे तरी गायब झाला.
मेघनाने मागे वळून संजयला पाहिलं आणि कावरी बावरी होत विचारलं "तू?? तू इथे कसा काय?"
तिला शांत करत संजय म्हणाला "ते महत्त्वाचं नाही आहे.. आधी सांग तू इथे काय करते आहेस? या अशा वस्तीत? इथे कोण राहतं का तुझं?? आणि तो माणूस कोण होता??"
अचानक इथे आलेल्या संजयला आणि त्याने विचारलेल्या इतक्या प्रश्नांनी भांबावून जात मेघना अनुत्तरित होऊन फक्त त्याच्याकडे पाहत राहिली.... चेहऱ्यावर एक पुसटशी आशा घेऊन... मनात विचारांचं काहूर घेऊन... तिने स्वतःलाच विचारलं "देवाच्या मनात नक्की काय आहे? परवा आणि आता आजही.... हा का माझ्यासमोर येतो आहे सारखा सारखा???"
क्रमशः......
सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..
साहित्यचोरी हा गुन्हा आहे.
कथा आवडत असल्यास लाईक आणि कमेंट करून मला कळवा आणि असेच विविध विषयांवरील लेख वाचण्यासाठी मला फॉलो करा..
©®रश्मी केळुसकर...