भेटली ती पुन्हा (भाग ५)

अपूर्ण राहिलेली त्या दोघांची गोष्ट - मनात इतकी वर्ष जपून ठेवलेली मेघना तरीही आवडू लागलेली मंजिरी.. कोण येईल पुढे संजयच्या आयुष्यात??


"छान आहे ना रे मंजिरी एकदम. माझ्यातर नजरेसमोरून तिचं ते सोज्वळ रूप जातच नाहीय. गोड आहे अगदी. घरचे सुद्धा अगदी चांगली माणसं आहेत. साधी सरळ नाकासमोर चालणारी माणसं वाटली मला. मंजिरी जर या घरात सून म्हणून आली ना तर तुझा संसार सुखाचा करेल बघ... लक्ष्मीच्या पावलांनी येईल आपल्या घरी.." आई घरी आल्या आल्या मंजिरीच्या नावाचा नुसता जप करत होती.

संजय आईच्या बोलण्यातला तो आनंद, ते समाधान बघून सुखावला. कितीतरी दिवसांनी आई अशी आनंदी आणि प्रसन्न दिसत होती. साहजिकच होतं म्हणा. बाबा गेल्यानंतर संजयची आई एकटी पडली होती. संजय सकाळी ऑफिसला जायचा तो थेट रात्री घरी यायचा. रविवारची सुट्टी बरेचवेळा मित्रांसोबत घालवायचा त्यामुळे आई घरी एकटीच असायची. बाबा गेल्याच्या दुःखातून ती कशीबशी सावरली ते आपल्या एकुलत्या एका मुलाचं लग्न या गोष्टीचा विचार करून पण जेव्हा संजय लग्न करणारच नाही या त्याच्या हट्टावर अडून बसली तेव्हा मात्र आई हिरमुसली. आता जगायचं तेही कुठल्या आशेवर असा विचार करून ती आपल्याच कोशात जगू लागली. शांत राहू लागली, हरवल्यासारखी राहू लागली तर कधी उगाचच चिडचिड करू लागली. संजयला सगळं कळत होतं पण मेघनाशिवाय दुसरी कुणी आवडावी अशी आत्तापर्यंत कुणी भेटलीच नव्हती ना!!! पण आज...........!!!!

आज काहीतरी वेगळं घडलं होतं. माहित नव्हतं का पण कुठे ना कुठे, राहून राहून तो मंजिरीचा सालस चेहरा संजयच्या डोळ्यासमोर येत होता. तिचे ते निरागस डोळे कुणालाही भुरळ पडावी असेच होते. अमुक एक गोष्ट नाही आवडली मला असं तिच्या बाबतीत सांगण्यासारख काही मिळतच नव्हतं संजयला आणि म्हणूनच आजचा नकार उद्यावर ढकलून त्याने वेळ मारून नेली होती.

रात्री जेवणानंतर संजय शतपावली करायला बिल्डिंगच्या खाली उतरला तेव्हा त्याचा मोबाईल वाजला.. मेसेज आला होता. त्याने मोबाईल खिशातून काढला तर मांजिरीचा मेसेज..

मंजिरी : Hii

संजय : Hii

मंजिरी : sorry तुम्हाला असं disturb केलं पण उद्या आपण कुठे भेटायचं हे तुम्ही सांगितलंच नाही नीट म्हणून मेसेज केला.

संजय (मनातल्या मनात.. "अरे हो हिला सात वाजता ऑफिस जवळ भेटूया इतकंच सांगून कलटी मारली मी" असा विचार करून डोक्यावर हात मारत) : ohhkk. राहून गेलं सांगायचं. ते माझ्या ऑफिसच्या इथे बाजूलाच कॉफी शॉप आहे ना तिथे भेटू. Will send u d location tomorrow.

मंजिरी : Ok. Good night ?

संजय ("आता मलाही good night म्हणावच लागेल" असा विचार करून) : Good night ?

मेसेज करून झाल्यावर संजय विचारात चालू लागला "काही वेळातच एखादी व्यक्ती आपल्याशी कशी कनेक्ट होऊन जाते ना!! आता माझ्या मनात तिच्याविषयी काहीही नाही पण तिच्या मनात तर असेलच ना!! म्हणजे तसं तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं मघाशी आणि आत्ता तिने स्वतःहून मेसेजसुद्धा केला. उद्या भेटायचं असं बोललो आहे खरा मी पण मला लग्न च करायचं नाही आहे आणि आज मी फक्त माझ्या आईच्या हट्टामुळे भेटायला आलो होतो हे सगळं तिला सांगून टाकायला हवं. उगाच ती भावनिक गुंतागुंत नको वाढवायला. आज तिथे घरचे सगळेच होते त्यामुळे काहीच बोलता आलं नाही आणि प्रकरण उद्यावर गेलं पण उद्या तिला सगळं स्पष्टपणे सांगून टाकतो. एक काम करू का? तिलाच विचारतो की तू तुझ्या बाजूने नकार देशील का म्हणून? मुलगा आवडला नाही असं सांग सांगतो म्हणजे मग आईचा नंतर मला काही विचारायचा प्रश्नच नाही... वाह!! काय सुचलं आहे मला!!" स्वतःवरच खुश होऊन तरीही बऱ्याचशा गोंधळलेल्या मनस्थितीत संजय शतपावली आटपून घरी जाऊन झोपला.

सकाळी आज संजय मंजिरीला भेटायला जाणार या आनंदात आई भलतीच चांगल्या मूडमध्ये होती. संजयला आवडते तशी भरली वांगी आणि उकड काढलेल्या तांदळाच्या भाकऱ्या करून तिने छान डबा बनवला. सकाळ सकाळ किंचित गूळ घालून केलेल्या भरल्या वांग्याच्या घरभर सुटलेल्या वासानेच संजयने आईचा चांगला मूड ओळखला होता. आत्ता काही बोलून आईचं मन दुखवायला नको म्हणून संजयने जे चालू आहे ते तसच चालू दिलं.

"संजय अरे आज मंजिरीला भेटणार आहेस ना संध्याकाळी तर जेऊन वैगरेच येणार असशील तर मला फक्त एक फोन कर" आई डबा भरता भरता बोलत होती.

"अगं आई जेवून वैगरे काय फक्त कॉफी प्यायला जात आहोत आम्ही. अर्ध्या एक तासात आटपेलच आमचं आणि येईन मी घरी." संजयने स्पष्ट केलं.

तयारी करून संजय ऑफिसला निघून गेला तसा आईने लगेच आपल्या बहिणीला म्हणजे संजयच्या सरिता मावशीला कॉल लावला आणि "हॅलो अगं मी काय म्हणते, मंजिरी जशी आपल्या मनात भरलीय तशीच संजयच्या मनात भरली आहे असं वाटतं आहे मला.. आज भेटायला जाणार आहे तो तिला आणि स्वारी खुशीत आहे. नेहेमीप्रमाणे चिडचिड नाही करत आहे. यंदा बार उडणार वाटतं माझ्या मुलाच्या लग्नाचा" असं म्हणत हसू लागली. त्यानंतर दोघी बहिणींनी लग्नात काय काय करायचं याची जवळ जवळ तास दीड तास गप्पा मारून यादी फायनल करून मगच फोन ठेवला.

इथे संजय दिवसभर मंजिरीशी बोलताना कुठून आणि कशी सुरुवात करावी, तिला नकार द्यायला कसं तयार करावं याची मनात जुळवाजुळव करू लागला.

संध्याकाळी नेमकं निघायच्या वेळेला एक अर्जंट मेल आला आणि संजयला थांबावं लागलं. पटापट काम आटपून घाईघाईने तो ऑफिसमधून निघाला. घड्याळात पाहिलं तर सव्वा सात वाजून गेले होते. मंजिरीचा एकही कॉल किंवा मेसेज आला नव्हता पण.

"हीचा कॉल किंवा मेसेज नाही म्हणजे ही पण आली नसेल का अजून?" विचार करतच संजय कॉफीशॉप जवळ आला. "कॉल करुया का हिला?? नको आत जाऊनच बघतो" म्हणत संजय आत शिरला आणि उजव्या बाजूच्या कोपऱ्यातल्या टेबलवर त्याला आपल्या ओढणीशी चाळा करणारी मंजिरी दृष्टीस पडली.

"अहाहा काय दिसत होती ती!!! हलक्या फिकट पण अगदी फ्रेश अशा पिवळ्या रंगाचा आणि त्यावर नाजूक गुलाबी फुलं अशी प्रिंट असणारा सलवार कमीज, त्यावर एका खांद्यावर घेतलेली त्याच हलक्या गुलाबी रंगाची नाजूकशी लेस असलेली ओढणी, तिचे ते लांबसडक काळेभोर केस आज तिने मोकळे सोडले होते..." तिला लांबूनच एवढं न्याहाळून तिथेच थबकलेला संजय भानावर येत पुढे गेला.

संजय टेबलसमोर जाऊन उभा राहिला तरी तिचं लक्षच नव्हतं. ती खाली बघत आपल्याच विचारात होती. काहीतरी बोलावं म्हणून संजय म्हणाला..

"आलीस पण तू?? सॉरी मला जरा एक अचानक काम आलं म्हणून उशीर झाला"

संजयला असं अचानक समोर पाहून मंजिरी जरा गोंधळली. हसत म्हणाली "इट्स ओके. मी येऊन पंधराच मिनिटं झाली."

खुर्चीत बसत संजयने समोर ठेवलेलं पाणी पीत मंजिरीला पाहिलं तर ती खाली बघून गालातल्या गालात हसत, लाजत होती. आपल्या भावी पतीला असं पहिल्यांदा एकटं भेटताना एका तरुणीची जी अवस्था होईल तीच मंजिरीची होत होती आणि संजय हळूहळू तिच्या या सुंदर दिसण्यात, हलकेच लाजण्यात, वाऱ्यावर उडणाऱ्या केसांना आपल्या बोटांनी कानामागे करण्याच्या तिच्या निष्फळ प्रयत्नात, गालातल्या गालात हसण्यात आणि गोड बोलण्यात पुरता हरवू लागला होता. इतका की तो दहा मिनिटं फक्त तिच्याकडे बघतोय हे त्याला कळलंच नव्हतं. मंजिरी मात्र संजयच्या या एकटक बघण्याने पुरती लाजली होती.

इतक्यात वेटर आला आणि ऑर्डर विचारली. त्याच्या या आवाजाने भानावर आलेल्या संजयला कळलं की तो बराच वेळ मंजिरीकडे फक्त पाहत बसला होता. ओशाळल्यासारख होऊन त्याने दोन कॉफी ऑर्डर देऊन उगाचच आपला मोबाईल काढला आणि त्यात पाहू लागला.

"मी हे काय करतोय??? का असा बघतोय हिच्याकडे?? का हीच सौंदर्य, हिचं दिसणं, हिचं माझ्यासोबत असणं हे सारं मला भुरळ घालतंय?? माझ्या या अशा वागण्यामुळे हिला positive signal मिळेल ना!! मी हिच्या प्रेमात पडलोय, होकार देणार आहे अशी समजूत होईल ना हीची!! का??" स्वतःवरच मनातल्या मनात रागावत संजय मोबाईलमध्ये बघितल्यासारखं करत होता.

इतक्यात बाहेर पाऊस बरसू लागला आणि.........


क्रमशः.....


सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..

साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


©®रश्मी केळुसकर...

🎭 Series Post

View all