Jan 19, 2022
कथामालिका

भेटली ती पुन्हा (भाग ४)

Read Later
भेटली ती पुन्हा (भाग ४)
"चल आवर संजय तयार हो... जायचयं ना आपल्याला" आई आपली तयारी करून बाहेर येत संजयला म्हणाली.

"हो ग माझं काय शर्ट पँट चढवलं की झालं" संजय आळस देत म्हणाला.

"नाही हा, मी तुझा तो दिवाळीत घेतलेला निळ्या रंगाचा शर्ट इस्त्री करून घेतलाय तो घाल. छान दिसतोस तू त्यात" आई हसत हसत म्हणाली.

आई अगदी मागेच लागली म्हणून संजयने घातला एकदाचा तो शर्ट आणि आरशात पाहून तो शर्टची बटणं लावता लावता स्वतःलाच पाहू लागला.

"नाही नाही म्हणता म्हणता आज मी लग्नासाठी मुलगी बघायला चाललोच आहे. खरंतर मनात अजिबात इच्छा नाही आहे पण ही आई ऐकतच नाही आहे. ती तिच्या जागी चुकीची नाही आहे म्हणा. आपल्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नासाठी प्रयत्न करणं हा तिचा हक्क च आहे. कळतंय मला सगळं पण काय करू?? मनातून मेघनाचा विचार जात च नाही आणि नियतीचा खेळ पण काय अजब आहे इतक्या वर्षांनी कालच नेमकी ती मला भेटली. तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं खरं पण तरीही कुठेतरी पाणी मुरतय हे नक्की. काहीतरी आहे तिच्या आयुष्यात जे मला माहित नाहीय... काय असेल बरं..!!! छ्या... मी हे काय विचार करतोय?? तिचं आता लग्न झालंय हे का कळत नाहीय मला?? कदाचित तिला मुलं ही असतील. तिच्याबद्दल काहीच माहीत नसताना उगाच तर्क वितर्क लावण्यात काहीही अर्थ नाही आणि मी आता लग्नासाठी मुलगी बघायला निघालो आहे ही छोटी गोष्ट नाही. समजा ती मुलगी चांगली असेल आणि आईला आवडली आणि मलाही नावं ठेवायला काही जागाच नसेल तर मी कुठल्या आधारावर नकार कळवू?? काय करू???? काहीही कळत नाहीय" स्वतःशीच मनातल्या मनात बोलत संजय कितीतरी वेळ असाच उभा होता इतक्यात बाहेरून आईने पुन्हा आवाज दिला "संजय अरे चल नाहीतर उशीर होईल आपल्याला. सरिता मावशी डायरेक्ट तिथेच भेटणार आहे आपल्याला त्यांच्याकडे. ती निघाली सुद्धा घरातून"

"हो हो आई चल निघूया" म्हणत संजयने मोबाईल खिशात टाकला आणि दोघे निघाले.

तिथे पोहोचल्यानंतर दारातच मुलीचा भाऊ हसतमुखाने स्वागतासाठी सज्ज होता. "पाहुणे आले" अशी वर्दी घेऊन तो लगेच च आत धावला.

"याला बहुतेक आजची हीच मोठी कामगिरी सोपवली होती वाटतं" संजय हळूच आईच्या कानात कुजबुजला आणि हसला. त्यावर आई ही हसली आणि "गप रे" म्हणाली त्याला.

संजय आणि आई घरात जाताच मुलीचे आई बाबा आणि भाऊ "या या बसा" म्हणत पाहुणचार करायला सरसावले. संजयची मावशी दहा मिनिटांपूर्वीच येऊन बसली होती आणि इथून तिथून बरीच ओळख काढून पार झाली होती.

"छान आहे हा तुमचं घर.." हसत हसत संजयची आई म्हणाली आणि घर अगदी निरखून पाहू लागली. जागच्या जागी ठेवलेल्या आणि प्रत्येक भिंतीवर छान सजावट केलेल्या वस्तूंनी त्यांचं विशेष लक्ष वेधलं. घरातील स्वच्छता त्यांना जाणवत होती. घरात येताना उंबरठ्यावर बाहेर काढलेली रांगोळी आणि त्यातली रंगसंगती त्यांच्या मनाला भावली होती. एकूण काय तर दारातल्या रांगोळी वरून आणि घरातल्या एकूण वातावरणावरून संजयच्या आईने मुलगी कशी असेल याचा एक प्रार्थमिक अंदाज मनातल्या मनात लावायला एव्हाना सुरुवात पण केली होती आणि हा एकूणच आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. इथे संजय जरा ओशाळल्यासारखाच बसला होता. उगाचच मोबाईल काढून परत परत खिशात ठेवत होता.

"ती दारात रांगोळी कुणी काढली आहे??" संजयच्या आईने न राहवून विचारलं.

"आमच्या मंजिरी ने.. तिला रांगोळी आणि मेहेंदी काढायची खूप आवड आहे" हसत हसत मुलीच्या बाबांनी सांगितलं.

"अरे वाह.. सुंदर च काढली आहे अगदी. खूप आवडली मला" आपले अंदाज बरोबर येत आहेत याचा कोण आनंद झाला संजयच्या आईला. आता कधी एकदा मुलीला बघते असं झालं होतं. तसं फोटोत पाहिलं होतं पण प्रत्यक्षात सुद्धा ती तितकीच सुंदर आहे का याची उत्सुकता लागली होती तिला.

इतक्यात पाणी घेऊन मुलीची आई आली आणि "घ्या पाणी.. मंजिरी चहा आणि पोहे घेऊन येतेच आहे" म्हणाली.

दोन तीन मिनिटातच मुलगी म्हणजे मंजिरी हातात ट्रे घेऊन, पोहे घेऊन आली.

गोरीपान नितळ कांती, लांबसडक काळेभोर केस, नाकी डोळी अगदी सुंदर, चार चौघात उठून दिसेल अशी, बघता क्षणी नजरेत भरेल अशी मंजिरी समोरून आली आणि संजयच्या आईशी हलकेच हसली. संजयच्या आईला तर पाहताक्षणीच मनात भरली. संजय मात्र मोबाईल मधेच उगाच काहीतरी चाळत बसला होता. त्याच लक्ष च नव्हतं.

हातातला ट्रे भावाच्या हातात देऊन आल्या आल्या आधी मंजिरीने संजयच्या आईला आणि मावशीला वाकून नमस्कार केला आणि गोड हसली. बास्स!!! आणि काय हवं?? आता तर संजयच्या आईसमोर संजय आणि मंजिरी एकमेकांना वरमाला घालत आहेत असं स्वप्न दिसू लागलं.

"संजय अरे ठेव तो मोबाईल आता, बघ मंजिरी आली आहे. पोहे घे" संजयच लक्ष वेधलं जावं म्हणून आई म्हणाली.

तेव्हा कुठे संजयने ओझरतं मंजिरीला पाहिलं आणि पोहे घेतले. पोहे देताना मंजिरीने सुद्धा हळूच संजयला पाहिलं आणि लाजली.

"बस ना तू पण खुर्चीवर मंजिरी" सरिता मावशीने विषयाला हात घालावा म्हणून मुलीला बसायला सांगितलं.

"अं.. हो" म्हणत मंजिरी खुर्चीवर बसली आणि खाली पाहू लागली.

औपचारिक बोलणी सुरू झाल्यावर संजयची आई, मावशी, मुलीचे आई आणि बाबा चांगले गप्पा मारू लागले. इथे संजय आणि मंजिरी मात्र चोरून हळूच एकमेकांना पाहायचा प्रयत्न करू लागले. मंजिरीला संजय फोटो बघूनच आवडला होता. संजय मात्र एक दोन वेळा नजर भेट झाल्यानंतर नजर चोरू लागला. त्याला आता जास्तच ओशाळल्यासारख वाटू लागलं. आईकडे त्याने पाहिलं तर आई ज्या वेगाने गोष्टी ठरवत होती ते पाहून संजयला आई आता परस्पर होकार वैगरे कळवते की काय असं वाटू लागलं.

चहा पाण्याचा कार्यक्रम आटपल्यावर आम्ही आलोच म्हणत मुलीकडचे सगळे आतल्या बेडरूम मध्ये गेले. तसं इथे संजयच्या आईने संजयला लगेच विचारलं "काय मग संजय पसंत आहे ना मुलगी? दिसायला अगदी सुंदर आहे आणि बोलायला ही सोज्वळ. संस्कार अगदी देहबोलीतून कळतच आहेत. सुस्वभावी आहे अगदी.."

"अगं हो हो आई, जरा थांब, तू तर अगदी कौतुकच सुरू केलं तिचं. म्हणजे दिसायला आहेच सुंदर ती पण मी अजून काहीच बोललो नाही आहे तिच्याशी आणि लगेच पसंती कशी कळवू? एक काम करूया आम्ही दोघेच उद्या बाहेर कॉफी प्यायला भेटतो आणि मग कळवतो तुला" वेळ मारून न्यायला आणि मंजिरी नेमकी कशी आहे आणि तिच्या मनात या लग्नाबद्दल काय भावना आहेत हे जाणून घ्यायला संजयने शक्कल लढवली.

इतक्यात मुलीचे आई बाबा, भाऊ सगळेच हसत हसत बाहेर आले आणि "आमचा होकार आहे" असं जाहीर करून टाकलं. त्यांच्या या होकाराने संजयची आई खुश झाली पण संजय मात्र टेन्शनमध्ये आला तरीही त्याने आईला सांगितल्याप्रमाणे उद्या बाहेर भेटण्याचा पर्याय सुचवला. मंजिरी आणि तिचे घरचे लगेच तयार झाले यासाठी आणि उद्या संध्याकाळी संजय आणि मंजिरीच्या भेटीची वेळ ठरली संध्याकाळी सात ची. सगळे अगदी खुश झाले. इतक्यात बाहेर हलकेच पाऊस बरसू लागला.

हा असा पाऊस नेहेमीच सोबत मेघनाच्या आठवणींचा खजिना सोबत घेऊनच यायचा.. अगदी न चुकता.. त्यात अगदी कालच झालेल्या भेटीमुळे संजय आतून अस्वस्थ आणि बैचेन झाला होता. अनेक निरूत्तरीत प्रश्न त्याच्या डोक्यात कालपासून थैमान घालत होते. का कुणास ठाऊक पण मेघनाला आपली गरज आहे असं त्याला राहुन राहून वाटत होतं आणि इथे मंजिरी शी त्याचं लग्न जवळ जवळ ठरत होतं. नकार द्यायला काही कारणही नव्हतं ना!! मंजिरी कुणालाही आवडेल अशीच होती पण मेघना काहीच न विसरावं अशी होती.....


क्रमशः......


सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..

साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


लेख आवडला तर लाईक आणि कमेंट करून मला कळवा आणि पुढील असेच उत्कंठावर्धक सगळे भाग वाचण्यासाठी मला फॉलो करा..

©®रश्मी केळुसकर...ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Rashmi Keluskar

Housemaker

सकारात्मकता आणि लिखाणाची आवड यांचा मेळ साधत व्यक्त होणारी मी?