Jan 29, 2022
कथामालिका

भेटली ती पुन्हा (भाग ३)

Read Later
भेटली ती पुन्हा (भाग ३)

भेटली तू पुन्हा....

भाग ३

रात्रभर पाऊस रिमझिम रिमझिम बरसतच होता आणि इथे संजयच्या मनातील मेघनाच्या आठवणी पुन्हा पुन्हा भिजून ओथंबत होत्या. त्या रात्री संजयला नीट झोप अशी लागलीच नाही त्यामुळे सकाळी उठायला त्याला उशीर झाला. आईचा वाढदिवस म्हणून त्याने आज सुट्टी टाकली होती ना!! इथे संजयची आई आज तिचा वाढदिवस तरी संजय अजून लोळत पडला आहे, विसरला असेल का माझा वाढदिवस? या विचाराने अस्वस्थ होत होती.

संजयचे वडील सहा वर्षांपूर्वी वारल्यानंतर संजय आणि त्याची आई असं दोघांचंच जग उरलं होतं. एकुलत्या एका संजयला लहानपणापासूनच आईचा लळा जास्त. आईच्या शब्दाबाहेर तो कधीच नव्हता. शेजारी पाजारी आणि नातेवाईक सुद्धा त्याला आईचा श्याम म्हणायचे. वडील वारल्यानंतर या आई आणि मुलामधील नातं आणखीनच घट्ट झाले होते म्हणूनच तर दरवर्षी न चुकता संजय आपल्या आईच्या वाढदिवसादिवशी हमखास सुट्टी घ्यायचा आणि दोघे सकाळ सकाळ सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जायचे. आज मात्र हा नियम मोडला होता कारण दरवर्षीप्रमाणे सकाळी संजय उठला नव्हता आणि त्याने आईला शुभेच्छाही दिल्या नव्हत्या त्यामुळे आईला जरा वाईट वाटणंही स्वाभाविक होतं. "मीच उठवू का संजयला?" असा विचार आईच्या मनात आला पण माझाच वाढदिवस आणि मीच आठवण करून द्यायची का असा विचार करून आई आपल्या नेहमीच्या कामाला लागली. पावसामुळे वातावरण छान थंडगार झालं होतं. मस्त चादर डोक्यावर घेऊन संजयला झोप लागली होती.

सकाळचे दहा वाजले तेव्हा मात्र न रहावून आईने संजयला हलवून "अरे वाजले किती बघ!! उठायचं आहे की नाही आज?? तुला आवडतात तसे शेंगदाणे घालून पोहे केले आहेत मी. चल उठ लवकर!!" म्हणत संजयला उठवलं आणि ती स्वयंपाकघरात निघून गेली.

अंगावरील चादर बळेबळेच बाजूला करत डोळे चोळत संजय उठला आणि त्याने घड्याळात पाहिलं तर खरंच दहा वाजून गेले होते. आज आईचा वाढदिवस आणि आपण देवळात जायला लवकर उठायला विसरलो असं मनातच म्हणत संजय लगबगीने उठला. लाडात आईला हाक मारत स्वयंपाकघरात जात त्याने "सॉरी आई" म्हणत "आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा" असं म्हणत शुभेच्छा दिल्या आणि वाकून नमस्कार केला.

"आई यावर्षी मला तुझं गिफ्ट आणायला मिळालं नाही सॉरी कारण काल पावसाने गोंधळ घातला पण आज संध्याकाळपर्यंत तुला तुझं गिफ्ट मिळेल" असं सांगत तो फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला.

इतक्यात संजयच्या आईला तिच्या बहिणीचा म्हणजे संजयच्या सरिता मावशीचा कॉल आला. संजय अंघोळ वैगरे आटपून बाहेर आला तरी आईचा फोन चालूच होता. "या बहिणी दिवसातून रोज किमान एक तास गप्पा मारतात तरी काय बोलायचं राहतं यांचं एवढं काहीच कळत नाही??" असं स्वतःशीच पुटपुटत इशाऱ्यानेच त्याने आईकडे चहा मागीतला. तसा आईने आपला कॉल आटपता घेत संजयसाठी चहा पोहे आणायला आत गेली.

"संजय मला ते गिफ्ट म्हणून साडी वैगरे आणू नकोस हा!!" असं बोलत चहा पोहे आणता आणता संजयच्या आईचा चेहरा खुलला होता.

मावशीचा कॉल येऊन गेला आणि आईचा चेहरा एवढा खुललाय म्हणजे नक्कीच माझ्यासाठी मावशीने लग्नासाठी नवीन स्थळ आणलं असणार याची संजयला कल्पना आली आणि आई साडी नको म्हणते आहे म्हणजे आता मुलगी पाहण्यासाठी आपल्याला गळ घालणार हेही त्याने ओळखलं. आईचा असा अचानक बदललेला लाडीक स्वर फक्त लग्नाचा विषय निघाला कीच ऐकू यायचा संजयला आणि इतक्या वर्षात आपल्या आईला एवढं तर ओळखतच होता तो. आता पुढच्या पाच मिनिटात आपल्यावर भावनिक बळजबरी होणार आहे याची खात्री पटलेल्या संजयने "आई मला एक ऑफिसच अतिशय महत्त्वाचं काम आठवलं आहे, एक अर्जंट मेल करायचा आहे" असं म्हणत विषय टाळण्यासाठी लॅपटॉप काढला.

"अरे राहूदे रे तुझं काम. रोजचच आहे. मी जास्त वेळ घेणार नाही तुझा आणि आज माझा वाढदिवस आहे ना मग आज माझं तू सगळं ऐकलंच पाहिजे." आईनेही तिचं शस्त्र काढलच.

आज वाढदिवस म्हंटल्यावर संजयला आईला टाळणं अवघड जाऊ लागलं.

"हा बोल ऐकतो मी काय म्हणणं आहे तुझं?" संजय निर्विकारपणे म्हणाला.

"हे बघ संजय सरळ मुद्द्यालाच हात घालते. गेली तीन वर्ष लग्नासाठी स्थळ म्हणून इतक्या मुलींचे फोटो तुला दाखवले मी पण तू नीट बघतच नाहीस. आत्ता नाही आत्ता नाही म्हणत आता तिशीचा झालास तू. मला आता हे सगळं घरातलं काम झेपत नाही रे आणि तू ऑफिसला निघून गेलास की मी घरात एकटी पडते. तुझं लग्न झालं तर घरात कसं चैतन्य येईल, माझी सून आली की तिच्या खांद्यावर सगळ्या जबाबदाऱ्या टाकून मी बापडी मोकळी होईन. तुलाही तुझी हक्काची जोडीदार मिळेल आणि खरं सांगू का संजय लग्न ही गोष्ट वेळेच्या वेळीच झालेली चांगली असते. एकदा वय निघून गेलं की काही अर्थ नाही रे. मग नातवंडं येतील आणि घर कसं गोकुळ होईल..." हे सगळं बोलताना आई अतिशय भावूक होऊन स्वप्न रंगवण्यात तल्लीन झाली होती. तिचं बोलणं मधेच खोडत संजय म्हणाला "आई जरा थांब.. पार नातवंडांपर्यंत पोहोचलीस ग तू दहा मिनिटात. जरा ब्रेक मार तुझ्या सुसाट निघालेल्या या गाडीला. मला इतक्यात लग्नच नाही करायचं आहे असं मी मागच्या वेळीच निक्षून सांगितलं होतं ना तुला तरी तू आज पुन्हा तेच तेच का उगाळते आहेस??" संजय जरा रागातच बोलला.

त्याचा रागावलेला स्वर ओळखून आईसुद्धा आज काय तो सोक्षमोक्ष लावायचा असा निर्धार करून बोलली "मला तू माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून या मावशीने सुचवलेल्या स्थळाला भेटायला यायला होकार दे. बास्स... बाकी मला काही नको आणि मी हे सगळं तुझ्याच भल्यासाठी करते आहे ना? बघ तरी हा फोटो पाठवलाय सरिता मावशीने माझ्या व्हॉट्स ॲपवर. कसली सुंदर दिसते आहे ही मुलगी!! नाकी डोळी अगदी देखणी आहे.. बघ तरी" म्हणत त्या मुलीचा फोटो जबरदस्ती संजयसमोर धरला. संजयने बघितल्यासारखं केलं आणि एक दीर्घ उसासा टाकत म्हणाला "आई आज एवढा चांगला दिवस आणि तू काय नको तो विषय घेऊन बसलीस?"

"नको तो नाही हवा तोच विषय आहे मला हा. देवानेच ऐकलं माझं आणि एवढं चांगलं स्थळ तुला सांगुन आलं तेही बरोबर आजच्या दिवशी. दे आता मला माझं गिफ्ट!!" म्हणत एखाद्या लहान मुलीसारखी संजयची आई फुरगटून बसली.

आता आईची समजूत काढण्याशिवाय गत्यंतर नाही असं ओळखून वेळ मारून न्यायला म्हणून संजय उगाचच खोटं हसत म्हणाला "चल ठीक आहे दिलं तुला हवं ते गिफ्ट वाढदिवसाच. येईन मी मुलगी बघायला.. नाहीतरी कांदेपोहे खायला आवडतातच मला.. निदान पोहे तरी खाईन" मिश्कीलपणे खांदे उडवत संजयने बाजी मारल्याच्या आवेशात हातातला लॅपटॉप बाजूला ठेवला आणि आईने दिलेले पोहे खाऊ लागला.

"आई आज काही बनवू नकोस हा.. आज तुला पूर्ण आराम. चल तयारी कर. आपण सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाऊन येऊ आणि बाहेरच जेऊन येऊ. रात्री मी करतो काहीतरी स्पेशल तुझ्या बर्थडेसाठी. तू मस्त आराम कर."

"अरे आराम कसला आता? आपल्याला आजच जायचं आहे त्या मुलीच्या घरी. सरिता मावशीने तसं कळवल सुद्धा आहे त्या मुलीकडच्यांना. संध्याकाळी पाच वाजता चा कार्यक्रम आहे!!"

"काय!!!!!! आज???? नाही हा, आई ही शुद्ध फसवणूक आहे. तू मघाशी असं काहीही म्हणाली नव्हतीस. आजच जायचं आहे वैगरे. हे कधी ठरलं??" आता फुरगटून बसायची संजयवर वेळ आली.

"अरे मला माहित होतं तू काही सहजासहजी ऐकायचा नाहीस आणि माझ्या वाढदिवसाला तू सुट्टी घेणार हे मला माहीत होतं. खरंतर मागच्याच आठवड्यात मावशीने हे स्थळ सुचवलं होतं पण मी आजच्या दिवशी कार्यक्रम ठरवला आणि मुद्दामच आज विषय काढला नाहीतर लग्नाचा विषय काढला की तू काही ऐकूनच घेत नाहीस माझं" आईने अगदी मुत्सद्दीपणाने उत्तर दिलं. आपला प्लॅन यशस्वी झालाय याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता आणि संजय मात्र पुरता यात अडकला होता.


संजयने आईला शब्द दिला म्हणून संजय आजच्या कार्यक्रमाला जायला तयार झाला खरा पण नाखूष होऊनच. त्याचं मन तर अजूनही तिथेच रेंगाळत होतं.... कालच्या त्या चहाच्या टपरीपाशी... पावसात भिजलेल्या मेघनाच्या विस्कटलेल्या केसात आणि तिच्या गालावरून ओघळणाऱ्या प्रत्येक थेंबात....


क्रमशः

सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..

साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


©®रश्मी केळुसकर...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Rashmi Keluskar

Housemaker

सकारात्मकता आणि लिखाणाची आवड यांचा मेळ साधत व्यक्त होणारी मी?