Jan 29, 2022
कथामालिका

भेटली ती पुन्हा (भाग २)

Read Later
भेटली ती पुन्हा (भाग २)इतक्यात त्याचं लक्ष हातातल्या चहाच्या ग्लासकडे गेलं तर चहा थंड होऊन गेला होता... आता चहामध्ये तसं स्वारस्य उरलच नव्हतं त्याचं... त्यामुळे त्याने तो थंड चहा तसाच पिऊन टाकला.... आणि इकडे पावसाचा जोर मात्र कमी व्हायच्या ऐवजी अजूनच वाढला...


"आधी चहा आणि आता पाऊस माझ्या मदतीला धाऊन आला आहे. आज मेघना आणि माझी भेट घडायचीच होती म्हणजे.... चक्क नऊ वर्षांनी!!!!" संजयच्या मनात अनामिक आनंदाची लहर उठली होती... त्याला आठवलं कॉलेज मध्ये असताना असाच पाऊस कोसळत होता आणि मैत्रिणींसोबत पावसात छत्री बाजूला करून गालातल्या गालात हसणाऱ्या मेघनाला त्याने पहिल्यांदा पाहिलं होतं.... छत्री वरून ओघळणारे ते पावसाचे थेंब ती आपल्या हातावर घेत पुन्हा उडवत होती.....अगदी एखाद्या लहान मुलीसारखी.... एका हाताने छत्री सांभाळत ती मधेच तिचे भिजलेले केस गालावरून बाजूला करत होती... आणि संजय हे बघण्यात इतका हरवून गेला की कधी न आवडणारा पाऊस त्याला आवडू लागला हे त्याचं त्यालाही कळलं नाही.....

त्यानंतर मग एका मित्राकरवी केलेली मेघनाशी ओळख... आणि मग हळू हळू फुलत गेलेली संजय आणि मेघना ची मैत्री... ते दिवस खरंच कित्ती सुंदर होते ना!!! पण मनातलं प्रेम व्यक्त करण्याची हिम्मत मात्र कधीच संजयला झाली नाही... मेघना सारखी इतकी साधी, सोज्वळ आणि सुंदर मुलगी... आपण तिला आपल्या मनातलं सांगितलं आणि तिला नाही आवडलं तर ती आपली असलेली ही चांगली मैत्री सुद्धा तोडेल या भीतीने कित्येक वेळा संजय ने ओठांपर्यंत आलेलं सगळं तिथेच थांबवलं होतं आणि म्हणूनच की काय संजय हा आपला एक अतिशय चांगला आणि खरा मित्र आहे ही मेघनाची समजूत दिवसेंदिवस अधिकच दृढ होत गेली.... कॉलेजची ती चार वर्ष खूप धमाल मस्ती केली दोघांनी त्यांच्या दहा जणांच्या ग्रुप मध्ये..... ग्रुप मध्ये एकत्र असतानाही संजय मात्र मनाने कायम फक्त मेघना सोबत असायचा..... आणि अचानक एक दिवस....!!!!

मेघना ने संजयला येऊन सांगितलं की उद्यापासून ती कॉलेज ला येऊ शकणार नाही आहे... कॉलेज च शेवटचं वर्ष होतं..... ती सांगताना रडत होती... तिच्या वडिलांनी तिला सांगून आलेल्या एका श्रीमंत स्थळाशी तिचं असं तडकाफडकी लग्न ठरवलं होतं.... मुलगा वयाने आठ वर्षांनी मोठा होता तिच्यापेक्षा पण श्रीमंत आहे, मुलाकडच्याना घाई आहे सांगून हातचं चांगलं स्थळ जायला नको म्हणून हिला शिक्षण सोडायला सांगत होते.... "काय करायचं आहे पुढे शिकून?? एवढ्या पैसेवाल्या घरात गेल्यावर नोकर चाकर असतील दिमतीला... कुठे नोकरी करायला जावं लागणार आहे?? मग कशाला शिकायचं पुढे??" असं बाबा म्हणत आहेत हे सांगून ती रडत होती.... शिक्षण सोडावं लागणार ही खंत होती तिच्या बोलण्यात.... पण संजय मात्र त्याच प्रेम असं एकाएकी त्याला सोडून जातंय या विचाराने स्तब्ध झाला..... गेल्या चार वर्षांची मैत्री, त्याच्या मनातलं एकतर्फी प्रेम सगळं सगळं संपणार होतं..... त्याला खूप वेळा वाटलं होतं सांगून टाकूया मनातलं पण शब्द साथ च सोडून जायचे, अवसान गळून गेल्यासारख व्हायचं त्याचं आणि नंतर बोलू नंतर बोलू करत ते अबोल प्रेम निराधार व्हायचं..... आजही आत्ता बोलू का?? या गोंधळलेल्या मनस्थितीत असतानाच ती रडत च कधी तिथून निघून गेली होती हे विचारमग्न त्याला कळलं ही नव्हतं आणि त्या नंतर थेट आज..........!!!!

गेल्या नऊ वर्षात त्याचा आणि तिचा संपर्क तुटला होता कारण तिचं लग्न झालं आणि ती तिच्या संसारात सुखी आहे हे काही वर्ष त्याला तिच्या जवळच्या मैत्रिणीकडून कळलं होतं पण त्यानंतर ते ही नाही...... संजय मात्र तिला अजूनही विसरू शकला नव्हता.... घरच्यांनी त्याच्या मागे लागूनही त्याने मात्र लग्न करण्यास ठाम नकार दिला होता.... दुसऱ्या मुलीचा विचार च त्याच्या मनाला शिवला नव्हता.... त्याने ठरवलं होतं मेघना वर त्याचं एकतर्फी का होईना खरं आणि निस्सीम प्रेम होतं.... तिच्या आठवणीत च त्याने जगायचं ठरवलं होतं...........

भानावर येत संजयने पुन्हा मेघनाकडे पाहिलं.
आधी कायम व्यवस्थित, टापटीप राहणारी आणि आत्मविश्वास असलेली मेघना आज मात्र काहीशी अस्वस्थ वाटत होती.... तिच्या सौंदर्याचं तेज चेहऱ्यावरून हरवलं होतं..... "आधी पाऊस कित्ती आवडायचा हिला आणि आज ही अशी उदास का वाटते आहे?? ती खुश असेल ना?? की काही बिनसलं असेल?? विचारू का तिला?? नाही... नको.... लग्न झालं आहे आता तिचं... काहीतरी रोजच्या आयुष्यातल्या लहान मोठ्या कुरबुरी असतील... त्या विचारात असेल..." संजय स्वतःशीच बोलला...

इतक्यात पाऊस जरा ओसरला तशी ती साडी सावरत निघू लागली.... एवढ्या वेळात तिने एकदाही आपल्या बाजूला कोण उभं आहे हे बघितलं नव्हतं... ती आपल्याच विश्वात हरवलेली होती... ती निघते आहे हे पाहून संजय ने गडबडीने बोलला "मेघना!!!!!! ओळखलं का मला??? मी संजय......!!!!!"

"अं..." तिने मागे वळून पाहिलं आणि काहीवेळ पाहतच राहिली.

"अरे संजय.. तू?? कित्ती वर्षांनी??" चेहऱ्यावर उसनं हसू आणून मेघनाने संजयला विचारलं.

"अगं ऑफिसमधून घरी जात होतो तर बाईक बंद पडली माझी म्हणून आडोशाला थांबलो होतो तर तू दिसलीस. आधी ओळखलच नाही मी तुला. कित्ती वेगळी दिसतेस आता? कशी आहेस?"

"अं... मी.. मी बरी आहे. सॉरी हा मी पहिलंच नाही तुला. तू कसा आहेस?"

"मी पण मस्त..." संजयने बोलताना मेघनाची अस्वस्थता टिपली. ती आपल्या नजरेला नजर मिळवत नाहीय हे त्याच्या लक्षात आलं.

काहीतरी बोलावं म्हणून संजयने पुन्हा विचारलं "इथेच कुठे राहतेस का तू??

यावर मेघनाने फक्त होकारार्थी मान हलवून "चल आता निघते मी खूप उशीर झालाय" म्हणत छत्री उघडली आणि ती चालू लागली.

ती आपल्याला टाळते आहे हे संजयला कळत होतं आणि म्हणूनच तिला अडवण्याचा वायफळ प्रयत्न त्याने न करता तिला जाऊ दिलं..... ती थोडी पुढे गेल्यावर अजून जोरात चालू लागली आणि समोरच्या गल्लीत दिसेनाशी झाली.

"समोर तर बैठ्या चाळी दिसत आहेत. इथे राहत असेल का मेघना? पण का? तिचं लग्न तर श्रीमंत मुलाशी झालं होतं ना!! कदाचित इथून शॉर्टकट वैगरे असेल आणि तिचं घर जवळ असेल तिथून." उगाचच तर्क वितर्क लावत संजय तसाच उभा राहिला. एव्हाना पावसाने आपला जोर कमी केला होता.

तिचा नंबर तरी घ्यायला हवा होता... पुन्हा बोलणं तरी झालं असतं असा विचार संजयच्या मनात आला पण ती एक विवाहित स्त्री आहे हे विसरून चालणार नाही हे स्वतःच्या मनाला निक्षून सांगत त्यानेसुद्धा जड पावलांनी चालायला सुुरुवात केली. रया गेलेला तिचा निस्तेज चेहरा संजयच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. बाईक तिथेच ठेऊन टॅक्सी करून तो तसाच विचारात मग्न घरी आला. घरी आई वाट पाहत टीव्हीवर पावसाच्या बातम्या पाहत बसली होती.

"अरे काय संजय कित्ती उशीर?? इथे माझा जीव टांगणीला लागला होता तुझा फोन ही लागत नव्हता कित्ती फोन केले मी तुला!! टीव्हीवर पावसाच्या बातम्या बघून टेन्शन वाढत गेलं माझं आणि तू एक फोन पण नाही केलास उशीर होईल म्हणून." आईचा पार वरचा सा लागला होता.

"अगं आई ऑफिसमधून निघालो आणि रस्त्यात बाईक बंद पडली. कॉल करायला घेतला तुला तर कळलं मोबाईलची बॅटरी पण संपली होती. पाऊस जोरात पडत होता म्हणून तिथेच थांबलो. टॅक्सीच मिळत नव्हती कितीतरी वेळ!! आणि आई हे न्यूजवाले जरा अतीच दाखवतात पावसाचं टेन्शन नाही घ्यायचं ग." संजय आपल्या आईला समजावण्याचा प्रयत्न करू लागला.

आईने जेवण गरम करून दोघांना वाढलं आणि स्वयंपाकघरातील कामं आटपायला ती आत निघून गेली. जेवताना ही लक्ष नसलेल्या संजयच्या मनातून नऊ वर्षांपूर्वीची मेघना आणि आत्ताची मेघना यांची तुलना काही केल्या जात नव्हती. बरेच प्रश्न त्याला सतावू लागले होते. अनेक उत्तरं त्याला शोधायची गरज वाटत होती. बैचेन होऊन त्याने जपून ठेवलेला त्याच्या डायरीतील त्यांच्या ग्रुपचा फोटो काढला. त्यातल्या मेघनाला पुन्हा पुन्हा तो निरखून पाहू लागला. पुन्हा एकदा भेटेल का ती मला? भेटली तर नक्कीच निदान फोन नंबर तरी घेईन मी तिचा. स्वतःशीच पुटपुटत त्याने तो फोटो पुन्हा डायरीत ठेवला.....


क्रमशः......

सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..

साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


लेख आवडला तर लाईक आणि कमेंट करून मला कळवा.

©®रश्मी केळुसकर...
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Rashmi Keluskar

Housemaker

सकारात्मकता आणि लिखाणाची आवड यांचा मेळ साधत व्यक्त होणारी मी?