Login

भेटली ती पुन्हा (भाग १७)

अपूर्ण राहिलेली त्या दोघांची गोष्ट


भेटली ती पुन्हा (भाग १७)
©®रश्मी केळुसकर.

************************************************


आपल्या आईबाबांना आपल्या संसारातलं दुःख कळू न देता मेघना एक एक दिवस काढत होती. तिला खूप वेळा वाटलं की इथून पळून निघून जावं पण जाणार कुठे? "माहेरी परत गेले तर आई बाबांना आधीच बहिणींच्या लग्नाचा धक्का बसला आहे त्यात माझा नवरा असा आहे आणि माझी ही अशी वाताहत झाली आहे हे कळलं तर त्यांना ते सहन नाही होणार" असा विचार करून ती तिथे राहिली. एका थंड आणि गोठलेल्या शरीरासारखं आता तिचं मनही गोठू लागलं होतं हळू हळू. सुरेश ने तर तिला विनाकारण कुणाला काही यातलं सांगितलस तर परिणाम वाईट होतील अशी धमकी सुद्धा दिली होती त्यामुळे त्याला घाबरून ती तिथे राहत होती.

एक दिवस रात्री सुरेश खूप दारू पिऊन घरी आला आणि मेघना झोपली होती तरी तिला तशीच जवळ घेऊ लागला. तो दारूचा वास, त्याचा तो ओरबाडणारा स्पर्श तिला बीभत्स वाटू लागला. तिने त्याला दूर लोटलं तसं त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला आणि त्याने अक्षरशः तिला मारायला सुरुवात केली. त्याचं ते राक्षसी आणि पाशवी वागणं बघुन मेघनाला त्याची किळस वाटली. ती ओरडू लागली पण त्याचा काहीही उपयोग नव्हता कारण तो तिचा समाजमान्य नवरा होता. इतर कुठल्या पुरुषाने जर अशी किळसवाणी जबरदस्ती केली असती तर ती पोलिसांकडे तक्रार तरी करू शकली असती पण नवराच जर असा क्रूर वागू लागला तर कुणाला सांगणार? हतबल होऊन ती जिवंत असून मेलेल्या देहाप्रमाणे निपचित पडून राहिली आणि तो तिला ओरबाडत राहिला.. त्याची तहान भागेपर्यंत... आताशा तिला होणाऱ्या जखमाही सवयीच्या झाल्या होत्या. डोळ्यातून अखंड वाहणारा अश्रूंचा झरा त्याचं झाल्यावर तो झोपून गेल्यावरही तसाच सुरू राहिला... सकाळ पर्यंत. कधी डोळे मिटले आणि कधी दुसरा दिवस उजाडला तिला काहीच कळलं नाही.

सकाळी जाग आल्यावर जेव्हा तिने उठायचा प्रयत्न केला तेव्हा रात्रीच्या जखमा विव्हळू लागल्या. लपेटलेली साडी तिचे हातापाया वरचे निळेकाळे वळ झाकू शकत होती पण मनावर झालेले आघात?? ते तर आक्रोश करतच होते.

मेघना कशीबशी उठली आणि तिने अंघोळ करून घेतली. बाहेर आली तर सुरेश उठला होता आणि तिच्याकडे रोखून पाहत होता. न रहावून मेघना दबक्या आवाजात त्याला म्हणाली "मला खूप दुखतय.. इथलं मला काही माहित नाही. डॉक्टरकडे न्याल का? आईंसोबत गेले असते पण हे त्यांना काय आणि कसं सांगू?" बोलता बोलता ती पुन्हा रडू लागली..


"त्यात काय आहे? माझ्यासोबत चल गाडीने. तुला सोडतो डॉक्टरकडे. मी नाही येणार पण वर. घरी येताना मग रिक्षाने ये परत" चढ्या आवाजात सुरेश खेकसला.


नाईलाजाने मेघना तयार होऊन सुरेश सोबत गाडीने डॉक्टरांकडे गेली. सुरेशने तिला खालीच सोडलं आणि निघूनही गेला. मेघना डॉक्टरांना भेटून निघाली तशी खाली आल्यावर समोर एक सफेद शर्ट आणि सफेद पँट घातलेला आणि गळ्यात खूप साऱ्या सोन्याच्या चैन असलेला एक माणूस दिसला. तिची नजर गेली तर तो तिच्याकडेच पाहत होता. तिने लगेच खाली बघितलं. तो इतका वाईट नजरेने तिला बघत होता की तिला कधी एकदा रिक्षा पकडुन तिथून निघते आहे असं झालं होतं. पाच मिनिटांनी एक रिक्षा आली. एवढा वेळ तो तसाच तिला बघत उभा होता. हातात सिगारेट ओढत बेफिक्रीने तो हवेत त्या सिगारेटचा धूर सोडत मेघनाला नखशिखांत न्याहाळत होता. मेघना रिक्षात बसता बसता तिने पाहिलं तर सुरेश कुठून तरी येऊन त्या माणसाशी बोलताना तिला दिसला.

"सुरेश या अशा विचित्र माणसाला ओळखत असतील का?" मेघनाच्या मनात विचार आला.

घरी आल्यानंतर गोळ्या घ्यायच्या आहेत म्हणून थोडसं जेवून घेतलं तिने. शरीराचे आणि मनाचे घाव असे सहजा सहजी भरणार नव्हतेच पण तरीही आपल्या आयुष्याचे हे भोग आहेत असं म्हणून ती रडत रडत तशीच बेडवर पडून राहिली. इतक्यात सुरेशची आई तिथे आली आणि तिने रडणाऱ्या मेघनाला पाहून विचारलं..

सुरेशची आई : "मेघना... का रडते आहेस ग आणि डॉक्टरांकडे का गेली होतीस? बरं नाही वाटत आहे का तुला?"

मेघना (न रहावुन) : "आई...." असं म्हणून जोरजोरात रडू लागली.

सुरेशची आई : "काल तुमच्या खोलीतून जोरजोरात आवाज येत होता. तुझ्यावर हात उचलला का सुरेशने?"

मेघना : "हो आई... आज मला राहावत नाही म्हणून सांगते तुम्हाला.. आमचं लग्न झाल्यापासून हे मला फक्त एक वस्तू म्हणून वापरत आहेत. मी त्यांची बायको आहे, माझंही मन आहे, मलाही भावना आहेत हे त्यांना कळतच नाहीये. ते फक्त आपला पुरुषी हक्क गाजवतात बाकी काहीच नाही" असं म्हणून मेघना डोळ्यातलं पाणी पुसू लागली.

सुरेशची आई : "माझंच चुकलं आहे बघ.. मी एक आई म्हणून कमी पडले.. याचा बाप कायम दारूच्या नशेत असायचा तेव्हा संसार रेटायला मी घराबाहेर पडले. लोकांची कामं करू लागले. सुरेशकडे लक्ष च दिलं नाही नीट. तो दिवसभर काय करतो, कोणाची संगत करतो हे कधी बघितलंच नाही आणि नोकरी लागलीय असं खोटं सांगून जेव्हा घरात पैसा आणायला त्याने सुरुवात केली तेव्हा त्याच्यावर विश्वास टाकला. मी मग घरात बसू लागले आणि तो बाहेर जाऊन पैसे कमवू लागला. जेव्हा तो चुकीच्या मार्गाने पैसे कमावतो आहे हे मला कळलं तेव्हा बराच उशीर झाला होता कारण तोपर्यंत एक गुंड आणि मवाली म्हणून पोलिसात त्याचा रेकॉर्ड झाला होता. त्याला पैश्याची चटक लागली होती आणि तो काहीही ऐकण्याच्या पलीकडे गेला होता.. इतका की एक आई म्हणून माझा उद्धार करू लागला होता. माझा हा असा गरीब स्वभाव... मी लोकांच्या नजरा टाळायला घरातून बाहेर पडणंच सोडून दिलं. हळूहळू तो सराईत गुन्हेगार झाला आणि चोऱ्या माऱ्या, खंडणी आणि सगळे वाईट धंदे करू लागला. मी काही बोलायला गेले की उलट बोलून मला गप्प करू लागला. तुझ्याशी लग्न करतो म्हणाला तेव्हा मला वाटलं याच्या डोक्यावर अक्षता पडल्या की सुधारेल हा म्हणून याच्या खोटेपणात तेव्हा मी साथ दिली पण नाही.. कुत्र्याच शेपूट वाकडं ते वाकडं च. तुझ्यासारख्या चांगल्या मुलीची याच्याशी लग्न लावून देऊन तुझ्या आयुष्याची वाट लावली मी. दोषी आहे मी तुझी" असं म्हणून सुरेशची आई रडू लागली. आपल्या वाया गेलेल्या मुलामुळे मेघनाच्या आयुष्याची वाताहत उघड्या डोळ्यांनी त्यांना बघवत नव्हती.

मेघना : "आई तुम्ही शांत व्हा.. तुमची चूक नाही, हे माझ्या नशिबाचे भोग आहेत.. जे विधिलिखित आहे ते होणारच. इथे फक्त एक तुम्ही माझा आधार आहात.. तुम्ही रडू नका "

मेघना असं बोलताच सरेशच्या आईने मेघनाच्या पाठीवरून हात फिरवला आणि मेघनाचे डोळे पुसले. सुरेशच्या आईशी असं मनातलं बोलुन मेघनाला जरा बरं वाटलं. एकमेकींना समजावत दोघी बराच वेळ बोलत बसल्या.

त्या रात्री सुरेश जरा लवकर घरी आला. घरी आल्या आल्या मेघनाला हाक मारू लागला. कधी नव्हे ते आज सुरेश आपल्याला हाक मारतोय हे पाहून मेघनाला आश्चर्य वाटलं.

सुरेश : "बरं वाटतंय का तुला आता?"

मेघना (सुरेश इतक्या काळजीने विचारतो आहे हे पाहून भांबावून): "हो आता ठीक आहे"

सुरेश : " उद्या सकाळी लवकर उठ. आपल्याला बाहेर जायचं आहे. माझ्या साहेबांकडे.. तयार हो"

मेघना (काहीशी गोंधळून जात) : "हो चालेल"

आज सुरेशचा असा अचानक बदललेला सुर आणि उद्या बाहेर जायचं आहे हे ऐकून मेघनाला वाटलं की आपल्या वागण्याचा बहुतेक सुरेशला पश्र्चाताप झाला असावा आणि म्हणून तो आता नीट वागायचा प्रयत्न करता असावा. आतातरी काहीतरी चांगलं होईल, सगळं नीट होईल ही आशा तिला वाटली आणि कालचा राकट सूरेश तो हाच का याचं उत्तर शोधत कालच्या उठलेल्या वळांना तिने मलम लावलं.

सुरेशच्या मनात नेमकं काय होतं? दुसऱ्या दिवशी पुढे काय झालं? मेघनाच्या भूतकाळात डोकावताना पुढे काय घडलं हे बघायला नक्की वाचत रहा... भेटली ती पुन्हा.

सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..

साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


कथा आवडत असल्यास लाईक आणि कमेंट करून मला कळवा आणि या कथेचे पुढचे सर्व भाग वाचण्यासाठी मला फॉलो करा..