©®रश्मी केळुसकर
************************************************
संजयच्या मनातील घालमेल सुरूच होती. त्याने ऑफिसला जायची तयारी केली आणि चहा नाश्ता करायला बसला. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याने बघितलं तर मंजिरीचा मेसेज..
"Good morning ?"
रिप्लाय करावा म्हणून त्याने सुद्धा गूड मॉर्निंग लिहून पाठवलं तर मंजिरीचा पुन्हा मेसेज आला..
"आज एका क्लाएंट विझिटसाठी मी तुमच्या ऑफिसच्या इथेच येणार आहे. लंच टाईममध्ये भेटूया का?"
आता मंजिरी ऑफिसच्या जवळच येणार आहे म्हंटल्यावर भेटायला नाही म्हणायला तसं काहीच कारण नव्हतं संजयकडे म्हणून त्याने पुन्हा रिप्लाय केला..
"yes.. sure ?"
"हे स्मायलिजच एक बरं असतं. आपल्या मनात काहीही असेल पण हे स्मायलिज तेच दाखवतात जे बहुतेकदा समोरच्याची अपेक्षा असेल.." स्वतःशीच मनातल्या मनात बोलत संजयने चहा नाश्ता आटपला. "आई आज टिफीन नको ग" म्हणत त्याने बॅग घेतली आणि निघाला. इतक्यात आई लगबगीने बाहेर आली आणि तिने बूट घालत असलेल्या संजयला उत्सुकतेने विचारलं..
"आज काय मंजिरीला भेटणार आहेस की काय दुपारी?" आईने अंधारात बरोब्बर मारलेला खडा संजयला लागला.
"हो ग जरा ती माझ्या ऑफिसच्या जवळच येणार आहे तिच्या कामानिमित्त म्हणून भेट होणार आहे बाकी काही नाही" संजयने उडवाउडवीच उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
"असं कसं? बाकी काही नाही कसं?? एवढं कळत आम्हाला!! अरे एकदा माणूस मनात भरला की सारखं सारखं भेटावसं वाटतंच" आई संजयची मस्करी करत बोलली.
"काहीही असतं तुझं आई.. चल बाय" म्हणत संजयने तिथून जवळजवळ पळ काढला.
"लाजला वाटतं" स्वतःशीच म्हणत आई हसत हसत पुन्हा स्वयंपाकघरात गेली.
"कित्ती विचित्र संयोग जुळून आला आहे माझ्या आयुष्यात सद्ध्या? माझ्या मनातून मेघनाच्या आठवणी काही केल्या जात नाहीत आणि मंजिरीला नाही कसं बोलावं हे कळत नाही. मेघना माझा भूतकाळ होता पण तरीही ती पुन्हा पुन्हा का समोर येतेय माझ्या?? मंजिरी माझा वर्तमानकाळ होऊ पाहते आहे हे कळतय मला पण या दोघींपैकी माझा भविष्यकाळ नक्की कुणासोबत जोडला गेलाय ते कळतच नाही आहे या घडीला!! अरे पण मेघना तर विवाहित आहे त्यामुळे तिचा विचार करणं हे पाप आहे.. कसं कळत नाहीय मला?? शी!!! हे कसले विचार करू लागलोय मी परत.. जाऊ दे" डोक्यातले विचार झटकून टाकत संजयने बाईक स्टार्ट केली.
ऑफिसमध्ये गेल्यावर कामात त्याने स्वतःला झोकून दिलं. मेघनाचा आज वाढदिवस त्यामुळे राहून राहून आज जरा जास्तच आठवण येत होती त्याला तिची. दुपारचा एक वाजला तसा मंजिरीचा कॉल आला..
मंजिरी : "हॅलो.. हा येताय ना तुम्ही खाली. लंचला जाऊया ना आपण?"
संजय : "हा.. हो.. आलोच हा"
संजयने पटकन आपला कॉम्प्युटर बंद केला आणि खाली गेला.
बिल्डिंगच्या खाली आल्यावर त्याने बघितलं तर मंजिरी त्याच्याच येण्याकडे डोळे लावून उभी होती. अगदीच टापटीप राहणारी आणि प्रोफेशनल वाटली ती त्याला तेव्हा. तिच्याशी हसत संजय हातानेच हाय करत चालत राहिला. मंजिरी ही त्याच्या मागे चालू लागली. काहीतरी बोललं पाहिजे म्हणून संजय म्हणाला...
"आज एकदम सरप्राइज दिलंस तू भेटायचं ठरवून"
मंजिरी : "हो म्हणजे अगदीच अचानक ठरलं माझं. सकाळी सुचलं की आज तुमच्या ऑफिसच्या जवळ येतेय तर भेट होईल म्हणून. लंचला जाऊ"
संजय : "इथे एक चांगलं रेस्टॉरंट आहे तिथे जाऊया जेवायला"
मंजिरी : "हो हो, तुम्हाला इथलं माहीत असेल चांगलं. मला काहीही चालेल. खूप भूक लागली आहे खरंतर"
दोघेही हसले आणि त्या रेस्टॉरंट मध्ये आले. तिथे बऱ्यापैकी गर्दी होती दुपारची वेळ असल्यामुळे. एक टेबल रिकामं दिसलं तिथे जाऊन ते दोघे बसले...
मंजिरी संजयला एकटक पाहत होती. त्याचं कायम शांत आणि संयमी असणं तिला खूप आवडू लागलं होतं. आज ती त्याला भेटणार म्हणून खास नुकताच घेतलेला नवा कुर्ता घालून आली होती. हलकासा मेकअप तिचं सौंदर्य खुलवत होता. संजय कालसारखा आजही आपलं सौंदर्य बघून घायाळ होईल याची तिला खात्री होती. ती गालातल्या गालात हसत मध्ये मध्ये खाली बघत होती.
संजयने तिला काय खाणार म्हणून विचारलं आणि ऑर्डर दिली. ऑर्डर घेऊन वेटर निघून गेल्यावर सहज त्याचं लक्ष समोर बसलेल्या मंजिरिकडे गेलं तर ती त्याच्याकडेच पाहत होती. तो हसला तशी ती ही हसली आणि लाजली. संजय जाणून बुजून इकडे तिकडे बघू लागला.
आजूबाजूला बघताना त्याचं लक्ष समोर बसलेल्या मंजिरीच्या मागच्या टेबलवर गेलं... तिथे एक मुलगी आणि समोर चक्क मेघना बसली होती. संजयने मेघनाकडे बघायला आणि तिनेही समोरून संजयला बघायला अशी एकच नजरानजर झाली आणि संजयच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. आज मेघनाला त्या गुलाबी साडीत, सागर वेणी घालून त्यावर गजरा माळलेला बघून तिचं ते मोहक रूप पुन्हा पुन्हा नजरेत साठवून घ्यावं वाटलं त्याला. त्याची नजर तिच्यावरच खिळून राहिली. संजय आपल्याकडेच बघतोय हे पाहून मेघना जरा बावरली. तिने खाली मान घालून खायला सुरुवात केली. तिच्या समोर बसलेल्या वानिताची अखंड बडबड चालूच होती पण आता मात्र मेघना त्यातलं काहीही ऐकत नव्हती... तिला ऐकू येतच नव्हतं.. कारण समोर असं अचानक संजयला बघून तिच्या मनात सप्तसूर निनादू लागले होते. ती संजयची नजर टाळायला नजर खाली करूनच खात राहिली.
"संजय... अहो काय झालं? काय बघताय तुम्ही? कुणी ओळखीचं आहे का तुमच्या?" मंजिरीने संजयला असं एकटक समोर बघताना बघून कुतूहलाने विचारलं.
मंजिरीच्या प्रश्नाने भानावर येत संजय तिच्या काही लक्षात येऊ नये म्हणून पटकन बोलला.. "अं... नाही ग सहज च तंद्री लागली माझी. तू बोल ना.. आता पुन्हा तुला इथून तुझ्या ऑफिसला जायचं असेल ना?"
मंजिरी : "हो आज जरा काम जास्त आहे. संध्याकाळी पण उशीरच होईल मला. हे असं बाहेरची कामं असली की ऑफिसची इतर कामं राहून जातात आणि मग पुन्हा जाऊन करावी लागतात."
संजय : "हो.. ना"
मंजिरीशी बोलताना संजयच लक्ष मात्र मेघनाकडेच होतं. हळूच तो तिला बघत होता. मेघनाने मात्र आपली नजर जाणीवपूर्वक संजयला बघण्यापासून टाळली आणि आपलं आटपून ती वनिताला म्हणाली "चल झालं ना? माझं तर झालंय. लंच टाईम संपायच्या आत पोहचायला हवं आपल्याला."
तिथून लवकर निघून जाण्यासाठी मेघनाची धडपड सुरू होती. अजून किती वेळ ती अशी नजर चोरणार होती म्हणा!! कारण संजय आपल्याकडे बघतोय का हे बघायला नाही नाही म्हणताना तिने आत्तापर्यंत तीन चार वेळा चोरटा कटाक्ष टाकलाच होता. संजय तर वरवर मंजिरीशी बोलत आहे असं दाखवत मेघनाला आपल्या डोळ्यात साठवून घेत होता. त्याचं हे असं बघणं शेवटी मेघनाला सहन झालं नाही आणि "हे काहीतरी वेगळं आणि चुकीचं घडतंय" अशी चाहूल तिच्या मनाला लागली. ती ताडदिशी उठली आणि आपले हात धुऊन बॅग उचलून पैसे द्यायला काउंटरवर गेली. ती अशी अचानक घाईने निघालेली बघून वानितानेही पटकन हात धुतले आणि पळतच तिच्या मागे गेली.
वनिता : "अगं मेघना अजून आहेत पंधरा मिनिटं आपला लंच टाईम संपायला. कशाला इतकी घाई करतेस आणि मी आपल्या सरांना सांगून आले आहे."
मेघना : "अगं एक काम आठवलं मला अर्जंट द्यायचा आहे एक रिपोर्ट" वनिताला कसंबसं समजावत मेघना चालू लागली.
"ती संजयच्या सोबत होती ती त्याची बायको असेल का? की प्रेयसी?? कुणीतरी मुलगी आहे एवढंच पाहिलं मी. चेहरा काही मागे वळुन पहिला नाही. ऑफिसमधील असेल नाहीतर कुणी मैत्रीण.. कुणी का असेना!! मी का विचार करतेय? पण संजय असा एकटक का बघत होता माझ्याकडे? पूर्वीसारखाच.. काय आहे नक्की त्याच्या मनात?? पण त्याच्या मनात काहीही असो माझ्या मनात हे असले विचार येणं आता शक्यच नाही.. मी आता खूप पुढे निघून आलेय.. \" प्रेम \" ही संकल्पना माझ्यासाठी नाहीच आहे.. तेव्हाही नव्हती आणि आता असूच शकत नाही... नाही.." मनातलं विचारांचं काहूर घेऊन मेघना पटापट पावलं टाकत चालत राहिली.
इथे संजय ओझरत्या का होईना पण आजच्या दिवशी मेघनाच्या झालेल्या भेटीने सुखावला होता....
क्रमशः..................
पुढे काय घडेल हे पाहण्यासाठी नक्की वाचत रहा "भेटली ती पुन्हा"...
कथा आवडत असल्यास लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा.
सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..
साहित्यचोरी हा गुन्हा आहे.
©®रश्मी केळुसकर...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा