भेटली ती पुन्हा (भाग ७)

अपूर्ण राहिलेली त्या दोघांची गोष्ट


संजयला असं समोर बघून मेघनाच अवसान च गळून पडलं होतं खरंतर पण स्वतःला सावरत तिने हातातल्या रुमालाने आपल्या चेहऱ्यावरील घाम पुसला.. आवंढा गिळत ती म्हणाली..

"मी इथेच पुढे राहते जरा.. इथून जरा या गल्लीतून जवळ पडतं म्हणून इथून जात होते. Thank u तू माझी त्या मवालाच्या तावडीतून सुटका केलीस म्हणून. खूपच अचानक समोर आला तो आणि माझा हात धरला त्यामुळे मला काही कळलंच नाही आणि मी ओरडणार इतक्यात मागून तू आलास."

मेघनाच्या या उत्तराने फारसं समाधान न झालेल्या संजयने आजूबाजूला पाहिलं आणि "मी सोडू का तुला घरापर्यंत?" असं विचारलं. त्याच्या अशा विचारण्याने मेघना पुन्हा कावरीबावरी झाली आणि हाताने आपला पदर चाचपडू लागली. खाली बघून उगाचच हाताने आपले केस कानामागे करून आता याला काय उत्तर द्यावं असा विचार करू लागली. तिला असं बैचेन झालेलं बघून संजयला सुद्धा जरा ओशाळल्यासारख झालं. "आपण उगाच असं विचारलं का? कॉलेजची मैत्रीण असली तरी एक विवाहित स्त्री आहे ती. मी तिची थोडीशी मदत काय केली आणि एकदम घरी सोडू का विचारतो आहे?"

मनात असे उगाचच नको ते विचार करत संजय पुन्हा स्वतःलाच मनात म्हणाला "नाही नाही ती विवाहित असली तरी ती माझी मैत्रीण आधी आहे आणि मैत्रीच्या नात्याने आता या अशा वेळी तिला मी मदत म्हणून तिच्या घरी सोडूच शकतो. किंबहुना माझं कर्तव्य आहे हे.." या क्षणी आपली मेघनाला गरज आहे असं स्वतःच स्वतःशी ठरवत संजय मेघनाची चलबिचल जाणूनबुजून दुर्लक्षित करत पुन्हा म्हणाला.. "अगं चल ना इथे जवळच आहे म्हणतेस ना तुझं घर मग चल येतो मी सोडायला"

संजय जवळजवळ आग्रह करतो आहे असं वाटू लागल्यावर मेघना म्हणाली "नाही नको अरे.. जाते मी. माझा नेहमीचा रस्ता आहे हा तसा. तुला कशाला त्रास? जाते मी. Bye"

असं म्हणून लगेचच मेघना वळून चालू देखील लागली. संजय यावर काय प्रतिक्रिया देतोय याची वाटही न बघता ती तडक समोरच्या गल्लीच्या दिशेने पटापट चालत होती. तिचं असं वागणं संजयला जरा चमत्कारिकच वाटलं. "आपल्याला ही टाळते आहे का? पण का? कदाचित हिच्या नवऱ्याला असं ती कुणा मित्रासोबत वैगरे आलेलं आवडत नसावं किंवा मग इतक्या वर्षांनी आम्ही भेटलो आहोत म्हणून तिला कंफर्टेबल वाटलं नसेल माझ्यासोबत.. पण मी तर तिची मदतच करत होतो ना.. आणि इतकी चांगली मैत्री होती आमची मग का ही असं वागते आहे आता?" अनेक शंकाकुशंका मनात घेऊन तर्कवितर्क लावत संजय मागे फिरला.

"आजही मेघना अस्ताव्यस्तच दिसत होती.. साधीशीच साडी आणि जेमतेम मागे बांधलेले केस.. चेहऱ्यावर तेजच दिसत नव्हतं तिच्या. काहीतरी हरवल्यासारख वाटत होतं तिच्याकडे बघून. तिचं ते डोळ्यात साठवावं वाटणारं सौंदर्यच कुठेतरी हरवलं आहे तिच्या या अशा अघळपघळ राहण्यात.. पण हो!! आज एक जाणवलं मला... त्या दिवशी ती मला बघून जशी गोंधळून गेली होती तशी आज गोंधळली नाही. सुरुवातीला मला बघून तिच्या डोळ्यात एक चमक दिसली पण नंतर कुठे राहतेस विचारलं तेव्हा पुन्हा ती टाळाटाळ करू लागली. का अशी वागते आहे ही??" अजूनही न राहावून मेघनाचाच विचार करत संजय बाईकपाशी आला. "पोहचली असेल ना ही घरी नीट?" पुन्हा त्याच्या मनात शंका निर्माण झाली पण तिचा काहीच कॉन्टॅक्ट नंबर नसल्यामुळे हा विषय इथेच सोडून देण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरला नव्हता.. मघाशी खरंतर मेघना निघू लागल्यावर तिच्या मागे जावं असं क्षणभर वाटलं होतं त्याला पण मग तिला आवडेल की नाही या विचाराने तो तिथेच थांबला होता.

एक दीर्घ उसासा टाकत, मान हलवत तो बाईकवर बसला आणि निघाला.

इथे मेघना घरी पोचली. खांद्याला लावलेली बॅग तिने काढून खुंटीला लावली आणि ग्लासात पाणी घेऊन ते पित पित समोरच्या खुर्चीत बसली. कितीतरी वेळ ती तशीच त्या खुर्चीत बसून एकटक शून्यात बघत बसली. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली. ती उठली आणि खिडकीत येऊन उभी राहिली. खिडकीतून बाहेर पाऊस बघू लागली. परवा याच पावसात भेटलेला संजय आणि आता आज पुन्हा... ऐनवेळी तिच्या मदतीला धाऊन आलेला..

"पण मी कशी वागले त्याच्याशी? त्या दिवशीसुद्धा तो माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा मी लगेच तिथून निघाले आणि आजतर तो माझीच मदत करत होता. माझ्या सुरक्षेसाठी मला घरी सोडू पाहत होता आणि मी... मी मात्र सरळ सरळ त्याला टाळून निघून आले. काय वाटलं असेल त्याला??" झाडांवरील पानावरून ओघळणाऱ्या त्या पावसाच्या थेंबांकडे पाहत, गळ्यातल्या मंगळसूत्राशी हाताने चाळा करत ती स्वतःलाच प्रश्न विचारत होती. इतक्या वर्षांनी का होईना कॉलेजचे ते मज्जा मस्तीचे दिवस तिला आठवले. हा असा पाऊस पडू लागला की कॉलेजच्या बाजूला असणाऱ्या त्या वडापावच्या गाडीवर जाऊन ते सगळे मित्र मैत्रिणी प्रत्येकाकडे असणारे आहेत नाहीत तेवढे सगळे पैसे गोळा करून त्यात किती येतील तेवढे वडापाव घ्यायचे आणि मग वाटून खायचे. तिला आठवलं बरेचदा तिच्याजवळ पैसे नसायचे तेव्हा संजय त्याच्याकडचे पैसे द्यायचा आणि तिच्यासाठी वडापाव घ्यायचा. तो पाऊस आणि गरमागरम वडापाव... आहा!! काय मस्त वाटायचं त्या पावसात तेव्हा.. एका हाताने छत्री सांभाळत, पाठीला बॅग लावून, वडापाव खाण्याची मजाच वेगळी.. सगळं सगळं आठवून मेघना स्वतःशीच हसली....

"असं वाटतंय पुन्हा नऊ वर्ष मागे जावं आणि त्या जुन्या दिवसांमध्ये स्वतःला झोकून द्यावं. पुन्हा त्या पावसात मनमुराद भिजावं... अगदी लहान मुलीसारखं. भिजून मग घरी जाऊन आईचा ओरडा खावा आणि मग तिने केलेला आल्याचा गरमागरम चहा पीत पुन्हा खिडकीतून पाऊस डोळेभरून पहावा..." भूतकाळातल्या त्या रम्य आठवणी उराशी कवटाळत कितीतरी वेळ खिडकीतून त्या पावसात डोळ्यांनीच भिजत ती तशीच उभी होती. या आठवणीत रमताना कधी तोच पाऊस अश्रू बनून तिच्या डोळ्यातून वाहू लागला तिचं तिलाच कळलं नाही. गालावरून ओघळत जेव्हा ते अश्रू मिळेल त्या दिशेने वेगाने पळू लागले तेव्हा मात्र भानावर येत तिने आपले डोळे पुसले आणि खिडकी बंद करून टाकली.

खिडकी बंद करून आपल्या भूतकाळातील आठवणी हृदयाच्या कप्प्यात बंद करून टाकल्याच्या आवेशात तिने पदराने डोळे पुसून टाकले आणि हातपाय धुऊन कपडे बदलून घेतले. जेवणाची तयारी करायला हवी आता म्हणत तिने कुकर लावायला घेतला. दोन माणसांचा डाळ भात लावून तिने आणलेली पालेभाजी निवडायला घेतली.

डोळे पुसून टाकले म्हणजे अश्रू थांबले असं नाही ना होत.. ती स्वतःला कामात गुंतवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती पण राहून राहून ते जुनेच दिवस तिला हवेहवेसे वाटत होते.

तिला आठवलं ते कॉलेजमध्ये असताना संजयच तिच्याकडे हळूच चोरून बघणं.. तिची नजर जेव्हा जेव्हा संजयकडे जायची तेव्हा तेव्हा तो तिला तिच्याकडेच पाहताना दिसायचा. बरेचदा त्याने लगेच इकडेतिकडे बघून न बघितल्यासारखं केलेलंसुद्धा तिने पाहिलं होतं. त्याचा तो निष्फळ प्रयत्न बघून त्या क्षणी तो तिला खूपच निरागस वाटायचा. तेव्हा तिला त्याचा राग कधीच आला नव्हता उलट याच्या मनात काहीतरी चाललंय याची कल्पना येत होती. तो मात्र कायम एक चांगला मित्र म्हणून तिच्याशी वागत होता. संजयच्या या निखळ मैत्रीला नक्की काय समजावं याचा त्या वयात निष्कर्ष न लावू शकलेलं मेघनाच मन आता मात्र त्याच्या अशा अचानक पुन्हा पुन्हा तिच्या समोर येण्याचे अनुमान लावू पाहत होतं.

"नियतीच्या मनात चांगलं काहीतरी असेल का??"

या प्रश्नाचं उत्तर शोधत विचारमग्न ती तशीच बसून होती आणि कूकरच्या पहिल्या शिट्टीच्या आवाजाने तिची तंद्री भंग झाली.


क्रमशः.........


सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..

साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


©®रश्मी केळुसकर...


🎭 Series Post

View all