भय इथले संपत नाही.पर्व 2 भाग 3

एक अनामिक चाहूल प्रिया ओळखू शकेल का?


भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 3

मागील भागात आपण पाहिले की देवीची पूजा करताना प्रियाला ह्या देवळात काहीतरी वेगळे आहे हे जाणवत होते.त्यांनतर शेतावर कोणीतरी कानात बोलल्याचा आवाज.नंतर वाड्यातसुद्धा कोणीतरी आसपास आहे असे सतत जाणवत होते.आता पाहूया पुढे.


निशा आणि प्रिया बोलू लागल्या,"निशा,तुलासुद्धा तो आवाज ऐकू आला होता ना?

"निशा इकडेतिकडे पहात म्हणाली,"हो,मलासुद्धा तो गूढ आवाज ऐकू आला.नक्कीच ह्या वाड्यात काहीतरी वेगळे आहे."

तेवढ्यात अचानक खोलीतील वातावरण बदलू लागले.एक धुरकट गंध खोलीत पसरला.प्रिया काही बोलणार एवढ्यात निशाने तिला गप्प रहायची खूण केली.अचानक मंत्रध्वनी ऐकू यायला लागले.त्याबरोबर प्रिया आणि निशाच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली.


"प्रिया! ये प्रिया! अग उठ लवकर."उमा कितीतरी वेळ निशा आणि प्रियाला हाक मारत होती.


प्रियाला दुरून काहीतरी ऐकू येत असल्याचा भास होत होता.हळूहळू प्रियाने डोळे उघडले.सकाळचे नऊ वाजले होते.प्रियाला काल रात्रीचे काहीही आठवत नव्हते. काल रात्री निशा आणि ती कधी आत येऊन झोपल्या?काहीही आठवत नव्हते.

प्रियाने अतिशय प्रयत्नपूर्वक डोळे उघडले.अरुणा म्हणाली,"प्रिया काय हे? आपल्याला आज विनय फिरायला नेणार होता.कितीवेळ झोपलाय तू आणि निशा."


आता प्रियाने चमकून निशाकडे पाहिले.दोघींनी गप्प राहणेच पसंद केले.त्यानंतर स्वाती ओरडली,"आवरा यार लवकर उशीर होतोय. एकतर दोन दिवस झाले मी माझ्या फोटोग्राफी ब्लॉग वर काहीच अपलोड केले नाहीय.त्यात तुम्ही इथे झोपा काढताय."

निशा हसत म्हणाली,"अग गावाकडच्या निवांत वातावरणात लागून गेली झोप.तुम्ही तिघी खाली जा.आम्ही आवरून येतोच."


त्या तिघी बाहेर जायला निघाल्या.त्यानंतर निशाने दरवाजा बंद केला आणि प्रियाकडे वळून म्हणाली,"काल झालेला प्रकार तुझ्या लक्षात येतोय का?"

प्रिया म्हणाली,"हो,हाच तर माझ्या संशोधनाचा विषय आहे.पण तुला सगळे कसे समजते निशा?"

निशा हसत म्हणाली,"वेळ आल्यावर नक्की सांगेल. सद्या माझ्यावर विश्वास ठेव.या वाड्याभोवती नक्कीच काहीतरी गूढ आहे."

प्रिया म्हणाली,"आपण आज रात्री शोध घेऊ.आवर लवकर नाहीतर ह्या तिघी परत ओरडत येतील वर."


निशा आणि प्रिया तयार होऊन खाली आल्या.विनयची नजर हटेना.प्रिया अतिशय सुंदर दिसत होती.शेवटी उमाने कोपर मारला त्याला,"माझ्या मैत्रिणींशी टाईमपास नको हा."

तितक्यात ह्या दोघी खाली आल्या.स्वाती ओरडली,"निघा लवकर,आधीच किती उशीर केलाय."

तितक्यात थांबा असा करारी आवाज कानावर आला.हिराबाई खाली आल्या. विनयकडे पहात त्या म्हणाल्या,"विनय सांगितलेले लक्षात ठेवा.नसते धाडस करू नका."

त्यानंतर प्रियाकडे पाहून म्हणाल्या,"काही ठिकाणं,गोष्टी आणि विषय न उकललेले योग्य असते."


एवढेच बोलून त्या निघून गेल्या.सगळेच क्षणभर थबकले.इतक्यात उमा लगबगीने म्हणाली,"चला ग लवकर.आपल्याला उशीर होतोय."


सगळ्याजणी पटकन बाहेर पडल्या. वाड्याबाहेर पडताना निशा आणि प्रिया क्षणभर थबकल्या.एक गूढ चाहूल अजूनही जाणवत होती.विनयने गाडी काढली ह्यावेळी कोणीच पुढे बसले नाही प्रियाला जागा दिली त्यांनी.वर स्वातीने ऐकवल,"तंत्र आणि मंत्रच बोलायचे असतील तर तुम्ही दोघेच बसा पुढे."


विनय हसत म्हणाला,"आवडीचे विषय आहेत तर गप्पा रंगणार की."बोलताबोलता गाडी गावाबाहेर आली. देवराईकडे जाणाऱ्या रस्त्यावर गाडी चालू लागली.

विनय पुन्हा प्रियाला म्हणाला,"मी खूपवेळा मंदिर आणि त्यावर कोरलेल्या अक्षरे आणि चिन्हांचा अर्थ शोधायचा प्रयत्न केला आहे."

इतक्यात स्वाती ओरडली,"विनय......"


विनयने अचानक ब्रेक लावला.स्वाती थरथरत होती.उमा म्हणाली,"स्वाती काय झाले?"


स्वातीच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.अरुणा म्हणाली,"स्वाती बोल काय झाले?"

स्वातीने बाहेर पाहिले आणि ती गोंधळात पडली.दरवाजा उघडून स्वाती बाहेर आली.पाठोपाठ सगळेजण बाहेर आले.स्वातीने सगळीकडे फिरून पाहिले.विनयने स्वातीला खाली बसवले.तिला पाणी प्यायला दिले.आता स्वाती थोडी शांत झाली होती.विनय म्हणाला,"स्वाती तुला बर वाटतेय का?"

स्वातीने मान हलवली.उमा काही बोलणार इतक्यात निशाने तिला आता नको अशी खूण केली.सगळेजण पुन्हा गाडीत बसले.स्वाती हळूहळू शांत झाली.तरीही तिच्या मनातला गोंधळ संपला नव्हता.गाडीसमोर आलेली आकृती कोणाची होती?बाकी कोणालाही काहीच दिसले नाही.म्हणजे मला भास झाला असेल.स्वातीने मनाची समजूत काढली.

गाडी पुढे धावत होती.देवराई जवळ येऊ लागली.प्राचीन काळी पूर्वजांनी जोपासलेली परिपूर्ण जैविक परिसंस्था म्हणजे देवराई.


गर्द दाट झाडी.सगळीकडे भरलेला हिरवा रंग अतिशय सुंदर वातावरण होते.खाली उतरताना स्वातीने कॅमेरा काढला.विनयने सुद्धा त्याचा कॅमेरा आणला होता. काल आजी असल्याने सगळेजण जरा दबकत होते.आज मात्र सगळे समवयस्क असल्याने बिनधास्त गप्पा चालू होत्या. दाट झाडीतून जाणारी पायवाट आणि आजूबाजूने असलेला निसर्ग.


इतक्यात अरुणा म्हणाली,"उमा,आपण येताना रात्री पाहिलेली पडकी गढी दिसतेय बघ इथून."

सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या.उमा म्हणाली,"चला लवकर आपल्याला वर पोहोचायचे आहे."


उमाचे बोलणे प्रियाला खटकले.ती म्हणाली,"उमा,तू आणि तुझ्या घरचे त्या गढीबद्दल विषय टाळताय.काही खास कारण आहे का?"

स्वाती म्हणाली,"झाली हीच्यातली संशोधिका जागी."


पण निशाने विषय निसटू दिला नाही,"विनय नक्की कारण काय आहे? काल त्या पार्वतीबाईसुद्धा गूढ बोलल्या."


विनय म्हणाला,"नक्की कारण आम्हाला माहीत नाही.लहान असल्यापासून आम्ही हेच ऐकतोय.ती जागा शापित आहे.तिकडे जायचे नाही."


सगळेजण मंदिराजवळ पोहोचले.आज निवांत पाहता येणार होते.स्वातीने कॅमेरा काढला.आता निवांत फोटो काढायचे होते. विनय आणि प्रिया मंदिरावरील फोटो काढत होते.मंदिरात असलेली देवीची मूर्ती पाहून अरुणा म्हणाली,"प्रिया,ही मूर्ती नेहमी आपण पाहतो तशी वाटत नाही."


त्यावर प्रिया हसून म्हणाली," अगदी बरोबर.ही मूर्ती गण नायिकेची आहे.मातृसत्ताक समाजात अनेक नायिका पुजल्या जात असत.संपूर्ण भारतभर अशी अगदी मोजकी मंदिरे आहेत.पण ह्या मंदिराचा कुठेही उल्लेख नाही."

विनय म्हणाला,"हो,मीसुद्धा खूप शोध घेतला याचा.पण कुठेच संदर्भ सापडत नाही.इथे कोणाला संशोधन करायची परवानगी दिली जात नाही.पुजारी यायच्या आता फोटो काढून घ्या."


विनयने भराभर फोटो काढले.प्रिया म्हणाली,"यापूर्वी फोटो का नाही काढून ठेवले?"


विनय म्हणाला,"खूपदा प्रयत्न केला.पण गावातून बाहेर गेल्यावर फोटो आपोआप गायब होत.असे अनेकदा झाले.आता तू इथे आहेस तर ह्या लेखांचा अर्थ इथेच उलगडता येईल."


विनयने दिलेले उत्तर आणि ह्या मंदिराचा इतिहासातून गायब असणारा उल्लेख ह्या दोन्ही गोष्टींमुळे प्रियाला ह्यात धोका आहे असे सतत जाणवत होते.ती काही बोलणार इतक्यात पुजारी येताना दिसले.


पुजारी आल्यावर प्रियाने त्यांना विचारले,"तुम्ही आजही पाली भाषेतले मंत्र म्हणता?तुम्हाला भाषा येते?"


पुजारी हसत म्हणाला,"नाही येत.ह्या मंत्रांचे उच्चार पिढ्यानपिढ्या पुढे येत राहिलेत.भाषेचे जाणकार मात्र इतिहासात लुप्त झाले."


पूजा आटोपली आणि सगळेजण दर्शन घेऊन खाली यायला निघाले.तेवढ्यात स्वाती पाय घसरुन पडली.तिला फार लागलं नाही.सगळेजण दुपारपर्यंत घरी पोहोचले.सगळ्याजणी वर खोलीत आल्या.संध्याकाळी जवळच्या कुलदैवत असलेल्या मंदिरात जायचे होते.फ्रेश होऊन जेवण करायला खाली या असा रखमाने निरोप दिला.


जेवण करून सगळ्यांनी मस्त ताणून दिली.बरोबर चार वाजता रखमाने दारावर थाप दिली,"उमाताई आव उटा लवकर."


उमा उठली आणि सगळ्यांना जागी करत होती.स्वातीला हात लावला आणि वेगाने हात मागे घेतला.स्वातीने अंग तापलेल्या तव्याइतके गरम होते.तिने बाकीच्यांना उठवले.स्वातीला जागे करायला पुन्हा निशाने तिला हात लावला.तिलाही तोच अनुभव आला.


प्रियाने स्वातीला हाक मारली,"स्वाती,ये स्वाती उठ ना."


तेवढ्यात स्वाती म्हणाली,"नका उठवू मला.नाहीतर परत झोपणार नाही मी."


हा आवाज मागे उभ्या रखमाने ऐकला.ती तडक धावत खाली गेली.इकडे स्वातीचा आवाज असा काय येतोय?ह्यामुळे सगळ्या चिंतेत पडल्या.प्रियाने स्वातीच्या चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे मारले.अक्षरशः त्याची वाफ झाली.एवढ्यात रखमा आणि पाठोपाठ हिराबाई आत आल्या.हिराबाई स्वातीजवळ उभ्या राहिल्या त्यांनी स्वातीच्या कपाळावर हात ठेवला आणि काही पुटपुटू लागल्या.पाच मिनिटांनी स्वातीने डोळे उघडले.

सगळे आपल्याकडे असे काय बघतात म्हणून ती घाबरली.निशाने सगळ्यांना खुणावले.हिराबाई जाताना निशाला जवळ बोलावून म्हणाल्या,"काही शक्ती असतात हे मान्य करायला शिका.शहरात राहिला म्हणजे सगळे समजले का?स्वातीला कुठे काही लागलं आहे का?"

निशाने नकारार्थी मान हलवली.सगळ्याजणी तयारीला लागल्या.


प्रिया आणि निशा मात्र चिंतेत होत्या.नक्की स्वातीला काय झालं?हिराबाईंनी तिला कसे बरे केले?मंदिरावरील मंत्रांचा अर्थ काय?
वाचत रहा.
भय इथले संपत नाही. 
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all