भय इथले संपत नाही.पर्व 2 भाग 11

महादेव कडे असलेली लक्षणे पाहून विभावरी आता सामर्थ्य आणि मातृत्व दोन्ही साठी त्याला मिळवू शकेल का?



भय इथले संपत नाही.पर्व 2 भाग 11

मागील भागात आपण पाहिले, विभवारीने राणी अवंतिका संदर्भात रहस्य शोधून काढले.त्याबरोबर तीन बळी द्यायचे होते.त्यातील दोन बळी तर समोर होते.परंतु काळया शक्ती तिला सावध करत होत्या. वाड्याच्या बाहेर नेऊन बळी द्यायचा होता.विभावरी यात यशस्वी होईल का?


विभावरी आता विचार करू लागली.सगळ्यात आधी चिंतामणरावांचा धाकटा भाऊ महादेव याचा बळी द्यायचा.येत्या अमावस्येला.


त्यासाठी आधी विधी करायची जागा आणि साहित्य जमवायला हवे.विभावरी आत आली. पहाट होत आली.सगळे सरदेसाई गाढ झोपेत होते.विभावरी हसली.तिने मंत्र म्हणून जखिन बोलावली कामे करायला.

विभवारीने तिला आदेश दिला,"आत येऊन कामे कर."

तशी ती कराकरा दात वाजवत म्हणाली,"इथ रक्षा कवच आहे.मी आत येऊ शकत नाही."

विभावरी हसत म्हणाली,"रूप बदल.तुला एका सामान्य स्त्रीच्या रुपात आत येता येईल."

जखीन आत यायला निघाली.पण तिला प्रवेश मिळेना.विभवरी चिडली.तिने आत्माबंधन मंत्र जपला.तीन पुण्यात्मे प्रकट झाले.

विभावरी जखिनीला म्हणाली,"तू ह्या गावात रहा.तुझी कामगिरी तुला सांगते."

जखीन निघून गेली.बंधन केलेल्या आत्म्यानी सगळी कामे करताच विभवारीने त्यांना कैद करून ठेवले.सकाळ होऊ लागली. एकेकजण जागा होऊ लागला.


द्वारकाबाई घाईने उठल्या.सगुणाबाई नाहीत म्हणजे देवपुजेची तयारी करायला हवी.त्या आंघोळ आटोपून खाली आल्या.बाकी सगळे आवरले होते.देवपुजेची तयारी मात्र नव्हती.

त्यांना विचार करताना पाहून विभावरी म्हणाली,"धाकट्या बाई,मला माहित नाही.तयारी कशी करायची."


द्वारकाबाई म्हणाल्या,"अग एकटीने कामे केलीस.जा आता आराम कर.बाकीचे मी बघते."

विभावरी खोलीत आली.तिने बंधन केलेल्या आत्म्यापैकी एकाला तिचे रूप घ्यायचा आदेश दिला,"मी बाहेरून येईपर्यंत इथे विभावरी म्हणून थांबायचे आहे.कोणाला काही सांगायचा प्रयत्न केला तर खबरदार."


विभावरी बाहेर येताच लगेच तिने वायुगमन मंत्र जपला.ती जखिनीच्या घरी आली.

विभावरी म्हणाली,"आता मी तुला जादुई सौंदर्य बहाल करते.त्याद्वारे तू महादेवराव सरदेसाईला अमावस्येच्या दिवशी जंगलातील गुहेत घेऊन यायचे."

जखिण म्हणाली,"महादेवराव मारुतीचा भक्त.ब्रह्मचारी आहे तो."


विभावरीने आपली नखे जखीनीच्या गळ्याभोवती रुतवली,"मला तो हवाय.नाहीतर तुझा जीव जाईल.आता तू ठरव काय करायचे."


विभावरी वाड्यावर परतली.तोवर दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती.


"विभावरी,अग खाली येतेस ना?"द्वारकाबाईंनी हाक मारली.

विभावरी हळूच खाली आली.जेवत असताना ती म्हणाली,"महादेव भाऊजी नाहीत आज पंक्तीला."

सासूबाई म्हणाल्या,"अग आता उत्सव येईल.आखाड्यात तयारी करत असेल.आता रोज रात्रीपर्यंत तिथेच असेल तो."

हे ऐकताच विभवारीचे डोळे चमकले.तिला हवी ती माहिती मिळाली होती.दोन दिवसांनी सगुणाबाई परत आल्या.

वाड्यात शिरताना काळया शक्ति हसत होत्या.सगुणाबाई सावध झाल्या.नक्कीच काहीतरी घडले असणार.त्या आत आल्या.


द्वारकाबाई पळत आल्या.सगुणाबाईंना पाहून त्या म्हणाल्या,"धाकट्या बाई अहो रहायचे की आठ दिवस माहेरी."


सगुणाबाई हसल्या,"थोरल्या बाई,वाडा सोडून रहायचे मला शक्य नाही."

तेवढ्यात विभावरी आली.सगुणाबाईंना पाहून ती मनातून थोडी धास्तावली.तरीही शांत राहणे भाग होते.काहीतरी करून पुढील काही दिवस सगुणाबाईंना दुसरीकडे गुंतविले पाहिजे.हा विचार करत असताना तिची नजर सगुणाबाईंच्या मांडीवर बसलेल्या विष्णूवर गेली.विभावरी हसली,तिला मार्ग सापडला होता.


दुसऱ्या दिवशी विष्णू खाली खेळत असताना तूप कढवलेल्या भांड्यात भात खायला घुटमळत होता.तेवढ्यात ती म्हातारी आली.

तिने गुपचूप विष्णूला भात खायला दिला.विष्णूला ती म्हणाली,"मी खायला दिलं सांगू नगा कुणाला."


विष्णू हसत खेळायला गेला.दुपारी अचानक विष्णूला थंडी वाजून आली.त्यानंतर अंग गरम झाले.सगुणाबाईंनी घरगुती औषधे देऊनही फरक पडेना.तेव्हा त्यांनी नोकराकडे निरोप पाठवून वैद्याला बोलवले.

वैद्य आले आणि त्यांनी तपासले.ते म्हणाले,"खाण्यात काहीतरी आले असेल.दोन तीन दिवस काळजी घ्या.नीट होऊन जाईल."


सगुणाबाई आता पूर्णपणे मुलाची काळजी घेण्यात व्यस्त झाल्या.विभावरी आता मंत्र साधना करू लागली. वाड्याभोवती असणाऱ्या काळया सावल्या तिला मदत करायला आत येतील अशी व्यवस्था करायला हवी.


त्यासाठी सुरक्षा कवच भेदले पाहिजे.तिने वाड्याच्याभोवती फिरून पाहिले.आठही दिशेला एकेक गण देवता होती.त्याबरोबर एकेक पवित्र वृक्ष होता.

हे कवच तोडायला हवे.त्यासाठी यातील एक वृक्ष नष्ट व्हायला हवा.विभावरी सावकाश योजना आखत होती.


त्याप्रमाणे तिने आग्नेय दिशेला असणाऱ्या वृक्षाच्या मुळाशी अपवित्र जल टाकायला सुरुवात केली.त्याबरोबर काही विषारी द्रव्य मिसळून टाकली जात होती.


इकडे सगुणाबाई द्वारकाबाईंना म्हणाल्या,"आठही वृक्षांची काळजी घ्या."

द्वारकाबाई म्हणाल्या,"तुम्ही बाळाकडे लक्ष द्या.आम्ही करतो सगळी कामे."


विभावरी हसून त्यांच्याऐवजी हे काम स्वतः करत असे.दोन दिवसांनी विष्णू बरा झाला.खेळू लागला.


आता सगुणाबाई वाड्यातील गोष्टी पहात होत्या.त्यांना कवच कमजोर झालेय असे जाणवत होते त्यांनी वाड्याची चक्कर मारायचे ठरवले.


एवढ्यात मळ्यावरून गडी धावत आला.मळ्यात उभ्या पिकाला आग लागली होती.पंधरा वीस माणसे आगीत जळून खाक झाली.सगुणाबाई,त्यांचे यजमान आणि घरातील सगळेच शेताकडे निघाले.



इकडे शेतावर आग लागली. महादेवराव तेव्हा तिथेच होते.आगीत मजूर होरपळत होते.

तेवढ्यात चांगुणा नावाची म्हातारी ओरडू लागली,"माझी भाची आत रायली.आजच कामावं आली व्हती.वाचवा!"


महादेव उभ्या पिकात आत घुसले.एका बाजूला थरथर कापत ती उभी होती.अप्रतिम लावण्य असलेली.तिला महादेव हाताला धरून जाऊ लागले.इतक्यात साडीने पेट घेतला.आता विचार करायला वेळ नव्हता.महादेवने साडी अंगावरून काढून टाकली त्यांचेही कपडे पेटले होते.समोर विहीर होती.त्यांनी तिला उचलून विहरीत उडी मारली.


वर आग पिकाला लागली होती आणि खाली विहिरीच्या थंड पाण्यात दोन देहाना.अंगावरचे वस्त्रांचे अडथळे दूर होताच दोन्ही घडीव सौंदर्य एकमेकात विरघळत होती. तिच्या डोळ्यातील नशा ब्रह्मचारी व्रत संपवून गेली.


चार पाच तासांनी आग विझली.दोघे भानावर आले.महादेवरावांनी जवळ पडलेले धोतर तिला गुंडाळायला लावले.ती हळूच पलीकडे झोपड्यांच्या दिशेने गेली.


इकडे घरचे सगळे पोहोचले होते.मजूर वस्तीत आकांत चालला होता. काळे ठीक्कर पडलेले मृतदेह ओळखतही नव्हते.

"महादेव कुठे दिसत नाही?",चिंतामणराव म्हणाले.


तसे नोकर चारही दिशेला त्यांना शोधू लागले.विभावरी आणि चिंतामणराव कंदील घेऊन शोधत होते.तेवढ्यात आवाज ऐकून महादेव म्हणाला,"दादा,मी इथे विहिरीत आहे.आगीत कपडे जळाले.आता अंगावर काहीच नाही."

चिंतामणराव विभवारीकडे पहात म्हणाले,"मी उपरणे आणि पटका सोडतो.तो गुंडाळ."


महादेव बाहेर आला.समोर विभावरी पाहून तो ओशाळला.जेमतेम अंग झाकेल एवढे कपडे.त्यातून दिसणारे मर्दानी शरीर.

विभावरी हसली,तिची योजना सफल झाली.फक्त तिला स्वतःला.त्याला भोगायचे होते.कारण आता नव लक्षणे असलेला हाच एकमेव पुरुष ह्या घराण्यात होता.जो तिला अंश देऊ शकत होता.

तेवढ्यात सगळे घरचे आले आणि महादेव पटकन निघून गेला.


इतकी भयानक घटना पाहून आख्खे गाव घाबरले होते.अचानक आग लागली कशी?सगुणाबाई चिंतेत पडल्या.त्यांना काहीतरी खटकत होते.तरीही त्या शांत राहून सगळ्यांना धीर देत होत्या.


विभावरी आनंदात होती.तिला आता महादेव हवा होता.जे सहज शक्य होते.पण त्या आधी सासऱ्याना मारायचे.कारण महादेव बरोबर तिला आता संग हवा होता.चेटकीण वंश वाढवण्यासाठी.


दुसऱ्या दिवशी आगीची चौकशी आणि मजूर लोकांना धीर देण्यासाठी सासरे शेतावर काही दिवस राहणार असे ठरले.


ते पाहताच विभावरी म्हणाली,"मामंजी,तुमच्या सोबतीला मी आणि हे थांबतो."


यात कोणालाही वावगे वाटले नाही.विभावरीने म्हाताऱ्या बाईला सगळे समजावले आणि ती बाहेर पडली.


विभावरी यशस्वी होईल का?तिला कसे आणि कोणी कैद केले?

वाचत रहा.
भय इथले संपत नाही

🎭 Series Post

View all