भय इथले संपत नाही पर्व 2भाग 4
मागील भागात आपण प्रिया आणि विनय पुन्हा मंदिराजवळ सगळ्यांना घेऊन गेले.मंदिराचे रहस्य उलगडले जावे यासाठी त्यांनी फोटो काढले.परत येताना स्वातीला पडल्याने थोडे लागले.घरी आल्यावर स्वातीला प्रचंड ताप आला. हिराबाईनी स्वातीला बरे केले.त्यानंतर सगळे कुलदैवत असलेल्या खंडोबा मंदिरात दर्शनाला निघाले.आता पाहूया पुढे.
स्वातीला काहीही आठवत नव्हते.तिला उमा आणि अरुणा आडून आडून विचारत होत्या.पण तिला फक्त ती झोपली होती एवढेच आठवत होते.सगळेजण दर्शनाला जायला निघाले.बाहेर पडणार एवढ्यात सात आठ माणसे वाड्यात आली.गावातली ही माणसे रडत होती.
त्यातील एक म्हातारी बाई विनयला म्हणाली,"इनामदार आव माझ्या सुनला वाचवा.ती लई कसतरी करती हाय."
विनय पुढे होणार इतक्यात हिराबाईंचा करारी आवाज घुमला,"यशोदे,आम्ही वाड्यावर आहोत.विनयला काय म्हणतेस?"
ती म्हातारी हात जोडत म्हणाली,"मोठ्या बाई माज चुकल, पर कालपासून माझी नाजूका तापल्या तव्यावर ठेवल्यासारख तळमळत हाय."
दुसरा एक म्हातारा म्हणाला,"मोठ्या बाई,ही समदी लक्षण."
तेवढ्यात त्याला थांबवत हिराबाई विनयला म्हणाल्या,"विनय,तुम्ही आणि विनायक दादा निघा.इकडचे आम्ही पाहू."
नाईलाजाने सगळ्यांना निघावे लागले.प्रियाला मात्र सतत यात काहीतरी जाणवत होते.नक्की काय झाले असेल ह्या बाईच्या सुनेला. स्वातीचे अंग सुद्धा असेच गरम झाले होते.पण आता बाहेर जावे लागल्याने पुढे काय घडेल कळणार नव्हते.
एवढ्यात एक तरुण बाई सगळ्यांना झुगारून आत घुसली.केस अस्ताव्यस्त,अंग धुळीने भरलेले,बेभान अशी ती बाई चार चार पुरुषांना आवरत नव्हती.ह्या सगळ्यात लक्ष वेधून घेत होते तिचे डोळे.अतिशय भेदक आणि गूढ व क्रूर अशी नजर होती तिची.तिला थोपवनाऱ्या पहारेकऱ्यांना ती म्हणाली,"मला आन माझ्या मालकीनीला न्हाय थांबवू शकत तू."
असे म्हणून तिने अगदी सहज त्या चारही पहारेकऱ्यांना फेकून दिले.त्यानंतर तिला पकडायला कोणीच पुढे येईना.ती मात्र वाड्याच्या दिशेने चालत येत होती.तिच्या डोळ्यातील क्रूर भाव पाहून कोणाचीही तिला अडवायची हिंमत होईना.तेवढ्यात हिराबाई बाहेर आल्या.
तिच्याकडे पहात ठाम आवाजात गरजल्या,"थांब,काहीही झाले तरी वाड्यात प्रवेश करू शकत नाहीस तू."
तशी ती खदाखदा हसू लागली.मला रोखले तरी तिला थांबवू शकणार नाही तू.काल तिचा अंश वाड्यात आलेला तुला समजला सुद्धा नाही."
तशा हिराबाई क्रोधाने म्हणाल्या,"जिथून आलीस तिथेच परत जा."
असे म्हणून हिराबाई मंत्र म्हणू लागल्या. नाजुका ओरडू लागली.भिंतीवर डोके आपटू लागली.सैरावरा धावू लागली.शेवटी हिराबाईंनी मंत्र उच्चार करत अभिमंत्रित भस्म तिच्या अंगावर फेकले आणि नाजूका खाली कोसळली.
हिराबाई शांतपणे विनयकडे वळत म्हणाल्या,"तुम्ही निघा.देवदर्शनाला विलंब नको."विनयने मान हलवली आणि सगळे गाडीत बसले.
गाडीत बसल्यावर मात्र अरुणाला रहावले नाही,"उमा हे सगळ काय आहे?आम्ही आल्यापासून पाहतोय.काहीतरी वेगळे घडतेय."
उमा म्हणाली,"मी आणि विनय दादा शिक्षणासाठी लहान असल्यापासून शहरात होतो.दादा तरी ह्या विषयात रस घेई पण मी कधी जाणून घेतलेले नाहीय."
प्रिया म्हणाली,"विनय,हा आजचा प्रकार वेगळा होता.नेहमी खेडूत भूत बाधा वगैरे असा प्रकार नव्हता हा."
विनय म्हणाला,"ह्या सगळ्यांची उत्तर शोधायचा प्रयत्न यापूर्वी एकदा केला होता."
निशा अचानक म्हणाली,"पण उत्तर मिळाली नाहीत ना?"
विनय चमकून म्हणाला,"हो,पण तुला कसे माहित?"
निशा म्हणाली,"प्रिया,विनय आणि तुम्ही सगळ्याजणी आता ती वेळ आलीय.मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगायची."
स्वाती म्हणाली,"म्हणजे?तुझ्याबद्दल काय सांगणार आहेस?"
निशा म्हणाली,"नीट ऐका,भारत देशात तंत्र मंत्र साधना हजारो वर्षे केली जाते.मातृसत्ताक पद्धत असताना स्त्रियासुद्धा ह्यात भाग घेत.काही स्त्रियांचे यावर अतिशय प्रभुत्व असे."
प्रिया म्हणाली,"हो,वाचलं आहे मी.कलिमातेच्या पूजक असणाऱ्या ह्या स्त्री पंथाबद्दल."
निशा पुढे सांगू लागली,"मंत्रांद्वारे मिळणाऱ्या शक्ती ह्या निसर्ग संतुलन जपत.ह्या साधू आणि साध्विना त्यामुळे प्रचंड आदर दिला जाई.पण त्यानंतर काही स्त्रियांना सत्ता आणि अमरत्व हवे वाटू लागले.अघोरी जसे आजही दिसतात तशा चेटकीनी दिसत नाहीत."
अरुणा हसली,"निशा काहीही सांगू नकोस."
इतक्यात अरुणा निशाकडे वळली.निशा संपूर्ण बदलली होती.निशा म्हणाली,"ऐका, चेटकीनी काळा जादू करतात.तसेच त्यांना रोखणाऱ्या योद्धा म्हणून आम्ही काम करतो."
प्रिया म्हणाली,"म्हणजे?चेटकीण आजही असते?"
निशा म्हणाली,"देव आणि दानव एकाच वेळी अस्तित्वात असतात.माझ्या पूर्वज स्त्रियांनी अनेक काळया चेटकिनिना हरवले आहे.पण....ह्या गावात मला एक वेगळीच शक्ती जाणवते आहे.ह्या सगळ्यांची उत्तरे त्या मंदिरावर कोरलेल्या गोष्टीत आहे.ते कोणतेही मंत्र नाहीत.पण मला पूर्ण पाली भाषा येत नाही."
प्रिया म्हणाली,"इथून परत गेल्यावर आपण याचा शोध घेऊ."प्रिया असे म्हणताच क्षणी स्वातीच्या हातात तिचा गळा होता आणि स्वाती वेगळ्याच आवाजात म्हणाली,"काहीही झालं तरी ह्यावेळी आम्ही बळी मिळवणारच.सोडणार नाही कोणाला."
इतक्यात निशाने एक धागा स्वातीच्या हातावर बांधला आणि स्वातीच्या हाताची पकड सुटली आणि प्रियाचा गुदामरलेला श्वास मोकळा झाला.
निशा पुढे बोलू लागली,"सकाळी जेव्हा स्वाती खाली पडली तेव्हा त्या शक्तीचा काही अंश तिच्या आत प्रवेश करून गेला.आता आपल्याला अधिक सावध रहायला हवे."
स्वाती घाबरली,"निशा,मला काही होणार नाही ना?"
निशा म्हणाली,"सद्या तरी नाही.परंतु ती शक्ती तुला वश करायचा प्रयत्न करेल हे नक्की.हा धागा हातातून काढू नकोस अजिबात."
तेवढ्यात एक छान पॉइंट पाहून स्वाती म्हणाली,"थांबा,इथे थोडे फोटो घेऊ आपण."
सगळेजण उतरून खाली आले. संधीकाळ असलेली वेळ. सूर्य अस्ताला जायच्या तयारीत होता.स्वाती कॅमेऱ्यात वेगवेगळ्या बाजूने फोटो घेत होती.इकडे बाकीच्या मोबाईलवर सेल्फ्या टिपण्यात दंग होत्या आणि प्रिया व विनय नकळत एकमेकांकडे पहात होते.प्रियाच्या गालावर रुळणारी बट आणि तिचे गोड हास्य विनयच्या मनात इंद्रधनुष्य फुलवत होते.इकडे प्रियाची काही वेगळी अवस्था नव्हती.कमालीचा देखणा आणि नावाप्रमाणे विनयशील असलेला हा मुलगा तिला आवडला होता.
ते दोघे एकमेकांत हरवले असतानाच उमा ओरडली,"ये चला लवकर नाहीतर उशीर होईल आपल्याला."नाईलाजाने सगळे गाडीत येऊन बसले.
गाडी सुसाट देवदर्शनाला निघाली. हेमाड पंथी बांधणीचे भव्य मंदिर लांबूनही अतिशय सुंदर दिसत होते.विनय आणि उमा बरोबर असल्याने सगळ्यांना अगदी विनासायास दर्शन झाले.हिराबाई ह्या मंदिराच्या ट्रस्टी होत्या.दर्शन घेऊन सगळेजण खाली आले.तेवढ्यात एक भिकारी प्रियाजवळ आला.प्रियाने पैसे द्यायला पर्स मध्ये हात घातला.
तितक्यात तो म्हणाला,"तिची नजर सगळीकडे आहे.तुला सावध रहायला हवे."
असे म्हणून एक मळकट गाठोडे प्रियाच्या हातात देऊन तो वेगाने गर्दीत दिसेनासा झाला.उमा म्हणाली,"प्रिया,ते घाणेरडे गाठोडे फेकून दे."
का कोणास ठाऊक प्रियाने ते गाठोडे गाडीच्या डिकीत टाकले.दर्शन करून सगळेजण रात्री नऊच्या सुमारास वाड्यावर पोहोचले.सकाळी घडलेल्या प्रकाराचा कुठे मागमूसही नव्हता.आज जेवायला बासुंदी पुरी होती.हिराबाई स्वतः प्रेमाने मुलींना वाढत होत्या.जेवण झाल्यावर सगळ्या आत आल्या.
स्वातीने फोटो ब्लॉगवर टाकायचे म्हणून कॅमेरा लॅपटॉपला जोडला.स्वाती फोटो स्क्रोल करत असताना अचानक अरुणा किंचाळली,"स्वाती थांब!हे बघ आपण गावात आलो तेव्हा रात्री तू घेतलेले गढीचे फोटो."
एव्हाना सगळ्याजणी गोळा झाल्या सगळ्याजणी डोळे फाडून पहात होत्या कारण फोटोत मोडक्या गढीच्या जागी एक सुंदर सजवलेली गढी दिसत होती आणि समोर एक धूसर आकृती.
हा फोटो पाहून सगळेच चक्रावले.अरुणा म्हणाली,"स्वाती पुढचे फोटो बघ.ती पार्वती आपल्याला भेटली तेव्हाचा बघ."
स्वातीने फोटो पुढे स्क्रोल केले.पार्वती फोटोत होतीच पण त्या प्रत्येक फोटोत एक धूसर आकृती दिसत होती.काही वेळा समोर तर काही वेळा पाठमोरी.
पाठमोऱ्या आकृतीमध्ये तिची अगदी पोटरिपर्यंत रुळनारी जाडजूड वेणी स्पष्ट दिसत होती.धूसर आकृतीत सुद्धा तिचा आकर्षक बांधा कळत होता.तेवढ्यात वाड्यात मंत्र ऐकू येऊ लागले.सगळेजण आपोआप झोपी गेले.निशा स्वतःला जागे ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत होती.शेवटी डोळे बंद होताना तिला खोलीत कोणीतरी प्रवेश करत असलेले दिसले.
नक्की काय असेल गढीचे रहस्य? आकृतीत दिसलेली स्त्री कोण असेल? निशा पुढे काय सांगेल? देवळात भेटलेला भिकारी कोण होता?
रहस्य उलगडेल वाचत रहा
भय इथले संपत नाही.
©®प्रशांत कुंजीर
भय इथले संपत नाही.
©®प्रशांत कुंजीर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा