भावकी 3 अंतिम

.
त्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता. सर्व बायका एका ठिकाणी बसून गप्पागोष्टी करत होत्या. कीर्ती सुदधा रमली होती आपल्या सासुरवाडीत. तेवढ्यात किर्तीला बोलवायला एक चुलत दिर आला..

"वहिनी, घरात बोलावलं आहे तुम्हाला.."

कीर्ती आत गेली आणि दिराने खोलीचा रस्ता दाखवला..कीर्ती गोंधळत आत गेली. पाहते तर काय, सुहास दारू पिऊन उलट्या करत होता आणि खोली पूर्ण खराब झाली होती, सुहासला कसलंही भान नव्हतं...तो झोकांड्या देत कसाबसा इकडून तिकडे चालत होता.

कीर्तीचा संताप झालेला,

तेवढ्यात तिचा दिर तिला म्हणाला,

"वहिनी हे सगळं साफ करून बाहेर या.."

तिने रागाने त्याच्याकडे पाहिलं..सर्व चुलत भावंडांनी मिळून सुहासला खूप दारू पाजली होती आणि जेव्हा सुहासला त्रास व्हायला लागला तेव्हा सगळी मंडळी हात वर करून बाहेर पळाली.

किर्तीने ठरवलं, आता याला कायमचा धडा शिकवायचा. तिने मोबाईल काढला आणि सुहासचं झोकांड्या देणं, उलट्या करणं सगळं मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलं. खोली साफ करून ती बाहेर आली.

दुसऱ्या दिवशी सुहासला जाग आली तेव्हा त्यालाच कळत नव्हतं की रात्री नक्की काय झालेलं...लग्न पार पडलं, कीर्ती सुहासला म्हणाली,

"चला निघुयात आता.."

"तू जा, मी अजून थांबेन 2 दिवस.."

किर्तीने मोबाईल काढला आणि सुहासला व्हिडीओ दाखवला..सुहास प्रचंड घाबरला...

"यासाठी गावाकडे पळायचे का तुम्ही सारखे? कितीदा सांगायचे मी ती भावकी असली तरी असं संसार सोडून त्यांच्याकडे पळू नका, आधी स्वतःचा संसार सांभाळा आणि मग भावकीकडे बघा...पण ऐकायचं नाही असं ठरवलंच होतं ना?? इतका माज करतात ना तुम्ही माझी भावंडं म्हणून?? हीच भावंडं काल तुम्हाला त्रास व्हायला लागला तर बाहेर पळून गेलेली...मी आले तुमच्या ओकाऱ्या साफ करायला....आता गपगुमान घरी चला नाहीतर हा व्हिडीओ अख्ख्या भावकीला दाखवेल..."

सुहास गपगुमान घरी निघाला...
घरी गेल्यावर पण किर्तीने त्याचा चांगलाच समाचार घेतला, सुहासकडे आता स्पष्टीकरण देण्यासारखं काही उरलं नव्हतं...

त्या दिवसापासून त्याला समजलं..की आधी आपलं कुटुंब, मग भावकी....तो आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ लागला आणि गावी फक्त आई वडिलांसाठी चार महिन्यातून एकदा जाऊ लागला...

कारण त्याला माहित होतं, आधीसारखं पुन्हा वागलो तर बायको अख्या फॅमिलीत व्हिडीओ व्हायरल करून देईन...

व्हिडिओच्या भीतीने का होईना, नवरा आपल्या संसारात लक्ष घालू लागतोय ही किर्तीसाठी एक सुखद बाब होती.

🎭 Series Post

View all