Feb 29, 2024
ऐतिहासिक

भाऊबीज मानाची

Read Later
भाऊबीज मानाची

मावळ मुलुखात चारशे वर्षांपर्वी. "सगुणे,आग ये बया उठ की लवकर.आग जात्याव बसाय होव का नाय.दिवाळी आलिया जवळ."

सगुणा पटकन बाहेर आली,"आक्का आग उठतच व्हते म्या.चला चटशिरी दळून टाकू."

सगुणा आणि सारजा सख्ख्या बहिणी आणि जावासुद्धा. जातेगवच्या जिवाजी पाटलांच्या लेकी आणि वडगावच्या जानकोजी पाटलांच्या घरच्या लक्ष्मी.

दोघी बहिणी दळायला जात्यावर बसल्या आणि आपसूक ओव्या ओठातून बाहेर येऊ लागल्या.सण दिवाळीचा आला
बंधू आला ग पाहूणा
शेजी पुसती कौतुकानं
कोण राजस देखणा?


सगुणा ओवी म्हणू लागताच सारजाचे डोळे भरून आले.

सगुणा म्हणाली,"आक्का,रडू नग बाई."

सारजा म्हणाली,"तीन साल झालं,दादा येत नाही न्यायला. म्याच वाईट लई बोलले त्याला."तीन वर्षांपूर्वी असाच भाऊ हिरोजी बहिणींना न्यायला आला. दोघी बहिणी अगदी आनंदात होत्या. इकडे त्याच दिवशी दोघींचे पती राजगडावर निघाले होते.त्यांच्या बहिणी येईपर्यंत थांबले नाहीत. बहिणी रुसल्या.थोरली बायजा म्हणाली,"आमी येस्तवर थांबल न्हाईत दोग. काय आसा खजिना घावनार व्हता. पाटील आपुन आस कशाला कुनामाग पळायचं. काय जादू केली काय माहित भोसल्यांनी."तशी सगुणा म्हणाली,"आक्का आव आज राज हायेत म्हणून लेकी बाळी माह्यारी बिनघोर जात्यात."


तशा नणंदा नाक मुरडत म्हणाल्या,"फुकटच्या लढाया कशापायी लढायच्या म्हणते मी."


सारजा आणि सगुणा गप्प राहिल्या. दोघी भावासोबत माहेरी जायला निघाल्या.
वाटेत एके ठिकाणी आदिलशाही छावणी होती.

चौकीवर हुकूम झाला,"गाडी रोको?"

हिरोजी थांबला आणि मुजरा करत सामोरा गेला,"हुजर जातेगावचे पाटील हावो आमी."

त्यावर तो हसला,"पाटील? कोण पाटील? यहाँ हम राजे है l गाडीचे पडदे उघडा."

हिरोजी हात जोडून म्हणाला,"सरकार,भनी हायेत गाडीत."

तसा तो कोतवाल हसत म्हणाला,"दो सौ मोहरा देना.फिर चले जाव."

हिरोजीने मोहरा काढल्या. इतक्यात बाजूच्या गावातील दोन पोरींना त्यांनी पकडुन आणले होते. दहा - बारा वर्षांचा पोरी भेदरलेल्या आणि घाबरलेल्या होत्या.


कोतवाल म्हणाला,"इनको कोठडी मे डाल दो l "


तेवढ्यात सारजा बाहेर आली,"थांबा,आमचं मोल दोनशे मोहरा लावल. ह्या पोरींना सोडायचं काय घेशिला?"


कोतवाल म्हणाला,"कवळा माल है l जास किंमत लागलं त्याची."


सगुणा म्हणाली"दादा आर सोडीव त्या पोरींना."

हिरोजीने सारजाला बाजूला ओढले,"आक्के आग चल हितून. अशा किती पोरींना वाचीवनार?"

सारजा त्याच्या हाताला हिसका देवून पुढे आली,"बोला कोतवाल साब, ह्या पोरींना सोडायचं काय घेशीला?"


कोतवाल तिच्या दगिण्यांकडे नजर रोखून म्हणाला,"ये सब दोगी?"


सारजा हसली,"सगुने दागिन पायजे त्याला."


सगुणा आणि सारजा दोघींनी सगळे दागिने त्याच्या हवाली केले.तसा कोतवाल ओरडला,"छोड दो उन लडकियो को l "


दोन्ही पोरी कोकराने बिलगावे तशा सारजाला बिलगल्या.

सारजा म्हणाली,"घरला जावा पोरीनो."


गाडी चालू लागली. संपूर्ण वाटेत दोघी बहिणी काहीच बोलल्या नाहीत.माहेरी आल्यावर दोघी गप्पच होत्या. दोघींनी दिवसभर आई वडिलांशी गुजगोष्टी केल्या. संध्याकाळी भाऊबीजेला ओवाळायचे होते.

ओवाळून झाले आणि हिरोजी ओवाळणी द्यायला लागला तशी सारजा म्हणाली,"दादा,धनी नव्हत म्हणून यंदा माहयारी आलु. भावाबिज कराया. पर आता आमी मागू तीच ववाळणी दे."हिरोजी म्हणाला,"काय पायजे आक्के? सोन नाण काय पायजे ते माग."

तशा दोघी बहिणी ताठ उभ्या राहिल्या,"दादा आमी जिवाजी पाटलांच्या लेकी हावोत. आमाला सोन नाण काय बी नग."


तशी भावजय पुढे आली,"वन्स आव मंग काय पायजे बोला की?"


तशा दोघी पोरी म्हणाल्या,"माह्यारच्या वाटवरची आदिलशहाची ठाणी उदवस्त कर. तवाच आमी ववाळणी घिऊ. आबा गाडी जुपा आमाला घरी पोचवा."एकही घास न जेवता लेकी सासरी परत गेल्या.
सारजा रडत असताना तिचे डोळे सगुणा पुसत होती.

तेवढयात त्यांच्या सासूबाई आल्या,"पोरींनो तुमी बराबर केलं. आग आपल राज स्वराज उभ कराचं म्हणून दिस रात राबत्यात. मंग आपुन लेकिबाळीनी तेच वाण नग का घ्याया. चला उटा सणासुदीच रडू नगासा."


सगुणा म्हणाली,"व्हय आत्याबाय. आज वन्सबाई येणार हायती."


दोघी बहिणी स्वयंपाकाला लागल्या. गव्हाच्या सांजोऱ्या, पुडाच्या वड्या,पुरणपोळ्या असा फक्कड बेत केला होता. दोघी नणंदा आल्या.पायावर पाणी घेऊन थोरली बायजा आत आली,"काय वैनी यंदा बी कुरडी का भावबीज?"


तशी सगुणा हसून म्हणाली,"आक्कासाब आव आमचा भाव हाय ना तिकड राजगडाव."


तेवढ्यात सगुणा आणि सारजाचे पती आले. दोघेही राजांच्या सैन्यात शिलेदार होते. बहिणींनी ओवाळले.


जेवायला बसणार एवढ्यात बाहेर एक स्वार ओरडत आला,"सारजाक्का आव सारजाक्का!"


सगुणा म्हणाली,"आक्के आग ह्यो तर गोमाजी बाबाचा आवाज."


तशी सारजा बाहेर धावली. म्हातारा गोमाजी वाडा ओलांडून धावत आला होता.सगुणााने लगेच गूळ पाण्याचा तांब्या गोमाजीच्या हातात दिला.

पाणी पिल्यावर तो खाली बसला आणि म्हणाला,"आक्के तुजा शबुद खाली पडू दिला न्हाय. माज्या हिरोजिन समद्या चवक्या मारल्या. तुंबळ लडाई झाली."


सगुणा म्हणाली,"दादा कसा हाय काका?"


गोमाजी हसला,"आग वाघाचा बछडा हाय. चार दोन घावानी काय हुतय. लेकिनो म्या मुराळी आलोय. पावन पोरिस्नी धाडून द्या."तसे जानकोजी पाटील पुढे झाले,"गोमाजी बाबा आजची रात रहावा आन उद्या खुशाल घिऊंन जावा पोरीसनी."दुसऱ्या दिवशी सकाळी सारजा जात्यावर बसली आणि आपसूक ओवी बाहेर पडली.


बंधू माझा शिलेदार
राजगडाच्या राजाचा
लेक जानकु पाटलाचा
आब राखी मह्याराचा.त्यावर सगुणा लगेच पुढे म्हणाली
बंधू राजस देखणा
सये बाई ग आईक
माझा ग बंधुराजा
शिवबराजाचा पाईक.दोघी लेकी माहेराला आल्या. यंदाची भाऊबीज हसरी खेळती झाली होती.

ओवाळून झाल्यावर सारजा म्हणाली,"दादा,राग नग धरुस र. पर आपल्या मुलुखात लेकिबाळी आपुन पाटलांनी जपायच्या. आस राज सांगत्यात."


हिरोजी हसत म्हणाला,"आक्के आग ह्या हिरोजीची मान ताठ हाय तुमच्या दोघींमुळ. अशा पाठच्या भणी हायत तवर स्वराज्य वाढत जाणार बग."


आज लेकिंचे माहेर आनंदी होते. प्रकाशाने झळकत होते अगदी राजगडासारखे.
टीप: सदर कथा काल्पनिक आहे. जसे मावळे लढले. तशा त्यांच्या लेकी सुना पोरीबाळीसुद्धा स्वराज्यासाठी झटत होत्या हेच सांगायचा हा छोटासा प्रयत्न.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune A Writer,A Poet An Anchor

//