Login

भाऊ माझा पाठीराखा भाग ३ अंतिम

नात भावा बहिणीच


सारिकाला जाळून मारण्याच्या प्रयत्नात सासू नवरा आणि सासरे या तिघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आणि त्या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ज्योती मात्र खूप दुखावली गेली होती. लेकीचा त्रास तिला समजला नाही इतके वर्ष तिने काही न बोलता घरच्यांना कोणी बोल लावू नये म्हणून मुकाट्याने सगळ सहन करत राहिली. आता तिला तिच्या लेकीला सक्षम बनवायचं होत.

"अहो.. ऐकलत का? मी विचार केला आहे आपण आपल्या सारिकाला पोलिसात भरती करूया. मला माहित आहे हा काही खाऊ नाही बोलून काही होत नाही पण आपली सारिका मेहनती आहे. जे तिच्यासोबत झालं ते आणखी कोणासोबत होऊ नये. जश्या आपल्या पाठी आपल्या पोलीस ताई उभ्या होत्या तशीच मला आपली लेक इतर लेकींच्या पाठी तिने खंबीरपणे उभी राहिलेली बघायची आहे. तिचा आत्मविश्वास खचला आहे तो नव्याने उभारी घेईल. तुम्हाला काय वाटत?" ज्योती

"तुझ म्हणणं मला पटतय..पण तिला पण विचारुया आपण." पुरुषोत्तम राव बोलत होते.


"बाबा आई .. मी तयार आहे. गेल्या जन्मात नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल मी म्हणून माझा विचार करणारे आईबाबा आणि माझा पाठीराखा भाऊ मला या जन्मी भेटले... माझ्या पाठी खंबीरपणे उभे राहिले. आई बाबा मी तयार आहे.

गावातल्या पंचांनीपण सारिकाला उत्तम साथ दिली. गावातल्या पोलिस ताईंनी पण सारिकाला खूप मदत केली. अभ्यासक्रम नीट समजावून सांगण्यापासून ते ट्रेनिंग पर्यंत सगळ्या प्रवासात अख्ख गाव सारीकाच्या सोबत होत. अखेर सगळ्या स्पर्धेत सारिकाने उत्तम कामगिरी करून तिला हवी असलेली पी.एस. आय ची पोस्ट मिळवली. तिच्या आईच्या जन्मदिनी ती पी.एस.आय झाली आणि ज्या आईने पोटच्या लेकी सारखी सांभाळून तिला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा दिला तीच स्वप्न तिने आज पूर्ण केलं याचा तिला जास्त आनंद झाला. ट्रेनिंग संपवून सारिका तिच्या गावी आली. तिच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव वेशीवर आल होत. सारिकाच्या कर्तुत्वाने सगळ्यांचा उर भरून आला होता. सरपंचांनी तिच्या गळ्यात गुलाबांच्या फुलांचा हार घातला. ढोल ताश्याच्या गजरात सारिका स्टेज वर आली आणि हातात माईक घेतला.


"काय बोलू? बोलायला खरतर शब्दच नाहीत आणि शब्द फुटले तरी ते अपूर्ण पडतील. सगळ्यांचे मनापासुन आभार.. तुम्ही सगळे माझ्यासठी सख्ख्यापेक्षा जास्त आहात. आई बाबा.. तुमचे ऋण मी कधीच नाही फेडू शकत. माझी आई गेल्यानंतर मला माझ्या शाळेतल्या सगळ्या मैत्रिणी बोलायच्या \" सावत्र आई खूप छळ करते,त्रास देते \" मला पण वाटल होत माझ्या बाबतीत पण तेच होईल; पण नाही. माझ्या बाबतीत अगदी उलट झाल. माझ्या सख्ख्या आईप्रमाणे या आईने मला सांभाळलं.. मला जपल आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. माझ्या बाबांनी पण मला खूप पाठिंबा दिला. पण माझा खरा पाठीराखा तर माझा भाऊ आहे. तो जर त्यादिवशी आला नसता तर आता मी इथे उभी नसते." सारिकाच्या डोळ्यात पाणी जमल होत.


"श्री... ये वर..."सारिका श्रीधरला स्टेजवर तिच्या जवळ बोलावते. श्रीधर स्टेजवर येतो. सारिका तिच्या गळ्यातील मेडल काढून भावाच्या गळ्यात घालते आणि त्याला घट्ट मिठी मारते.

आज मी इथे माझ्या या भावामुळे आहे. त्याने जर त्यादिवशी येऊन माझी सुटका केली नसती तर मी इथे नसते. माझ्या सोबत होणाऱ्या गोष्टी मी सांगू शकत होते पण माझ्या हयात नसलेल्या आईने एकदा म्हंटलेल मला पुसटस आठवत होत. \" आपल्या आई बापाला नाव ठेवेल अशी आपली लेक कधीच वागणार नाही हो लग्न झाल्यावर \" हे शब्द कानात घुमत होते म्हणून मी कधीच काही सांगितल नाही पण आज त्या सगळ्या गोष्टींवर मात करून मी इथवर आले. सगळ्यांचे खूप खूप आभार. मी तुम्हा सगळ्यांची आयुष्यभर ऋणी राहीन. धन्यवाद.....

सारिका श्रीधर सोबत स्टेजवरून खाली उतरते आणि आई बाबांना मिठी मारते. डोक्यावरची तिची मानाची टोपी ती बाबांच्या डोक्यावर चढवते आणि आईच्या गळ्यात स्वतःचा हात गुंफून तिला घट्ट मिठी मारते. सगळे गावकरी टाळ्यांच्या कडकडाट करतात.

समाप्त...
@श्रावणी लोखंडे.

🎭 Series Post

View all